मुंबईच्या काळा घोडा परिसराचे सौंदर्य

मुंबईमध्ये अनेक धर्म, जाती-जमातींतून बनलेल्या एकोप्याचे प्रतिबिंब सामाजिक विविधतेत दिसून येते, तर विविध देशी-विदेशी स्थापत्यशैलींत बांधलेल्या इमारतींत अप्रतिम कलासौंदर्याचा मिलाफ दिसून येतो. काळा घोडा परिसर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे!

मुंबईला आधुनिक शहराचा चेहरा नागरी व्यवस्थापनाची उत्तम जाण व निर्णयक्षमता असलेले ब्रिटिश गव्हर्नर आणि तज्ज्ञ नगररचनाकार यांनी दिला. बांधकामाचा पूर्वानुभव आणि विदेशी भाषेचा गंधही नसलेल्या आंध्र प्रदेशाच्या तेलुगू समाजातील कुशल कंत्राटदारांनी मुंबईमधील विदेशी शैलीतील इमारती प्रत्यक्षात उभ्या केल्या. भारतीय स्थापत्य अभियंत्यांनी बांधकाम देखरेख; तसेच, ब्रिटिश आर्किटेक्ट व कंत्राटदार यांच्यासाठी दुभाष्याचे काम केले. कालांतराने, वसाहतकालीन वास्तुशैलीही ब्रिटिश राजवटीप्रमाणे लोप पावली. तेलुगू समाजातील नव्या पिढ्यांनीही पिढीजात बांधकाम व्यवसाय बंद करून इतर छोट्यामोठ्या धंद्यांत शिरकाव केला.

काळा घोडा व म्युझियम यांच्या परिघात दक्षिणोत्तर रिगल सिनेमा ते एस्प्लनेड मॅन्शन आणि पूर्व-पश्चिमेकडील लायन गेट ते ओव्हल मैदानापर्यंतचा भाग येतो. ब्रिटिश वास्तुविशारदांनी वेगवेगळ्या शैलींत बांधलेल्या इमारती तेथे दिसतात. त्यांत मुंबई विद्यापीठ, एलफिन्स्टन कॉलेज, डेव्हिड ससून लायब्ररी व्हिक्टोरियन निओ गॅाथिक शैलीत, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय इंडो सारसेनिक शैलीत, आर्मी नेव्ही इमारत रिनायसन्स रिव्हायवल शैलीत, तर नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट ही इमारत एडवर्डियन निओ क्लासिकल अशा शैलींत बांधल्या गेल्या आहेत. मॉडर्न शैलीत बांधलेले मॅक्सम्युलर भवन व भारतीय कलेचे माहेरघर समजली जाणारी जहांगीर आर्ट गॅलरी वसाहतकालीन वातावरणात सहजपणे विलीन झाल्या आहेत.

कोणतेही सौंदर्य ही साक्षात अनुभूती असते. सौंदर्याची कल्पना प्रत्येक व्यक्तिगणिक बदलत असते. ती कालसापेक्ष असते. सौंदर्य जाणून घ्यायचे असेल तर व्यक्तीकडे सौंदर्यदृष्टी हवी. स्थापत्य कलासौंदर्याचे नानाविध नमुने काळा घोडा परिसरात पाहण्यास मिळतात. स्थापत्यकलेने नटलेल्या सौंदर्यपूर्ण परिसराची खासियत अशी आहे –

– विविध वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील प्रमाणबद्ध इमारती.
– विशाल रुंदीचे रस्ते. जवळपास त्याच रुंदीच्या आकारमानातील उंच इमारती.
– समान उंचीच्या इमारती.
– भरभक्कमतेची खात्री देणारे दगडी बांधकाम व एकल रंगसंगती व त्यावरील नक्षीकाम.
– भरपूर रुंद व आच्छादित पदपथ.
– घनदाट छाया देणारे उंच, डेरेदार निवडक वृक्ष.
– शहर सुशोभीकरणात फाउंटन, क्लॉक टॉवर, पुतळ्यांचा कलात्मक वापर.

वरील वैशिष्ट्यांचा एकमेकांशी असलेला समतोल, लयबद्धता, मोठ्या आकारातील मैदाने, विविध शैलींत आकारबद्ध केलेली कारंजी व उत्कृष्ट पुतळ्यांची रेलचेल यांमुळे वातावरणातील प्रसन्नता वाढते. त्या संयुक्त दृश्य परिणामातून वास्तुविशारदांनी परिसरसौंदर्य खुलवण्याची किमया साधली आहे. नागरिकांना काळा घोडा परिसराला वारंवार भेट द्यावीशी वाटते. त्यातच सारे काही आले!

तत्कालीन नागरी आराखड्यात विविध शैलींतील इमारती; तसेच, शहर सुशोभीकरणासही तेवढेच महत्त्व दिले जात होते. सामाजिक बांधिलकीतून तत्कालीन धनिक सार्वजनिक जागी कारंजे, क्लॉक टॉवर, फाउंटन उभारण्यात पुढाकार घेत असत.

काळा घोडा परिसरात कलावंतांची वर्दळ असते. जहांगीर आर्ट गॅलरी, मॅक्सम्युलर भवन आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या कलाविषयक संस्था त्याच परिसरात आहेत. जहांगीर आर्ट गॅलरीतील सहाशे चौरस फूट जागेत केवळ दोन टेबलांच्या रांगा असलले एकमेवाद्वितीय असे ‘कॅफे समोवर’ 1964 मध्ये सुरू झाले (ते काही वर्षांपूर्वी बंद झाले). कॅफे समोवरचा चहा किंवा स्नॅक्स आणि तासन् तास गप्पा हे समीकरण ठरलेले असे! तसेच, ‘वेसाइड इन’मध्ये दिग्गज कलावंतांची ऊठ-बस असे. मी तेथे नवोदित कलावंतांना त्यांच्या कल्पनेतील दुनियेत रमवणाऱ्या विविध कलाक्षेत्रांतील मिश्किल कलावंतांना मी जवळून पाहिले आहे! दर्दी मुंबईकरांची आवड जोपासणारे ऱ्हिदम हाउस व संगीत या वेगळ्या न करता येणाऱ्या गोष्टी होत्या. वर्तमान डिजिटल तंत्रज्ञानाने त्यांचे अस्तित्वच पुसून टाकले आहे. गेली अनेक वर्षें कलावंतांच्या हृदयात स्थान बनून राहिलेल्या बैठकीच्या जागा काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत! ती उणीव भरून काढण्याची गरज आहे.

ब्रिटिश राज्यकर्ते व कर्तबगार गव्हर्नर यांचे मार्बलमधील अनेक पुतळे तत्कालीन दक्षिण मुंबईत होते. ते पुतळे वसाहतकालीन राजवटीची देन होती. वसाहतकालीन राज्यकर्त्यांचे पुतळे मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत नसावेत, या विचारधारेतून 1960 च्या दरम्यान अनेक पुतळे भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई उद्यानात (क्वीन व्हिक्टोरिया गार्डन) हलवण्यात आले. पुतळ्यांची रवानगी ‘राणीच्या बागेत’च केली जावी हा योगायोग की दुसरे काय, हे सांगणे कठीण आहे! किंग एडवर्ड यांचा (सातवा) पुतळाही तकलादू कारण पुढे करून राणीच्या बागेत 1965 मध्ये हलवण्यात आला. किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) हॉस्पिटल 1926 मध्ये बांधण्यात आले. एकाच राज्यकर्त्याच्या स्मरणार्थ शिल्प व इमारत बांधले गेले होते. ते हॉस्पिटल आर्थिकदृष्ट्या मागास जनतेसाठी अल्प खर्चात वैद्यकीय सेवा पुरवण्याचे कार्य करत आहे! शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या शिल्पाबाबत सापत्नभाव दाखवला जाणे ही बाब माझ्या कला-संवेदनशील मनास खटकते!

वसाहतकालीन परिसरातील जगप्रसिद्ध शैलीत बांधलेल्या इमारती हे मुंबईचे वैभव आहे. फोर्टमधील अनेक सुंदर दाखले केवळ दुर्लक्ष केल्यामुळे नजरेआड गेले आहेत. त्या इमारतींत पुढील अनेक वर्षें टिकून राहण्याची क्षमता आहे. परंतु इमारतींचे योग्य जतन झालेले नाही, हे वास्तव आहे.

युरोपमध्ये संपूर्ण शहर जतन केल्याचे दाखले अनेक आहेत. योगायोगाने त्याचा प्रत्यक्ष पुरावाच जहांगीर आर्ट गॅलरीत पाहण्यास मिळाला. व्हिज्युअल डिझाइन विषयात कौशल्य मिळवलेल्या संजीव भागवत या आर्किटेक्टने चौदाव्या शतकापासून भरभराट पाहिलेल्या झेक प्रजासत्ताकाची राजधानी असलेल्या प्राग शहराचे पुरातन सौंदर्य छायाचित्रांच्या माध्यमातून मांडले होते. कॅमेऱ्यात कैद केलेल्या चौकटीतील बारकावे चार शतकांपूर्वीचे आहेत यावर विश्वास बसत नव्हता! शहरातील मुख्य रस्त्याची दगडी फरसबंदी (Cobblestone) शहर सौंदर्याचा भाग असू शकते हे प्रागमध्येच शक्य आहे. वर्तमान मुंबईतील रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक हे त्याचे विरूद्ध टोक आहे. पुरातन वस्तू असोत की इमारती, विदेशात त्यांचे योग्य रीतीने जतन होते. भारतीयांनी तसे केले नाही. छायाचित्रे पाहताना ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे तत्कालीन संपादक स्टेनली रोड यांनी लिहिलेल्या वाक्याची आठवण झाली. 1880 च्या दरम्यान फोर्ट तटबंदी व तीन मुख्य दरवाजे पाडून टाकण्यात आले. ती बातमी ऐकून निराश झालेल्या संपादकांनी लिहिले होते – ‘त्या प्रसंगाच्या आठवणीने मन व्यथित होते. ज्या पुरातन स्थापत्याशी जोडले गेलो होतो, ती शृंखलाच आम्ही तोडून टाकली आहे. अरे! निदान एक दरवाजा तरी आठवण म्हणून जतन करायला हवा होता!’ केवढी ही संवेदनशीलता…

काळा घोडा परिसरातील वसाहतकालीन वस्तूंचे संग्रहालय एस्प्लनेड मॅन्शनपासून जवळच आहे. जवळपास एकाच कालावधीत बांधलेल्या इमारती कार्यरत आहेत. अनेक घटनांचा साक्षीदार असलेला प्रतीकात्मक काळा घोडा प्रस्थापित झाला. एस्प्लनेड मॅन्शन ही इमारत एकेकाळी अनेक महत्त्वपूर्ण घटनांची साक्षीदार राहिली आहे. महोत्सवी झगमगाटात सिग्नलच्या अंधुक प्रकाशात दोलायमान अवस्थेतील एस्प्लनेड मॅन्शनचे चित्र मन विचलित करणारे आहे. तरीपण वसाहतकालीन पुरातन दाखलेच मुंबईची ‘सौंदर्य ओळख’ टिकवून आहेत! बदल ही काळाची गरज असते. वर्तमान कला सादरीकरणातील काळानुरूप बदलही आम्हाला मान्य आहे. परंतु वर्तमान पूर्ततेसाठी गरजेसमोर शरणागती पत्करून अनेक वर्षें जोपासलेली पुरातन शिल्पकला किंवा गौरवशाली स्थापत्यमोल पणाला लावणे योग्य नव्हे असे मला वाटते! स्थापत्याचा एकमेव नमुना असलेल्या एस्प्लनेड मॅन्शनलाही एक दिवस काळा घोडा महोत्सवातील झगमगाटात सहभागी करून घेतले जाईल हीच अपेक्षा.

– चंद्रशेखर बुरांडे, 9819225101, fifthwall123@gmail.com

(‘बाईट्स ऑफ इंडिया’वरून उद्धृत, संस्कारित- संपादित)

About Post Author