मैत्री स्वत:शी, मैत्री सर्वांशी!

0
53
carasole

‘मेळघाट’ हा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडील संपूर्ण जंगल असलेला परिसर. मेळघाटात तीनशेवीस गावे आहेत. चार हजारपन्नास चौरस किलोमीटरचा तो प्रदेश चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांत विभागलेला असून तेथे कोरकू आदिवासींची मुख्य वस्ती आहे.

मेळघाटातील बालमृत्यू आणि कुपोषण यासंबंधीच्या खूप बातम्या १९९७ सालच्या पावसाळ्यात वृत्तपत्रांमध्ये आणि टेलिव्हिजनवर येत होत्या. महाराष्ट्रातील काही लोकांनी त्याची शहानिशा करण्याचे ठरवले. त्यांनी मेळघाट फिरून पाहिला. त्यावेळी त्यांना बालमृत्यू आणि कुपोषण हा प्रश्न खूप गंभीर आहे असे दिसले. त्यांनी महाराष्ट्रातील स्वयंसेवकांना त्या वर्षीच्या पावसाळ्यात मेळघाटात येऊन कामास लागण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद म्हणून दोनशेपासष्ट स्वयंसेवक मेळघाटात गेले. त्यामध्ये डॉक्टर, पत्रकार, बँक मॅनेजर, विद्यार्थी, समाजसेवक, वकील अशा विविध व्यावसायिकांचा समावेश होता. ‘मेळघाटमित्र’ची सुरुवात ही अशी झाली.

त्यानंतर पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते तेथे आले आणि त्यांनी मेळघाटच्या प्रश्नांसाठी काम सुरू केले. ‘एकही बालमृत्यू होऊ द्यायचा नाही’ हा एकमेव उद्देश त्यांच्या डोळ्यांपुढे होता. सुरुवातीस सहा गावांत सुरू केलेले काम अठ्ठावीस गावांत जाऊन पोचले आहे. संस्थेला कायदेशीर बाबी, हिशोब ठेवावे लागतात; त्यासाठी ‘मैत्री’न्यासाची रीतसर नोंदणी १९९९मध्ये करण्यात आली. मुकुंद केळकर, अनिल शिदोरे, राहुल धर्माधिकारी, श्रीराम रामदासी, संजय रिसबुड, डॉ. पार्वती हळबे हे ‘मैत्री’ न्यासाचे काही विश्वस्त आहेत. तर विनिता ताटके, जयश्री शिदोरे, शिरीष जोशी,मंगेश जोशी, अश्विनी धर्माधिकारी, अभिजित कस्तुरे, हर्षद पेंडसे असे ‘मैत्री’ चे अनेक पाठीराखे आहेत.

‘मैत्री’चे सभासद बैठकीसाठी पुणे येथील भांडारकर रोड वरील ‘कमला नेहरू पार्क’च्या हिरवळी वर गेली अठरा वर्षें दर मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता एकत्र जमतात. तेथे विचारांची देवाण घेवाण होते. ‘मैत्री’च्या पुढील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येते; अनुषंगिक विषयांवर चर्चा होते.

मेळघाटात दरवर्षी शेकडो बालके वयाची पाचवर्षे पूर्ण व्हायच्या आत मृत्युमुखी पडतात आणि तेवढीच कुपोषणाच्या अतिगंभीर श्रेणी मध्ये जीवन-मृत्यूच्या काठावर असतात. बालमृत्यूची कारणे अनेक आहेत. त्यापैकी कुपोषण हे एक महत्त्वाचे कारण. मेळघाटात जेवढे बालमृत्यू होतात, त्यांपैकी साठ टक्के बालमृत्यू बालकाचे वयाचे अठ्ठावीस दिवसपूर्ण होण्याच्या आतघडून आलेले असतात. मेळघाटातील बालमृत्यू रोखणे व आदिवासींच्या तदनुषंगिक समस्या सोडवणे हा ‘मैत्री’चा मुख्य उद्देश आहे. ‘मैत्री’ ही मानवतावादी कार्य करणारी व स्वयंसेवकांच्या आधारा वर चालणारी संस्था आहे. ‘मैत्री’चे कार्यकर्ते मेळघाटात जाण्या येण्यासाठी व तेथील वास्तव्याच्या खर्चासाठी पदरमोड करतात.

‘मैत्री’चे घोषवाक्य ‘मैत्री, स्वत:शी, – मैत्री, सर्वांशी!’ हे आहे. ‘मैत्री’ची मदार उत्स्फूर्ततेने काम करणाऱ्या स्वयंसेवकांवर आहे. ‘मैत्री’ त्यांना संघटनात्मक पाठिंबा देते. ‘मैत्री’चे कार्यकर्ते स्वत:चा उद्योगधंदा सांभाळून ‘मैत्री’चे काम करतात. ‘मैत्री’च्या स्वयंसेवकांना स्वातंत्र्य असते. त्यांनी घेतलेले निर्णय त्यांनी स्वत:च पुढाकार घेऊन पूर्णत्वास न्यायचे असतात. सध्या ‘मैत्री’ मुख्यत: मेळघाट, (‘आरोग्य व शिक्षण’), ‘सर्वात आधी शिक्षण’ (साउंड ऑफ इंग्लिश), ‘आपत्कालीन मदत व पुनर्वसन’या क्षेत्रांत काम करत आहे.

मेळघाट (आरोग्य व शिक्षण) – मेळघाटात कुपोषणामुळे दीड हजार बालमृत्यू १९९७मध्ये झाले. त्या पार्श्वभूमीवर अनेक स्वयंसेवक एकत्र आले व त्यांनी अनेक आदिवासी बालके कुपोषणाच्या व मृत्यूच्या विळख्यातून वाचवली. पावसाळ्यातील तीन महिने त्यांनी सतत काम केले व ‘मेळघाट मित्र’ची स्थापना झाली.

महाराष्ट्रातून जवळ जवळ अडीचशे स्वयंसेवक जमा झाले होते. ते तेथील कोरकू आदिवासीं सोबत राहिले. त्यांनी त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि त्यांच्या आरोग्य, शिक्षण व अन्नाची शाश्वत उपलब्धी यांसाठी (कुपोषण टळावे म्हणून) काम सुरू केले. त्यासाठी कोरकूंचा विश्वास संपादन करणे हे मोठे आव्हान होते. त्यांच्या संपर्कात राहून, त्यांची भाषा शिकून, त्यांच्यात आपले पणाची भावना जोपासणे गरजेचे होते. स्वयंसेवकांना त्यांच्या बद्दल वाटणारी कळकळ त्यांना जाणवल्या वरच त्यांना मदत करणे शक्य होते. त्यासाठी स्वयंसेवकांना प्रयत्न करावे लागले. स्थानिक पातळीवरील शासन यंत्रणेशी ही संपर्क ठेवण्यात आला. कोरकूंना साहाय्यक रण्यातज्या अडचणी येत त्यांचे निराकरण करण्यात आले.

कोरकूंना शासकीय योजनांची माहिती करून देण्यात आली. ते ‘चिलाटी’ येथील ‘मैत्री’च्या केंद्राशी संपर्क साधू लागले.

मेळघाटात वीस गावांत प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. त्यातून स्थानिक पातळीवरील तरुण कार्यकर्ते तयार झाले. त्यांना कोरकूंच्या प्रश्नांची जाण होती व ते कोरकूंशी सहज संवाद साधू शकत होते. त्यांचा दुभाष्ये म्हणून ही उपयोग होत होता.

डॉ. अभय बंग यांच्या मार्गदर्शना खाली सहा वर्षें वयाच्या बालकांच्या मृत्युदराची पाहणी करण्यात आली. त्याला आदिवासींनी ही सहकार्य केले.

मेळघाटात पंधरा गावांत पंधरा ‘गावमित्र’,बारा ‘आरोग्य मैत्रिणी’ व पाच स्थानिक ‘कोरकू स्वयंसेवक’ हे तेथील आरोग्य व शिक्षण यासाठी नियमित पणे काम करतात. त्यांना त्यासाठी मानधन देण्यात येते. ते आरोग्य व शिक्षण यांसंबंधी जागृती करण्याचे काम साधतात. कुपोषित मुले शोधून त्यांना पोषक आहार देणे, सर्वसाधारण आजारांवर प्राथमिक उपचार करणे, आरोग्याच्या नोंदी ठेवणे, शासकीय यंत्रणा वजनता यांमधील दुवा म्हणून काम करणे, स्वच्छते विषयी प्रबोधन करणे, शासकीय आरोग्य सेवांचा लाभ घेण्यास उद्युक्त करणे, आरोग्याच्या व इतर अंधश्रद्धा दूर करणे, शेती संबंधी मार्गदर्शन करणे, कृषी खात्याच्या योजना समजावून सांगणे, लोकांना संघटित करणे व त्यांच्या साहाय्याने प्रश्न सोडवणे, लोकांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देणे,‘रोजगार हमी योजने’च्या माध्यमातून कामे करून घेणे इत्यादी कामे करतात.

मेळघाटातील पंधरा गावांमधून शाळा भरण्याच्या अगोदर एक तास अभ्यासवर्ग चालू झाले आहेत. ‘गावमित्र’ अभ्यासवर्ग घेत असतात. त्यामुळे मुलांना तर उपयोग होतोच, पण शाळेतील उपस्थिती वाढण्यास व शाळा वेळेवर सुरू होण्यास मदत होते.‘आरोग्यमैत्रिणी’शासकीय‘आशां’सारखेच काम करत आहेत.

‘मेळघाट मित्र’च्या धडक मोहिमेची सुरुवात मुळात कुपोषण आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू वाचवणे या उद्देशाने झाली. मेळघाटात जास्त बालमृत्यू हे पावसाळ्याच्या दिवसांत होतात. मेळघाटात पावसाळ्यातील परिस्थिती वाईट असते. मेळघाटात वर्षभरामध्ये जेवढे बालमृत्यू होतात त्यातील साठ टक्के फक्त पावसाळ्याच्या दिवसांत होतात. त्या दिवसांत साथींचे आजार वाढलेले असतात. पावसामुळे गावांमधील संपर्कही तुटलेला असतो. त्यामुळे दवाखान्यात जाऊन उपचार घेणे अवघड होते. लहान मुलांच्या बाबतीत लगेच उपचार झाले नाहीत तर बालमृत्यू होण्याचा धोका वाढतो. अशा आजारांवर नियंत्रण ठेवणे आणि लोकांना सोबत घेऊन असे आजार होऊ नयेत म्हणून काम करणे यासाठी ‘मैत्री’तर्फे जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत धडक मोहिमेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यावसायिक, महिला इत्यादी धडक मोहिमेत सहभागी होतात आणि प्रत्यक्ष गावागावात राहून अदिवासींसाठी काम करतात. मोहिमेत बालमृत्यू वाचवण्याबरोबर आरोग्यशिक्षण देण्यावर भर दिला जातो.

धडक मोहिमेत मुख्यत: पुढील बाबींवर काम केले जाते.

 

  • सहा वर्षांवरील मुलांच्या आजार पणाकडे लक्ष देणे.
  • एक वर्षा खालील सर्व मुलांच्या घरी दररोज भेट देणे.
  • गरोदर स्त्रियांना दररोज भेटणे आणि त्यांना आरोग्य शिक्षण देणे.
  • कुपोषित मुलांच्या घरी भेटी देणे आणि त्यांच्या पालकांना आहाराबद्द्ल मार्गदर्शन करणे.
  • गावा गावातील लोकांना सोबत घेऊन सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबवणे.
  • साध्या आजारांवर उपचार करणे.
  • प्रथमोपचार पद्धत अवलंबवणे.
  • शासकीय आरोग्य विभाग आणि आदिवासी यांच्यामध्ये दुवा साधणे.

‘मैत्री’ने धडक मोहिमा नऊ वर्षें राबवल्या आहेत. त्यांत प्रत्येक मोहिमेत जवळ जवळ दीडशे स्वयंसेवक सहभागी झाले. त्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे किमान दीडशे बालके वाचली. मेळघाटातील ज्या पंधरा गावांमध्ये ‘मैत्री’चे काम पूर्ण वेळ चालू आहे तेथे एक ही कुपोषित मूल नाही.‘मैत्री’तर्फे मेळघाटात ‘सौरऊर्जे’चा वापर करून ‘चिलाटी’या गावाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. तसेच,‘रूईपठार’या गावात जलवितरण व्यवस्था करण्यात आली आहे.

एसीएम (असोसिएटेड कॉलेजेस ऑफ मिडवेस्ट) – अमेरिकेतील मिडवेस्ट भागातील काही विद्यार्थी दरवर्षी ‘सर्व्हिस लर्निंग प्रोग्राम’या उपक्रमा अंतर्गत ‘मैत्री’मार्फत मेळघाटला भेट देतात. अमेरिकेतील कोलोरॅडो कॉलेज मधील विद्यार्थी‘मैत्री’मार्फत त्या उपक्रमात सामाजिक कार्याचा अनुभव घेण्यासाठी सहभागी झाले होते.

मेळघाटातील चिलाटी येथे ‘शंभर दिवसांची शाळा’ हा उपक्रम घेण्यात आला. त्या अंतर्गत आदिवासी मुलांची निवास-भोजनाची व्यवस्था करून त्यांना विविध प्रकारचे शिक्षण देण्यात आले. त्यासाठी पुण्यातून प्रशिक्षित स्वयंसेवकांची एक बॅच दर दहा दिवसांनी चिलाटीला जात होती.

‘मैत्री’ निधी संकलन –‘मैत्री’च्या वेगवेगळ्या उपक्रमांना लागणारा निधी लोकसहभागातून उभा केला जातो. त्यासाठी वृत्तपत्रांतून लोकांना वेळोवेळी आवाहन करण्यात येते. तसेच,  इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांचाही (टी.व्ही., फेसबुक, ईमेल) उपयोग करण्यात येतो. जवळ जवळ दहा हजार लोकांशी ‘मैत्री’मार्फत संपर्क ठेवण्यात येतो. इमेल, मोबाईल या माध्यमांतून त्यांना सदिच्छा भेटी दिल्या जातात; वाढदिवसाला शुभेच्छा देण्यात येतात. त्यांना देणगीसाठी आवाहन करण्यात येते. पूर्वी देणगीदार जास्त होते पण पूर्वीपेक्षा आता निधी संकलन जास्त होते. नियमित देणग्या देणारे दाते आहेत. तसेच, काही लोक विवाह, वाढदिवस अशा प्रसंगी देणग्या देतात. गुजरातच्या भूकंपात ‘मैत्री’च्या कामात‘टेक महिंद्र’च्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पुढे त्यातील काहीजण परदेशी गेले. पण त्यांनी ‘मैत्री’शी जुळलेला दुवा सांभाळला. अशा व इतरही काही परदेशी व्यक्तींकडून वैयक्तिक स्वरूपात ‘मैत्री’ला देणग्या मिळत असतात.‘मैत्री’ला कोणते ही शासकीय वापर देशी अनुदान मिळत नाही.

संस्थेला देणग्या मिळवण्याबरोबर प्रत्यक्ष लोकसहभागातून निधी जमवावा अशी कल्पना ‘मैत्री’च्या स्वयंसेवकांच्या मनात आली आणि त्यांनी २००६ सालापासून पुण्यातील मोठ्या सोसायट्यांमधून रद्दी जमवून, ती विकून निधी संकलनास सुरवात केली. त्या उपक्रमाला संस्थेने ‘रद्दीतून सद्दी’असे नाव दिले आहे. घरी जमणारी रद्दी दुकानात विकण्यापेक्षा ‘मैत्री’च्या हवाली करून पुणेकरांनी लाखो रूपयांची रक्कम ‘मैत्री’च्या खात्यात जमा केली आहे. ‘मैत्री’तर्फे पुण्यातील कोथरूड येथील राहुल टॉवर्स, पिनांक सदिच्छा, मारूती मंदिर, मयूर कॉलनी परिसर, वुडलँड सोसायटी, स्प्रिंगफील्ड सोसायटी येथून; तसेच, नवशा मारूती जवळील औदुंबर, प्रज्ञागड, शुक्रतारा या सोसायट्यांमधून नियमितपणे रद्दी संकलन केले जाते. केवळ राहुल टॉवर्स या सोसायटीतील एकशे ऐंशी फ्लॅटस् मधून दरमहा दहा हजार रूपयांची रद्दी जमा होते. त्या सर्व सोसायट्यांमधील जवळ जवळ बाराशे घरांतून दरमहा पंधरा ते सोळा हजार रुपयांची मदत मिळते व त्यातून वर्षाला साधारण दोन लाख रुपयांचा निधी गोळा होतो. ‘मैत्रीजत्रे’त कलाकारांनी स्वत:च्या हातांनी तयार केलेल्या कलाकुसरच्या वस्तू प्रदर्शित केल्या जातात. ते प्रदर्शन दिवाळीच्या आसपास भरवले जाते. त्यातून मिळणारा नफा कलाकार ‘मैत्री’च्या कामासाठी देतात.

‘मैत्री’तर्फे ‘इंद्रधनू’ नावाचे अनियतकालिक चालवले जाते. अनियतकालिकाचे दहावे वर्ष चालू आहे.

‘सर्वात आधी शिक्षण’ हा मैत्रीचाच एक गट. त्या गटातर्फे होणा-या ‘साउंड ऑफ इंग्लिश’ (Education First) या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचा परिचय करून दिला जातो. बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळांत उत्कृष्ट इंग्रजी भाषा शिक्षक उपलब्ध करून दिले जातात. अशा प्रकारे पालकांना त्यांच्या पाल्यांना बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवण्यास प्रोत्साहन दिले जाते.

गुजरातमध्ये झालेल्या भूकंपावेळी ‘मैत्री’ने आपद्ग्रस्ताना सहकार्य केले. बचावकार्य व मदत या दोन्हींची लोकांना गरज होती. भूकंपामुळे लोक मुख्यत: बेघर झाले होते. त्यामुळे ‘मैत्री’ संस्था निवारा व पुनर्वसन या कार्यांत प्राधान्याने सहभागी झाली; संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छतेचे व्यवस्थापन कोलमडल्याने निर्माण झालेले आरोग्याचे प्रश्न सोडवण्यास सहकार्य केले.

‘मैत्री’चे स्वयंसेवक २००५ मध्ये आलेल्या त्सुनामी आपत्तीमध्ये चेन्नई परिसरात धावून गेले. समुद्राच्या रुद्रावतारामुळे लोक भयग्रस्त झाले होते. लोकांचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवून देणे आवश्यक होते. ‘मैत्री’ने त्यांना दिलासा देऊन त्यांची समुद्राबद्दलची भीती हटवण्याचे काम केले.‘मैत्री’ने उपजीविकेची साधने देऊन, बोटींच्या दुरुस्तीस मदत करून पुनर्वसन कार्यास हातभार लावला.

‘मैत्री’च्या मंगेश जोशी आणि अन्य कार्यकर्त्यांनी ढगफुटीनंतर लेहला भेट दिली. त्यांनी तेथील परिस्थितीची त्या भेटीत पाहणी केली. तुफान पावसाने दरडी कोसळल्यामुळे त्याखाली अनेकजण गाडले गेले होते. तो कमी पावसाचा बर्फाळ थंड वाळवंटी प्रदेश! तेथे मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात एकशेपासष्ट नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्या आपत्तीत सापडलेल्या नागरिकांचा आणि पर्यटकांचा बचाव आणि त्यांची सुटका करण्याचे काम करून,‘मैत्री’ने लेहवासियांस मदत केली. उत्तराखंडमध्ये झालेली ढगफुटी आणि त्यामुळे आलेल्या महापुरामुळे नैसर्गिक आपत्तीचा फटका देशभरातील हजारो पर्यटक आणि तेथील स्थानिक नागरिक यांना बसला होता. पर्यटनासाठी गेलेले नागरिक तेथे अडकले होते. गावेच्या गावे वाहून गेली होती. त्या आपत्तीचा सामना करण्याचे प्रयत्न ‘मैत्री’च्या प्रशिक्षित स्वयंसेवकांनी केले. ‘मैत्री’ने उत्तरांचलमधील आपत्तीत देखील तत्परतेने मदत केली आणि पुनर्वसनाचे काम पार पाडले. त्यासाठी तेथील स्थानिक संस्थांची मदत घेण्यात आली. उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यातील मुन्सियारी वधारचुला या तालुक्यांतील नैसर्गिक आपत्तीच्या भीषण तडाख्यात सापडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करण्यात आली. गोरीगंगा, काली गंगा व धौली गंगा या तीन नद्यांना आलेल्या महापुरामुळे त्या तीन नद्यांच्या संगमांवरील गावांमध्ये हाहा:कार उडाला होता. जौलजीबी व तवाघाट या दोन गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले होते. रस्त्यांची दुरवस्था झाली होती. धारचुलाहून तवाघाट या गावी जाताना, इलाघाट येथे रस्ता तुटलेला होता. प्रचंड वेगात वाहणारा झरा तेथे होता. निदान चालत तरी जाता यावे म्हणून ‘मैत्री’ आणि ‘गिरीप्रेमी’ या संस्थांच्या स्वयंसेवकांनी त्या झऱ्यावर पाईप्सचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपाचा पूल उभारला. त्याचा फायदा हजारो लोकांना झाला. त्या सर्व भागांत पुरामुळे, पावसामुळे जगाशी संपर्क तुटला होता. त्यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यांना ‘मैत्री’तर्फे आरोग्याच्या समस्यांमध्ये ही सहकार्य करण्यात आले.

नेपाळमध्ये भूकंप झाल्यावर ‘मैत्री’चे स्वयंसेवक शिरीष जोशी, शिवकुमार, तुषार आणि स्वाती शुक्ला तत्काळ काठमांडूमध्ये पोचले. तेथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. मदतीचे स्वरूप ढिगा-याखाली दबलेल्या माणसांना बाहेर काढणे, आरोग्यसेवा देणे, फुड पॅकेट्स व पाणी पोचवणे हे होते. पाऊस पडत होता, भूकंपाचे धक्के बसत होते. त्यामुळे लोक रस्त्यावर राहत होते. आवश्यक तातडीची मदत म्हणून ‘मैत्री’तर्फे अन्नधान्य, पाणी आणि ताडपत्री यांसाठी प्राधान्याने सहकार्य करण्यात आले. तसेच, तेथील जनजीवन सुरळीत सुरू व्हावे याकरता ही त्यांना ‘मैत्री’मार्फत मदत करण्यात आली.

‘मैत्री’तर्फे १ जानेवारी २००६ रोजी अहमदनगरपासून ‘दुष्काळ हटवू माणूस जगवू’ पदयात्रा काढण्यात आली व ती नऊ जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत वर्धा येथे समाप्त झाली. तिचा हेतू दुष्काळाच्या प्रश्नाकडे समाजाचे लक्ष वेधून हा प्रश्न कायम स्वरूपी सोडवणे हा होता. पण पदयात्रेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. शासनाने ही दखल घेतली नाही. ज्या ज्या गावांतून पदयात्रा पुढे गेली त्या त्या ठिकाणी वैयक्तिक पातळीवर लोकांनी पुढाकार घेतला.

अकरा कार्यकर्ते त्या पदयात्रेत सुमारे नऊशे किलोमीटर चालले. तीन लाख लोक त्या पदयात्रेत सहभागी झाले व दहा लाख लोक संपर्कात आले. त्यामुळे सामाजिक अभिसरण झाले. गावागावांत शिक्षण, आरोग्य, गटबाजी यांबाबत लोकजागृती करणे हा हेतू होता तो ही साध्य झाला. पण दुष्काळ हटवण्यासाठी पदयात्रेचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही. शासनाने ही दखल घेतली नाही.

– अनुराधा काळे

‘मैत्री’ कार्यालय,३२, नटराज सोसायटी, कर्वेनगर, पुणे ४११ ०५२ येथून चालते.

(‘मैत्री’ला सर्व उपक्रम राबवण्यास वर्षाला साधारणपणे पंचवीस लाख रुपयांच्या जवळपास खर्च येतो. ‘मैत्री’ साठी दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या ८०जी खाली करमुक्त आहेत.)

इच्छुकांना देणगी ‘मैत्री’ या नावाने चेक/रोख रक्कम देणगी म्हणून देता येईल.
ऑनलाईन देणगी: एच.डी.एफ.सी. बँक, खाते क्रमांक: 01491450000152
आय.ए.एफ.एस. कोड: RTGS/NEFT-HDFC0000149,
पॅन क्रमांक : AAATZ 0344 C

 

About Post Author