माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान

0
41
carasole

मन, मनगट, मेंदू – तीन मकारांचा ‘उत्कर्ष’!

‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सातत्याने दुष्काळी असणा-या सांगोला तालुक्यात महिलांनी उभी केलेली समाज परिवर्तनाची चळवळ. या महिलांजवळ आहे अंत:प्रेरणा, तळमळ आणि जिद्द. शिक्षण, आरोग्य, अन्याय-अत्याचाराविरुद्ध संघर्ष, आर्थिक स्वावलंबन आणि पर्यावरण साक्षरता या पंचसूत्रीच्या साहाय्याने ग्रामीण समाजाच्या विकासासाठी संस्थेचे कार्य 1979 पासून सुरू आहे.

आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर, लोकशाहीची गळचेपी करणा-या वातावरणात काहीतरी रचनात्मक केले पाहिजे असे वाटणा-या समवयस्क मैत्रिणी 1978-79 साली एकत्र आल्या. त्या मैत्रिणींनी सांगोल्यातील पहिल्या महिला डॉक्टर संजीवनी केळकर यांच्या पुढाकाराने ‘महिला सहविचार केंद्र’ सुरू केले. डॉ. संजीवनी 1973 मध्ये, लग्नानंतर सांगोल्यात आल्या. सांगोला येथे वैद्यकीय प्रॅक्टिस करत असताना, सुरुवातीच्या काळात, त्यांना खूप वेगळे अनुभव गाठीस पडले. ग्रामीण भागात राहणा-या महिलांची सुखदु:खे त्यांच्या शब्दांत ऐकून त्यांच्या असे लक्षात आले, की त्या स्त्रियांचे भावविश्व खूप वेगळे आहे. त्यांच्या समस्या व त्या समस्यांची उत्तरेही वेगळी आहेत. स्त्रीविषयक अनेक बाबींचा प्रसिद्धी माध्यमांमधून विचार मांडला जातो, तो शहरी स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून. ग्रामीण भागामध्ये राहून सर्व प्रकारच्या अभावांना, पुरुषकेंद्रित ग्रामीण रूढी-परंपरांना, पुरुषांच्या व्यसनांना, दारिद्र्याला, शारीरिक कष्टांना समाजातील गुंडगिरीला तोंड देत जगणा-या स्त्रीबद्दल कळवळा फारसा कोणाला दिसत नाही. तशा वैचारिक आकलनामुळे त्यांची अस्वस्थता वाढत गेली. त्यांच्यासारख्या स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणा-या आणि संपन्न प्रतिष्ठित घरातील व्यक्तींना ग्रामीण स्त्रीसाठी काही करणे तर शक्य आहे आणि जर त्यांनाही ते जमणार नसेल तर मग कोणीतरी ते करावे असे म्हणण्याचा त्यांना अधिकार काय आहे असेही प्रश्न डॉ. संजीवनी यांच्या मनाला पडले.

डॉ. संजीवनी यांच्या मैत्रीण बनलेल्या नीला देशपांडे, माधवी देशपांडे, कै. निर्मला वांगीकर, कै. नलिनी ठोंबरे, प्रतिभा पुजारी, वसुधा डबीर, वसुंधरा कुळकर्णी, प्रा. शालिनी कुळकर्णी, प्रा. चित्रा जाभळे, श्रीदेवी बिराजदार अशा मैत्रिणींनी मिळून 1978 -79 मध्ये ‘महिला सहविचार केंद्र’ सुरू केले. दर आठवड्यातून एकदा चालणा-या त्या केंद्रात सर्व जातिधर्मांच्या, सर्व वयोगटांच्या अशिक्षित, अर्धशिक्षित, सुशिक्षित, पदवीधर; तसेच, सर्व आर्थिक स्तरांमधील ग्रामीण महिला सहभागी होऊ लागल्या. त्यांची दु:खे मनमोकळेपणाने मांडू लागल्या. एकमेकींचे अश्रु पुसू लागल्या, एकमेकींना आधार देऊ लागल्या. त्याच महिलांनी ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ ही संस्था रजिस्टर केली. संस्थेने छोट्या मुलांसाठीचा ‘जिजामाता बाल संस्कार वर्ग’ 1979 मध्ये सुरू केला. त्यातून बालवाडी सुरू करण्याची (1980 ) कल्पना सुचली. त्यासाठी सगळ्यांनी मिळून सांगोला तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एक चॅरिटी शो आयोजित केला – जादुगर विजय रघुवीर यांचा! त्यातून बालवाडीसाठीचा निधी उभा राहिला. डॉ. केळकर हॉस्पिटलच्या आवारातच ‘उत्कर्ष बालक मंदिर’ जून 1980 मध्ये सुरू झाले. त्यासाठी शिक्षिका सेविका होत्या ‘सहविचार केंद्रा’तील सभासद. 1981 मध्ये पालकांच्या आग्रहाने ‘उत्कर्ष प्राथमिक विद्यालया’चा पहिलीचा वर्ग सुरू झाला. त्यासाठी ‘सहविचार केंद्रा’तील निष्ठावान कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले आणि त्यांनी ‘उत्कर्ष प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विद्यालय’ उभे केले. शाळेतील विद्यार्थी संख्या आठशेतेरा आहे. जून 2012 पासून पाचवीचा वर्ग सुरू झाला आहे आणि दरवर्षी एक इयत्ता वाढवत शाळा दहावीपर्यंत नेण्याचा मानस आहे. मन, मनगट आणि मेंदू यांचा मिलाफ साधून ग्रामीण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी शाळा असा नावलौकिक शाळेने मिळवला आहे.

ग्रामीण महिलांसाठी ‘महिला अन्याय निवारण समिती’ 1990 मध्ये स्थापन झाली. समितीच्या माध्यमातून एक हजार आठशेसत्तर महिलांच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. त्यातील चाळीस टक्के अर्जांबाबत यशस्वी तडजोड होऊ शकली. ‘भारतीय स्त्री शक्तीच्या सहकार्या’ने केंद्रीय समाज कल्याण बोर्डाचे ‘मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र’ सांगोला येथे व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ‘महिला समुपदेशन केंद्र’ मंगळवेढा येथे सुरू झाले आहे. ग्रामीण महिलांनी आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे म्हणून व्यवसाय प्रशिक्षणाला सुरुवात 1992 मध्ये केली. शेळीपालन, गांडुळखत निर्मितीपासून ते संगणक व ब्युटीपार्लर प्रशिक्षणापर्यंत अडतीस प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण घेऊन तीन हजार एकशेतीन महिला प्रशिक्षित झाल्या. त्यातून त्यांचे स्वत:चे छोटे छोटे व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून अधिक आहे. व्यवसायाभिमुख झालेल्या ग्रामीण स्त्रीला पतपुरवठा मिळावा आणि त्यामुळे तिचे तिच्या कुटुंबातील स्थान सन्मानाचे व्हावे यासाठी 1995 मध्ये पाच महिला बचत गट सुरू केले, ते पहिले. सध्याच्या दोनशेपासष्ट गटांपैकी एकशेचाळीस गट स्वयंपूर्ण झाले असून एकशेपंचवीस गटांचे व्यवस्थापन संस्थेमार्फत सुरू आहे. ग्रामीण महिला सक्षम, सबल झाल्या आणि त्यांनी त्यांची कुटुंबेही तेवढीच सक्षम केली. छोट्यामोठ्या अनेक व्यवसायांतून दोन हजारांहून अधिक महिला आणि त्यांची कुटुंबे विकसित झाली आहेत.

2008 मध्ये ग्रामीण भागातील मातामृत्यू दर आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी ‘आरोग्यदूत योजना’ सुरू केली. त्या योजनेच्या माध्यमातून दहा गावांमधील ग्रामीण महिलांना प्रसृतिपूर्व मातेच्या आणि नवजात शिशूंच्या तपासणीचे व धोक्यांचे प्रशिक्षण दिले गेले. त्या त्यांच्या गावांमध्ये ‘आरोग्यदूत’ म्हणून जबाबदारीने काम करत आहेत आणि त्यांनी तेथील मातामृत्यूचे प्रमाण जवळ जवळ शून्यावर आणले आहे. नवजात शिशूंचा मृत्युदरही परिणामकारकपणे घटला आहे. बचत गटातील महिलांना शेती, व्यवसाय यासाठी जास्तीत जास्त भांडवल मिळावे आणि त्याद्वारे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने नुकतीच ‘जनकल्याण मल्टिस्टेट महिला को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.’ सोलापूरची शाखा सुरू केली आहे.

संस्थेने काम करताना राजकीय पुढा-यांचा हस्तक्षेप होऊ दिलेला नाही. शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार (1995 ), डॉ. हेडगेवार स्मृती पुरस्कार, नीरा गोपाल पुरस्कार, बाया कर्वे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे. ग्रामीण भागात राहून तेथील स्त्रीला हिंमत आणि किंमत मिळवून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण समाजामध्ये परिवर्तन घडून आले आहे यात शंका नाही.

– वसुधा डबीर

About Post Author