माळवद

महाराष्‍ट्रात माळवद या नावाने ओळखली जाणारी घरातील वातावरण नियंत्रीत ठेवण्‍याची पारंपरिक पद्धत होती. माळवद या शब्‍दाचा अर्थ घराचे छप्‍पर, गच्‍ची अथवा टेरेस असा विविधांगांनी समजून घेता येतो. वर्तमानात एकमजली घरांना छप्‍पर म्‍हणून सिमेंट-लोखंडाचे पत्रे वापरले जातात. पूर्वीच्‍या काळी घराला छपराच्‍या जागी मोठमोठे लाकडी ओंडके टाकले जात असत. त्‍यावर सागाच्‍या लाकडाच्‍या पट्ट्या लावल्‍या जात. लाकडाचे ओंडके आणि सागाच्‍या पट्ट्या यांची एकसंघ आणि अनेक स्‍तरांची रचना केली जाई. त्‍यानंतर त्‍यावर भरपूर पांढरी माती मोठा दाब देऊन टाकली जाई. या प्रकारच्‍या छपरांना माळवद असे म्‍हणत.

माळवद तयार करण्‍यामागे घरातील वातावरण नियंत्रीत राहावे हा उद्देश असे. माती आणि लाकूड, दोन्‍ही घटक उष्‍णतोरोधक असल्‍याकारणाने उष्‍णतेस अटकाव होई आणि माळवद असलेल्‍या घरातील वातावरण नियंत्रीत राही. त्‍यामुळे माळवदाखालील घरामध्‍ये वातावरण उन्‍हाळ्यात थंडगार तर हिवाळ्यात उबदार राहत असे.

माळवदाचा वरील भाग हा कमी खोलीच्‍या लहान हौदासारखा दिसत असे. घराच्‍या माथ्‍यावर चारी बाजूंनी फूट-दीड फूट उंचीच्‍या भिंती असत. त्‍यामध्‍ये पांढ-या मातीचा भरणा असे. लाकडी ओंडक्‍यांचे काही स्‍तर, त्‍यानंतर सागाच्‍या पट्ट्या आणि वर मातीचे आवरण याप्रकारचे तयार केलेल्‍या माळवदाची उंची काही फुटांची असे. त्यावरची मातीदेखील घट्ट असे. तसेच पांढरी माती पाणी धरून ठेवत नसल्‍यामुळे पावसाळ्यात माळवदातून पाणी खाली झिरपत नसे. माळवदावर साठलेले पाणी निघून जाण्‍याकरता पन्‍हाळी लावलेली असे. सध्‍याच्‍या काळात थंडाव्‍यासाठी फ्रीज आणि उबदार वातावरणासाठी हिटरचा वापर केला जातो. मात्र आपल्या पूर्वजांनी पारंपरिक ज्ञानातून विकसित केलेली माळवदासारखी उपयुक्‍त पद्धत बदलत्‍या जीवनशैलीच्‍या प्रवाहात लुप्‍त होण्‍याच्‍या मार्गावर आहे. पूर्वीच्‍या काळी महाराष्‍ट्रात पुणे, बीड, नाशिक, सोलापूर, उस्‍मानाबाद यांसारख्‍या जिल्‍ह्यांत घरांना माळवद असे. आजही या परिसरातील काही जुन्‍या घरांवर माळवद आढळतात. सध्‍या सर्वच प्रदेशातील घरांच्‍या रचना आधुनिकतेकडे झुकत असताना दिसतात. त्‍यामुळे माळवद असलेली घरेदेखील लवकरच दिसेनाशी होतील.

– किरण क्षीरसागर

About Post Author

Previous articleरामचंद्र दीक्षितांचा वाडा
Next articleआर्यन चित्रमंदिर – पुण्यातील पहिले चित्रपटगृह
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767

2 COMMENTS

  1. atishay sudar mahiti. he
    atishay sudar mahiti. he wachun aamche purviche ghar aathwle,

  2. अरविंद मोटे, (वाळूज गाव,
    अरविंद मोटे, (वाळूज गाव, मोहोळ तालुका, सोलापूर)
    तुमच्‍या सूचनेनुसार लेखात माळवदावरील मातीच्‍या माहितीबाबत दुरूस्‍ती करण्‍यात आली आहे. माळवदची कल्‍पना स्‍पष्‍ट होतील असे काही फोटो पाठवू शकाल का?
    सूचनेकरीता धन्‍यवाद.

Comments are closed.