रफीवेडे डॉ. प्रभू आहुजा

12
23
carasole

ठाण्‍याजवळ उल्हासनगर येथे ‘शिवनेरी’ नावाचे हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटल आहुजा डॉक्टर दांपत्य चालवतात. कोणी म्हणेल, त्यात काय नवीन आहे? आजकाल खेड्यापाड्यातही पतिपत्नी, दोघेही डॉक्टर असतात. पण आहुजा पतिपत्नी व त्यांचा दवाखाना थोडा वेगळा आहे. डॉक्टर आहुजा हे गायक मोहम्मद रफी यांचे चाहते आहेत. किती चाहते? तर ‘रफीवेडे’ हाच शब्द त्यांना चपखल लागू पडेल. त्यांच्याजवळ मोहम्मद रफी यांची संपूर्ण माहिती, त्‍यांचे प्रत्येक गाणे, गझल, गैरफिल्मी गीत संग्रहित आहे.

आहुजा यांनी मोहम्मद रफी यांचा सर्व इतिहास संकलित केला आहे. त्यांनी ‘मोहम्मद रफी फॅन क्लॅब’ नावाचा ग्रूप उल्हासनगरमधील रफीवेड्या मित्रांसोबत स्थापन केला आहे. ते मोहम्‍मद रफी यांची जयंती आणि स्मृतिदिन टाऊन हॉलमध्ये दरवर्षी साजरे करतात. शहरातील होतकरू गायक-गायिका यांना त्या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळते. मात्र सर्व गाणी रफी यांच्याशी संबंधित असावी लागतात. डॉक्टर स्वतः हॉलचे भाडे भरतात, वाद्यवृंदाचा खर्च करतात. तो सिलसिला २००५ सालापासून नियमित दरवर्षी सुरू आहे.

डॉक्टर आहुजा यांचे रफी प्रेम येथेच संपते का? तर नाही! आहुजा यांनी उल्हासनगरमध्ये ‘शिवनेरी’ हॉस्पिटलजवळच्या इमारतीतील एक फ्लॅट ‘मोहम्मद रफी फॅन क्लॅब’साठी दिला आहे. तेथे फक्त रफी यांचे फोटो, तालमीसाठी लागणारी वाद्ये व इतर साहित्य ठेवलेले आहे. तो फ्लॅट कोणाही गायकासाठी चोवीस तास खुला असतो. तेवढे करूनही आहुजा यांचे रफीप्रेम संपत नाही. आहुजा यांचे मोठ्या प्रसिद्ध कलाकार मंडळींना शहरात आणून त्यांचा सत्कार करणे, समाजातील दुर्लक्षित गायक-कलाकारांचा सन्माान करणे – त्यांना मानधन देणे असे काम २००० सालापासून सुरू आहे.

डॉक्टर आहुजा राहतात तो उल्हासनगर परिसर यु. एस. ए. (USA) या आद्याक्षरांनी ओळखला जातो. कारण त्या परिसराची महती ‘कोणतीही वस्तू तिथे मिळणार म्हणजे मिळणारच’ अशी आहे. तो परिसर घडवला, नावारुपाला आणला तो सिंधी बांधवांनी. भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी कित्येक स्थलांतरीत सिंधी कल्याण जवळच्या छावणीत राहू लागले. घरदार, शेतीमालमत्ता काही नातेवाइकही सारे काही राहत्या जागी (पाकिस्तानातात) सोडून त्यांची येथे जगण्याची धडपड सुरु झाली. पुढे ते छोटे छोटे व्यवसाय करुन, लोकलमध्ये वस्तू विकून चांगल्या स्थितीला आले. डॉक्टतर आहुजा यांचे कुटुंबही येथे त्याच मार्गाने स्थिरावले. त्यांच्यास घराण्याेच्या  पहिल्या पिढीनंतर दुसरी पिढी शिक्षण घेऊन दुसरा मार्ग स्विकारत होती.

प्रभू आहुजा यांचा जन्‍म २२ डिसेंबर १९५९ ला उल्हासनगर येथे झाला. ते बारावीनंतर मेडीकलसाठी ‘जे. जे. मेडीकल कॉलेज’ला गेले. ते १९७९ साल असावे. जे जे मधील काँलेजच्या गँदरिंगला मोहम्मद रफी पाहुणे म्हणून आले होते. प्रभू आहुजांना त्‍यावेळी त्याचे काही सोयरसुतक नव्हते. आहुजा त्‍यावेळी स्पोर्टस् मध्ये भाग घेत, पण गाणे वगैरे त्यांच्या लेखी दूर होते. त्यांनी कधी गाणे ऐकलेच तर तलत मेहमुद यांचे! आहुजा गाणे ऐकणारे दर्दी, असे तरुण नव्हते. सर्वसाधारण प्रत्येक होस्टेलला जशा गाण्यांच्या मैफिली होतात. तशा आहुजा यांच्या होस्टेललाही होत. त्यामुळे त्यांना गाणे ऐकायला आवडू लागले. त्यांनी पुढे MBBS पूर्ण केले. त्यापुढे पोस्ट ग्रँज्युएशन MS. त्‍यांचा गाणे ऐकण्याचा छंद शिक्षणाच्‍या धांदलीत मागे पडला. अनेक वर्षे लोटली…

आहुजा यांनी उल्हासनगरला प्रँक्टीस सुरु केली. एकदा ते मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त उल्‍हानगरमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या गाण्याच्‍या कार्यक्रमास गेले. तो दिवस होता ३१ जुलै १९९९ चा. तो कार्यक्रम ‘मोहम्मद रफी फॅन क्लब’ नावाच्या दुस-या संस्थेकडून आयोजण्यात आला होता. तेव्हा आहुजांच्या लक्षात आले की, तो कार्यक्रम ढिसाळ आहे. ना गाण्याची निवड योग्य, ना गायक मनापासून गात आहेत… तेथे श्रोतेही जास्त संख्येने उपस्थित नव्हते. आहुजा त्या कार्यक्रमाचे आयोजक शंकर असवाणी यांना भेटले. आहुजा त्यांना बेधडक म्हणाले, “कशाला करता असे कार्यक्रम? करायचे तर व्यवस्थितपणे करा”. असवाणींनी पैशांसह अनेक कारणे सांगितली. डॉक्टरांनी “पुढच्या वर्षीचा कार्यक्रम मी करतो” असं म्हणत त्या कार्यक्रमाची जबाबदारी अचानक स्वीकारली. तेव्हापासून आहुजा रफींसोबत जोडले गेले ते कायमचे.

डॉक्टर आहुजा यांना त्या कार्यक्रमासाठी रफींची गाणी शोध, श्रोते मिळव, हॉलची तजवीज कर असे अनेक प्रयत्न करावे लागले. त्यांनी ते सारे वैद्यकीय व्यवसाय सांभाळून केले. त्यादरम्यान डॉक्टरांना प्रो. यादव, दीपक नाजरिया, अनुप मदनानी, अंबरनाथचे इनायत खान व उल्हासनगरचे मेघानी प्रीतम अशा अनेक रफीप्रेमींनी गाणी पुरवली. त्या गाण्यांतून उत्तमोत्तम गाणे शोधताना आहुजा यांचा आपसूक मोहम्मद रफी यांच्यासंबंधी अभ्यास होत गेला. डॉक्टरांना मोहम्मद रफी या गायकाची ओळख पटत गेली आणि हळुहळू ते रफीचे दिवाने झाले.

त्यानंतर पुढच्या वर्षी डॉक्टर आहुजा यांनी उल्हानगरमधील एका भव्य सभागृहात रफींच्या पुण्यतिथीनिमित्ताने आगळावेगळा कार्यक्रम सादर केला. त्या‍त परिसरातील गायकांनी रफींची गाणी सादर केली. पुढे आहुजा यांनी २४ डिसेंबर हा मोहम्मद रफी यांचा जन्मदिवस देखील साजरा करण्यास सुरूवात केली. लोक त्यांच्या कार्यक्रमांना येऊ लागले. त्याओघात ‘मोहम्मद रफी फॅन क्लॅब’ची औपचारिक स्थापना झाली. आहुजा यांच्या कार्यक्रमांमुळे क्लबची प्रसिध्दी वाढू लागली. आज त्या क्लबचे दोनशेहून जास्त सभासद आहेत. त्यापैकी पन्नास व्यक्ती सातत्याने कार्यरत असतात.

मोहम्म्द रफी यांनी त्यांच्या कारकिर्दीत फिल्मी, गैरफिल्मी, गझला अशी अठ्ठावीस भाषांत एकूण सात हजार गाणी गायली. डॉक्टर आहुजांपुढे ती सारी गाणी जमा करणे हे मोठे आव्हान होते. डॉक्टर आहुजा यांना मोहम्मद रफी यांचे उर्दूचे उच्चार, त्या भाषेत गाताना त्यांची गायकीवरील पकड भावते. ते इतर गायकात व रफीत तुलना करताना म्हणता, की ”मोहम्मद रफी हे गॉड गिफ्ट आहे. दुसरं काहीही नाही”. ‘रफी क्लब’साठी कायमस्वरुपी वास्तू असावी या उद्देशाने त्यांनी शिवनेरी हॉस्पिटलजवळ तीन रुमचा फ्लॅट घेतला. तेथे वर्षभर गाण्याच्या तालमी होत असतात. आहुजा दर रविवारी त्यांच्या छंदाला पूर्ण वेळ देऊ लागले.

आहुजा यांचा स्वतःचा आवाज तितकासा चांगला नाही. ते गायकही नाहीत. पण बिघडते कुठे? त्‍यांना पत्नी मिळाली ती गायिका! आहुजा यांच्या पत्नी डॉक्टर आशा पेंडसे या गात्या गळ्याच्या आहेत. डॉक्टर कार्यक्रम आयोजन करत असताना आशा त्या कार्यक्रमांमध्ये गाऊ लागल्या. आहुजा दांपत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्या दोघांनाही रफी यांची गाणी ऐकण्यास आवडतात.

‘रफी फॅन क्लब’चे सभासद राज असरोंडकर क्लबमध्ये गाणे गात. ते उल्हासनगर महानगरपालिकेत नगरसेवक होते. त्यांनी ‘रफी क्लब’च्या समोरील रस्त्याला ‘मोहम्मद रफी मार्ग’ असे नाव देण्याची खटपट केली.

मोहम्मद रफी यांची काही गाणी चित्रपटासाठी मुद्रीत (रेकॉर्ड) झाली, पण ती चित्रपटात घेतली गेली नाहीत. काही वेळा तो चित्रपट प्रदर्शितच न झाल्याने काही गाणी लोकांपुढे आली नाहीत. तशा अप्रसिद्ध गाण्यांचा साठा आहुजा यांच्या क्लबकडे आहे. रफी यांनी ‘सदके हिर तुझपे फकिरराज गये’ हे गाणे राज कपूरच्या ‘मेरा नाम जोकर’साठी गायले होते. तो चित्रपट सुमारे चार तासांचा. म्हणून राजकपूरने त्या गाण्याला कात्री मारली. ‘मोहम्मद रफी फॅन क्लब’ तशा गीतांचा शोध घेतात आणि त्यांच्या कार्यक्रमातून सादर करतात.

आहुजा म्हणतात, की रफीचे गाणे थेट अल्लाला साद घालते. उदाहरणार्थ,

ओ दुनिया के रखवाले,
भगवान तू दिया,
लोग तुझे कहे शंकर,
मै कहू पत्थर,
मै तुझे पुछुंगा,
तु मुझे जवाब दे.

तशा अनेक गाण्यांची प्रात्यक्षिके क्लबमध्ये ऐकण्यास मिळतात. आहुजा म्हणतात, ”रफी यांच्या गायकीतली जादू त्यांची उर्दू भाषेशी असलेली जवळीक ही असावी. इंग्रजीत फक्त सव्वीस अक्षरे आहेत तर उर्दूत बावन्न‍. इतर गायक गाण्यातील शब्दाला न्याय देऊ शकत नाही. कारण त्यांचा त्या भाषेचा अभ्यास नसायचा. मात्र रफी कोणतेही गाणे गाताना ते प्रथम उर्दूत लिहून घ्यायचे.

”कोई सागर दिल को बहलाता नहीऽऽऽ”

या गाण्यातील ‘सागर’ हा शब्द ऐकताना, गाताना आपण व कोणताही इतर गायक ‘सागर’ हा समुद्र या अर्थाने गातो. पण गीतकाराने ‘सागर’ हा शब्द दारूचा प्याला या अर्थाने लिहीला आहे. रफी यांनी तसाच तो गायला आहे. डॉक्टार आहुजा यांच्याशी बोलताना मला गाणे ऐकण्यात साक्षर होणे गरजेचे आहे असे वाटू लागले!

डॉक्टर प्रभु आहुजा त्यांचे रफीचे सर्वात आवडते गाणे कुठले असा प्रश्न मला पडला. त्यावर आहुजा म्हणाले, ”रफीचे प्रत्येक गाणे चांगले आणि दुसरे त्याहून अधिक चांगले असेच आहे. Mohommad Rafi’s song is like Diamond”

डॉ. प्रभु आहुजा,
शिवनेरी हॉस्पिटल, मोहम्मद रफी मार्ग, उल्हासनगर
9822018275, drprabhuahuja@gmail.com

– श्रीकांत पेटकर

About Post Author

12 COMMENTS

  1. सर

    सर
    खुप आनंद वाटला आपल्या सारखे संगीत वेडे आहेत तो पर्यन्त भारतीय संगीताला चांगले दिवस राहणार
    आपल्या छंदाला मनापासून सलाम

  2. Dr.ahuja sir sangeet ak aisi
    Dr.ahuja sir sangeet ak aisi dava hai Jo insan komase uthakar jine ki rahpar chalne lagta hai.ap bahot bade dilwale insan ho..good Job sir.me bhi gana chanti hu.mene abhi ak shindhi movie ke liye songs recording ki hai..me bhi music me bahot interest hu.

  3. खूपच छान छंद आहे आपला.
    खूपच छान छंद आहे आपला. गाण्यासाठी किंबहुना एखाद्या गायकासाठी एवढे समर्पित एक व्यक्ती मी पहिल्यांदाच एकतोय…
    आपल्याला मनापासून नमस्कार मी सुध्दा रफी साहेबांचा चाहता आहे, आणी आता तर आपल्याला भेटायला खूप आवडेल….

  4. आपल्याकडे महम्मद रफी
    आपल्याकडे महम्मद रफी साहेबांच्या गाण्याचा प्रचंड साठा आहे हे ऐकून फार बरे वाटले.आपण त्याच्या चाहत्यांकरता जो स्तुत्य उपक्रम राबवत आहात त्याबद्दल शतशःधन्यवाद.मी पण लहानपणापासून रफीजींच गाणी म्हणतो स्टेज आर्टीस्ट म्हणून कार्यक्रम पण केले आहेत.रफीजीं सारखा दूसरा होणे अशक्य.त्यांना त्रीवार प्रणाम.

  5. रफीवेडे डाँ. आहुजा

    रफीवेडे डाँ. आहुजा तर जगावेगळ्या लौकाच्या मुलांखत घेणारे जगावेगळे वेडे पेटकर….

  6. रफि वेडे कथा वाचून माझ ही मन
    रफि वेडे कथा वाचून माझ ही मन रफी मय झालेPetkar sir chhan mahiti puravli.
    Thanks

  7. Really ……….Mohommad
    Really ……….Mohommad Rafi’s song is like Diamond. “खरोखऱ मधाळ ऱफी”

  8. असे चांंगले कााही काामंं होत
    असे चांंगले कााही काामंं होत असतात… नोंंद सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायला हवी.

  9. डॉ.प्रभू आहूजाजी,…
    डॉ.प्रभू आहूजाजी,
    आपले हार्दिक अभिनंदन. मला आपल्या क्लब चे सभासद व्हायला आवडेल.

Comments are closed.