राँग थिअरी

आपण आणि आपल्या आजुबाजूचा जगरूपी पसारा याविषयी विचार करणे ही माणसाच्या आवडीची गोष्ट. लहान मूलसुद्धा स्वत:साठी त्याच्या परीने तसा विचार करत असते. अजमावत असते, की हे काय विश्व आहे – येथे काय केले जाऊ शकते… मला काय काय करता येऊ शकते… काय केले तर मजा येते… काय झाले तर धडपडायला होते… त्याला त्रास कशामुळे होतो… त्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास कधी होतो…

माणूस अनुभवाच्या प्रक्रियेतून, विचार करण्यातून मोठा होतो. त्याचे लहानपणीचे काही समज-गैरसमज कुणी न सांगता बदलतात; काही तसेच राहतात, भक्कम होतात. त्याचे आकलन घडवण्याला – स्वानुभवाच्या जोडीला इतरांचे अनुभव, काही सामुहिक माहिती (पुस्तके, वर्तमानपत्रे इत्यादी) – मदत करतात. त्या सगळ्यातून त्याचा कॉमन सेन्स किंवा सर्वसाधारण समज आकाराला येतो.

कॉमन सेन्स माणसाला जगणे सोपे करण्याला मदतशील असतो; परंतु कॉमन सेन्स सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. पसाऱ्यातील गुंता जेवढा वाढत जातो आणि जगणे जेव्हा अवघड वाटू लागते तेव्हा गुंता सोडवण्यासाठी कॉमन सेन्सच्या पलीकडचा प्रयत्न लागतो. गिरीश अभ्‍यंकर लिखित ‘राँग थिअरी’ हा तसा प्रयत्न आहे.

तो प्रयत्न का करायचा याचे उत्तर ही ‘राँग थिअरी’ या पुस्तकाची कळीची गोष्ट आहे. त्या प्रयत्नाचे उद्दिष्ट ‘मजेत राहणे’ असे आहे. ते पुस्तक ‘आपल्याला मजेत राहायला आवडतं बुवा!’ ही कबुली ज्यांना द्यावीशी वाटते त्यांच्यासाठी आहे. मजेत राहण्यासाठी मानवतील तेवढे कष्ट आणि सोसवतील तितपत धोके किंवा हानी असे समीकरण जुळावे लागते.

माणूस किंमत आणि मिळकत हा व्यवहार जाणतो. तो व्यवहार फायद्याचा – जिथे किंमत कमी किंवा परवडेलशी आणि मिळकत जास्त हे मान्य करता येते. माणसाला ज्या उलाढाली जगताना आणि जगवताना कराव्या लागतात त्यांची त्याला अशी फायद्याची मांडणी करता आली, म्हणजे कष्ट आणि हानी ही किंमत आणि सुरक्षित, आरामदायी, मजेचे जगणे म्हणजे मिळकत असे माणसाचे समीकरण त्याला मांडता येते. त्याला व्यवहार तोट्याचा दिसत असेल तर तो काय करत आहे त्याचा पुनर्विचार करता येतो आणि मुख्य म्हणजे जगणे सोपे करणाऱ्या उत्तरांपर्यंत हळुहळू पण हमखास पोचता येते ही ‘राँग थिअरी’ची मांडणी आहे.

गिरीश अभ्‍यंकरपण हे ओळखावे कसे? किती म्हणजे खूप किंवा कमी यांची व्याख्या हरेक माणसागणिक निराळी. असे असताना त्या प्रश्नाला एका पुस्तकात उत्तरे कशी शोधता येतील? तर त्याचे उत्तर असे आहे, की अशी ‘रेडिमेड’ उत्तरे किंवा सर्वांना चालतील अशी आध्यात्मिक वचने त्या पुस्तकात नाहीत. त्या पुस्तकात विश्वनियमांचा ऊहापोह आहे. विश्वनियम किंवा ‘युनिव्हर्सल लॉज’ यांची सर्वसाधारण ओळख माणसाला असते. (जसे, की गुरुत्वाकर्षण हा विश्वनियम आहे.) विज्ञानाच्या, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना त्यांची ओळख अभ्यासक्रमातूनदेखील झालेली असते. विश्वनियमांचा विचार विज्ञानाच्या, त्यातही भौतिकशास्त्राच्या बंधनात अनेक वर्षे राहिला. विश्वनियम असे म्हणताना माणूस हादेखील विश्वाचा भाग आहे आणि माणसावर देखील त्या नियमांचा प्रभाव असतो ही जाणीव अलिकडची आहे. माणसाच्या जगाचा आणि विश्वनियमांचा संबंध नेमका कशा प्रकारचा आहे हे तपासण्याचे काम फार थोड्या विचारवंतांनी केले आहे. त्यातही अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास या ‘मानव विद्या’ (ह्युमॅनिटीज्) शाखांशी त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु माणसाच्या रोजच्या जगण्याशी त्या नियमांचा काय संबंध आहे हे तेवढ्या स्पष्टपणे उलगडून सांगितलेले वाचण्यास मिळणे अवघड आहे. तशा तऱ्हेचा, खऱ्या अर्थाने मूलभूत विचार नजीकच्या मराठी समाजात होत आहे ही दखल घेण्यासारखी गोष्ट आहे.

ते नियम कोणते आणि त्यांचा व माणसाचा संबंध काय याचे विवेचन पुस्तकात आहेच. त्या नियमांच्या प्रकाशात माणूस त्याच्याकडे आणि त्याच्या आजुबाजूच्या घटितांकडे बघू लागला, की त्याला असे का? आणि तसे का नाही? या प्रश्नांची सहज पडताळता येतील अशी उत्तरे मिळू लागतात. विश्वनियम हे सार्वकालिक आणि सर्व ठिकाणी लागू होणारे असल्यामुळे त्यांना अपवाद असत नाही किंवा विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर अपवाद सापडण्याची शक्यता अतिदुर्मीळ असते. थोडक्यात, ते सूत्र समजावून घेतले असता पसाऱ्याची उकल करण्याची गुरुकिल्ली सापडते. कोणत्या प्रकारच्या घटना संभवनीय आहेत आणि नाहीत याचा माणसाला त्याच्यासाठी वेध घेता येतो. (उदाहरणार्थ, कोणीही येऊन त्याला ‘अमुकतमुक’ ऊर्जास्रोत सापडला, की आपल्याला लॉटरी लागणार आहे अशा प्रकारच्या भूलथापा सांगून बनवू शकत नाही.) असंभवनीय गोष्टींच्या मागे लागून माणसाला महत्त्वाचा वेळ, कष्ट आणि तज्जन्य हानी टाळता येते. इतरांना त्याच्यामुळे त्रास होण्याचा संभव कमी होतो. संघर्ष आणि तडजोड या दोन्हींपासून त्याला लांब राहता येते. जगणे सोपे करणाऱ्या त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे वेगळे पटवून देण्याची गरज नाही.

‘राँग थिअरी’ हे पुस्तक तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातील नेमका संबंध ओळखण्याला मोलाची मदत करते. तंत्रज्ञानाचे नेमके स्वरूप ओळखता आले तर त्याला डोक्यावर बसवणे आणि तंत्रज्ञान अजिबात न वापरण्याची भाषा करणे ही दोन्ही टोके टाळता येतात. तंत्रज्ञानाकडे डोळसपणाने बघता येते. तंत्रज्ञानाच्या अंतरंगाचा तसा वेध पुस्तकात घेतला आहे, की त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आणि तंत्रज्ञाला, दोघांनाही त्याचा अचूक बोध व्हावा.  मुख्य म्हणजे स्वत:साठीचे लहानमोठे निर्णय नियमांच्या प्रकाशात घेता यावेत यासाठी ते पुस्तक उद्युक्त करते.

पुस्तकाची सुरुवात जरी ‘माणूस आणि त्याच्या आजुबाजूचे जग’ अशी होत असली तरी शेवटाकडे लेखक ‘मी’पर्यंत येतो. माणूस ही प्रजाती म्हणून माणसा- माणसांत असलेला सारखेपणा ओळखून सुरुवातीचे विवेचन केलेले असले तरी ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हेदेखील खरे. त्यामुळे सर्वांनी काय करावे, असे असावे-तसे नसावे अशी ‘विद्यार्थ्यांची भाषा’ सोडून ते ‘स्वत:’कडे वळतात. त्यांनी त्यांचा स्वत:चा विश्वनियमांच्या प्रकाशात अभ्यास कसा केला, स्वत:ला काय हवे- काय नको ते कसे शोधले आणि त्यातून जी जीवनसरणी आकाराला आली त्यातील ते वाटून घेण्याजोगे आहे, म्हणजे तंत्रज्ञानातील विविध प्रकारचे प्रयोग, जीवनशैली, सवयी यांचा उल्लेख अभ्यंकरांनी ‘माय ब्लॉग’ या प्रकरणात केलेला आहे. त्यातील अनेक गोष्टी वाचकाला अनुकरणीय वाटतात, परंतु त्याला तसे जमेल का असा विचारही त्याच्या मनात येण्याची शक्यता वाटते.

‘चांगले असले तरी त्याला काही लगेच जमणे शक्य नाही!’ अशी विफलतेची भावना मनात असण्याचे कारण नाही असे वाचकाला पुस्तकातूनच कळते. त्याने त्याचा स्वत:चा विचार करून त्याच्यात बदल घडवायचा आहे, त्यात काही कोणाला प्रोग्रेस रिपोर्ट द्यायचा नाही, की त्याला कोणी त्याचे सर्टिफिकेटही देणार नाही. माणसाने त्याच्यासाठी काही आवश्यक बदल करताना ते हळू हळूच केले पाहिजेत. तिथे घाई उपयोगाची नाही, कारण जे बदल हळू होतात ते दूरगामी असू शकतात.  तेदेखील उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून दिसून येणारे शास्त्रीय सत्य आहे.  तात्पुरते, घाईघाईने केलेले बदल लवकर विरून जाण्याची शक्यता फार. तेव्हा माणूस बदलाच्या वाटेवर असेल तर त्याला वेगाची चिंता करण्याचे कारण नाही. योग्य त्या मार्गावर उचललेले हरेक पाऊल त्याला समाधान देणारे आहे की नाही – निदान नको असलेले जास्तीचे प्रश्न त्याच्यासाठी निर्माण करत नाही ना हे त्याला सतत पडताळून बघता येते.

विषय गंभीर असला तरी वेगळ्या आणि मिश्किल शैलीत तो वाचकांसमोर मांडला गेला आहे, ही आणखी एक उल्लेखनीय गोष्ट. ‘राँग थिअरी’ हे नावच कुतूहलजनक आहे. पुस्तकाचे ते नाव का याची एकापेक्षा जास्त स्पष्टीकरणे लेखकाने दिलेली आहेत. त्यातील एकच वानगीदाखल स्पष्टीकरण असे, की WRONG हे आद्याक्षरांपासून बनलेले नाव आहे. संपूर्ण नाव आहे Wilderness Resourced Opulence Naturally Gainful. (रानव्यापासून मिळालेली समृद्धी जी निसर्गत: माणसाला मानवणारी आहे.)

माणसाच्या रोजच्या जगण्याचा विश्वनियमांच्या प्रकाशात विचार करण्याची पद्धत ही वाचकाला नवी तरीही कुतूहल निर्माण करणारी वाटेल यात शंका नाही. या वेगळ्या वाटेच्या ओळखीसाठी आणि वेगळ्या वाटेच्या वाटाड्याला जाणून घेण्यासाठी ‘राँग थिअरी’ वाचकाला नक्कीच मदत करेल.

गिरीश अभ्‍यंकर,
९८६०५४७४७१
girish.abhyankar@gmail.com

मृणालिनी वनारसे,
आवर्तन ५ हिल व्‍ह्यू सोसायटी,
४६/४ एरंडवणे, पौड रोड,
पुणे – ४११०३८
९८२२०००८६२
ioraespune@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. हे पुस्तक कुठे मिळेल? आज…
    हे पुस्तक कुठे मिळेल? आजच्या सकाळ पेपर मध्ये लेख वाचला. विचार समजून घ्यावेसे वाटते.

Comments are closed.