रंगनाथ वायाळ गुरुजी आणि ठाकरवाडीचा उद्धार

0
21
_WAYAL_GURUJI_1.jpg

भीमाशंकरच्या डोंगररांगांमधील ‘सैंदानी ठाकरवाडी’ नावाची वस्ती. खेड तालुक्यातील दोंदे गावापासून ओढ्यामधून तीन किलोमीटर लांबीची ओबडधोबड पाऊलवाट जाते. तरुण शिक्षक रंगनाथ कोंडाजी वायाळ हे तीच पाऊलवाट तुडवत हातात नियुक्तीचा आदेश घेऊन ठाकरवाडीला पोचले.

वायाळगुरुजी ठाकरवाडीत आले तेव्हा वाडी तशी सुस्तच होती. झोपड्यांसमोर चरणाऱ्या शेरड्या, कोंबड्या आणि रापलेल्या चेहऱ्याची एखाद-दुसरी वयोवृद्ध व्यक्ती. आजुबाजूला जीर्ण कापडाच्या लंगोट्या लावून खेळणारी आदिवासी मूले.

गुरुजींनी एका मुलीला विचारले, ‘काय रे बाळा, शाळा कुठेय?’ मुलीने भीत भीत बोट दाखवले. गुरुजींनी बोटाच्या दिशेने पाहिले, तर नजरेला पडली ती केंबळाची झोपडी आणि त्या झोपडीला लटकलेली, ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सैंदानी ठाकरवाडी’ अशी अक्षरे लिहिलेली जीर्ण पाटी.

गुरुजी शाळेत आले. हातातील पिशवी छपराच्या वाशाला टांगली आणि सगळी शाळा स्वच्छ केली. वाडीत फेरफटका मारून दिसतील तेवढी सगळी मुले त्यांच्याबरोबर घेतली आणि सुरु झाली वायाळ गुरुजींची शाळा!

पहिली ते चौथीची ती ‘एक शिक्षकी’ शाळा. मोडलेल्या खुर्चीत बसलेले वायाळ गुरुजी आणि समोर पिंजारलेल्या केसांची, अस्वच्छ शरीराची, फाटके-जीर्ण कपडे घातलेली दहा-पंधरा मुले-मुली. गुरुजी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना शिकवू लागले, पण कशाचा काही मेळ लागेना, कारण मुलांची भाषा ठाकर समाजाची ! त्यामुळे मुलांना तीच भाषा येई.

गुरुजींना ठाकर समाजाची भाषा शिकणे अत्यावश्यक आहे हे जाणवले. त्यासाठी गुरुजी ठाकरवाडीतच राहू लागले. ठाकरांमध्ये मिसळू लागले, त्यांचे सण-समारंभ, लग्नकार्य यात आवर्जून हजेरी लावू लागले. गुरुजींनी हळूहळू ठाकरांच्या भाषेत मुलांशी संवाद सुरू केला, त्याच भाषेत अध्यापन सुरू केले. तेवढेच नव्हे तर त्यांनी ठाकर समाजाच्या मुलांना समजण्यासाठी पहिली ते चौथीपर्यंतची पाठयपुस्तके त्या भाषेमध्ये लिहून काढली. मुले शाळेत रमू लागली, आनंदाने शाळेत येऊ लागली.

एके दिवशी, दुपारची मधली सुट्टी झाली. मुले घरी गेली. काही मुले शाळेभोवती खेळू लागली. दुपारनंतर शाळा भरली, पण घरी गेलेली मुले शाळेत आलीच नाहीत. बऱ्याच वेळाने काळुराम मधवे नावाचा मुलगा भीत भीत शाळेत आला. गुरुजींनी त्याला विचारले, “काळुराम, इतका वेळ कोठे होतास?” काळुराम घाबरलेला होता. तो थरथरत म्हणाला, “गुरुजी, कालपास्न घरात खायला भाकरतुकडा न्हाई. भुकेनं जीव कासावीस झाला म्हून मधल्या सुट्टीत बांधाबांधानं हिंडलो. गिलोरीन दोन पाखरं मारली. काटक्या गोळा केल्या. आग लावली, त्यावर ती पाखरं भाजली, खाल्ली आन् साळंत आलो”.

वायाळ गुरुजींना गलबलून आले. त्यांच्या डोळ्यांत पाणी मावेना. गुरुजींच्या डोळ्यासमोर त्या आदिवासींची खपाटलेली पोटे, रोडावलेली शरीरे, आक्रसलेले चेहरे येऊ लागले. बायामाणसांना पाण्यासाठी करावी लागणारी तीन-तीन कोस पायपीट, मजुरी न मिळाल्याने दिवसेंदिवस उपाशी राहणारे आदिवासी!

गुरुजींनी ते चित्र बदलण्याचे ठरवले.

आदिवासी उपजीविका जिथे होईल तेथे फिरत असतात. त्यामुळे गुरुजींनी ठाकरवाडीत जोपर्यंत उपजीविकेचे साधन निर्माण होत नाही, तोपर्यंत आदिवासी तेथे राहणार नाहीत आणि त्यांच्यात शिक्षणाचे बीज रुजणार नाही हे ओळखले.

वाडीचा सगळ्यात गंभीर प्रश्न होता तो म्हणजे पाण्याचा! त्यासाठी त्यांनी वाडीतील अनेक लोकांना एकत्र घेऊन ‘शबरी आदिवासी पाणीपुरवठा संघ’ स्थापन केला. ‘जिल्हा ग्रामीण विकास योजना’ आणि ‘जानकीलाल बजाज ग्रामीण विकास संस्था’ ह्यांच्या माध्यमातून कर्ज मिळवले, लोकसहभागातून आठ इंची पाईपलाईन तीन किलोमीटर अंतरावरच्या भीमा नदीपासून टाकून घेतली. वाडीलगतच्या टेकडीवर सव्वीस हजार लिटर क्षमतेची टाकी गावकऱ्यांच्या मदतीने बांधून घेतली. वाडीत घरोघरी पाण्याचा नळ आला!

गुरुजींनी वाडीतील कोणाकोणाच्या नावावर किती जमिनी आहेत त्याचा शोध घेतला. सदुसष्ट कुटुंबांपैकी सोळा कुटुंबीयांच्या नावे एकतीस एकर जमीन असल्याचे आढळले. वाडीच्या आसपास असलेल्या सदतीस एकर जमिनीचे मालक वाडीच्या आसपास नव्हते. त्या जमिनीच्या वारसांचा शोध सुरू झाला. गुरुजींनी त्या सगळ्या लोकांना आदिवासींची व्यथा समजावून सांगून त्यांच्या जमिनी आदिवासींना विकण्यासाठी विनवण्या केल्या. त्यांना त्यासाठी मुंबईला वाऱ्या कराव्या लागल्या. पैशांचा प्रश्न तयार झाला तेव्हा गुरुजींनी बँकांना कर्ज देण्यासाठी विनंती केली.

गुरुजींनी बँकांना, आदिवासींनी कर्ज फेडले नाही तर पैसे त्यांच्या पगारातून कापून घ्या, असा शब्द दिला. गुरुजींची आदिवासींना कर्ज देण्याची विनंती ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने मान्य केली. अगोदर ताब्यात असलेली एकतीस एकर आणि विकत घेतलेली सदतीस एकर अशा अडुसष्ठ एकर जमिनीचे वाटप प्रत्येक कुटुंबाला एक एकर याप्रमाणे केले गेले. आदिवासींनी त्या जमिनीवर शेती सुरू करावी म्हणून पाण्याची सोय केली. शेतीला पूरक म्हणून एका सेवाभावी संस्थेच्या मदतीतून प्रत्येक कुटुंबाला संकरित गाय आणि गोठा मिळवून दिला.

वर्षाचे सात-आठ महिने मोलमजुरी करणारा आदिवासी आता शेतकरी झाला, बागायतदार झाला! गावात महिला बचत गट, सहकारी दुधसंस्था स्थापन झाल्या. शाळेसाठी चार वर्गखोल्या बांधल्या गेल्या आणि शाळा हे वाडीचे केंद्रस्थान बनले. कोणत्याही कामाचे नियोजन, आखणी शाळेमध्ये गावकऱ्यांच्या उपस्थितीत होऊ लागले. वाडीचे रूप पालटून गेले आहे. चराईबंदी आणि कुर्‍हाडबंदी यांमुळे गावातील वनराई टिकून आहे, जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होत आहे. ज्या हातांनी गिलोरीतून दगड मारून पक्षी मारले तेच हात आता पक्ष्यांच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी वृक्ष लागवड करत आहेत!

गुरुजींच्याच प्रयत्नांमुळे वाडीतील सदुसष्ट घरांमधून एकाच दिवशी सदुसष्ट वीज मीटर लागले. त्यामुळे प्रत्येक घरात वीज आहे. काही योजना लोकसहभागातून वाडीत राबवल्या जात आहेत. या वाडीला भेट देण्यासाठी विदेशातून पथके येतात. जागतिक बँकेचे पथकही ठाकरवाडीला भेट देऊन गेले आहे. अर्थात ठाकरवाडीचा हा कायापालट करण्याचे श्रेय रंगनाथ कोंडाजी वायाळ या प्राथमिक शिक्षकाचे!

– राजू दीक्षित

rajudixit9@gmail.com

(समन्वयक : हेमंत लागवणकर)

पूर्व प्रसिद्धी – ‘लोकसत्‍ता’, 28 मे 2012

छायाचित्र – श्रीरंग गायकवाड यांच्‍या ब्‍लॉगवरून

About Post Author