मोक्ष –ज्ञानदेवतेशी एकतानता!

0
21
_Moksha_Dnyandevteshi_1.jpg

संगणकावर आंतरजाल म्हणजे इंटरनेट अवतरले ते सुमारे वीस वर्षांपूर्वी. मुंबईतील नेहरू सेंटरने त्याच सुमाराला त्या संबंधीचे एक प्रदर्शन भरवले होते. ती सारी दुनिया नवीच होती. सर्व चमत्कार वाटायचे, पण ते माणसे घडवत होती! त्यामुळे त्यांना चमत्कार कसे म्हणणार? मला हे नेहमीच कोडे वाटत आले आहे, की भीम पराक्रम घडवणारी माणसे आजुबाजूला दिसत असताना, लोक त्यांच्याकडे पाहत नाहीत आणि भागवत सप्ताहात विष्णूच्या अवतारांच्या काल्पनिक कथांत दिवसच्या दिवस रमून जातात! ते असो. मी नेहरू सेंटरमधील प्रदर्शनात एका बूथमधील एका संगणकासमोरील तरुणास एक संदर्भ विचारला. त्याने मला एका क्षणात थेट वॉशिंग्टनच्या ‘स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट’च्या म्युझियममध्ये नेले आणि हवा तो खुलासा केला. मी त्यामुळे मोहित झालो आणि इंटरनेट कल्पनेच्या प्रेमातच पडलो. मला वाटे, अर्जुनाला झालेले विश्वरूपदर्शन मीच साक्षात अनुभवू शकतो की! त्यासाठी मला श्रीकृष्णासारख्या मध्यस्थाची गरज नाही. माझ्या हातातील माऊसच्या साहाय्याने माझे मीच ते दर्शन घेऊ शकतो. मग मला तो छंदच लागला. मी पार जगभर ‘भटकू लागलो’ – कोणताही विषय घेऊन. मी एका व्हर्चुअल रिअॅलिटी शोमध्ये तर रोमजवळच्या एका चर्चमध्ये जाऊन थडकलो. चर्चची इमारत चारशे वर्षांपूर्वी बांधली, त्याची वीट न् वीट चढत असल्याचे मला जाणवत गेले. योग असा, की मला मी रोमला त्या चर्चमध्ये 1972 साली गेल्याचे आठवले, परिसरातील झाडे दिसू लागली. मी थरारून गेलो. तो अनुभव अद्भुत होता. मी एका साध्या डेस्क टॉप मशीनसमोर बसलेला होतो. ब्रॉड बँड कनेक्शनने, माऊसच्या सहाय्याने एका मागोमाग एक क्लिक करत होतो आणि विलक्षण विश्वात रमून गेलो होतो-वारंवार जात होतो. ते केवळ एक वेड नव्हते, किंवा छंदसुद्धा राहिला नव्हता. क्षणा-क्षणाला माझी उत्सुकता वाढत होती आणि प्रत्येक क्लिकबरोबर माझे ज्ञानक्षितिज विस्तारत होते!

माझ्या त्या ‘वेडा’ला पार्श्वभूमी दोन-तीन दशकांची होती. आम्ही ‘ग्रंथाली’च्या माध्यमातून महाराष्ट्रभर, ग्रंथप्रसाराचा यज्ञ आरंभला. आम्ही त्याला त्या काळच्या हिशोबात ‘वाचक चळवळ’ म्हणत होतो. आमचे स्वप्न महाराष्ट्रातील त्या वेळच्या सुमारे सात कोटी लोकांच्या हाती पुस्तक जावे असे होते, कारण वाचण्याने माणूस प्रगल्भ होतो हा आमचा भरवसा. तशाच एका ‘ग्रंथप्रसार यात्रे’त कवी प्रल्हाद चेंदवणकर याने ‘वाचाल तर वाचाल’ अशी घोषणा एका लयीत दिली. शेकडो ग्रंथप्रेमी आणि विजय तेंडुलकरांपासूनचे आठ-दहा साहित्यिक औरंगाबादच्या रस्त्यावरून त्याच ठेक्यात ‘वाचा रे वाचा पुस्तके वाचा’ म्हणत फिरत गेले. पण काळ बदलत होता. आम्ही 1989 ला ‘वाचन परिषद’ घेतली आणि त्यात ‘वाचनाचा जाहीरनामा’ प्रकाशित केला, तेव्हा आम्ही समजून चुकलो होतो, की ज्ञानसंपादनाचा मार्ग केवळ पुस्तके एवढा राहणार नाही. अन्य साधनेही त्यासाठी उपलब्ध होणार आहेत. कारण तेव्हा पर्सनल कॉम्प्युटर मुंबईत येऊन थडकला होता. बघा, ही साधने किती झपाझप येत गेली! म्हणून आम्ही त्या जाहीरनाम्यात म्हटले, की वाचन ही स्वतंत्र स्वयंभू गोष्ट नाही. ते एक साधन आहे जिज्ञासापूर्तीचे. मूळ महत्त्व आहे ते जिज्ञासेचे. ती माणसाच्या ठायी असली पाहिजे. तो गुण आहे मेंदूचा. त्या गुणाचे संवर्धन कोणत्याही मार्गाने होऊ द्या. त्यानंतर गेल्या पंचवीस वर्षांत ज्ञानसाधनेचे अनेक मार्ग उपलब्ध होत गेले, की थक्क होऊन जावे. त्याचे अत्युच्च टोक आहे ते कृत्रिम बुद्धिमत्तेचे – आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे. तेव्हा ज्या रेडिओवरून गाणी-भाषणे-मुलाखती ऐकता ते श्रवणमाध्यम, ज्या क्षीण होत चाललेल्या ग्रंथप्रेमाची हकिकत मी सांगितली ते ग्रंथमाध्यम, ज्या मालिका पाहता पाहता तुमची संध्याकाळ साजरी होते ते टेलिव्हिजन आणि साध्या आकडेमोडीसाठी म्हणून सुरू झालेले आणि सार्‍या जगाला व्यापून उरले ते संगणक व आंतरजाल यांचे माध्यम… अशी सारी माध्यमे गाऊन, ओरडूनओरडून, आर्जवे करून तुम्हाला सांगत असतात, ‘अहो, माध्यम महत्त्वाचे नाही. महत्त्वाची आहे जिज्ञासा. ती एकदा जागी झाली, की तुम्ही जग जिंकलेच!’ मूल जन्माला आले, की त्याचे डोळे भिरभिर फिरत असतात. ते बाळ जगाकडे कुतूहलाने पाहत असते. आपण त्याला काऊचिऊ, चांदोबा दाखवून त्याचे कुतूहल शमवतो, ते शांतच करून ‘टाकतो. त्यानंतर बालकाचे कुतूहल जागते राहवे यासाठी काही प्रयत्न करत नाही. कम्युनिकेशनच्या नवनव्या साधनांनी ते बंद दरवाजे सताड उघडून टाकले आहेत. तेथून येणा-या ज्ञानप्रकाशात न्हाऊन जाऊया. या समाजाला ‘नॉलेज सोसायटी’ म्हणतात. म्हणजे ज्ञानाधिष्ठित समाज.

मी श्रीवर्धनच्या एका भाषणात इंटरनेटवर उपलब्ध ज्ञानप्रकाशात कसे न्हाऊन निघता येते ते काही उदाहरणे देऊन सांगितले आणि म्हटले, की मी इंटरनेटवर असतो तेव्हा मला मोक्ष मिळालेला असतो! मला जगाची फिकीर नसते. मी माझ्या मनबुद्धीतील परमानंद अनुभवत असतो. माझी समाधी लागलेली असते. माणसाला मोक्ष चौर्‍याऐशी योनीतून जन्म घेऊन गेल्यावर मिळतो असे रूढ कल्पना सांगते, पण इंटरनेटवर मोक्ष याच जन्मात जागेपणी मिळू शकतो. तुमच्या बुद्धीचे आणि मनाचे सारे विभ्रम तेथे प्रकट होतील तेदेखील ज्ञानदेवतेशी एकतानता साधत…

कोणी यानंतर परमार्थाचा, अध्यात्माचा आनंद वेगळा कसा याचे वर्णन करील. तेथेही ज्ञानसमाधीच अभिप्रेत असते. त्या ज्ञानाची व्याख्या वेदांतकाळापासून निश्चित करण्यात आली आहे. सद्यकाळात जग बहुअंगांनी प्रस्फुटीत होत असताना ‘ज्ञानाला मर्यादा नाही’ असे म्हणत त्या व्याख्येशी निगडित राहायचे, की ‘ज्ञान’ संकल्पनेच्या नवनव्या, विस्तारत जाणाऱ्या व्याख्येचा शोध घ्यायचा.

(आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर झालेल्या भाषणाआधारे)

– दिनकर गांगल

About Post Author

Previous articleरानातल्या पाखरांचा चिवचिवाट रोजनिशींतून
Next articleमातीत रुजलेल्या शिक्षणाची सुरुवात
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.