रेमिडी जयमधील क्रांतिकारी बदल!

3
26
_RemedyJaymadhil_KrantikariBadal_1.png

मला शिकवण्याची खूप आवड; त्यामुळे मी माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम चालू केले. माझ्याकडे जागेची अडचण आहे. त्यामुळे मी मोजके विद्यार्थी घेऊन ते काम करत असते. इयत्ता पाचवीचा विद्यार्थी जय संजय भोसले त्याच्या आईसोबत अॅडमिशनसाठी 2013 च्या जुलै महिन्यात आला.

जयच्या आईने मला जयबाबत सर्व माहिती सांगितली. आईचे बोलणे पूर्ण होताच मी माझ्या काही अडचणींमुळे त्यांना प्रवेश नाकारला. त्या उदास होऊन निघून गेल्या. त्या एका महिन्यानंतर पुन्हा घरी येऊन विनवणी करू लागल्या. मी माझ्याकडील एखादा विद्यार्थी कमी होताच जयला बोलावून घेईन अशी हमी त्यांना दिली. त्या दरम्यानही, त्याची आई माझ्या संपर्कात राहिली.

मी शाळेचे अर्धे सत्र संपताच त्याच्या आईला कॉल करून ‘जयला शिकवण्याची जबाबदारी घेते’ असे सांगितले. त्याची आई ते ऐकताच अत्यानंदित झाली. तिने माझ्यावर धन्यवादाचा वर्षाव केला!

जयने जेव्हा क्लासला येण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला अभ्यासाची बिलकूल आवड नव्हती. अभ्यासाव्यतिरिक्त बोलण्यास त्याला आवडायचे. तो खेळापासून ते शाळेतील गंमतीजमती सांगण्यास सुरुवात करायचा. जय लाघवी, मनमिळावू आहे. तो डॉ. अँथोनिया  डिसिल्वा शाळेत जातो. त्याला शिकवताना माझ्या लक्षात आले, की जय हा रेमिडी विद्यार्थी आहे. मला त्याची काळजी वाटू लागली. मी त्याच्या आईशी बोलले. जयचा बुद्ध्यांक आणि अभ्यासाची जाण कमी प्रमाणात आहे याची कल्पना तिला दिली. त्या दुःखी झाल्या. मी त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले. मी त्याला माझी शिकवणी मात्र चालू ठेवली. मी आईला धीर देत म्हटले, त्याला दोन वर्षांनी समज येईल पण आपल्याला डॉक्टरी इलाज चालू ठेवावे लागतील. जयला आणि त्याच्या आईला माझे म्हणणे पटले. मी आणि डॉक्टर यांच्या सल्ल्याने जयचा शैक्षणिक प्रवास चालू आहे. जयला सुरुवातीला वाचन जमत नसे. तो अक्षरांची जुळवाजुळव करून शब्द बोलत असे. लिखाण तर बिलकुल होत नाही. शाळेतील बार्इंची तर त्याकरता नेहमीच तक्रार असे. वह्या पूर्ण नाहीत, पाठांतर करत नाही वगैरे. मी एके दिवशी त्याला विचारले, “अरे तू अभ्यास का करत नाहीस?” त्यावर त्याने सहज उत्तर दिले, “मला अभ्यास करण्यास आवडत नाही. माझे मित्र मला ढ म्हणतात.”

मला त्याच्या मनातील सल कळली. त्याला भोवतालच्या परिस्थितीचा त्रास होत असे, मग तो खूप चिडचिड करतो. त्याचा हायपरनेस इतका असतो, की तो स्वतःला सांभाळू शकत नाही. ती स्थिती त्याच्या चेहऱ्यावर, डोळ्यांत दिसून येते, अशा वेळी औषधांचा परिणाम होण्यासही वेळ लागतो. कधी-कधी, त्याच्या तशा स्थितीला आम्हाला दोन-तीन दिवस सामोरे जावे लागते. तो हळूहळू शांत होत जातो, मग त्यामागील कारण सांगतो. मी त्याला यावर मात करण्याचा उपाय म्हणजे तू अभ्यासात त्या सगळ्यांना मागे टाक. म्हणजे बघ ते तुझे मित्र बनतील असे सांगितले. पण त्याचा बुद्ध्यांक त्यासाठी कमी पडतो. मी त्याची प्रगती कशी होईल याचा सतत विचार करत असते. माझ्यासमोर त्याला घडवण्याचे एक आव्हानच असते!

रेमिडी स्टुडंटसाठी वेगळ्या शिक्षकांची निवड केली जाते. त्यांची अभ्यास घेण्याची पद्धत वेगळी असते. तशा मुलांच्या बौद्धिक टक्केवारीनुसार त्यांना परीक्षेसाठी जास्त वेळ आणि रायटर दिला जातो. त्यासाठी नायर हॉस्पिटल, मुंबई येथे स्पेशल वर्ग चालवले जातात.

जयसाठी नायर हॉस्पिटल येथे दोन टेस्ट घेतल्या गेल्या. मी मात्र जयला इतर विद्यार्थ्यांप्रमाणे शाळेत सन्मान मिळेल, त्याची अभ्यासाची आवड वाढेल यासाठी मेहनत घेणे चालू ठेवले आहे. मी त्याला क्लासचे वेळापत्रक आखून दिले. दोन तासांच्या त्या दरम्यान एक तास वाचन आणि एक तास लिखाण करायचे. वाचन मात्र माझ्यामागून तो करत असे. तर लिखाण करताना मी बोलायचे आणि त्याने लिहायचे. त्यात वाक्यातील स्पेलिंग सांगणे, व्याकरणाची चिन्हे घालणे या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. या पद्धतीचा जयला फायदा झाला. जयचे ऐकणारे कान आता लिहिते झाले. शब्दांची कल्पना स्पष्ट झाली आणि मुख्य म्हणजे त्याची एकाग्रता वाढली. अजूनही मी तीच पद्धत वापरते. त्यामुळे तो शाळेतील बार्इंनी काय शिकवले? त्याला काय कळले नाही?, प्रकल्पाविषयी चर्चा यांविषयी बोलू लागला. त्याच्या बोलण्यात मृदुता आली. त्याला अभ्यासाविषयीची चिंता वाटू लागली. वेळेचे महत्त्व कळले. तो प्रश्नांची उत्तरे सखोल समजावून घेऊ लागला.

जयला त्याच्यातील सकारात्मक बदल आणि डॉक्टरांचे औषधी उपचार यांचा फायदा झाला. त्याची बौद्धिक आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे.

सातवीच्या रिझल्टच्या दिवशी जयचा मला फोन आला. जयने आनंदवार्ता दिली, की “टीचर, मला रिटेस्ट लागली नाही. मी चांगल्या गुणांनी पास झालो!” माय-लेक दोघेही त्या दिवशी खूप खूश होते. मला जयची आवड-निवड सहवासातून कळली होती. म्हणून मी त्याच्या आईला जयला आठवीत टेक्निकलला अॅडमिशन करूया असे सुचवले.

आमच्या टेक्निकलच्या निर्णयाने जयच्या शैक्षणिक यशाला कलाटणी मिळाली. जयची शाळा बदलली. त्याला नवे वातावरण, नवे शिक्षक, नवा मित्रपरिवार मिळाला. त्या वातावरणात तो चांगलाच खुलला. तो शाळेतील स्पर्धांमध्ये भाग घेतो. तेवढेच नाही तर त्याला अभ्यासाची आवड निर्माण झाली आहे. त्याचे उदाहरण म्हणजे आठवीच्या पहिल्या घटक चाचणीत इतिहास विषयात जयला पंचवीसपैकी चोवीस गुण मिळाले आणि सहामाही परीक्षेत बासष्ट गुण मिळाले.

हाच तो जय, जो पास होतानाही नाकी नऊ यायचे, पण आता परिस्थिती बदलली आहे. जयने यश खेचून आणले आहे. त्याने त्याच्यातील न्यूनतेवर मात केली आणि तो इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सबळ, हुशार आहे अशी पोचपावती दिली. तो पुढील शैक्षणिक वाटचालीकडे झेप घेत आहे.

जय, तुला उज्ज्वल यश लाभो ही माझी मनोकामना!

– मनीषा कदम

About Post Author

Previous articleचरखा चला चला के….
Next articleहिवरे गाव – समृद्धीकडून स्वयंपूर्णतेकडे!
मनीषा रामचंद्र कदम यांनी एम.ए., एम.लिब.चे शिक्षण घेतले आहे. त्या ग्रंथपाल प्रमाणपत्र परीक्षा मंडळ, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ग्रंथालय सहाय्यक म्हणून ‘नरसी मोंजी इंस्टीटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’, ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ येथे काम केले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ, मुंबई येथे सहाय्यक संपादक म्हणून काम केले आहे. त्यांनी ‘भारत कॉलेज ऑफ फाईन आर्ट’, मुंबई येथे ग्रंथपाल पदी काम पाहिले आहे. कदम यांनी विविध कोशांमध्ये सहाय्यक संपादक म्हणून काम पहिले आहे. लेखकाचा दूरध्वनी 7506027287

3 COMMENTS

  1. खूप सुंदर. मुलांचे…
    खूप सुंदर. मुलांचे मानसशास्त्र अध्यापक महाविद्यालयात शिकवले जातेच. पण हल्ली स्वयंअर्थसहाय्यीत व विनाअनुदानीतच्या जमान्यात उपाशी शिक्षकांना पोटाची भ्रांत आहे. नोकरीची शाश्वती नाही. इंग्तारजी माध्यम शाळांत काय सरु आहे.चकचकीत, टकटकीत शाळा दुरुन डोंगच ठरत आहेत. या स्थितीत हे उदाहरण आदर्श व अनुकरणीय आहे. तर काँर्पोरेट स्कूल सुरु होतील.

  2. Congrats Teacher khup sundar…
    Congrats Teacher khup sundar lekh ahe. Tumhi mulana khup chan samjun gheta. Tumchi mulana shikvnyachi paddhat khup chan ahe. Mazya mulila urvi la yacha khup fayda zala ahe.tumchya mule tila abhyasachi aavad nirman zali ahe.tumchya sarakhe teacher asha sarv mulana milale tar ti mule kuthe mage padnar nahit.etar mulanchya barobarine pudhe jatil.kharch teacher tumche praytn khupach sundar ahet..

Comments are closed.