मी आणि माझे जलसंवर्धनाचे प्रयोग

1
55
_Vinod_Hande_1.png

मला मी नोकरीमध्ये असताना असे कधी वाटले नव्हते, की मी जलसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि पर्यावरण या विषयांवर बोलू शकेन व लिहू  शकेन! पण मी निवृत्तीनंतर जे काही काम या क्षेत्रात करत आलो त्याचे श्रेय माझे साहेब प्रवीण पुंज यांना (जनरल मॅनेजर, टेलिकॉम प्रोजेक्ट) जाते.

आम्ही नागपूरच्या नरेंद्र नगर भागात घर बांधण्यास १९८८ साली काढले. तो शहराचा नवीन भाग असल्याकारणाने कॉर्पोरेशनचा पाणीपुरवठा त्या भागात नव्हता. घर बांधायचे म्हणजे पाण्याकरता विहीर खणणे गरजेचे होते. आमच्या आजूबाजूला रिकामे प्लॉट्स होते. आम्ही आमची विहीर वीस फूट खणली. विहिरीला पाणी होते. मे-जून महिन्यातदेखील पुरेसे पाणी असे. त्याच दरम्यान आमच्या शेजारी पण घराचे बांधकाम सुरू झाले. त्यांनीसुद्धा पाण्यासाठी विहीर खणली आणि तिची खोली पण वीस फूटच घेतली. तो एक उन्हाळा बरा गेला, पण नंतर आम्हाला पाण्याचा उपसा वाढल्याने उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली.

विहिरीचे पाणी आटते हे लक्षात आल्याबरोबर आमच्या शेजाऱ्याने विहिरीची खोली वीस फूटांपासून बावीस फूटांवर केली. मग लगेच आम्हीदेखील पुढच्या वर्षी वीस फूटांची खोली बावीस फूट केली. आमचे तसे विहीर खोलीकरण दोन- तीन वर्षें सुरू राहिले. दर वर्षी विहिरीचे खोलीकरण करणे म्हणजे पैसा लागायचा. मग एक दिवस असा विचार मनात आला, की आपण आपल्या विहिरीत जर पावसाचे पाणी सोडले तर उन्हाळ्यात पाणी पुरेल किंवा पाण्याचा त्रास होणार नाही. मी ती कल्पना घेऊन पावसाळ्यात माझ्या छतावरील एकीकडचा ड्रेन पाईप विहिरीत सोडला. परिणाम बरा मिळाला. आम्हा दोन्ही कुटुंबांचे विहीर खोल करण्याचे काम थांबले. मी ते काम तेव्हापासून आजपर्यंत नित्याने करतो. माझ्या छतावरील पडलेले पावसाचे सगळे पाणी विहिरीमार्गे जमिनीत जाते.

_Vinod_Hande_2.pngमी असिस्टंट जनरल मॅनेजर असताना १५ ऑगस्ट २००६ ला, ऑफिसमध्ये झेंडावंदनाच्या वेळेला माझे साहेबही (पुंज) हजर होते. ऑफिस स्टाफसमोर भाषण द्यायचे होते. कोणता विषय निवडावा हा माझ्या समोर प्रश्नच होता! विचार केला आणि मी रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करतो ते त्यांच्यासमोर सांगितले. ऑफिस स्टाफला पण तसे करावे अशी विनंती केली. माझ्या साहेबांना तो विषय खूप आवडला.

माझी निवृत्तीची वेळ ऑगस्ट २०११मध्ये आली. माझ्या समोर निवृत्तीनंतर काय करायचे हा मोठाच प्रश्न होता. त्याच दरम्यान, माझी आणि पुंजसाहेबांची भेट झाली. त्यांनी सहज विचारले, की निवृत्तीनंतर काय करणार? मी म्हणालो, की मी अजून काही ठरवले नाही. त्यावर ते म्हणाले, तुम्ही तुमच्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम पुढे का नेत नाही? मला त्यांचा विचार पटला.

मग मी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अभ्यास सुरू केला. लक्षात आले, की पावसाचे समीकरण बिघडले आहे. कशामुळे? तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे. ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे वाढले, तर पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे. पण संतुलन कशामुळे बिघडले या दिशेने थोडेफार वाचता वाचता विषय सापडत गेले आणि माझा त्याबाबतचा प्रवास सुरू झाला.

मी त्या संबंधित विषयांवर लेख लिहिणे, भाषणे करणे या माध्यमातून लोकजागृती सुरू केली.

मी २०१२ पासूनच्या पाच वर्षांत जवळपास पंचवीस लेख विविध वर्तमानपत्रे आणि मासिके यांतून प्रकाशित केले आहेत. प्रतिसाद बरा आहे. मला माझी एक ओळख निर्माण करता आली याचे समाधान आहे.

– विनोद हांडे

vkh0811@gmail.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.