रा. चिं. ढेरे – महासमन्वयाची ओळख

_Ra_Chi_Dhere.jpg

डॉ. रा. चिं. ढेरे यांना ‘त्रिदल फाऊंडेशन’च्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार डॉ. एस. एल. भैरप्पा आणि महेश एलकुंचवार यांच्या हस्ते २०१० साली प्रदान करण्यात आला होता. त्या समारंभात डॉ. ढेरे यांनी केलेले त्यांचे आत्मकथनात्मकवजा समग्र हे भाषण.

*****

‘त्रिदल फाऊंडेशन’च्या वतीने मला माझ्या ध्यासभूमीच्या, कर्नाटकाच्या, म्हणजेच दक्षिण भारताच्या मातीतील फार मोठ्या साहित्यकाराच्या हातून ‘पुण्यभूषण’ पुरस्कार दिला जात आहे आणि माझ्या जिव्हाळ्याच्या परिवारातील एक प्रतिभावंत मराठी साहित्यकार माझ्याविषयीच्या प्रेमाने त्यासाठी येथे उपस्थित आहे, हा माझ्यासाठी आनंदाचा योग आहे.

माझी मूळ माती मावळची आहे, पण पुण्याने मला माझ्या तेरा-चौदा वर्षांच्या वयापासून गेली सहासष्ट वर्षें ज्ञानाचा फाळ लावून नांगरले आहे आणि आज आलेल्या पिकाचे कौतुक करण्यासाठी, सोन्याच्या नांगराने पुण्यभूमी नांगरणाऱ्या शिवरायांची प्रतिमाच ‘त्रिदल’ने मला दिलेली आहे! मनात आनंद आहे आणि संकोचही आहे. मी सभासंमेलने आणि भाषणे यांच्या वाटेला फारसा गेलेलो नाही. मी सार्वजनिक क्षेत्रातील वावरही शक्यतो टाळत आलो आहे. लेखन-संशोधन हीच माझी आवडीची, आग्रहाची आणि समाजसंवादाची मुख्य वाट राहिली आहे.

मी व्यासपीठावर फार क्वचित आलो आहे आणि थोडेबहुत बोललो आहे. पण मला त्या अपवादप्रसंगी फार संकोचल्यासारखे, अवघडल्यासारखे वाटत आले आहे. माझ्यामध्ये आहे तो अंदर-मावळातील एका अगदी लहानशा खेड्यातील एक सामान्य मुलगा. तो मुलगा सहासष्ट वर्षें पुण्यात घालवल्याने पुण्यावर प्रेम करत असला, तरी पुण्यातील नागर जीवनाला सरावलेला नाही. माझ्यासाठी उन्हाळ्यात अनवाणी पायांनी माळरानावरच्या शेण्या वेचणे किंवा झाडाच्या वाळक्या काटक्या गोळा करून, त्या आजीला स्वयंपाकासाठी आणून देणे हे तसे सोपे होते. पावसाळ्यात स्वत: इरली विणून रानभाज्या खुडून आणणे किंवा भातकापणी झाल्यावर खाचरातील सरवा गोळा करून आणणे सोपे होते. आजारी मामांऐवजी देवळात जाऊन पोथ्या-पुराणे वाचणे सोपे होते. पण तिथून निघून, म्हाताऱ्या आजीचे बोट धरून चाललेल्या धाकट्या बहिणीच्या पाठोपाठ, आजारी मामांसोबत शहर पुण्यात पहिले पाऊल ठेवताना छातीत जी धडधड झाली होती आणि नळाच्या तोटीतून धो-धो पाणी अचानक येताना पाहिल्यावर जो धसका बसला होता, तो धसका आणि ती धडधड अजून, ऐंशीव्या वर्षीही माझ्या मनात कायम आहे.

‘शाकुंतल’ नाटकात दोघे ऋषिकुमार कण्वांच्या शकुंतलेला राजाघरी पोचवण्यासाठी जातात. रानावनात वाढलेल्या त्या कुमारवयीन मुलांना राजधानीत प्रवेश केल्यावर आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या परिसरात पाय ठेवल्यासारखे वाटते. मी शहराबद्दलची माझी खरी भावना उघड करणारा तो प्रसंग दृष्टांत म्हणून गमतीने इतरांना सांगत आलो आणि आता, ‘पुण्यभूषण’ पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यात बॉम्बस्फोट झाला, हा कसला योगायोग आहे? मी हे शहर आगीच्या ज्वाळांनी वेढले जाण्याच्या अवस्थेपर्यंत खरोखरीच पोचेल अशी कल्पनाही केली नव्हती. माझ्या कल्पनेतील पुणे वेगळेच होते. मी आठ-नऊ वर्षांचा असताना देवराम अभंग नावाच्या माझ्या शिक्षकांच्या तोंडून पुण्याचे वर्णन खूप ऐकले होते. तेव्हा मित्राला पत्र लिहित आहे, अशी कल्पना करून, माझ्या कल्पनेतील पुण्याविषयीचा निबंधही लिहिला होता. पुण्याला जाण्याची तेव्हा विलक्षण ओढ वाटे; प्रत्यक्षात पुण्याला आलो तेव्हा थोडे कपडे आणि भांडी यांचे ओझे बरोबर होते. भर माध्यान्हीच्या उन्हात पाय पोळत होते आणि शनिवारवाड्याची प्रचंड भिंत पाहून जीव दडपला होता.

पुढे मात्र, याच पुण्याने मला अक्षरश: मातीतून वर काढले. काहीच नव्हते माझ्याजवळ. जन्मतारखेचा दाखला नव्हता, की कोठलीही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नव्हते. पण त्यावेळच्या अत्तरदे नावाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी माझी केवळ तोंडी परीक्षा घेऊन मला पाचवीच्या वर्गात प्रवेश दिला. मी दोन-दोन इयत्तांचा अभ्यास एकेका वर्षांत करत गेलेली वर्षें भरून काढली आणि दिवसा पोटापाण्याचे उद्योग धुंडाळत सरस्वती मंदिर रात्रशाळेतून शिक्षण पूर्ण केले.

मला त्या काळात भेटलेल्या कितीतरी शिक्षकांची आठवण येते. ते शिक्षक शिक्षण माणसाला घडवते याचा अनुभव देणारे होते. त्यांनी नुसती पाठ्यपुस्तके शिकवली नाहीत, तर मला जगण्यास शिकवले-चांगल्या गोष्टींचा ध्यास लावला. मला बोरकर गुरूजी म्युनिसिपालिटीच्या आठ नंबरच्या शाळेत भेटले. त्यांच्यामुळे मला कवितेची गोडी लागली. मला बोरकर गुरूजींमुळे मन पाझरत ठेवणाऱ्या, यक्षिणीच्या त्या अद्भुत कांडीचा स्पर्श झाला आणि मी दु:ख- दारिद्र्याचा विसर पाडणाऱ्या एका विलक्षण जगात प्रवेश करू शकलो. पुढे, मीही कविता लिहिल्या, स्तोत्रे आणि आरत्या लिहिल्या, मित्रांबरोबर ‘सविता मंडळ’ स्थापन केले, नभोवाणीसाठी संगीतिका लिहिल्या.

संशोधनाकडे वळल्यावर मात्र कविता लिहिणे थांबले, बोरकर-माडगूळकरांबरोबरच्या खासगीत रंगणाऱ्या मैफिली थांबल्या, पण कविता सोबतीला राहिलीच. ती माझ्या शैलीचा अविभाज्य भाग बनली. ती अर्थातच स्वाभाविक गोष्ट होय. पण त्याहीपेक्षा तिने दिलेले मोठे देणे म्हणजे संशोधन आणि तोही एक प्रातिभ-व्यापारच असतो याची जाणीव.

केवळ माहितीचे भारे जमवणे म्हणजे संशोधन नव्हे. अनेकदा, माहितीच्या संकलनाचे असे काम काही क्षेत्रांत, काही पातळ्यांवर आवश्यक असते आणि महत्त्वाचेही असते. पण शेवटी संदर्भाचे दुवे जुळवत, त्यातून विषयाच्या-व्यक्तींच्या, काळाच्या आकलनापर्यंत पोचणे ही प्रतिभाबळानेच घडणारी गोष्ट असते. कवितेने मला संशोधनाच्या प्रांतातही सर्जनाशी कायम बांधून ठेवले. तिने मला तर्ककर्कश होऊ दिले नाही, भावात्मतेपासून दूर जाऊ दिले नाही आणि विरोधाला निकराने तोंड देण्याची वेळ आली, तेव्हाही स्वत:ला सापडलेल्या सत्याला सोडून जाऊ दिले नाही. नव्या-जुन्या कविता पुष्कळ सोबत करत असतात, भरवसा देत राहतात.

सत्याच्या जातीला दु:ख असे मिळणारच

दु:खातून करुणेचे मर्म सहज कळणारच

अशी मुक्तिबोधांची कविता आहे. कवितांचे असे दिलासे माझ्या वाटेवर सारखे भेटत राहिले. मी निवडलेले अभ्यासाचे क्षेत्रच असे आहे, की तेथे आत जायचे तर मानव्याच्या महाद्वारातून जावे लागते. माझे संतपरंपरा आणि लोकपरंपरा हे अभ्यासाचे विषय. मला माझ्या लहानपणाचे भान त्या अभ्यासाने दिले, त्याची खंत मिटवली आणि मोठ्या गोष्टींचा ध्यास लावला; ज्ञानाचे अपारपण दाखवले, अखंडत्व दाखवले, उदारपण दाखवले आणि समन्वयाचा साक्षात्कार घडवला.

मी माझी अभ्याससाधने, अभ्यासक्षेत्रे आणि अभ्यासदिशा विविध ज्ञानशाखांचा समन्वय करतच विस्तारू शकलो. सर्वसामान्य माणसांविषयीचे प्रेम हा येथील लोकपरंपरेचाच नव्हे तर संतपरंपरेचाही गाभा आहे. मी त्या गाभ्याशी जाण्याची वाट सिद्ध करू शकलो आणि मला तेथपर्यंत पोचल्यानंतर, तेथील सार्वजनिक जीवनात न वावरताही माणसांचे अलोट प्रेम मिळाले. माझ्यासारख्या पोरकेपणाचा अनुभव घेतलेल्या, वेदनांनी पोळलेल्या आणि व्यवहारात अडाणी राहिलेल्या माणसासाठी या प्रेमाचे मोल किती आहे ते कसे सांगू? मला माझ्या दुबळेपणासकट आधी पुण्याने आणि मग सगळ्याच मराठी जगाने स्वीकारले. मर्यादांसकट स्वीकारले. अगदी फाटका माणूस होतो मी; जवळजवळ रस्त्यावर वाढत होतो; पण आबासाहेब मुजुमदार, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, दत्तो वामन पोतदार अशा त्या काळाच्या पुण्यातील थोर शास्त्री-पंडितांनी माझ्यासारख्या दरिद्री, अल्पवयीन आणि अल्पज्ञानी मुलाला अगदी सहज जवळ केले.

पुणे हे माझी ज्ञानाची भूक वाढवणारे आणि पुरवणारे एक मुक्त विद्यापीठ झाले. मोठ्या माणसांचे दर्शन घडवणारे आणि मला माझ्या ज्ञानधर्माची दीक्षा देणारे महाकेंद्र झाले. त्या शहरानेच मला सामान्य माणसांमधील भलेपणाचा आणि सामर्थ्यांचा अनुभव दिला. खऱ्या समाधानाची, अंतर्ज्योत पेटवणारी पुस्तके आणि त्या पुस्तकांतून भेटणारे कित्येक महान लेखक, कवी, चिंतक मला येथेच सापडले. मी सहासष्ट वर्षांपूर्वी येथे येताना जो कोणीच नव्हतो, तो येथे येऊन अभ्यासक झालो, संशोधक झालो आणि मुख्य म्हणजे माणूस झालो! पुण्याचे माझ्यावर हे ऋण आहे.

खरे तर, आता मागे वळून पाहताना, मला वाटत आहे, की ऐंशी वर्षांच्या आयुष्यात मी केलेले सगळे लेखन म्हणजे ऋणमुक्त होण्यासाठीचे एक तर्पण आहे!

ते तर्पण वडील गेल्यानंतर तेराव्या दिवशीच, प्रायोपवेशनाने स्वत:ला संपवून, अवघ्या एकविसाव्या वर्षी, स्त्रीत्वाच्या कणखर निग्रहाचे दर्शन घडवणाऱ्या माझ्या आईला आणि भागवतधर्माचे सार जगणाऱ्या, गावकुसाचा आधार बनलेल्या माझ्या आजीला आहे. ते तर्पण इतिहासरचनेची दृष्टी मला देणाऱ्या आणि सामाजिक-सांस्कृतिक अभ्यासातील मिथकांचे सामर्थ्य माझ्यासमोर उलगडणाऱ्या राजवाड्यांना आहे. ते तर्पण मला समन्वयाची दृष्टी आणि समग्रतेचे भान देणाऱ्या न्यायमूर्ती रानड्यांना आहे. ते तर्पण लोकपरंपरेच्या अभ्यासाचा पैस दाखवणाऱ्या कर्वे-चापेकरांना, ज्ञानाचा प्रचंड विस्तार पेलू पाहणाऱ्या भारताचार्य वैद्यांना, चित्रावांना, इरावतीबार्इंना, तर्कतीर्थाना आणि माझ्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या दादा पोतदारांना आहे. मी तर्पणाची भाषा करत आहे म्हणून कोणी माझ्यावर परंपरावादी धार्मिकाचा आरोप करेलही, पण मी आयुष्यभर परंपरा आणि परिवर्तन यांची सहृदय तरी निर्भय चिकित्सा करत आलो आहे. मी सश्रद्ध माणूस आहे; श्रद्धेचे सामर्थ्य अनुभवाने जाणणारा माणूस आहे. पण मी आयुष्यभर रूढ कर्मकांडापलीकडे जाण्याचा आणि ज्ञानदेवांच्या ‘कर्माचे डोळे ज्ञान, ते चोख होआवे’ या इशाऱ्याला सजगपणे स्वीकारत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आलो आहे.

मी श्रद्धेची तपासणी करण्याची वेळ आली तेव्हा ती करण्यास कधी कचरलो नाही आणि मी सांप्रदायिक श्रद्धांनी घातलेल्या मर्यादा ओलांडून, संशोधनाने समोर ठेवलेल्या सत्याकडे जाताना कधी पाऊल मागे घेतले नाही. मी लेखन धर्मकार्याइतक्या निष्ठेने करत राहिलो आहे; किंबहुना माझा स्वधर्म लेखन-संशोधन हाच राहिला आहे.

खरे म्हणजे धर्म किंवा जात हा शब्द उच्चारणेही आज अवघड झाले आहे. धर्मद्वेषाचा आणि जातिद्वेषाचा उठलेला गदारोळ कमालीचा क्लेशकारक आहे. आपण जाती मिटवण्याची भाषा बोलत, जातीयवादच धगधगत ठेवत आहोत; निधर्मी राष्ट्रवादाची भाषा बोलत धार्मिक अहंतांना आणि स्वतंत्र प्रादेशिक अस्मितांना खतपाणी घालत आहोत.

आपण धर्माची सांगड नीतीशी कायम घालत आलो आहोत. ती धर्माधिष्ठित समाजव्यवस्थेत स्वाभाविक प्रक्रिया होती. पण आपण धर्म नवसमाजरचनेचा प्रयत्न करताना दूर सारला, तशी नीतीही दूर सारण्याची अक्षम्य चूक केली आहे. धर्म कोणताही असो किंबहुना धर्म असो किंवा नसो, नैतिकता ही माणसाच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक चारित्र्याचे संवर्धन करणारी गोष्ट आहे. त्याच्या सामूहिक जगण्याचे निरोगी नियमन-संगोपन करणारी शक्ती आहे. त्या नैतिकतेचा सर्व क्षेत्रांमधील पाडाव कोणाही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारा आहे.

ज्ञानाचे क्षेत्र कमालीचे गढूळ आणि अशुद्ध झाले आहे. मी लोकपरंपरा आणि संतपरंपरा यांच्याइतक्याच आस्थेने एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन-परंपरेचा विचार करत आलो आहे. त्या परंपरेत उदयास आलेल्या प्रखर विवेकवादाकडे स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राने पाठ फिरवली आहे. मी ते पाहत असताना कमालीचा व्यथित झालो आहे. गावाकडे शिमग्याची सोंगे निघायची. ती सर्वसामान्य माणसाचा शीणभाग घालवणारी निरागस, उत्सवी मौज होती. पण समोर नाचताना दिसत आहे ती ज्ञानवंतांची सोंगे घेऊन वावरणारी सामान्य वकुबाची विषारी महत्त्वाकांक्षा, स्वार्थांध स्पर्धावृत्ती आणि फुटीरतेला पोसणारी विकृती.

राजवाड्यांच्या निरीक्षणाचा, जिज्ञासेचा आणि विश्लेषणाचा वारसा मिळालेल्या अभ्यासकांच्या पिढ्या याच पुण्यात माझ्यामागे उभ्या असत. तेव्हा जातीजमातींचा विचार म्हणजे आपला समाज समजावून घेण्याचे साधन वाटायचे. एखाद्याची जात समजली, कुलदैवत समजले किंवा ग्रामनाम समजले तरी बहुजिनसी मराठी समाजातील माणसांच्या स्थलांतरांची, उपजीविकांची, जीवनशैलीची, स्वभाववैशिष्ट्यांची आणि गुणधर्माची ओळख पटत जायची. एकूणच, समाजाची सामाजिक-सांस्कृतिक घडण समजत जायची. माणसे समजून घेण्याची ती एक वाट होती. त्या वाटेवरून चालताना भूतकाळाच्या निबिड अंधारातून, संस्कृतीची न समजलेली-न दिसलेली अस्तित्व-प्रयोजने उजेडात आणताना मानवी जीवनाच्या अर्थपूर्णतेजवळ जात राहिल्याची भावना मनात असायची. माझे सगळे संशोधन त्या भावनेने भारलेल्या अवस्थेत झाले आहे. संप्रदायांचा समन्वय, उपासनांचा समन्वय, सामाजिक- प्रादेशिक धारणांचा समन्वय – विसंगतीचे आणि विरोधाचे विष पचवत एका उदार, सहिष्णू, सहृदय आणि सत्त्वशील अशा महासमन्वयाकडे जाणे ही भारतीय संस्कृतीची आणि मराठी संस्कृतीचीही आत्मखूण राहिली आहे आणि त्या खुणेची ओळख पटवणे हेच माझ्या कामाचे अंतरउद्दिष्ट राहिले आहे.

मी माझे चित्रकार स्नेही अनंतराव सालकर यांच्या आग्रहाने, त्यांच्याबरोबर पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या भेटीला अनेकदा गेलो आहे. स्वामी तेव्हा क्षीण अवस्थेत अंथरुणावर पडून असायचे. सालकर स्वामींना एका भेटीत म्हणाले, “यांना अजून खूप काम करायचे आहे, पण प्रकृती साथ देत नाही. आजारपण सतत पाठीला लागलं आहे. यांना काही उपाय सांगा.” स्वामी किंचित हसले. म्हणाले, ‘‘लहान मूल असतं, खेळत असतं अंगणात. जोवर ते खेळात दंग असतं तोवर त्याला कशाचं काही वाटत नाही. पडणं-झडणं, खरचटणं याचं त्याला काही भानच नसतं. मग केव्हातरी आई हाक मारते. खेळ थांबतो, मूल भानावर येतं आणि आईजवळ गेल्यावर नंतर मग त्याला त्या लागण्या-पडण्याच्या वेदना जाणवून रडू येतं. पण तेव्हा काळजी घ्यायला, कुशीत घ्यायला आई असतेच. तुम्हीही एक खेळ मांडला आहे. संशोधनाचा खेळ. तो मनापासून खेळत राहा. आई बोलावून घेईल तेव्हा ती पडण्या-झडण्याच्या जखमांची काळजी घेईलच.’’

स्वामी म्हणाले ते फार खरे होते. मी एक खेळ मांडला आणि भान विसरून तो खेळत राहिलो. खेळही असा मिळाला की स्वत:ला देऊन टाकल्याखेरीज तो खेळताच येत नाही. स्वरूपानंदांचीच एक ओवी आहे – व्हावया वस्तूची प्राप्ती। साधक साधना करिती। परि ते वस्तू आहुती। साधकाचीच मागे।।

वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू. परब्रह्माचा साक्षात्कार व्हावा म्हणून साधक साधना करतात खरी, पण त्या ब्रह्माला हवे असते ते साधकाचे समर्पण. संपूर्ण समर्पण. तुमचा प्राण, तुमची आहुती त्याला हवी असते. मी माझ्या ज्ञानब्रह्मापुढे अशा आहुतीच्या तयारीने उभा राहिलो आहे.

– रा. चि. ढेरे

Last Updated On 18th Dec 2017

About Post Author