युवराज घोगरे यांचा एकच ध्यास- शाळेचा सर्वांगीण विकास! (Yuvraj Ghogre)

3
60
-yuvraj-ghogre-vithhalwadischool

युवराज घोगरे यांच्या शिक्षक म्हणून नोकरीची सुरुवात 12 मार्च 2005 रोजी जळगाव जिल्ह्यातील विवरे या लहानशा गावी जिल्हा परिषद शाळेत झाली. त्या गावात येण्या-जाण्याची साधी सुविधाही नव्हती. शाळेची पटसंख्या छत्तीस होती, परंतु मुले त्यांना शिक्षणात रस नसल्याने शेतात, रानात जायची. त्यामुळे रोज दहा-बारा मुले तरी गैरहजर असायची. वस्ती मुख्यत: भिल्ल, आदिवासी लोकांची; युवराज यांनी तशा घरांतील मुलांना शाळेचा लळा लावण्याचे ठरवले. त्यांनी मुलांना ती जेथे शेतात, रानात असतात, तेथे जाऊन त्यांना शिक्षणाची गोडी लावण्याचे काम सुरू केले; मुलांना आणि त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. युवराज यांनी विद्यार्थ्यांची व गावकऱ्यांची रुची हेरून त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांत गुंतवून घेतले. मुलांना शिक्षकांच्या गोष्टीगप्पा आवडू लागल्या. ती शाळेत येऊ लागली. तेवढेच नव्हे तर ती शाळा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमुळे तालुक्यात हळुहळू नावाजली जाऊ लागली. 

विवरे गावातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत; तसेच, आजी व माजी विद्यार्थ्यापर्यंत सर्वांच्या एकत्रित सहभागाने गावात अठ्ठावीस गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पहिल्यांदा झाला. तो कार्यक्रम युवराज घोगरे यांच्या संकल्पनेतून साकारला गेला होता. त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले जळगाव ग्रामीणचे आमदार यांनी गौरवोद्गार काढले, की “जेजुरीचा एक शिक्षक येतो, गावकऱ्यांना सोबत घेऊन शाळा घडवतो. गरिबांच्या पोट्ट्यांना खडाखडा इंग्रजी बोलण्यास लावतो. येथून पुढे मी जेथे जाईन तेथे सांगेन, की तुम्हाला शाळा व शिक्षक पाहायचा असेल तर विवऱ्याच्या शाळेस भेट द्या.” गावकऱ्यांनी जळगावचे सीईओ एन रामास्वामी यांनाही शाळा पाहण्यासाठी आणले. त्यांनी सरांची शाळा पाहून “मी अशी शाळा जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच पाहतोय” असे कौतुक केले. त्यांनी शाळेभोवती केलेले काटेरी कुंपण पाहून त्या शाळेचे ‘वॉल कंपाउंड’ मंजूर केले.-logo-shikshakvyaspith

युवराज यांची जिल्हाबदली जळगाव येथून 30 डिसेंबर 2009 रोजी पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्याच्या देऊळगाववाडा गावातील विठ्ठलवाडी शाळेत झाली. विठ्ठलवाडी ही वाडी लहान आहे. आठशेपर्यंत लोकवस्ती असेल. युवराज शाळेला पक्ष्यांचे घरटेच समजतात. त्यांनी पुन्हा नव्याने नव्या गावी घरटे उभारण्याचे कार्य हाती घेतले, पण त्यांची डाळ तेथे शिजेना. युवराज विठ्ठलवाडीला येऊन सहा वर्षें झाली तरी शाळेची प्रगती मनासारखी होत नव्हती. त्यांनी योजलेला सांस्कृतिक कार्यक्रम आदल्या दिवशी रद्द करावा लागला (जानेवारी  2016). सर खूपच नाराज झाले, पण केलेल्या कामाचे बीज कोठेतरी रुजत असतेच! त्यांना नाराज झालेले पाहून चौथीतील विद्यार्थिनी कोमल बारवकर तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांना घेऊन आली आणि सरांना म्हणाली, “सर, तुम्ही नाराज होऊ नका. आम्ही तुम्हाला साथ देऊ, शाळा पुढे घेऊन जाऊ.” युवराज घोगरे अस्वस्थ झाले त्या शाळेला सरकारकडून दरवर्षी दुरुस्ती वगैरे कामासाठी दहा हजार रुपये मिळत; शिवाय, स्थानिक लोकांचा सहभाग कमी असे, त्यामुळे त्यांनी लोकांना शाळेकडे आकृष्ट करण्यासाठी मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची ‘ट्रिक’ योजली. पालक मुलांच्या ओढीने शाळेत येत. मुळात मुलांना ती मोठी मौज वाटे.

-school-viththalvadiत्यांनी एके दिवशी कविता शिकवून झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, की “जर तुम्हाला देव भेटला, तर तुम्ही देवाकडे काय मागाल?” या प्रश्नावर अभिषेक बारवकर या विद्यार्थ्याने उत्तर दिले, की “गावकऱ्यांना तुम्हाला आणि शाळेला खूप सहकार्य करण्याची बुद्धी देवो आणि शाळेचा विकास होवो व आपली शाळा पुढे जावो, असे मी मागेन.” सरांचे व विद्यार्थ्यांचे नाते असे तयार झाले होते. त्यांनी मुलांची गुणवत्ता हे ध्येय समोर ठेवून, झोकून देऊन तशी गुणवान मुले घडवली होती. त्यातून पालक व शिक्षक यांचेही नाते घट्ट होऊ लागले. युवराज म्हणाले, की सांस्कृतिक कार्यक्रम असतात नाच-गाणी-नाटुकली या स्वरूपाचेच, परंतु आम्ही त्यासाठी निमित्त आंतरराष्ट्रीय दिनांपासून दहीकाल्याच्या स्थानिक दिवसांपर्यंतचे शोधतो. सर्व मुलांना त्यात कसोशीने गुंतवतो. विद्यार्थ्यांचे त्यामुळे ज्ञान वाढते, त्यांना शाळेची ओढ वाटते. त्यामुळे पालक खूष होतात.

सरांनी त्यांचे अनुभव गावकऱ्यांस 26 जानेवारी 2017ची तारीख गाठून सांगितले आणि मतभेद बाजूला सारून एकत्र येण्याची विनंती केली. त्या विनंतीला सर्वांची भावना समजून गावकऱ्यांनी लगेच, 28 जानेवारी 2017ला ग्रामस्थांची बैठक आयोजित केली. त्या दिवसापासून शाळेत परिवर्तन घडले!  बैठकीत सत्त्याणण्व हजार रुपये जमा झाले. शाळेने त्या रकमेतून प्रोजेक्टर, प्रिंटर, खेळाचे साहित्य, वाचनासाठी पुस्तके खरेदी केली. प्रत्येकाने त्याचे योगदान शाळेच्या विकासात देण्यास सुरुवात केली. कोणी सिमेंट, कोणी वाळू, कोणी खडी-विटा दिल्या. कोणी शाळेत श्रमदान केले. त्या लोकसहभागातून प्रवेशद्वार, कलामंच, रंगरंगोटी आदी भौतिक सुविधांची उभारणी झाली. अशा तऱ्हेने, सरांनी पालकांकडून रोख व वस्तू या माध्यमातून सात लाख रुपये उभे केले, ग्राम पंचायतीने शाळेला चार लाख रुपये दिले. त्यातून शाळेची उत्तमोत्तम कामे झाली. शाळेचे नाव चोहीकडे पोचू लागले. युवराज यांनी स्वतःची मुलगी वेदिका हिला जिल्हा परिषद शाळेतच दाखल करून इतरांना त्यांचे पाल्य मराठी शाळेत दाखल करण्याची प्रेरणा दिली.  

हे ही लेख वाचा –
जागतिक दर्ज्याच्या तोडीस तोड वाबळेवाडीची ओजस शाळा
कातकरी-मराठी शब्दकोशाधारे शालेय शिक्षण – गजानन जाधव यांचा उपक्रम

त्याच काळात शाळेसाठी काही ऐतिहासिक व महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘स्वच्छ भारत अभियाना’चा लोगो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांच्या फोटोमध्ये दिल्ली येथे संसदेमध्ये प्रदर्शित झाला! केंद्र सरकारच्या ब्लॉगवर, तसेच महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवर शाळेचे फोटो, व्हिडिओ, लेख झळकले. विठ्ठलवाडी शाळेने पुणे जिल्ह्यात विविध स्पर्धांत सर्वात जास्त बक्षिसे मिळवण्याचा विक्रम 2017-18 या शैक्षणिक वर्षात केला. शाळेला दोन वर्षांत बत्तीस बक्षिसे मिळाली आहेत. शाळेचे विद्यार्थी जिल्ह्यातील स्पेलिंग पाठांतर स्पर्धेत यशस्वी ठरले. शाळेचा नंबर समुहनृत्यात पहिला आला. शाळेने जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेतही यश संपादन केले आहे. युवराज यांची तळमळ जशी लोकांपर्यंत पोचली तशी शिक्षणविभागापर्यंतही पोचली. विभागाने त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वैशिष्ट्यपूर्णतेवर दीड मिनिटांची क्लिप तयार केली. त्यामुळे विठ्ठलवाडी शाळेच्या उपक्रमशीलतेच्या गोष्टी सर्वत्र पसरल्या. महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचनालयाने शाळेचा गौरव म्हणून शाळेची यशोगाथा चित्रित केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये युवराज घोगरे यांनी सहभाग नोंदवला. शाळेचे सांस्कृतिक  कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व शाळांना मार्गदर्शक म्हणून जाहीर झाले. विठ्ठलवाडी शाळेचा ‘राज्यस्तरीय आदर्श शाळा’ म्हणून दोनदा गौरव करण्यात आला आहे.

युवराज घोगरे फक्त पुस्तकी ज्ञानास महत्त्व न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून विविध उपक्रम घेत असतात. त्यामुळेच ती शाळा बौद्धिक क्षेत्राबरोबर कला व क्रीडा या क्षेत्रांतही ठसा उमटवत आहे. युवराज घोगरे शाळेच्या यशामध्ये ग्रामस्थांचा वाटा सिंहाचा आहे असे म्हणतात. त्या गावाच्या सरपंच पूनम विधाटे, माजी सरपंच डी डी बारवकर, ग्रामपंचायत सदस्य केशव बारवकर, अजय गवळी, प्रमिला बारवकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल बारवकर, हनुमंत बारवकर आणि सर्व ग्रामस्थ अशी सर्व मंडळी शाळेच्या उत्कर्षासाठी झटत असतात. युवराज घोगरे शाळेत रोज एक तास अगोदर जातात. ते त्यांच्या कुटुंबापेक्षा शाळेचा विचार जास्त करतात.

-vithalwadischoolयुवराज घोगरे मूळ पुरंदर तालुक्यातील जेजुरी-दौंडजचे. तेथे त्यांचे आई-वडील व त्यांच्या पत्नी राहतात. त्यांचे शिक्षण एम ए, डीएडपर्यंत झाले आहे. त्यांच्या पत्नी ज्योती पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यात शिक्षिका आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचा धाकटा मुलगा राजवीर व त्यांचे सासू-सासरे राहतात. युवराज यांच्याबरोबर त्यांची मुलगी वेदिका राहते. ती तिसरीत आहे. युवराज व ज्योती या पतीपत्नींच्या शाळांमध्ये एकशेदहा किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे त्यांची भेट ‘वीकेंड’लाच होते.

युवराज यांच्या उपक्रमशीलतेमुळे त्यांची निवड नरेंद्र मोदी यांच्या शालेय शिक्षकांच्या व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी झाली. त्यांच्यासाठी तो अनुभव फार मोलाचा आहे. ते म्हणाले, की त्यातून आम्हा शिक्षकांना स्फुरण मिळाले. युवराज यांचा दत्ता वारे, अर्जुन कोळी, बाळासाहेब घोडे, दत्तात्रय सकट, विक्रम अडसुळ अशा, परिसरातील अन्य उपक्रमशील शिक्षकांशी संपर्क असतो. युवराज म्हणाले, की त्यांच्या शाळा मोठ्या आहेत पण त्यांचे मार्गदर्शन खूप मिळते.

– युवराज घोगरे – 80870 95709
yuvrajghogare@gmail.com              

– रामदास डोंबे 9921383581
 ramdasdombe16@gmail.com
(लेखाचा विकास – थिंक महाराष्ट्र समूह)

About Post Author

3 COMMENTS

  1. खूपच छान युवराज सर
    खूप छान युवराज सर.

  2. खूप छान युवराज . आमच्यासाठी…
    खूप छान युवराज . आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मित्रा.

Comments are closed.