येशू ख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर ! (Wanted Yeshu’s Myth for spread of Christianity in India)

इतिहासाला मर्यादा आहे. तो माणसाच्या खोल अंतर्मनात शिरू शकत नाही; काव्य मात्र माणसाच्या अंतर्मनाचा वेध घेऊ शकते. म्हणूनच श्रीकृष्णाचे काव्य व बुद्धाचे मिथक माणसाला अंतरी खोलवर झेप घेण्यासाठी समर्थ करू शकते. पाश्चिमात्य लोक जेव्हा तुलसीदास वाचतात तेव्हा ते म्हणतात, की हा इतिहास नव्हे, कल्पित आहे ! बरोबरच आहे ते. तो इतिहास नाहीच आहे. कल्पितच आहे ते. तरीसुद्धा तुलसीदास हा कवी संत लूक याने ख्रिस्ताला जो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यापेक्षा अधिक न्याय श्रीरामाला देतो ! तुलसीदासाने रामाविषयी जे काही लिहिले आहे त्यात वाचक-रसिक खोल शिरतो व ते समजून घेतो. वाचक-रसिक काळापलीकडे झेप घेतो. तो पुन्हा श्रीरामाच्या काळात उडी घेतो. तेथे काळ, स्थळ नातेसंबंध उरत नाही. श्रीराम पुढे उभा आहे याची अनुभूती घेता येते. श्रीराम पुन्हा त्यातून जीवित होतो, काळाचे उन्नयन होते. त्याच कारणामुळे भारतात प्रत्येक वर्षी रामलीला हा कार्यक्रम सादर करण्यात येतो. अशासाठी, की रामकालीन वातावरण निर्माण व्हावे. जेव्हा कोणी रामाची भूमिका सादर करतो तेव्हा तो केवळ रामाचा अभिनय करतो असे नाही. तो खुद्द राम बनतो. लोक त्याला खरा राम मानतात. त्याचे चरणस्पर्श करतात. त्याची पूजा करतात. त्याचा आशीर्वाद घेतात. तो अभिनेता राहत नाही. तो पुनर्जीवित राम बनतो. सर्व काव्यमय बनते. संपूर्ण रामकथा उघडली जाते. ती कल्पनारम्यतेने भरलेली व भारलेली असते. तेथे रामाचा इतिहास कोणी पाहत नाही. त्या कोणाला त्यात मुळी रसच नसतो. ते सगळे अद्भुत असे आहे. माणसाने जर एखादा चित्रपट दोन किंवा तीन वेळा पाहिला तर तो कंटाळून व वैतागून जातो. परंतु रामकथेमध्ये मात्र काही वेगळेच असते. जरी हरएक जणाला रामाची संपूर्ण कथा आधीच ठाऊक असली तरी जेव्हा रामलीला प्रस्तुत केली जाते तेव्हा प्रत्येक जण रोमांचित होऊन जातो. रामलीला जर का केवळ कथा किंवा नाटक असते तर असे घडले नसते. परंतु ग्रामीण लोकांसाठी ते नाटक नसते. ती रामकथा नसते. तो अभिनय नसतो. तेथे राम पुनर्जीवित बनतो ! तेथे केवळ रंगमंच नसतो तर सारे जग असते. राम पुन्हा अवतारित होतो आणि जणू काही लोक त्याच्यासमवेत राहतात ! सर्व रामजीवन पुनरावृत केले जाते. काय घडणार आहे हे सर्वांना माहीत असते तरी लोक उत्तेजित होतात. कंपित होतात. रोमांचित होतात. ही अद्भुत घटना होय.

अलौकिक घटनेकडे पाहण्याचा हा पौराणिक दृष्टिकोन आहे. पुनर्मुद्रित करण्याचा, पुनरावृत्त करण्याचा व पुनर्जीवित करण्याचा हा मिथकीय दृष्टिकोन हेच रामाचे पुनरुत्थान! येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडे अशा पौराणिक दृष्टिकोनातून पाहिले असते तर साऱ्या जगाने त्याचा स्वीकार केला असता. परंतु येशूचे पुनरुत्थान ही ऐतिहासिक घटना म्हणून पाश्चात्यांसमोर सादर झाली, त्यामुळे पूर्वेकडील देशांनी त्याला नाकारले.

इतिहास अचल असतो. तो लगेच कालबाह्य होतो. मात्र मिथक गतिमान असते. ते पिढ्यान् पिढ्या टिकून राहते व लोकांना आध्यात्मिक उत्तेजना देत राहते. पुराण सहाय्यक आहे. त्यात तथ्य नसते. त्यात सत्त्व नसते. त्यात तथ्य व सत्त्व भरण्यासाठी सृजनशील कल्पितांची म्हणजे मायथोलॉजीची गरज असते. येशूभोवती अशी मिथके किंवा पुराणे तयार केली गेली नाहीत. त्यामुळे येशूची अलौकिकतेची घोषणा उपड्या घड्यावर पाणी अशी बनली आहे. इतिहास लवकर बुडून जातो. पुराणकथा टिकून राहतात. त्या अर्थाने येशूचा इतिहास एक दिवस पुसला जाईल आणि त्याच्या भोवती कल्पनारम्य मिथके, काव्ये, पुराणे निर्माण न केल्याने त्याचा महान संदेशही गुंडाळला जाईल अशी भीती आहे.

पौराणिक व इतिहासरहित दृष्टिकोन हा अलौकिकाशी संबंधित आहे. इतिहास हा लौकिकाशी जोडून आहे. मिथक अलौकिकाशी संवाद साधते. मिथक शाश्वताशी ताळमेळ साधते. इतिहास हा भूतकाळाशी मेळ साधतो. इतिहास ही कालची बातमी आणि उद्याची बातमी, कालचे वर्तमान व उद्याचे वर्तमान असते. इतिहास हा केवळ बातम्यांचा आणि वर्तमानपत्रांचा संग्रह असतो, तो सारखा वाढत जातो. परंतु आध्यात्मिक क्षेत्राचा विचार केला तर इतिहास निरुपयोगी आहे. किंबहुना अनावश्यक आहे. कारण इतिहास कधीही अलौकिकाचा वेध घेऊ शकत नाही. ज्या प्रमाणे ईश्वर विज्ञानाचा विषय होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे आध्यात्मिक अनुभूती हा इतिहासाचा विषय बनू शकत नाही. त्या अर्थाने इतिहास हा आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा नाही. इतकेच नव्हे तर तो धोकादायकसुद्धा आहे. कारण माणूस जेवढी भूतकाळाची नोंद करील आणि जितका त्याचा ऐतिहासिक संदर्भ व संग्रह वाढत जाईल तितका तो त्याच्या ओझ्याखाली अकारण दबून जाईल.

अशी कल्पना करा की जगाचा इतिहास संपूर्णपणे नष्ट केला, तर जगातील नव्याण्णव टक्के समस्या मिटतील. कारण त्या सर्व समस्या भूतकाळातून उद्भवलेल्या असतात. मुस्लिम समस्या, हिंदू समस्या, राममंदिर प्रश्न, काश्मिरी प्रश्न हे सर्व भूतकाळातून निर्माण झाले आहेत. ही शोकांतिका आहे परंतु ती वास्तव आहे. माणसाच्या जीवनातील नव्याण्णव टक्के समस्या दफनभूमीतून उद्भवल्या आहेत. जे लोक मेले आहेत ते सर्व मुर्खपणाच्या समस्यांचे दिग्दर्शन करत आहेत. जर इतिहासाला इतके प्रचंड महत्त्व दिले गेले नसते तर माणसाचे ओझे खूप हलके झाले असते.

मिथकाची गरज आहे. कल्पनारम्यतेची आवश्यकता आहे. मिथके भूतकालीन असतात आणि भविष्यकालीनही असतात. मिथकाची चौकट भूतकाळातून येते, परंतु त्याचे पुण्य नेहमीच भविष्याकडे उघडते. जर कोणी श्रीकृष्णाविषयी एक मिथक म्हणून विचार करत असेल तर तो फक्त भूतकाळाविषयी विचार करत नाही तर तो त्याच्या संभाव्यतेचा म्हणजे त्याच्या शक्यतेचाही विचार करतो. मानवी चेतना ही श्रीकृष्णचेतना बनू शकते. ती त्या बिंदूपर्यंत विकसित होऊ शकते. इतिहास हा नेहमीच मृत भूतकाळ असतो. त्याला मुळीच भविष्य नसते. मात्र मृत इतिहास हुकूम चालवतो. स्टॅलिन अजून हुकूमत चालवतो. हिटलर अजून हुकूमत चालवतो. ते हुकूमत चालवत राहतात. कारण माणूस इतिहासाने पछाडलेला आहे. मिथके चालू ठेवण्यास हवीत, कारण ती भविष्याची दारे माणसासाठी उघडतात. परंतु इतिहास बाद केला पाहिजे, कारण इतिहास समस्या, वाद आणि सवाल व संघर्ष खडे करतात. मला तर असे वाटते, की भूतकाळातील जे जे काही अर्थपूर्ण आहे ते कल्पनारम्य म्हणजे मिथकात रूपांतरित करावे; इतिहासात नव्हे, ते पौराणिक करावे. ते महाकाव्यात परिवर्तित करावे. काव्य कधीही बंद होत नाही. ते नेहमीच उघडत व उलगडत असते. त्याला स्थळकाळाची मर्यादा नसते. माणूस काव्याला त्याचा स्वत:चा अर्थ देऊ शकतो. त्याला ते पूर्ण स्वातंत्र्य आहे. परंतु वर्तमानपत्राला तो स्वत:चा अर्थ लावू शकत नाही. घटना जितकी विश्वसनीय व वास्तव तितके स्वातंत्र्य बाधित असते. माणूस त्याला अर्थ देऊ शकत नाही. त्याच्या प्रतिभेचा तेथे उपयोग नाही. कल्पनाविलास तेथे फोल आहे. माणूस हिटलर-स्टॅलिनविषयी नाही, परंतु श्रीकृष्णाविषयी मात्र निर्मितिक्षम बनू शकतो.

पुराणात अमर्याद स्वातंत्र्य आहे. पुराण ही नोंद करता न येणाऱ्या घटनांची नोंद असते. परंतु ती नोंद सूचित केलेली असते. ख्रिश्चानिटी अधिक समृद्ध व परिणामकारक झाली असती तर त्यांनी ख्रिस्ताभोवती मिथके तयार केली असती. परंतु ख्रिश्चन धर्म ख्रिस्ताभोवती मिथके निर्माण करू शकला नाही. ख्रिश्चन लोक ख्रिस्ताला पौराणिक कथेत गुंफवू शकले नाहीत. कारण तो धर्म व त्याचे प्रवर्तक ख्रिस्ताविषयीच्या ऐतिहासिक घटनांनी पछाडलेले होते. ते त्यांच्यात काही अधिक भर घालू इच्छित नव्हते. ते ख्रिस्ताची कथा प्रगत करू इच्छित नव्हते. ते ख्रिस्तकथा अधिक कल्पनारम्य व प्रतिभाशाली बनवू इच्छित नव्हते. ख्रिस्ताविषयीच्या हकिकतीला कथादेखील म्हणता येत नाही. भारतामध्ये रामकथा हे नाव काही अपघाताने पडलेले नाही. भारतीय लोक इतिहासापेक्षा पौराणिक कथेला अधिक महत्त्व देतात. कारण कथेमध्ये खूप संभाव्यता असतात, पण इतिहासामध्ये संभाव्यता मुळीच नसतात. ख्रिस्ती धर्माने ख्रिस्ताभोवती पौराणिक गोष्टी निर्माण न केल्यामुळे ख्रिस्ती धर्म हा धर्म म्हणून खऱ्या अर्थाने फुलू शकला नाही. पुराणकथेशिवाय कोठलाही धर्म शक्य नाही. ख्रिश्चानिटी ही पौरोहिती संघटना राहिली आहे. ती संन्याशी किंवा योगी निर्माण करू शकली नाही. ते त्यांना शक्य नव्हते. त्यांनी फक्त प्रवचनकार, धर्मपंडित, बायबलतज्ज्ञ, ईशतज्ज्ञ, तत्त्वज्ञानी,धर्मप्राध्यापक निर्माण केले. अतिप्रशिक्षित ज्ञानी, कडक शिस्तबद्ध अनुशासित असे पंडित ! परंतु संन्याशाचे सौंदर्य व काव्य तेथे उपस्थित नाही. मूलभूत आध्यात्मिक स्रोत तेथे मुळीच नाही.

पाश्चात्य इतिहास किंवा कालगणना येशूच्या जन्मापासून सुरू होते. पाश्चात्य इतिहासाचा मूळ आरंभ येशू आहे, म्हणून कालगणना ख्रिस्तपूर्व व ख्रिस्तानंतर- बिफोर क्राइट, बी.सी. आणि आफ्टर डॉमिनी: ए.डी. अशी नोंद करतात. येशू मध्य आहे. कालगणना त्याच्यापासून सुरू होते. येशूच्या जीवनाचा पाश्चिमात्य लोकांनी इतिहास तयार केला आणि त्यांनी त्या प्रक्रियेत ख्रिस्ताला ठार मारले. जेव्हा त्यांनी येशूला इतिहासात गुंफण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते फारच अडचणीत पडले. कारण ते येशूने केलेले चमत्कार व त्याचे पुनरुत्थान यांचे स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. चमत्कार ह्या पौराणिक गोष्टी आहेत. ते इतिहासातील घटना नव्हेत. पाश्चात्य मन येशूभोवती इतिहास म्हणून नोंद करू पाहत असल्याने येशूने केलेले चमत्कार त्यांना विरोधाभासी व बकवास वाटू लागले. येशू पुनरुत्थित झाला, तो पुन्हा जिवंत झाला ही घोषणा एक समस्या बनली. ती समस्या ख्रिश्चानिटी सोडवू शकलेली नाही. त्यांना अपराधगंड वाटू लागला. तेथे त्यांचे काहीना काही चुकत आहे असे त्यांना वाटते.

भारतीयांनी कधीच दावा केला नाही, की बुद्धाचे पुनरुत्थान झाले, महावीर पुन्हा जीवित झाला, श्रीकृष्ण मृतातून पुन्हा उठला. भारतीयांच्या दृष्टिने हरएकाचे पुनरुत्थान होणारच आहे. तेव्हा तो काही चमत्कार नव्हे. येशूच्या जीवनातील तुटक तुटक घटना विरोधाभासी वाटतात. त्यांचे स्पष्टीकरण देता येत नाही. मात्र जर म्हटले, की ती येशूची कथा आहे. येशूचा इतिहास नव्हे, तर तेथे विरोधाभास काही नाही. कथेमध्ये सर्व काही शक्य आहे. कारण कथेला तर्कशास्त्राची गरज नाही. कथा स्वत:चे तर्कजगत निर्माण करते. एकच एक गोष्ट कथेला आवश्यक असते; ती म्हणजे ती कथा काव्यात्म आणि प्रवाही असायला हवी. तेवढे पुरे. तर्कशास्त्रातील वास्तवतेची गरज काही नाही.

जर येशूला इतिहासात न गुंफता त्याला मिथकात किंवा कथेत गुंफले गेले असते तर ख्रिश्चानिटी अधिक समृद्ध बनली असती. ख्रिश्चानिटीच्या प्रारंभीच्या काळात तसा प्रयत्न काही द्रष्ट्यांनी केला, परंतु ख्रिस्ती धर्मपीठाने तो हाणून पाडला. जेव्हा चर्चपीठापुढे ख्रिस्ती जीवनाचा विश्वसनीय इतिहास सादर करण्याचा सवाल उपस्थित झाला तेव्हा त्याच्यापुढे जवळजवळ तीन हजार सहाशेतीस ख्रिस्त जीवनचरित्रे म्हणजे शुभवर्तमाने होती. त्याच्यामधील संत मत्तय, संत मार्क, संत लूक व संत योहान यांचीच शुभवर्तमाने विश्वसनीय व ऐतिहासिक म्हणून चर्चपीठाने ग्राह्य धरली आणि उरलेली सर्व पौराणिक मिथककथा, दंतकथा म्हणून वगळण्यात आली. ती वाचण्यास ख्रिश्चनांना बंदी घालण्यात आली. त्यांच्यापैकी मी वाचलेली व विचारवंतांना परिचित असलेली काही शुभवर्तमाने पुढीलप्रमाणे आहेत – संत थॉमसचे शुभवर्तमान, संत बार्नाबासचे शुभवर्तमान, संत पीटरचे शुभवर्तमान, संत निकोदेमचे शुभवर्तमान, संत बार्थोलेमूचे शुभवर्तमान, संत माग्दालेनचे शुभवर्तमान आणि इतर शेकडो शुभवर्तमाने. त्याशिवाय ख्रिस्त धर्मविरोधक व पाखंडी यांनी लिहिलेली सर्व ख्रिस्तचरित्रे चर्चपीठाने बाद ठरवली.

येशूविषयीची ही सर्व पौराणिक शुभवर्तमाने विचारात घेऊन, त्याच्यामध्ये येशूला गुंफले असते तर ख्रिश्चानिटी हाही भारतीयांचा पौराणिक ग्रंथ बनला असता व भारतीयांनी येशूला हिंदू संस्कृतीचा एक भाग बनवले असते. ऐतिहासिक ख्रिस्त भारतीयांना मानवला नाही. ऐतिहासिक ख्रिस्त त्यांना भावला नाही, म्हणूनच भारत देश, अगदी थोडे लोक वगळता ख्रिस्ताच्या अभिनव व अद्भुत अध्यात्माला मुकला.

फादर हिलरी फर्नांडिस 9892692077 22hilaryfernandes@gmail.com

—————————————————————————————————————————-

About Post Author

6 COMMENTS

  1. फादर हिलरी यांचे लेखन वाचलेले आहे. अतिशय अभ्यासू व्यक्ती.

  2. खूप छान लेख, विचारप्रवर्तक ! फादर थॉमस स्टिफन्स यांनी 'ख्रिस्तपुराण' लिहिले हे किती बरे केले. त्यांनी ख्रिस्ताला महाकाव्याचा विषय केले आणि पौराणिक बनवले. त्यामुळेच तर 'ख्रिस्तपुराण' जगप्रसिद्ध झाले; भाषा आणि साहित्याच्या अभ्यासकांना खाद्य मिळाले…- डॉ. सिसिलिया कार्व्हालो

  3. इतिहास आणि मिथके यांच्या तुलनेतून वेगळाच दृष्टिकोन समोर आला आहे . चिंतनशील लेख .

  4. श्री. हिलरी यांचा लेख एक वेगळी चर्चा सुरू करतो. इतिहास आणि मिथक यातील महत्त्वाचे काय? ही चर्चा कोणत्याही धर्माच्या बाबतीत होऊ शकते. बहुतेक सर्व धर्मांना इतिहास असतो. आणि त्या इतिहासाभोवती मिथक किंवा दंतकथा किंवा आख्यायिका फुललेल्या असतात. माझा कोणत्याही धर्माचा खास असा अभ्यास नाही. ज्या हिंदू धर्मात मी जन्मले त्या धर्माविषयी मला थोडी अधिक माहिती आहे. कारण मी त्या वातावरणात वाढले एवढेच. श्री. हिलरी म्हणतात, हिंदू धर्मात मिथके आहेत . ख्रिस्ती धर्मात इतिहास आहे. मग गुड फ्रायडे काय? सिसिलिया ताईंनी ख्रिस्ती पुराणाचाही उल्लेख केला आहे. तेव्हा मिथके ख्रिस्ती धर्मातही आहेतच. शिवाय माझा असाही प्रश्र्न आहे, इंग्लीश भाषेत मायथॉलॉजी हा शब्द प्रचारात आहे. तो कसा काय आला? तो लॅटिन इ.मधून आलेला असू शकतो. पण इंग्लीशमध्ये तो रुजला. त्याअर्थी धर्माभोवतीचे काल्पनिक वाङ्मय त्या समाजातही आहे. हिंदूंमध्ये तेहतीस कोटी देव असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या मिथकांची संख्या ख्रिस्ती धर्मापेक्षा साहजिकच प्रचंड असणार हे उघड आहे. हिंदूमध्ये देवांची संख्या इतकी प्रचंड का, हा चर्चेचा एक वेगळा विषय आहे.. हिलरी यांना हिंदू पुराणकथांत गोडवा आढळतो. तो सरसकट सर्व पुराणकथांमध्ये नसतो. चमत्कार मात्र बहुतेक हिंदू पुराणकथांमध्ये असतात. तर्काच्या कसोटीवर ते टिकत नाहीत. म्हणून ते अनेकांना पटत नाहीत. त्यामुळे हिंदूंमध्ये पुराणकथांना भाकडकथा मानणारा मोठा वर्ग आहे. या वर्गाला इतिहास प्रिय आहे. हा वर्ग करमणूक म्हणून पुराणकथांकडे पाहतो. अधूनमधून पुराणकथांची यथास्थित टवाळी करत असतो. हिंदू पुराणकथांची महती सांगताना हिलरी यांनी या वर्गाची दखल घेतलेली दिसत नाही.शिवाजी महाराज हे इतिहास म्हणून मान्यता पावलेले असले तरी त्यांच्याभोवती अनेक दंतकथा उभ्या आहेत. कल्याणच्या सुभेदाराची सून ही दंतकथा की सत्य याबद्दल इतिहास साशंक आहे. हिरकणी बुरूजाबाबतही अशीच आख्यायिका होती. डोंगराच्या त्या टोकावरून हिरकणीने उडी मारली, तरी ती जगली अशी कथा होती. अत्यंत अवघड वाटेवरून ती खाली उतरत गेली असावी, म्हणून शिवाजी महाराजांनी तेथे बुरूज बांधला असे इतिहास मानतो. देवदेवतांभोवतीच्या दंतकथांना हिंदू पुराणकथा म्हणतात असे वाटते. जनता विभूतीपूजक असते. चमत्कृतीने भरलेल्या दंतकथा – पुराणकथा ही जनतेतील बहुसंख्यांची मानसिक गरज असते. समाज जितका बुद्धिनिष्ठ होत जातो तितकी ही मानसिक गरज कमी होत जाते. बुद्धिनिष्ठांची मांदियाळी असलेले प्रगत पाश्र्चात्य देश ख्रिस्ती धर्माचे आधारस्तंभ. म्हणूनही ख्रिस्ती धर्मात पुराणकथा कमी असू शकतील. ख्रिस्ताभोवती पुराणकथा असत्या तर भारतात ख्रिस्ती धर्म अधिक पसरला असता का, या विषयात मला रस नाही.

  5. फादर हिलरी नेहमी वैचारिक लिखाण करतात. आम्ही, त्यांचे लेख सा. जनपरिवारमध्ये नियमित प्रसिद्ध करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here