मुंबईकरांच्या ‘टॉप टेन’ समस्या

0
27
ट्रेनमध्ये आढळणा-या जाहिराती

     आपल्या पूजाविधीमधे देवाला कापसाचे वस्त्र करून वाहण्याचा प्रघात आहे. त्यामधे सुरुवातीला कापसाच्या लहानशा गोळ्याला सर्व बाजूंनी खेचून-ताणून त्याचे तंतून् तंतू विरळ करतात, मूळ गोळ्याचा सपाट-पसरट पापुद्रा बनवतात, इतका विरळ की तंतूंमधे सांधाही दिसू नये. नित्यव्यवहारातले लहानसे प्रश्न आसपासच्या परिस्थितीतल्या निरीक्षणांवर असे पसरट ताणून पाहिले, की अचानक काही नवे संबंध लक्षात येतात; संदर्भ नव्याने लागतात. कापसाचं वस्त्र ह्या पद्धतीने केल्यामुळे काय भलं होतं माहिती नाही, पण तशी केलेली दिव्याची वात मात्र एकदम छान पेटते! त्याच न्यायाने आपण सुरुवातीला घेतलेल्या प्रश्नाचं सरळ उत्तर अशा पद्धतीने मिळेल असं नाही, पण काही ना काही उद्बोधक नक्कीच हाती येतं.

     मुंबईसारख्या ठिकाणी राहणार्‍या लोकांच्या जीवनमानात इतकी प्रचंड तफावत असते, की ते अगदी मर्यादित, भौगोलिक अर्थाने एकमेकांच्या जवळ राहत असतात. त्यांच्यातले संपर्कबिंदू म्हणजे ऋतुमान, हवा, पाणी, परिसर असे ढोबळ भौतिक. त्यांचे रोजचे प्रश्न, समस्या, अपेक्षांचा परस्परसंबंध शून्य. तरी अशा विविध स्तरांच्या लोकांचे भावजीवन कितपत समांतर आहे हे पडताळणं हा विचार समाजशास्त्रज्ञ, राजकारणी, व्यवस्थापक आणि प्रशासक ह्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ह्याचे प्रत्यक्ष निरीक्षणसिद्ध उत्तर शोधायचं ठरवलं तर वरील पद्धतीचा एक पर्याय आहे- लोकल ट्रेनचा.

     ट्रेनच्या डब्यांच्या भिंती, स्टेशनचा परिसर इथे हटकून आढळणा-या जाहिराती असतात वेगवेगळ्या बव्हंशी मानसिक विवंचनांवर उपाय सुचवू शकणा-या लोकांच्या. अंधश्रद्धा, बुवाबाजी अशा वृत्तपत्री विशेषणांना जरा बाजूला ठेवलं, तर ही यादी समाजातल्या एका विशिष्ट गटाला भासणा-या गरजांची आहे हे सहज समजून येतं.

     अशी अनेक भित्तिपत्रके तपासली, जी एकूणएक हिंदीत असतात; तर काही समान सूत्रे आढळतात- त्यांचा क्रम जरी बदलला तरी आशय तोच आढळतो. अशा ‘टॉप टेन’ विषयांत शारीरिक समस्या कमी असतात- असतात त्याही मानसशास्त्रीय उगमाच्या. संतानप्राप्ती आणि पुनरुत्पादनासंबंधी तपशील वगळले, तर सरळ आपण उतरतो ते ट्रेन वापरणार्‍या एका गटाच्या भावजीवनात. ‘मुंबई म्हणजे नुसती गर्दी, घाम, दगदग’ अशी प्रतिमा असणा-यांना आश्चर्य वाटेल, पण ‘टॉप टेन’ विषयांत प्रेमाचा, त्यातल्या गुंतागुंतींचा, विरह-ताटातुटीचा वाटा सर्वाधिक असतो. घटस्फोट, सवती/तींचा  जाच दूर करायची असते; तशी वशीकरणाचीही ‘ऑफर’ असते. हे बाबा, गुरू वेगवेगळ्या धर्मांचे असतात, काही आपण धर्मापलीकडे असल्याचेही सांगतात, पण त्या सगळ्यांचे ‘टॉप टेन’ तेच. तो विषय संपल्यावर लक्ष्मीबंधन, व्यावहारिक यश, कोर्टकचेरी हे मुद्दे येतात. अर्थात माणसांतली नाती पैसा किंवा व्यवहाराहून जास्त चिंता निर्माण करताना दिसतात. म्हणजे थोडक्यात पैशाची आशा असली तरी इकडे डंका प्रेमाचाच.      मुंबई ही ‘मुंबई’ असल्याने अजून एक ‘आयटेम’ असतो तो ‘फिल्मोंमे सफलता’! यादीत काळजीचा अभाव जाणवतो तो मुलांचा अभ्यास, शाळा-कॉलेजप्रवेश, कर्जफेड, स्थावर मालमत्तेबद्दल अपेक्षा, प्रदीर्घ आजारपण अशा विषयांचा. अशा जाहिरातींमधे अभिप्रेत असलेल्या लोकांबद्दल, त्यांच्या वयाबद्दल, आर्थिक क्षमतेबद्दल साधारण अंदाज लावता येतो तो या अभावांमुळे. बुवाबाजीबद्दल, अज्ञानप्रसाराबद्दल, लोकांच्या अंधश्रद्धाविवशतेबद्दल इतके बोलून झाल्यावरही वर्षानुवर्षं लोकांच्या अडचणी त्याच त्या राहताना दिसतात, उपाय करणारे वेगवेगळ्या नावाने समोर येतात. विशिष्ट मागणी असते आणि कायम राहते, तसा पुरवठा करायला कोणी ना कोणी पुढे येते.

     आता ह्या प्रयोगाचा पुढचा, जो भाग प्रस्थापित मानसोपचार तज्ञांनी करायचा/तपासायचा आहे, तो असा की त्यांनी त्यांच्याकडे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांच्या त्यांनी नोंदलेल्या समस्यांचे स्थूलमानाने वर्गीकरण करावे. टॉलस्टॉयने बजावून ठेवलेच आहे, की दुःख हे आपापल्या पद्धतीने वेगळे असते, म्हणून हे वर्गीकरण तारतम्याने करावे. थोडक्यात त्यांनी त्यांच्या निदानांची ‘टॉप टेन’ यादी करावी. कालमानानुसार, वयोगटांनुसार, उत्पन्नगटानुसार लावायच्या चाळणी नंतर लागतील, पण मुळात अशी प्रस्थापित ‘टॉप टेन’ यादी वेगवेगळ्या मानसोपचार तज्ञांकडून तयार होणे गरजेचे आहे. अशा प्रस्थापित ‘टॉप टेन’मधे एकवाक्यता कितपत आहे हे तपासणे आवश्यक आहे.

     इतक्या लोकांच्या सहभागाने आणि सहकार्याने लोकलमधल्या बुवांची आणि प्रशिक्षित तज्ञांची अशा जेव्हा आपल्या दोन्ही याद्या सिद्ध होतील, तेव्हा आपण मुंबईकरांच्या भावजीवनाबद्दल काही तरी समजून घेऊ शकू.

ऋचा गोडबोले – भ्रमणध्वनी : 9819321852, इमेल : rcagodbole@gmail.com

दिनांक – 05 डिसेंबर 2011

संबंधित लेख –

भाषा, लिपी आणि वास्तवाची जाणीव

आपल्या समजुतींचं कपाट

भाषेचे उत्पादक होऊ !

ऊस, राजगिरा, साबुदाणा, बटाटा, मिरची

About Post Author