मराठी रंगभूमी: कन्नड प्रभाव

carasole

मूळ इंग्रजी भाषण : नारायणराय हुईलगोळ
मराठी अनुवाद : प्रशांत कुलकर्णी

मराठी रंगभूमीने कर्नाटकाकडून नाट्याभिरुची आणि समज घेतलेली आहे. मराठी रंगभूमी इसवी सन १८७० च्या आधी अस्तित्वातच नव्हती. कन्नड रंगभूमीला ‘गोम्बी अटाडवरू'(बाहुल्यांचा खेळ), ‘भागवत अटाडवरू'(भागवत खेळ) आणि ‘यक्षगान अटाडवरू'(यक्षगानाचा खेळ) यांसारख्या आविष्कारांची परंपरा आहे. ते खेळ रामायण-महाभारत यांच्यासारख्या महाकाव्यावर, भागवत पुराणातील विषयांवर बेतलेले असत. ‘श्रीकृष्ण पारिजात’ नावाचा लोकनाट्याचा आविष्कारही प्रसिद्ध आहे. ते खेळ फलाटावर होत असत – जसे इंग्लंडमध्ये शेक्सपीयरच्या काळात होत असत, तसे. ‘गोम्बी अटाडवरू’मध्ये काम करणारे कलाकार वेगवेगळया पात्रांसाठी वेगवेगळे मुखवटे वापरत असत. ‘भागवत अटाडवरू’ आणि ‘यक्षगान अटाडवरू’ मध्ये काम करणारे कलाकारसुद्धा वेगवेगळया भूमिका करत, नृत्ये करत, तसेच, मोठमोठाले संवाद/भाषणे म्हणत. मुळची भाषा ही संस्कृतप्रचुर कन्नड असे हे खरे, परंतु त्यात काम करणारे कलाकार प्रामुख्याने ग्रामीण भागातील असत. त्यामुळे, त्यांच्याकडून ग्रामीण कन्नड भाषा वापरली जात असे.

त्यानंतर नाटक मंडळ्या आल्या. त्या उत्तर कर्नाटकाच्या आसपास असलेल्या मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, कुरुंदवाड यांसारख्या मराठी संस्थानिकांच्या राज्यात खेळ करण्यासाठी जात-येत असत. त्या भागात असलेले लोक प्रामुख्याने कन्नड बोलत असत. एकदा, सांगली संस्थानिकांच्या राजाने तसे खेळ मराठीतून व्हावे म्हणून विष्णुदास भावे नावाच्या व्यक्तीस नाटक मंडळी सुरू करण्यास पाचारण केले आणि ‘भागवत खेळ’च्या धर्तीवर नाटक करण्यास सांगितले. त्यांनी पैशांची व्यवस्था केली आणि मराठी नाटक मंडळी सुरू झाली. त्या मंडळीने रामायण-महाभारतातून कथानके घेऊन नाटके बसवणे सुरू केले. साधारण, त्यांची पद्धत पुढीलप्रमाणे असे:

प्रमुख नट सूत्रधार असे. तो रंगमंचावर प्रवेश करी आणि विदूषकाला बोलावी, त्याला नाटक सादर करण्यात मदत करण्यास सांगे. विदूषक डोक्यावर झाडाच्या फांद्या घेऊन प्रवेश करी. त्यानंतर सूत्रधार गणपती आणि सरस्वती देवता यांना उपस्थित होण्यास प्रार्थना करी. गणपती त्याच्या गणांसकट प्रवेश करून आलेली संकटे दूर करतो. त्याच तऱ्हेने विद्येची देवता सरस्वतीसुद्धा तिच्या वाहनावर प्रवेश करून सूत्रधाराला सर्व मदतीचे वचन देऊन जाई. अशा तऱ्हेने देवतांचे आशीर्वाद मिळाल्यावर सूत्रधार इतर पात्रांची एकामागून एक त्या त्या वेळेला ओळख करून देत असे. नाटकात संगीत नसे, सूत्रधार कधी कधी गात असे. रंगमंचावर वेगवेगळे देखावे आणि दृश्ये असत.

थोड्याच कालावधीमध्ये, मराठी संस्थानिकांच्या मदतीने इतर संस्थानांमध्येही अशी नाटक मंडळी स्थापन झाली. भव्य रंगमंच आणि कलात्मक पद्धतीने दाखवलेली दृश्ये यांनी सजलेले ते प्रयोग, त्यांना संस्थानांमध्ये आणि सध्याच्या उत्तर कर्नाटकातील भागामधे बरीच लोकप्रियता मिळू लागली. बरीच नाटककार मंडळी त्यात उतरू लागली आणि एकमेकांशी स्पर्धा करू लागली. अशा तऱ्हेने नाटकांचा आणि नाटक मंडळी यांचा विकास होऊ लागला. त्याच वेळेला अण्णा किर्लोस्कर नावाच्या व्यक्तीने १८८० मध्ये ‘किर्लोस्कर संगीत नाटक मंडळी’ नावाची संगीत नाटक मंडळी चालू केली. त्याबद्दल थोडेसे –

अण्णा किर्लोस्कर कर्नाटकातील गुर्लहोसूर नावाच्या एका गावी राहत असत. ते आणि बेळगावचे शेषगिरी राव हे मित्र होते. दोघेही वनखात्यात काम करत असत. शेषगिरी राव हे संगीत शिकलेले होते. ते थोडेफार काव्य आणि गीत रचना करत असत. त्यांनी नाटकात संगीत असावे असे सुचवले. त्यांनी तशी गीते रचली. ती पात्रांच्या संवादाचा जणू काही भाग होती आणि ती त्यांनी पात्रांच्या करवी गाऊन घेतली. त्यांनी कालिदासाचे ‘अभिज्ञान शाकुंतल’ कन्नडमध्ये भाषांतरित केले. तसे करताना संवाद आणि गीते त्यात आणली. नाटकातील शेवटच्या गीतामध्ये नमूद केल्याप्रमाणे, त्यांनी ते १८७१ मध्ये केले आहे. त्यांनी ते भाषांतर अण्णा किर्लोस्कर यांना दाखवले. त्यांनी ते शेषगिरी राव यांच्या पद्धतीने मराठीत भाषांतरित केले. पण अण्णा एवढे करून शांत बसणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी त्यांची कंपनी सुरू केली आणि कलाकारांना एकत्र आणून त्या नाटकाचे प्रयोग केले. तो नवीन नाट्यप्रकार होता. त्यात संगीत आणि गाणी होती, तो मराठी लोकांना आवडू लागला. अल्पावधीतच संगीत नाटके मराठीत लोकप्रिय झाली. त्यामुळे इतर बऱ्याच जणांनी संगीत नाटक मंडळ्या सुरू केल्या आणि त्यांचा प्रभाव वाढत गेला, त्यामुळे गद्य नाटकाचा प्रभाव ओसरू लागला.

अण्णा किर्लोस्करांना संगीत नाटकाचे जनक म्हणतात. परंतु मी ह्या सभेतील श्रोतृवृंदाचे लक्ष एका गोष्टीकडे वेधू इच्छितो की, शेषगिरी राव हे खरे संगीत नाटकाचे जनक होते. ते कर्नाटकाच्या दुर्दैवाने मागे पडले. मला असे नमूद करावेसे वाटते, की त्यांना कर्नाटकातील लोकांचा पाठिंबा मिळाला नाही आणि कन्नड लोकांतील उत्साहाचा अभाव यामुळे तसे घडले असावे.

समाज गद्य नाटकाकडून संगीत नाटकाकडे जात होता, त्याच वेळेस नाट्यक्षेत्रातील काही मंडळीनी नाटकाचे, नाट्याचे मर्म अभिनयात आहे हे जाणून, गद्य नाटकासाठी कोल्हापुरात ‘शाहूनगरवासी नाटक मंडळी’ ही संस्था स्थापन केली. सूत्रधाराने गणपती, सरस्वती यांना रंगमंचावर आणायचे, पण पुढे इतर जुन्या पद्धतींना फाटा देऊन त्यांनी नाटकांची रचना केली. त्यात शेक्सपीयरची नाटके पहिल्या प्रथमच मराठी रंगमंचावर आणली गेली. केळकर, आगरकर, देवल यांसारख्या प्रभृतींनी शेक्सपीयरची इंग्रजी नाटके मराठीत केली. त्यात अभिनय हाच प्रमुख भाग होता. त्यानंतर त्यांनी राजस्थान आणि महाराष्ट्र यांच्या इतिहासावर आधारलेली नाटकेदेखील आणली. गणपतराव जोशी नावाच्या जुन्या अभिनेत्यामुळे त्या नाटक कंपनीला बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यांनी वठवलेली ऑथेल्लो, हॅम्लेट, राणा भीमदेव यांसारखी पात्रे गाजली. त्यामुळे मराठी नाटकांनी वेगळीच उंची गाठली असे नक्कीच म्हणता येईल. ती कंपनी संगीत नाटक मंडळींबरोबर स्पर्धा करत नव्हती, तरीसुद्धा दोन्ही गोष्टी लोकप्रिय झाल्या. मात्र असे असूनसुद्धा दुसरी गद्य नाटक कंपनी सुरू झाली नाही, सर्व जणांचा संगीत नाटक मंडळी चालू करण्यावर भर होता. पाटणकर संगीत नाटक मंडळी, राजापुरकर संगीत नाटक मंडळी, नाट्यकलाप्रवर्तक संगीत नाटक मंडळी, स्वदेशी हितचिंतक संगीत नाटक मंडळी या आणि इतर बऱ्याच कंपन्या सुरू झाल्या.

पुराणावर तसेच इतिहासावर आधारित नाटके रचणारेदेखील पुढे येऊ लागले. देवल आणि श्रीपाद कोल्हटकर यांनी सामाजिक नाटके लिहून समाजातील वाईट चालीरीतीवर भाष्य केले. अशा नाटकांनी मनोरंजन आणि प्रबोधनही होत असे. दुसऱ्या बाजूला, किर्लोस्कर कंपनीचा डंका वाजत होता. जोगळेकर, बालगंधर्व, बोडस यांसारख्या गायक नट मंडळीमुळे त्यांची नाटके लोकप्रिय होत गेली. जोगळेकरांच्या निधनानंतर, बालगंधर्व आणि बोडस यांनी एकत्र येऊन, बडोद्याच्या महाराजांच्या आश्रयाने ‘गंधर्व नाटक मंडळी’ चालू केली. बालगंधर्वाना अमाप प्रसिद्धी मिळत गेली. केशवराव भोसले यांच्या रुपाने त्यांना प्रतिस्पर्धी निर्माण झाला. त्यांच्या नाटक कंपनीचे नाव होते ‘ललितकला आश्रक मंडळी’. ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’ नावाची गद्य नाटक कंपनी देखील त्याच सुमारास सुरू झाली.
या घडीला निशितपणे असे म्हणता येईल, की मराठी रंगभूमी ही जोमाने वाढत आहे. मात्र काही मुद्दे आहेत, ते मांडतो. संगीत नाटक मंडळी संगीताकडे जास्त लक्ष देतात, त्यामुळे गाण्यात असलेले भाव आणि त्यांची अभिव्यक्ती यांकडे दुर्लक्ष होत आहे. गाणे परत म्हणण्याचे प्रयोजनच त्या गाण्यातील भाव काय आहेत आणि नटाला काय सांगायचे आहे हे आहे. फक्त संगीतातील कौशल्य याकडे लक्ष दिल्यास विशेष बोध होत नाही.

महाराष्ट्रातील नाटककार समाजातील समस्यावर, राजकीय आणि इतर धार्मिक विषयांवर नाटके लिहीत आहेत. त्याद्वारे मराठी समाजात नाट्य अभिरुचीस खतपाणी मिळत आहे. तसेच विधवा विवाह, बाल विवाह यांसारख्या समस्यांवर नाटके येत आहेत. राजकीय नाटकांमुळे समाजात राष्ट्रीय भावना जागृत होत आहे. तसेच, प्रत्येक वर्षी ‘नाट्यसंमेलने’ वेगवेगळ्या ठिकाणी भरवली जात आहेत. नाटककार, नट आणि रसिक यांना त्यात आमंत्रण असते. नाट्यक्षेत्रातील समस्यांवर तेथे चर्चा होते. अशी पंधरा संमेलने भरवली गेली आहेत आणि ती अतिशय उपयुक्त ठरली आहेत.

मला खेदाने असे नमूद करावेसे वाटते, की मराठी नाटक कंपन्यांमध्ये हार्मोनियमचा साथीचे वाद्य म्हणून सर्रास वापर होत आहे. मी वर्तमानपत्रांत असे वाचले आहे, की ‘गंधर्व नाटक मंडळी’ने सारंगी वापरण्यास सुरुवात केली आहे. ते भारतीय वाद्य आहे, मला अशी आशा, आहे की इतर कंपन्यादेखील तसे करतील.

आपली कर्नाटकातील रंगभूमी जी मागे पडली आहे आणि जी अशिक्षित व अडाणी लोकांच्या हातात आहे, ते मराठी रंगभूमीचे अनुकरण करतील आणि म्हैसूर महाराजांच्या आश्रयाखाली प्रगती साधतील.

[मे १९२१ मध्ये बंगळूर येथे भरलेल्या दुसऱ्या संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित स्मरणिकेतून हा लेख घेतला आहे].

– प्रशांत कुळकर्णी

About Post Author

Previous articleपवई तलावावरील ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’
Next articleकलामहर्षी केकी मूस
प्रशांत कुलकर्णी हे गेल्या २० वर्षाहून अधिक काळ संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या cloud computing या विषयामध्ये ते एका आंतरराष्ट्रीय संस्थेत मध्ये काम करत आहेत. त्यांनी पुण्यातल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून भरतविद्येचा (Indology) अभ्यास केला आहे. भाषा, इतिहास, साहित्य आणि संगीत यासारख्या विविध क्षेत्रात त्यांना विशेष रुची आहे. त्यांनी काही काळ उर्दू भाषेचा देखील अभ्यास केला आहे. त्यांनी अमेरिका, युरोप, भारतात भटकंती केली आहे. सह्याद्रीत्तील १५० हून अधिक किल्ल्यावर जाऊन आले आहते. ते पुण्यातल्या डॉ जगन्नाथ वाणी संस्थापित 'स्किझोफ्रेनिया अवरेनेस असोशिएशन'(SAA), ह्या मानसिक आजाराच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेत देखील जबाबदारी पार पाडत आहेत. या पूर्वी त्यांनी भाषांतरित केलेले अमीरबाई आणि गोहरबाई यांच्यावरील लेख महाराष्ट्र टाईम्स, गावकरी या वर्तमानपत्रातून तसेच 'थिंक महाराष्ट्र' या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9850884878

2 COMMENTS

  1. मराठी रंगभूमी इ.स.1870 पूर्वी
    मराठी रंगभूमी इ.स.1870 पूर्वी अस्तित्वातच नव्हती, असे कसे म्हणता येईल? पौराणिक कथा, भागवत खेळ,यक्षगान या माध्यमांतून सादर होत असताना… महाराष्ट्रांतील, मराठवाड्यांतील मंदिराच्या रंगपीठांवर 16 व्या शतकांपासून लळिते, भारुडे सादर होत होती. आविष्कार शैलीत वेगळेपण असलं तरी, रंगभूमीचे साधर्म्य दखलपात्र आहेच!

  2. कन्नड आणि मराठी हे दोन्ही
    कन्नड आणि मराठी हे दोन्ही आमचे माय बाप आहेत. म्हणूनच आम्ही संयुक्त महाराष्ट्र सेना या नावाने पक्ष काढत आहोत.

Comments are closed.