रवळनाथ – लोकदेव व क्षेत्रपाळ

8
281
_Ravalnath_2_0.jpg

यक्षदेवता व वीरयक्ष हेच दक्षिण कोकणात प्रामुख्याने ग्राम व नगर संरक्षक देव मानले जातात, ते गावाचे संरक्षण करतात ही लोकांची श्रद्धा आहे. यक्षोपासनेची चिवट परंपरा पिढ्यान् पिढ्या सातत्यपूर्ण चालू आहे. म्हणूनच भैरव (गस्ती करणारा) हा लोकप्रिय क्षेत्रपाल देव प्रसिद्ध आहे. त्याच्या कौल, नवस, गाऱ्हाणे, बळी या उपासनेतून गाव बांधिलकी असणे, अरिष्टापासून संरक्षण, कोपापासून कृपा, सुखसमृद्धी ही अपेक्षा नसते. त्याचा भर सौम्य रूपापेक्षा उग्र रूपावर अधिक असतो. त्याची उपासना आणि भक्तीसुद्धा भीतीतून अधिक होते. निसर्गाचे गूढ, पंचमहाभूतांचे वाटणारे भय आणि त्यांची अवकृपा होऊ नये म्हणून करण्याच्या उपासना… या प्रक्रियेमधून झटकन् पावणाऱ्या ग्रामदेवता, यक्षदेवता या दक्षिण कोकणात प्रसिद्ध पावल्या. शाक्तांनी त्यांच्या पंथात मूळ यक्षदेवास कोणताही बदल न करता सामील करून घेतले. द.ग. गोडसे म्हणतात, यक्षपूजेपासून शिवोपासना आणि शिवोपासनेतून त्यांच्या अनुचर देवता – भैरव, मल्हारी, खंडोबा, ज्योतिबा, रवळनाथ – यांच्या पूजा शिवकालात रूढ होत्या. यक्षपूजा ही तर आर्यपूर्वकालीन आहे. शिवदैवत हे आर्येतरांचा पशुपती व आर्यांचा रुद्र यांचे एकत्रित केलेले स्वरूप आहे. शिवाचे पशुपती हे स्वरूप पाच हजार वर्षांपूर्वी सिंधुनदीच्या खोऱ्यात दिसून येते. रुद्र व शीव यांची उपासना ही मूळ आर्यांची नव्हे. त्यांनी ती लोकसंस्कृतीतून स्वीकारली. आर्यांचे देव ब्रह्मा, विष्णू, महेश, रुद्र, इंद्र, वरुण यांची मंदिरे त्या ठिकाणी दिसत नाहीत. मंदिरे आहेत ती यक्षदेवांच्या परिणत झालेल्या रूपांच्या देवांची! आदिम

कोकणातील रवळनाथ हे शिवाचेच एक रूप. रवळनाथ हा शिव आहे, कारण त्याचे पुजारी गुरव किंवा राऊळ असतात. भारतात शिवाचे पुजारी गुरव, जंगम आणि राऊळच आहेत. ते रूप स्वभावाने उग्र व वृत्तीने लढाऊ, म्हणजे तो मूळ यक्षदेवाच्या प्रकृतीचाच. शाक्तांनी तो शाक्त पंथात आणल्यावर त्यास मूर्तिरूप मिळाले. त्याला चार किंवा अधिक हात मिळाले. त्याच्या शिवस्वरूपामुळे त्याच्या हातात त्रिशूळ, डमरू ही आयुधे दिली गेली. तोच दक्षिण कोकणचा संरक्षक क्षेत्रपाळ रवळनाथ बनला! रवळनाथाची मूर्ती दक्षिण कोकणातील हरएक गावात असते. ती वैशिष्ट्यपूर्ण देवता आहे. मूर्ती उभी असून तिचा डावा पाय किंचित वाकवून, पुढे केलेला असतो. रवळनाथ चतुर्भुज असतो. पुढील उजव्या हातात तलवार, डाव्या हातात अमृतपात्र असतात. मागील उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात डमरू असतात. मूर्तीची दृष्टी समोर आणि सरळ असते. डोक्यावर मुकूट, कमरेखाली धोतर नेसलेले असते. गळ्यात यज्ञोपवित असते, इतर माळाही असतात. त्यात नरमुंडमालाही असते. ओठावर वळवलेल्या मिश्या असतात. त्या भागात देवतांच्या मूर्तींना रुप्यांचे नेत्र चिकटवले गेलेले असतात. मूर्तीच्या दोन्ही बाजूंस पारिचारिकांच्या चवऱ्या ढाळत असलेल्या दोन मूर्ती कोरलेल्या आढळतात. पारिचारिकांच्या चार मूर्ती काही ठिकाणी असतात. घोडा मूर्तीच्या उजव्या बाजूस अनेक ठिकाणी कोरलेला असतो. श्री रवळनाथ ही ब्रह्मचारी देवता आहे. दुसऱ्या समजुतीप्रमाणे त्याला बायको आहे, तिचे नाव पावणाई. ती कोठे द्विभुज तर कोठे चतुर्भुज आढळते. तिच्या चतुर्भुज रूपाची आयुधे रवळनाथाच्या आयुधांप्रमाणे असतात. पावणाई देवतेच्या जीवनरहस्याचा पट उलगडण्याचा अनेक जिज्ञासूंनी प्रयत्न केला आहे. तिची उपासना कोकणातील जनमानसांत सर्व स्तरांवर प्रचलित आहे.

रवळनाथ या देवतेची उन्नयन प्रक्रिया सातत्याने घडत गेलेली आहे. ग्रामदेवता ते कुलदेवता बनून तिच्यावरील अलौकिक श्रद्धा अभंग राहिलेली आहे. रवळनाथाची अवतारकथादेखील आहे. कोल्हापूरजवळ ज्योतिबाचा डोंगर म्हणून जे स्थान आहे त्याला रत्नागिरी असेही नाव आहे. तेथील ज्योतिबा हाच केदार रवळेश होय.

महालक्ष्मीने त्याला कोल्हासूराशी युद्ध करण्यासाठी मदतीकरता हिमालयातून आणले. त्याने रत्नालूर व रक्तभोजन या दोन असुरांचा नाश केला व हिमालयातून लिंग आणून केदारेश्वराची स्थापना केली असे वर्णन करवीर महात्म्यात आहे. ज्योतिबाला दक्षिणमुख केदार असेही म्हटले गेले आहे. कोकणातील रवळनाथाची बहुतेक देवळे दक्षिणाभिमुख आहेत. कोकणचा क्षेत्रपाळ भैरव. तोही दक्षिणाभिमुखी आहे. तो घाटमाथ्यावर ज्योतिबा आणि दक्षिण कोकणात, गोमंतकात रवळनाथ या नावाने ओळखला जातो.

_Ravalnath_1_1.jpgज्योतिबाला दक्षिणमुख केदार असे म्हटलेले आहे. म्हणजे ज्योतिबा, रवळनाथ व भैरव ही एकाच देवाची रूपे. तो मूळ शिव होय.

‘केदार विजया’तील ज्योतिबास्वरूप रवळनाथाची जन्मकथा अशी आहे – पौगंडऋषी आणि त्यांची पत्नी विमलांबुजा हे दांपत्य, पुत्रप्राप्तीसाठी बद्रीकेदारक्षेत्री तप करत होते. त्यांच्या तपाला जे फळ आले ते म्हणजे हा केदार रवळेश्वर! तो जमदग्नीच्या रवाग्निचा म्हणजे क्रोधाग्नीचा अवतार. रेणुकावधानंतर जमदग्नी ऋषींनी त्यागलेला क्रोध, परशुराम व नवनाथ (नवनारायण) यांनी समुद्र, अरण्य व अन्य जग असा वाटून घेतला. लक्ष्मीने नवनाथांचे क्रोध व तेज एकत्र करून ब्रह्मा, विष्णू व महेश यांना एकरूप अवतार घेण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी केदारनाथ ऊर्फ केदार रवळेश्वर म्हणून वसंत ऋतूत, चैत्र मासी, शुक्ल पक्षी, रविवारी षष्ठीयुक्त सप्तमी तिथीला रवळनाथाचा अवतार म्हणून जन्म घेतला.

नव रवाग्निचा अवतार | धरिण त्रिगुणी सगुणाकार |
म्हणुनी नाम रवेळश्वर | आगमोत्तरी ठेविले |

केदारनाथ हा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे केदारलिंगालाही ज्योतिर्लिंग असे म्हणतात. ज्योतिर्लिंग या नावावरूनही त्यास ज्योतिबा असे लोकप्रिय नाव रूढ झाले. तो करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या आग्रहास्तव दक्षिणेस आला. म्हणून त्याला दक्षिण केदार असेही म्हणतात. केदार या शब्दाचा अर्थच मुळी शेतजमीन असा आहे. त्यावरून त्याला केदारनाथ म्हणजे क्षेत्रपती असेही म्हटले गेलेले आहे. धरित्रीमाता आणि तिला सुफलित करणारा ज्योतिबा (लांगलदेव, नांगरदेव) पिता ही रचना वेदांपूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. यमाई आणि ज्योतिबा असा हा जिव्हाळ्याचा संबंध. त्या संबंधातून सृष्टीची निर्मिती झाली. म्हणून या देवी-माता-पितरांच्या सोहळ्यात ‘चांगभलं’ असा पवित्र घोष करतात!

कोकणात कुंकण ( कुं – पृथ्वी + कणा – रेणूरूप) म्हणून भूमीच्या कणांनी बनलेली. रेणुमयी म्हणजे भूदेवी. त्या रेणुकेची उपासना कोकण, गोमंतक, आंध्र, कर्नाटक या चार ठिकाणी वारुळ रूपात केली जाते. तिला भूमिका, सातेरी म्हणून रोवण किंवा वारूळ रूपात पूजतात. वारुळ हे भूमीच्या योनीचे प्रतीक आहे. त्या प्रतीकाच्या अनुषंगाने वारुळस्थ नाग हा पुरुषतत्त्वाचा म्हणजे क्षेत्रपाळाचा प्रतिनिधी मानला गेला आहे. वारुळरूपात क्षेत्रदेवता म्हणजे यल्लमा, मातंगी, रेणुका, सातेरी यांचे पूजन आणि नागरूपात वारुळात नांदणाऱ्या नागाच्या रूपात क्षेत्रपती मुरुग, सुब्राह्मण, ज्योतिबा, खंडोबा, रवळनाथ, म्हस्कोबा यांचे पूजन.

कोकणात रवळनाथ हा पती व सातेरी ही पत्नी म्हणून पुजनीय ठरली आहेत. सातेरी आणि रवळनाथ हा क्षेत्र, क्षेत्रपाळी संबंध आहे. सातेरीची ठाणी कोकणात गावोगावी आहेत व ती वारुळरूपातच आहेत. त्यास भोम भोंबाडा असेही म्हणतात. देवीचे तेच रूप पुजले जाऊन, तिला भूमिकादेवी हे नाव आहे. त्या सर्व ठिकाणी रवळनाथ हा क्षेत्रपती म्हणून नांदत असतो. केदारनाथ व केदारेश्वर या नावातील पहिले पद क्षेत्र दर्शवते आणि ‘ण’ या र भेदाने रोयण-रवणपासून’रवळ’ हा शब्द बनला आहे. त्याचा गोमंतकीय मराठीत ‘वारुळ’ हा अर्थ आहे. रवळेश्वर, रवणेश्वर अशी नावे उपलब्ध आहेत. त्यामुळे रवळ (रवण/रोयण) हे पद सातेरीचे द्योतक आहे. रवळनाथ हा तिचा पती (नाथ) आहे. अश्व व सर्प हीच त्यांची वाहने बऱ्याच ठिकाणी आहेत. कासव हेही त्याचे प्रमुख वाहन मानले जाते. त्याचे दुसरे वाहन शेष आहे. क्षेत्रपाल अनुक्रमे वारुळ व नाग ही प्रतीके वापरतो. ती स्त्रीपुरुष तत्त्वाची प्रतीके आहेत. रा.चिं. ढेरे यांचे यावरील संशोधन बहुमोल आहे. रवळनाथ हा कोणत्या देवाचा अंश असावा यावरून विद्वानांमध्ये भिन्न भिन्न कल्पना आहेत. शणैगोय बाब यांनी त्यांच्या ‘ऐन वेळार’ या कोकणी पुस्तकात म्हटले आहे, की ‘रवळनाथ’ हा वैदिकपूर्व काळातील देव आहे. रवळनाथ यातील ‘रवळ’ हा शब्द ‘राहुल’ याचे रूपांतर आहे. ख्रिस्त शकाच्या तिसऱ्या शतकात बुद्धधर्मी महायान संस्थापक नागार्जुन याच्या गुरूचे नाव राहुलभद्र असे होते. ह्याही ब्राह्मणाने बौद्धधर्माची दीक्षा घेतली होती. गौतम बुद्धाच्या मुलाचे नाव राहुल होते. त्यावरून बुद्धपूर्व वैदिक काळात हे नाव प्रचारात असणे शक्य आहे. त्याच काळात लोक राहुलनाथ हे नाव व त्याची भक्ती घेऊन कोकणात आले असावे. त्या नावाची देवळे इतर कोठेही नाहीत. रवळनाथ या नावाला कोकणच्या ट्रेड मार्कचे रूप आले आहे!

_Ravalnath_3.jpgरवळनाथ म्हणजे परमेश्वराच्या तृतीय प्रकृतीचे प्रतीक आहे. ती देवीची मूर्ती आहे अशी माहिती नानासाहेब चापेकर यांनी ‘चित्पावन’ ग्रंथात नोंदली आहे. ग.ह. खरे यांनी रवळनाथ हा कोकणातील देव खंडोबाशी एकरूप मानला आहे. ते म्हणतात, रवळनाथ-रवळदेव-रवळेश्वर हे खंडोबाचे एक नाव असून त्यांच्या मूर्तीवरून त्या दोघांचे एकरूपत्व प्रत्ययास येते. खरे यांच्या मते ‘लवल’ या शब्दापासून रवल हा शब्द बनलेला आहे. लवल हे एका वेलीचे शुभ्र वर्णाचे फळ असून शुभ्रतेच्या वर्णनात त्याचा उपमान म्हणून संस्कृत साहित्यात उपयोग आढळतो. शिव हा कर्पूरगौर पांडुरंग आहे. तेव्हा पवलनाथ. रवळनाथ म्हणजे पर्यायाने शिवच. परंतु रवळनाथ व खंडोबा हे शिवस्वरूप ठरले तरी भूमितीतील प्रमेयाप्रमाणे एकरूप ठरवता येणार नाहीत. ज्योतिबा सौम्य भैरवरूपी आहे. तसेच, त्याला केदारनाथ-रवळनाथ असेही म्हणतात. तो त्या खंडोबाच्या, भैरवाच्या अत्युग्र रूपातून सौम्य रूपाकडे जाणारी पुढील पायरी आहे असे वाटते. पं. महादेव शास्त्री जोशी यांच्या मते, रवळनाथ हा शुद्ध देव असून रु रु हे त्याचे मूळ नाव आहे. अष्टभैरवात रुरुचे रवळ आणि रवळूचे पुढे नाथ जोडून रवळनाथ असे नाव होऊ शकते. सर्पांचे विष उतरवणे हे रवळनाथाचे वैशिष्ट्य. त्यामुळे देशावरील बहिररोवर व दक्षिण कोकणातील रवळनाथ हे दोघे भैरव संघातील असल्याचे निश्चित होते.

दक्षिणेस कारवारपासून उत्तरेस देवगडपर्यंत रवळनाथाची देवळे तुरळक, तरीपण गावोगावी केदारलिंग देवतास्वरूप आढळतात. रवळनाथ व त्याचे भव्य रूप आजरे, चंदगड मार्गे कोकणात आले असावे, त्यामुळे रवळनाथाची मंदिरे चंदगड-आजरा येथेही आहेत. शिवाप्रमाणे केदार ही देवतादेखील द्रविडांची असावी. त्यामुळे कोकणात रवळनाथ देवतेला आणणारे वसाहतकार आर्य नसून द्रविडच असावे असा अंदाज पु.रा. बेहेरे यांनी व्यक्त केला आहे. बेहरे पुढे म्हणतात, रवळनाथ ही देवता ज्या वसाहतकाराने कोकणात आणली त्यांची जमात त्याच्या पराक्रमाने व गुणाने त्या भागात अग्रगण्य झाली असावी. त्यामुळे तरंग सार्वत्रिक आहे आणि तेच मुख्य तरंग आहे. संचाराची किंवा अवसराचीजी देवस्की असते त्यात रवळनाथाचा पूर्वस हा प्रमुखपणे मेळा करतो; म्हणजे अवसराबरोबर सल्लामसलत करून अखेरचा निर्णय देतो. म्हणून त्याला मेळेकरी असेही म्हणतात. थोडक्यात पंतप्रधानांची भूमिका!

ज्योतिबा व यमाई यांचे लग्न जसे लावतात तसेच रवळनाथाचे तरंग व पावणाईचे तरंग यांचेही लग्न लावतात. त्या विधीला ‘शिवलग्न’ असे म्हणतात. ‘पावणाई’ ही यमी असून ती रवळनाथाबरोबर कोकणात आली असली पाहिजे. यमाई ही महालक्ष्मीहून वेगळी देवता आहे. ती अनादी शक्ती आहे. रवळनाथ, पावणाई, भुतनाथ, सातेरी या दैवत उपासनेत तरंग नपुंसकलिंगी आहे. खांब हा त्यास पर्यायी शब्द. माणसाच्या उंचीची लाकडाची गुळगुळीत काठी. त्याला निरनिराळ्या रंगांचे पट्टे असतात. त्या तरंगांवर पितळ अथवा रूपे यांचे मुखवटे असतात. त्यात पुरुष मुखवटा आढळत नाही. देवीचा मुखवटा, हाताचा तळवा, कलश असे बसवून रेशमी किनारींची धोतरे किंवा लुगडी नेसवून विशेष प्रसंगी पूजन करताना गाव देवस्कीच्या वेळी खांद्यावर घेऊन अवसर काढतात. रवळनाथाचा तरंग प्रत्येक ठिकाणी असतोच. शक्यतो तो गुरव घेत असतो. तरंग काष्ठ आहे. तो नागफणीशी संबंधित आहे. नागकाल हे लिंगरूप आहे. तरंग हे त्याचे प्रतीक सामर्थ्याने भरलेले आहे. लिंग – लंगल – लगुल यापासून तलंग व तरंग. तलंग तरंगाची ही व्याप्ती रा.चिं. ढेरे यांनी स्वरागमाने स्पष्ट केली आहे. भालचंद्र आकलेकर यांनी दक्षिण कोकणातील एकशेएकोणचाळीस रवळनाथांचा अभ्यास केला. त्यांनी रवळनाथाचा नवा अन्वयार्थ लावला आहे. त्यातील एकोणतीस रवळनाथ हे केदार वाटतात. उरलेल्या एकोणसाठ रवळनाथाचे ध्यान विठ्ठलासारखे वाटते. कोकणात  एकादशीचा मोठा उत्सव होतो. मात्र कोकणात विठ्ठल मंदिरे फारशी नसतात. कोकणी लोक रवळनाथाला विठ्ठलस्वरूप मानत असावेत. त्या शिवाय कोकणात विठलाई, विठ्ठलादेवी या देवता सापडतात. विठ्ठलादेवीचा सहचर विठ्ठलेश, विठ्ठलेश्वर संक्षेपाने विठ्ठल तर नव्हे? विठ्ठलाचा उंच टोपीवजा मुकुट ह्याचे साम्य उत्तर भारतीय कुशाण शैलीच्या सूर्यमूर्तीशी जवळचे आहे असे मत ग.ह. खरे यांनी व्यक्त केले आहे. ते खरे मानले तर विठ्ठल ही सूर्यमूर्ती ठरण्याचा संभव आहे. रवळनाथ हे सूर्याचे रूप असावे असे काही जणांचे मत आहे. त्यामुळे रवळनाथ हे विठ्ठलाचे मूळ स्वरूप असण्याची शक्यता आहे. रवळनाथाची पार्श्वभूमी तामिळदेखील सांगितली आहे. रवळनाथ हा ‘इरवलनाथ’ आहे. इरवल म्हणजे भिक्षा मागणे. त्याच्या काठीलाही तरंग म्हणतात. त्यासंबंधी पुष्कळ माहिती तामिळ तरङ्मगम ‘कुलदैवत’ या ग्रंथात आहे.

आकलेकर म्हणतात, की रवळनाथ या नावाचा विचार करताना रावूळ हा शब्द ध्यानात घेतला पाहिजे. देवाचे स्थान जसे देऊळ तसेच रावाचे स्थान ते रावूळ. राव ही श्रेष्ठतादर्शक उपाधी आहे. दक्षिण कोकणात, कर्नाटकात राव हे उपनाव सर्वत्र प्रचलित आहे. समाजप्रमुखाने नवी वस्ती बसवली तर तिला रावूळ असे म्हणतात. तेथील देवाला रावुळनाथ असे म्हणत असावेत. त्याचेच पुढे रवळनाथ असे रूप झाले.

ख्रिस्ती सनाच्या आगेमागे दोन-तीनशे वर्षें मध्य पूर्वेकडे व्यापारी वस्तीत गेलेले कोळी, पांज्य, इतर पणी लोक दरवर्षी आषाढात काफिल्याने भारतात परत येत. दक्षिण कोकणात नवीन वस्त्या आल्या. त्यांनी प्रत्येक वस्तीत एकेक रवळनाथ त्यांच्याबरोबर स्थापन केला. भारतात येणारे पांड्य यांनी पांडुरंग देव स्थापन केला. पणी यांनी सूर्यनारायण आणला. त्यामुळे पांडुरंग, सूर्यनारायण हा रवळनाथ म्हणून देवुळी स्थापन झाला. रवळनाथ, पांडुरंग, विठोबा हे पर्यायी शब्द ठरतात.

असा हा शिंदे यांनी सिंधमधून आणलेला जोत-ज्योती-ज्योतिबा, जो सिंधी भाषेतून चांगभलं घोषाने कोल्हापुरी आला. चव्हाणांचा कुलदैवत ज्वालामुखी ज्योती रूपाने कांगडा खोऱ्यातून कोकणात आला.

पेडणे (गोवा), चंदगड (बेळगाव ) व ओटवणे येथील तीन रवळनाथ प्रमुख मानले जातात. त्या मूर्तींचे जैन तीर्थकर नेमिनाथ, पार्श्वनाथ यांच्या मूर्तीत काहींना साम्य दिसते. त्यामुळे रवळनाथ हा जैन तीर्थंकरांचा अवतार असावा असे मत काही जण व्यक्त करतात, पण त्याला पुरावा नाही. सावंतवाडीतील त्रेपन्न मंदिरे, वेंगुर्ल्यातील सव्वीस मंदिरे, कुडाळातील एकतीस मंदिरे, कणकवलीतील सोळा, देवगडमधील अकरा, मालवणमधील सदतीस मंदिरे… त्याशिवाय, राजापूर सहा, चिपळूण सात, दापोली चार, खेड दोन, गुहागर चार, रत्नागिरी दोन, संगमेश्वर दोन, लांजा तीन आणि गोव्यामध्ये एकोणपन्नास मंदिरे आहेत. प्रत्येकाचा इतिहास, कथा मनाला भारावून टाकतात. अशी दक्षिण कोकणात दोनशेअकरा देवळे उल्लेखनीय आहेत. प्रत्येक गावातील अशा या रवळनाथाचे/केदाराचे केदार कवनात सुंदर ध्यान आहे.

केयुराणि विभुषितै: करयुगै: रत्नांकितै: सुंदरै: |
नाना हार विचित्र पन्नयुतै: रत्नांकितै: सुंदरै: ||
हस्ताभ्यां धृत खङग पात्र डमरू शुलं सदा भाजितं |
वाजी वाहन दैत्य दर्पदलनं केदारमिशं भजे ||1||

परंतु कोकणी मन त्याला कुडाळी, मालवणी बोलीतून हाक मारते, नारूर गावाहून कुडाळ गावी आलेल्या रवळनाथला कुडाळेश्वर गाऱ्हाणेच घालणार –

– ‘बा देवा म्हाराज्या कुडाळेश्वरा भैरवा – होय म्हाराज्या’
– ‘लक्शुमी पाचपूर्वी जुगपती देवा तू म्हाराजा – होय म्हाराज्या’
– ‘येताळ पावनाथ इटला देवीची चाळो – होय म्हाराज्या’

तसेच, वालावलीच्या रवळनाथाला हाक मारताना ‘बा देवा म्हाराज्या समर्ता आज तू देव रवळनाथ, तर म्हाराज्या आज तुका सांगणा करतो आसोव पूर्वसंबंधान, देसधाम, रोगराय तू आज येशयेक बांध.’ त्याला ते पूर्वेच्या गुंड्याच्या गणित पुरा करण्यास सांगतात. ‘बारा पाचाचा गणित एक करायला सांगतात.’ ‘देसधाम दूर करून, शेवा चाकरी करून घ्यायला सांगतात.’

रा.चि. ढेरे देवाचा शोध ही व्यक्तीच्या अंतर्मनाची विकासयात्रा असते असे म्हणतात, तेच खरे.

– प्रकाश नारकर

About Post Author

8 COMMENTS

  1. लेख आवडला
    गोव्यातील कांही…

    लेख आवडला
    गोव्यातील कांही गावातून गायब झालेल्या रवळनाथ देवाविषयी माहिती आहे कां
    मी आपणास भेटूशकतोकां

  2. लेख खूप आवडला ,मला एक…
    लेख खूप आवडला ,मला एक विचारायचे आहे, की रवळनाथ देवाच्या कंबरेला नाग देवता असते का?

  3. उत्तम. सर्वोत्तम लेख. वाचनीय
    उत्तम. सर्वोत्तम लेख. वाचनीय

  4. उद्बोधक व दुर्मिळ माहिती…
    उद्बोधक व दुर्मिळ माहिती साठी कष्ट घेवून सादरीकरण केल्याबद्दल अनंत धन्यवाद.

  5. खूप छान माहिती दिली…
    खूप छान माहिती दिली. सर्वांना पूरक अशे विचार व त्यावरील अभ्यास. धन्यवाद..?

  6. खूप छान माहिती
    खूप छान माहिती

  7. फारच छान . रा.चिं. ढेरे…
    फारच छान . रा.चिं. ढेरे यांची काही पुस्तके वाचली आहेत. दुर्गा भागवतांच्या काही लोककथा वाचल्यावर छान माहिती मिळाली. संगीत देवबाभळी नाटक तर त्यांची पैस कथा वाचल्यानंतर विठ्ठल , रूक्मिणी याबद्दल छान माहिती मिळाली.

  8. Otavane gavat ravalnath…
    Otavane gavat ravalnath sateri Mandir aahe tar hya gavchi kuldevta kon v tithi kay

Comments are closed.