मराठी संस्कृती- माझ्या आईने मला शिकवलेली

0
20

मराठी संस्कृती- माझ्या आईने मला शिकवलेली!

दोन आठवड्यांपूर्वी, मातृदिन होऊन गेला. संस्कृतीचा पहिला धडा आई देत असते. तेव्हा मातृदिन हा खरा संस्कृतिदिनच होय !

माझ्या आईचा जन्म आणि तिचे तरुणपणीचे आयुष्य पुणे शहरात गेले. तिचे वडील, माझे आजोबा शंकर हरी गोडबोले, उत्कृष्ट चित्रकार होते. ते त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात म्हणजे १९३०-३५-४० च्या अलिकडे-पलीकडे वीस-पंचवीस वर्षे बॉम्बे आर्ट सोसायटीचे सचिव असायचे. माझ्या आईला चित्रकलेचा वारसा लहानपणापासून मिळाला होता. तिने तरुणपणी तो भरतकामाचे टेक्निक वापरून त्यामधे उतरवला. तिने ब्रश आणि कॅनव्हास ह्यांच्याऐवजी रेशमाचे भरतकाम करून अनेक सुंदर पेंटिंग्ज बनवली. माझ्या आजोबांच्या पुण्यातल्या घऱापासून वाडिया कॉलेजला जाणे सोयीस्कर होते म्हणून तिथे आईने प्रवेश घेतला, पण दोन वर्षांतच, तिने ते कॉलेज बदलले.

त्याचे असे झाले, की – माझी आई दिसायला सुंदर होती. आईच्या माहेरच्या अनेक माणसांच्या तोंडून ‘रूपवती सुकेशा’ असे वर्णन मी लहानपणी ऐकलेले आहे. कारण तिचा भरगच्च केशसंभार गुडघ्यापर्यंत पोचेल इतका लांब होता. माझी मावशी सांगायची, की आईने जर केसांचा अंबाडा बांधला आणि तो जरा सैलसर असला, तर डोक्यापेक्षा दुप्पट मोठा दिसायचा.

ती रूपवान असली तरी ‘रूपगर्विता’ नव्हती. प्रसिद्ध सिने-दिग्दर्शक के. नारायण काळे हे माझ्या मावशीच्या नात्यातले. ते मावशीकडे आले असताना एकदा, योगायोगाने माझी आईदेखील मावशीकडे गेलेली होती. तेव्हा काळ्यांनी तिला विचारले होते, “तुला सिनेमात काम करायचे आहे काय? मी देतो तुला चांगलीशी भूमिका.” पण जुन्या काळी सिनेमात काम करणे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जात नव्हते. म्हणून आईने नकार दिला होता.

माझ्या आठवणीतली आई या पूर्वेतिहासापेक्षा वेगळी आहे. नऊवारी लुगडे नेसलेली, जरा जुन्या वळणाची घरंदाज स्त्री आणि भाट्यांच्या घरातली थोरली सुनबाई असे तिचे स्वरूप मला आठवते. ती १९४५ साली तत्त्वज्ञान विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची बी.ए. झाली ( तोपर्यंत पुणे विद्यापीठ निघाले नव्हते). तिचे लग्न १९४६ साली झाले आणि माझा जन्म १९४७ साली झाला. माझ्या आईला कवी अनिल ऊर्फ आत्माराम रावजी देशपांडे यांच्या कविता फार आवडायच्या म्हणून तिने माझे नाव अनिलकुमार ठेवले

माझ्या आजोबांचे बिर्‍हाड पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या हौदासमोरच्या वाड्यात होते. घरात आजी, आजोबा, माझे आईवडील, दोन काका आणि तीन आत्या असा एकत्र कुटुंबाचा परिवार होता. माझे वडील त्यांच्या सर्व भावंडांमधे मोठे आणि माझी आई भाट्यांच्या घरातली थोरली सुनबाई.

माझ्या आईचा तत्त्वज्ञान हा आवडता विषय. पण घरात त्या किचकट विषयात कुणाला फारसे स्वारस्य़ नसायचे. तशी घऱातली सर्व माणसे उच्च विद्याविभूषित होती. वडील वनस्पती विज्ञानाचे प्राध्यापक आणि तोपर्यंत लग्न न झालेल्या कॉलेज विद्यार्थिनी असलेल्या, दोघी आत्यांचा ओढा देखील विज्ञानाकडे. एक काका डॉक्टर आणि दुसरे इंजिनीयर. मग तत्त्वज्ञानाची चर्चा करणार कोण?

पुण्यामध्ये त्या काळी अनेक थोर विदुषी होत्या. इरावती कर्वे, मालती बेडकर ही त्यांमधली प्रसिद्ध नावे. त्या माझ्या आईच्या ‘रोल मॉडेल’ होत्या. माझ्या आईने जी संस्कृती त्यांच्याकडून उचलली, तीच तिने मला शिकवली. माझ्या आयुष्यातल्या सर्व चांगल्या गोष्टींचे श्रेय मी त्यांना देतो.

आयुष्यात माझा संबंध काही पुरूष विद्वानांशी देखील आला. त्यांतल्या प्रत्येकाकडून मी काही ना काही शिकलो. पण त्यांचा म्हणावा असा प्रभाव माझ्या मनाच्या वैचारिक जडणघडणीवर कधीच पडला नाही, जितका वर म्हटलेल्या स्त्री-विदुषींचा पगडा माझ्या मनावर सतत राहिला.

तत्त्वज्ञान या आवडत्या विषयापासून दूर चालल्यामुळे होणारी मनाची घुमसट आई माझ्याजवळ बोलून दाखवायची. त्या लहान वयात तत्त्वज्ञानातले एक अक्षरदेखील मला समजणे शक्य नव्हते. पण ती बोलत राहायची आणि मी ऐकत राहायचो. वक्तशीरपणा असावा तर इमान्युएल काण्टसारखा असे माझ्या आईने मला तेव्हापासून शिकवले.

रोज सकाळी, चुलीवर स्वयंपाक करताना माझी आई मला शेजारी जवळ बसवून घेऊन तत्त्वज्ञानाचे धडे द्यायची. प्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्त याचे ‘कॉगिटो एरगो सम’ हे वाक्य असेच लहानपणी मी माझ्या आईच्या तोंडून ऐकलेले (अर्थ – मी विचार करू शकतो, म्हणून मी अस्तित्त्वात आहे.). देकार्तच्या ‘कॉगिटो’मधे खोलवरचा आणि व्यापक असा अर्थ भरलेला आहे. त्यामधे नुसता विचार नव्हे, तर आपल्या पंचेंद्रियांच्या द्वारे आपण मिळवलेले, सभोवतालच्या वास्तवाचे सर्व ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे विचार करू शकण्याची, वैचारिकतेची संपूर्ण क्षमता अभिप्रेत आहे. तसेच, त्यामधे भावभावना, अंतर्मनामधून सतत उठणार्‍या अनेकविध वृत्ती आणि त्यांच्यामधे असलेली मानसिक ऊर्जा व त्याबरोबरच बुद्धीच्या साहाय्याने या मानसिक ऊर्जेला दिलेले वळण आणि त्यापासून उत्पन्न होणारी नवनिर्मितीची क्षमता अशा सर्व गोष्टी ‘कॉगिटो’मधे सामावलेल्या आहेत.

हे असे सर्व आणि आणखीही बरेच काही माझ्या आईने मला शिकवले. तिने मला लहान वयापासून वैचारिकतेचे धडे दिले. विचार करायला शिकवले.

माझी आई धार्मिक नव्हती. तिचा देवावर विश्वास होता. पण तिची श्रद्धा देवापेक्षा ‘परिश्रम’ या गोष्टीवर होती. ‘यत्‍न तो देव जाणावा’ हे समर्थ रामदासस्वामींचे वाक्य तिने मला लहानपणापासून शिकवले.

मी शाळेत असताना तिने माझ्या मनावर बिंबवलेले आणखी एक वाक्य, कुठल्याशा कवितेतून घेतलेले, असे की…. “पूर्व दिव्य ज्यांचे, तया रम्य भाविकाल!” म्हणजे ज्यांनी पूर्वायुष्यामधे दिव्ये केलेली असतात, त्यांचाच भविष्यकाळ रम्य असतो. आणि विद्यार्थ्याने कसे असावे याबद्दलचे तिने मला शिकवलेले सुभाषित असे

“काकदृष्टी, बकोध्यानम्, श्वाननिद्रा तथैव च |
अल्पभोजी, गृहत्यागी, विद्यार्थी पंचलक्षणम् ||

(अर्थ : ज्ञानाचे कण वेचताना कावळ्यासारखी तीक्ष्ण नजर ठेवावी, कुठे काही नवीन शिकायला मिळत आहे का याचा शोध घेत राहवे, पण आपण असा शोध घेत आहोत, हे वरकरणी दाखवू नये. बगळ्यासारखा बहाणा करावा आणि काही नवीन सापडले की त्यावर झडप घालावी. ती झटकन घालता यावी म्हणून कुत्र्यासारखी झोप घ्यावी, अशाकरता की क्षणार्धात खडबडून जागे होता यावे. अति खाऊ नये, ज्ञानार्जनाकरता घर सोडायचीदेखील तयारी ठेवावी, ही उत्तम विद्यार्थ्याची पाच लक्षणे आहेत. )

जातीपातीच्या बाबतीत माझी आई फारशी उदार नव्हती. तिला स्वजातीचा अभिमान होता. ती म्हणायची, “आपण चित्पावन ब्राह्मण. शेंडीला दोरी बांधून आणि त्या दोरीचे दुसरे टोक आढ्याला टांगून अभ्यास करणे ही आपली परंपरा.”

आम्ही भावंडे मोठी झाल्यावर आमची आई पुन्हा एकदा विद्यार्थिनी बनली आणि तिने भाषाविषयामधे एम.ए.ची पदवी मिळवली. तत्त्वज्ञान शिकून घेतल्याला तोवर फारच वर्षे उलटून गेली होती. भाषाशास्त्राचा अभ्यासदेखील तिने त्यामधे जीव ओतून केला.

आधुनिक काळातल्या मराठी भाषेमधे पहिलीवहिली कविता दासोपंतांनी बोरूने काळी शाई वापरून, पांढर्‍या शुभ्र पासोडीवर लिहिली. (पासोडी म्हणजे झोपताना पांघरायची गोधडी, म्हणजे कापडाचे अनेक तुकडे एकावर एक असे जोडून बनवलेली ‘मल्टि-लेअर’ चादर) ती पासोडी मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली आहे. ती बघायला माझ्या आईने मला आमच्या ठाणे शहरातल्या घराहून थेट मराठवाड्यातल्या अंबेजोगाई नावाच्या गावाला नेले होते.

माझ्या आईचे अर्धे-अधिक आयुष्य माध्यमिक शाळेतली शिक्षिका म्हणून खर्ची पडले. तिने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या चार भाषा मला उत्तम प्रकारे शिकवल्या. म्हणूनच की काय, कित्येक वर्षे अमेरिकेत राहूनसुद्धा मी मराठी सहजपणे लिहू शकतो.

आमच्या घरात देवपूजा किंवा इतर धार्मिक गोष्टी कधी झालेल्या मला आठवत नाहीत. नाही म्हणायला स्वयंपाकघरातल्या एका लहानशा फळीवर देव्हारा होता. त्यामधे सुबक व सुंदर बारीक कोरीव काम केलेली सरस्वतीची हस्तिदंताची मूर्ती होती. कुण्या मूर्तिकाराने त्या मूर्तीवरचे कोरीव काम केले होते कुणास ठाऊक? पण त्या मूर्तीच्या चेहेर्‍यावरचे भाव तेजस्वी आणि तितकेच प्रेमळ होते. मला तर सरस्वतीची ती मूर्ती म्हणजे माझ्या आईची प्रतिमा वाटायची! त्या मूर्तीची पूजा आम्ही कधी केली नाही. कारण ती पांढरी शुभ्र राहवी म्हणून तिला हळद, कुंकू वगैरे काहीही वाहायचे नाही, नाहीतर ती डागाळेल. फुलेसुद्धा वाहायची नाहीत असा नियम होता. फक्त त्या हस्तिदंती मूर्तीचे सौंदर्य निरखायचे, तिच्या चेहेर्‍यावरचा प्रेमळ भाव मनात साठवायचा आणि नमस्कार करायचा!

त्या मूर्तीकडे बोट दाखवून आई आम्हा भावंडांना सांगायची, ही सरस्वती विद्येची देवता आहे. तुम्ही सर्वांनी आयुष्यभर या सरस्वतीची उपासना करा आणि ज्ञानमार्गी व्हा.

हातात झांजा घेऊन भजने गात, उदबत्त्या लावून, ‘टाळकुटेपणा’ करत केलेल्या अध्यात्माचे तिला फारच वावडे होते. असले अध्यात्म तिला आवडायचे नाही. अशा प्रकारच्या धार्मिक माणसांच्या ऐवजी निढळाचा घाम गाठून कष्ट करणारी माणसे देवाच्या अधिक जवळ जाऊन पोचलेली असतात, असे तिचे मत होते. त्यांचे देवत्व त्यांनी गाळलेल्या घामामधे असते, अशी तिची श्रद्धा होती. प्रसिद्ध मराठी कवी बाकीबाब बोरकर यांची ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ ही कविता तिनेच मला लहानपणी शिकवली.

“गाळुनिया भाळीचे माती, हरीकृपेचे मळे फुलविती, जलदांपरी येउनिया जाती,
जग ज्यांची न करी गणती, तेथे कर माझे जुळती |
यज्ञी ज्यांनी देऊनी निजशिर, घडिले मानवतेचे मंदिर, परी जयांच्या दहनभूमीवर,
नाही चिरा, नाही पणती, तेथे कर माझे जुळती||

हीच माझ्या दिवंगत आईने मला लहानपणी शिकवलेली संस्कृती

मला जर कुणी विचारले की मराठी संस्कृती काय आहे, तर मी क्षणाचाही विलंब न लावता बिनदिक्कपणे बोरकरांच्या या कवितेकडे बोट दाखवीन. कारण निदान माझ्या मते तरी, हीच खरीखुरी मराठी संस्कृती आहे.

अनिलकुमार भाटे

निवृत्त प्राध्यापक
विद्युत अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, माहिती तंत्रविज्ञान आणि मॅनेजमेन्ट
एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका
ईमेल : anilbhatel@hotmail.com

 

About Post Author