मी आणि माझे समाजकार्य

2
24

मी आणि माझे समाजकार्य

‘नीरजा’; माझे पहिले पाऊल!

– यशवंत मराठे

काही वर्षांपूर्वी, आमचा कौटुंबिक व्यवसाय नाशिकला स्थलांतरित झाला आणि मग मी विचार करू लागलो, की आता मी पुढे काय करणार? सुरुवातीला, एक वर्ष ब्रेक घेऊन मी माझे छंद जोपासणे अथवा काहीतरी शिकणे असा विचार करत होतो. परंतु असे लक्षात आले, की ह्या गोष्टी करणे हे फक्त वेळ घालवण्याचे साधन म्हणून त्याच्याकडे बघावे लागेल. माझे मानसिक रितेपण त्यामुळे कमी होईल अशी खात्री तर नक्कीच देता येणार नाही. खूप विचार केल्यानंतर मला असे जाणवले, की काहीतरी मोठे ध्येय आयुष्यात नसेल तर हा मानसिक ताण तसाच राहील; कदाचित वाढेलसुध्दा!

मी गेली चार-पाच वर्षे खूप विचार करायचो, की आपण या जगात का आलो? आपल्या आयुष्याचे ध्येय काय? असे वाटायचे, की जीवन म्हणजे जन्माला यायचे, शिक्षण घ्यायचे, व्यवसाय किंवा नोकरी करायची, लग्न करून संसार करायचा, कुटुंबाची व मुलांची तरतूद करायची, म्हातारे व्हायचे आणि एक दिवस या जगातून निघून जायचे, एवढेच आहे का? मी जन्म आणि मृत्यूपर्यंतच्या या जीवनप्रवासात याशिवाय दुसरे काही करूच शकणार नाही का? माझ्या जीवनाचा उद्देश फक्त वरवरचा आनंद मिळवणे आणि दु:खांना दूर ठेवणे, एवढाच आहे का? माझ्या सुखाचा एक कृत्रिम कोष निर्माण करून त्यात जगायचे हे, काही मला फारसे पटत नव्हते.

मला रीतीनुसार असे वाटू लागले, की नव्या सुखाचा शोध मला अध्यात्म मार्ग चोखाळला तरी लागू शकेल. त्यामुळे मी गेली काही वर्षे थोडे नामस्मरण, ध्यानधारणा असा प्रयत्न करत आहे. त्यामुळे असेल कदाचित पण मी शांत झालो आणि त्यात गोडीही लागली. असे असले तरी पोकळी राहिलीच. आपल्या देशात इतके अज्ञान, दारिद्रय, अंधश्रध्दा, अन्याय आहे, की तो उघड्या डोळ्यांनी पाहत असतानाही तिकडे दुर्लक्ष करायचे का? बहुतांशी गावांवर झालेली निसर्गाची अवकृपा, निष्क्रिय झालेली माणसे, लहान खेड्यांची-वस्त्यांची झालेली वाताहत, तरूणांनी रोजीरोटीसाठी शहरांकडे घेतलेली धाव, आटलेल्या नद्या, तळी, विहिरी आणि त्यापेक्षाही आटलेली तिथल्या माणसांची मने! हे सारे दृश्य अस्वस्थ करणारे, छळणारे आहे. हे बघून आणि वाचून असे वाटते, की ह्या माणसांना शाप आहे अवर्षणाचा, दारिद्रयाचा, उदासीनतेचा आणि मुख्यत्वे निष्क्रियतेचा. त्यांचे जीवन जणू काही गोठून गेले आहे!

या देशातील ऐंशी टक्के जनता खेड्यात राहते, त्यांच्याविना देशाचा विकास होऊच शकणार नाही. परंतु जिथे कसल्याही सुविधा नाहीत, सोयी नाहीत, दवाखाने-शाळा नाहीत, रस्तेदेखील नाहीत, अशी कित्येक खेडी आपल्या देशात स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली, तरीदेखील त्या परिस्थितीत, तिथल्या लोकांसाठी काहीही सुधारणा झालेल्या नाहीत. ह्यापुढे सरकारने काहीतरी करावे या भरवशावर राहून काहीच होणार नाही, तसेच, नुसता सरकारला दोष देत राहण्यातदेखील मतलब नाही. If we are not the part of solution, then we are the part of the problem.

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी मी जर काही करू शकलो तर एका झटक्यात माझे सगळे मुद्दे निकाली निघतील; मला माझ्या आयुष्यातील मोठे ध्येय गवसेल, ज्यायोगे मी काय करणार आणि तसेच, माझ्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि हे ऋण फेडण्यासाठी माझ्याकडील बुध्दी, श्रम, वेळ व पैसा ह्यांचा समाजाला काहीतरी फायदा होऊ शकला तर दुसरा चांगला पर्याय शोधण्याची गरजच राहणार नाही.

हा विचार मनात आला आणि हादरून गेलो! मनात अनंत प्रश्न आणि शंका-कुशंका उभ्या राहिल्या.

– समाजकार्याचा मला इतका ध्यास आहे का?

– माझे वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्य/जीवन ह्यामुळे प्रचंड ढवळून निघेल.

– हा फावल्या वेळेचा उपक्रम नाही.

– अपार शारीरिक कष्ट घ्यायची तयारी हवी.

– सगळा अहंकार गुंडाळून बाजूला ठेवावा लागेल.

– ह्यातून काहीही उत्पन्न मिळणार नाही, परंतु मलाच त्यासाठी पैशांची तरतूद करावी लागेल.

– भारत जरी विकसनशील देश असला तरी माझी परिस्थिती प्रगत देशासारखी आहे. आदिवासी पाडा अथवा खूप छोटे गाव म्हणजे एकदम अविकसित देशात पाऊल ठेवण्यासारखे आहे.

– काम चालू केल्यानंतर सहा-आठ महिन्यांनी मला कंटाळा आला किंवा मला जमत नाही असे म्हणता येणार नाही; आणि त्यामुळेच तेथून बाहेर पडता येणार नाही!

खूप विचारांती असे जाणवले, की मला खरोखरच समाजकार्य करायचे आहे.

त्यासाठी काही क्षेत्रे, उदाहरणार्थ, 1. अनाथाश्रम; 2. वृध्दाश्रम; 3. अपंग अथवा मनोरुग्ण पुनर्वसन केंद्र; 4. झोपडपट्टी शिक्षण; 5. आरोग्य रक्षणार्थ घ्यायची खबरदारी; धुंडाळली तर माझ्या असे लक्षात आले, की मी ह्या सर्व गोष्टींचा विचारदेखील करू शकत नाही, कारण तो माझा पिंड नाही. मी अशा निर्णयाप्रत आलो की मला समाजासाठी काही करायचे असेल तर मुंबईपासून दूर जाणे महत्त्वाचे ठरेल. पण मी अचानकपणे कुठच्या तरी गावी तर जाऊ शकणार नाही, कारण माझे तसे कुठेही स्थान नाही. सुदैवाने, माझे थोडेफार स्थान पालघरला निर्माण करता येऊ शकेल असे वाटले.

या माझ्या चाचपडण्यच्या काळात मी डॉ. अभय बंग, तात्या जोगळेकर, गजादादा केळकर, सतीश मराठे, विनायक दिक्षीत, जगन्नाथ चव्हाण, उल्हास परांजपे, श्रीराम करंदीकर ह्यांना भेटलो व त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मी दहा-बारा संस्थांना भेट दिली. खरेच, लोक समाजकार्याने प्रेरित होऊन थक्क व्हायला होईल अशी कामे करत आहेत. काही सेवाभावी संस्था वेगवेगळया क्षेत्रांत कार्यरत आहेत. उदाहरणार्थ, शिक्षण, वृध्दाश्रम, पुनर्वसन केंद्र, वसतिगृहे वगैरे. त्या सर्व लोकांची समर्पित वृत्ती आणि ध्यास बघून मी तर गांगरूनच गेलो आणि असा प्रश्न पडला, की खरेच आपल्याला असे काही करता येईल का? परंतु ही पण जाणीव झाली, की आपण कुठच्याही क्षेत्रात करू तितके काम थोडेच आहे.

तेव्हा मला असा प्रश्न पडला की माझी समाजकार्याची प्रेरणा काय आहे? विचारांती असे जाणवले, की अशी प्रेरणा पुढील गोष्टींची असू शकते – 1. सेवा, 2. प्रतिष्ठा (लोकेषणा), 3. समाजाशी संबंध जोडणे, 4. संशोधन. मग पुढचा प्रश्न मनात आला की हे कार्य मला कोणासाठी आणि कुठे करायचे आहे? कुटुंब, जात, विशिष्ट समाज, धर्म? आणि जन्मस्थळ, गाव, राहते शहर?

पुढे मी विचार करू लागलो, की खरेच, समस्या काय आहे आणि मी काय करू इच्छितो? आज महाराष्ट्राची पर्यायाने भारतातील प्रत्येक राज्याची समस्या शहरीकरणाची आहे. गावाकडे रोजगार उपलब्ध नसल्याने शहराकडे धाव घेण्याशिवाय लोकांना पर्याय उरलेला नाही. याचा दुष्परिणाम म्हणजे एकांगी विकास आणि शहरांचे बकालीकरण. हे बघितल्यावर महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळण्याच्यावेळी मांडलेली स्वयंपूर्ण गावाची आणि विकासाच्या विकेंद्रीकरणाची संकल्पना किती बरोबर होती याची जाणीव होते.

मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या मुलभूत गरजा पाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. ‘पाणी’ ही मानवाची प्राथमिक गरज आहे. जोपर्यंत लोकसंख्या कमी होती, मुबलक जमीन व जंगले अस्तित्वात होती, पाऊस नियमित भरपूर पडत होता, तोपर्यंत मानवाला पाण्याची टंचाई होऊ शकते असे स्वप्नातसुध्दा वाटले नव्हते, परंतु आता मानवाने स्वकर्तृत्वाने पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण करून आपल्या मुळावरच घाव घातला आहे. पाणी हा शेतीचा अविभाज्य घटक असला तरी आज महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जातात. असे असूनदेखील तो ब-याच अंशी दुर्लक्षित असाच मुद्दा आहे. पाण्याचे व्यवस्थापन आणि नियोजन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. गावोगावी लोकांना त्याची जाणीव व ज्ञान करून देणे हे महत्त्वाचे आहे. हे करत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी, की निसर्ग आपली भूक भागवू शकतो. परंतु आपली लालसा पूर्ण करू शकत नाही.

अखेरीस, मी अशा निर्णयाप्रत आलो की माझी प्रेरणा ‘विकास’ ही आहे. गांधीजींची ग्रामविकासाची आणि स्वयंपूर्णतेची कल्पना साकार करण्याची खरी गरज आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे तंत्रज्ञान वापरून पाणी नियोजन करून माझ्या पालघर क्षेत्रातील आदिवासी आणि इतर ग्रामीण जनतेचा विकास साधणे हे माझे कार्य असेल.

पालघर हे मी माझे कार्यक्षेत्र ठरवले असल्याने प्रथमत: माझे साडू, सुधीर दांडेकर ह्यांच्याशी बोललो. माझ्या सुदैवाने सुधीरची पालघरमध्ये जी सामाजिक प्रतिष्ठा आहे तिला तोड नाही. त्याची मदत घेऊन तेथील ब-याच लोकांना भेटलो. ह्याच काळात मासवण येथे कार्यरत असलेल्या ‘आदिवासी सहज शिक्षण परिवार’ या संस्थेला भेट दिली. त्यांचे आजुबाजूच्या गावांत सेवाभावी काम सुरू होते. त्या संस्थेच्या साधनाताई दधिच, वर्षाताई फातरफेकर, शैलेंद्र शिवदे ह्यांच्यामुळे पाण्याची किती अडचण आहे हे समजून घ्यायला मदत झाली. त्यांच्याबरोबर काही आदिवासी पाड्यांवर जायला मिळाले आणि तिथे असलेले पाण्याचे दुर्भीक्ष्य बघून खूप वाईट वाटले.

मग मी फेब्रुवारी २०१० मध्ये ‘नीरजा’ नावाने एक सामाजिक संस्था सुरू केली. तिचा मुख्य उद्देश :

‘ग्रामीण भागातील शेतक-यांना व लोकांना पावसाचे पाणी साठवण्याचे, अडवण्याचे आणि जमिनीत जिरवण्याचे साधे, सोपे, स्वस्त व सहज अनुकरण करता येईल असे तंत्रज्ञान पुरवून त्यांच्या विकासाला साहाय्यभूत होणे.’

वाढते शहरीकरण, पाण्याचा प्रचंड वापर यांमुळे खाली खाली जाणारी भूजल पातळी आणि पर्यावरणाचा होणारा -हास ह्यामुळे रेनवॉटर हार्वेस्टिंग ही आजच्या काळाची गरज आहे. पाणीपुरवठा, ज्याचा अनेक ठिकाणी अभावच आहे, असल्यास जो खात्रीलायक नाही व खर्चिकसुध्दा आहे, त्यामुळे रेनवॉटर हार्वेस्टिंगचा कमी खर्चिक पर्याय आणि त्याचे विकेंद्रित स्वरूप ह्यामुळे घरोघरी अथवा सार्वजनिक पातळीवर पाण्याची गरज भागवणे शक्य असल्यामुळे पाणीपुरवठ्यावरील ताण कमी करणे सहज शक्य आहे. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त रेनवॉटर हार्वेस्टिंग हे शेतीसाठी देखील उपयुक्त आहे, ज्यायोगे पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक फायदे मिळून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधण्यास हातभार लागतो.

आम्ही ह्या वर्षी ‘पालयट प्रोजेक्ट’ म्हणून तीन ठिकाणी बोअरवेल रिचार्ज आणि खडकोली येथील तलावातील गाळ साफ करणे अशी कामे केली आहेत. ह्याला मिळणा-या यशावर पुढील वर्षी आणखी जोमाने कार्य करता येईल अशी आशा आहे.

आपल्या आयुष्यात इच्छांचे मृगजळ, आशाआकांक्षांच्या उसळत्या लाटा, मायेची छाया किंवा परकेपणाचे दु:ख, कर्तृत्वाचे शिखर वा वैफल्याची दरी, सुखाची पौर्णिमा व दु:खाची अमावास्या, कधी वैभव तर कधी पैशांची कमतरता हे येतच राहणार, परंतु या पलीकडे जाऊन मला काही करायचे आहे. बस्स! हेच माझ्या आयुष्याचे ध्येय मानून पुढे जायचे. मला जर ग्रामीण भागातील लोकांसाठी काही काम करता आले आणि मी त्यांना थोडासा जरी आनंद, सोयी देऊ शकलो, तरीदेखील माझ्या जन्माचे सार्थक होईल असे मला वाटले. मला तर हल्ली असे वाटू लागले आहे, की हे करणे म्हणजेच अध्यात्म! हा विचार ज्या तीव्र वेगाने मला झपाटून टाकत आहे त्यामुळे वाटते, की मी हेच करावे अशी त्या ईश्वराची पण इच्छा असावी. त्यामुळे तोच पुढचा विचार सुचवेल आणि माझ्याकडून काम करवून घेईल अशी भावना ठेवणे श्रेयस्कर ठरेल. कारण मी करत आहे असे म्हटले तर परत अहंकार बळावेल!

डॉ.अभय बंग मला म्हणाले होते, की मनात विचार आला आहे ना, तेव्हा पहिले पाऊल उचला, पुढचा मार्ग आपोआप दिसायला लागेल. मी पहिले पाऊल तर उचलले आहे!

नीरजा – मराठी उद्योग भवन, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई – 400025.

विश्वस्त – 1. यशवंत मराठे, 2. सुरेश वैद्य, 3. सुधीर दांडेकर, 4. श्रीकांत भिडे, 5. आदिती मराठे.

संपर्क – यशवंत मराठे; दूरध्वनी – 91-22-24301342, +91 9820044630

ई-मेल : yeshwant.marathe@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. मला ही माझ्या गावा करिता…
    मला ही माझ्या गावा करिता समाज कार्य करू इच्छितो जसे की पाण्याची सोय, सांडपाणी नियोजन, सार्वजनिक शौचालय, ई.. आपल्या सहकार्याची अपेक्षा

  2. मी पहिले पाऊल तर उचलले आहे!
    मी पहिले पाऊल तर उचलले आहे!

Comments are closed.