भारतातील वैष्णव मंदिरे (Vaishnav Temples in India)

 

विष्णूचे मूर्तिरूपात पूजन आणि त्यासाठी मंदिरनिर्माण परंपरा भारतीय भूमीवर गेल्या बावीसशे वर्षांपूर्वीपासून दिसून येते. ब्रह्माविष्णू आणि महेश या लोकप्रिय त्रिमूर्तीपैकी विष्णू हा एक. विष्णूचे उल्लेख वैदिक वाङ्मयापासून मिळतात. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांत वैष्णवभक्तीची समृद्ध परंपरा काळानुरूप विकसित होत गेली आहे. त्यात राज्यकर्तेकलाकार व भाविक यांनी त्यांच्या सामर्थ्यानुसार भर टाकली.
 विष्णूची वासुदेव -संकर्षण रूपातील सर्वात प्राचीन प्रतिमा बॅक्ट्रिया येथील अगॅथोक्लेस राजाच्या (इसवी सनपूर्व 190) नाण्यांवर दिसून येते. बॅक्ट्रिया हे राज्य सध्याच्या अफगाणिस्तान – उझबेकीस्तान – अफगानिस्तान ताजिकिस्तान या प्रदेशात होते. साधारण त्याच काळात, राजस्थानातील घोसुंडी येथील शिलालेखात नारायण वाटिकेच्या निर्माणाचे उल्लेख दिसतात. मध्यप्रदेशातील बेसनगर येथे तक्षशिलेहून आलेल्या राजदूताने गरुड स्तंभासाठी दान दिल्याची माहिती मिळते. त्याचे नाव हेलिओडोरस असून तो ग्रीक वंशांचा होता. त्याने भागवत धर्म स्वीकारला होता. तेथे 1964-65 च्या दरम्यान झालेल्या उत्खननात तत्कालीन मंदिराचे अवशेष दिसून आले. त्याशिवाय मध्यप्रदेशातील टिकला येथील नैसर्गिक शैलगृहात उपलब्ध वासुदेवसंकर्षण आणि एकांशना यांचे चित्रदेखील उल्लेखनीय आहे.  
त्या काळात मथुरा नगरीत भागवत धर्म विशेष प्रसिद्ध होता. तेथे मिळणारे पुरावशेष तेच अधोरेखित करतात. मथुरेत आणि विशेषतः त्याजवळील मोरा या गावी मिळलेल्या अनेक मूर्ती आणि अभिलेखात नोंदवलेले वृष्णी (यादव) कुळातील पंचवीर यांच्या प्रतिमा आणि शैल-देवगृहाचे निर्माण नक्कीच विशेष आहे. त्याच काळात विष्णूची चतुर्भुज मूर्ती विशेष प्रचलनात आली. चेहऱ्यावर शांत भाव, माथ्यावर किरीट-मुकुट, कुंडलादी अलंकार, गळ्यात वनमाला आणि समभंग अवस्थेत उभ्या विष्णूचे रूप खरेच विलोभनीय दिसते. शंख-चक्र-गदा-पद्म या चार आयुधांच्या संयोगाने एकूण चोवीस प्रकारे केशव-नारायणादी विष्णुमूर्ती निर्माण केलेल्या दिसतात.
मध्यप्रदेशातील देवगढ येथील
गुप्त राजांच्या काळातील मंदिर
गोपालक समाजासोबतच भारतातील अनेक राज्यकर्त्या कुळांनी राजस विष्णूची पूजा आपलीशी केली. अनेक पुराणांची निर्मिती इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या आसपास झाली. विष्णूच्या मत्स्य-कुर्मादी अवतारांचे वर्णन पुराणांत येते. मध्यप्रदेशातील देवगढ येथील गुप्त राजांच्या काळातील मंदिर हे प्राचीन तरीही अतिशय परिपूर्ण वैष्णव मंदिर म्हणून गणले जाते. ते मंदिर उंच जोत्यावर लाल वालुकाश्मात बांधलेले असूनभिंतीवर कोनाड्यात मोजकीच परंतु अतिशय देखणी शिल्पे आहेत. त्यात शेषशायी विष्णू तसेच नर-नारायण यांचे अंकन अद्वितीय आहे. उदयगिरी येथील कोरीव लेण्यांतही गुप्त राजांच्या आश्रयाने कोरली गेलेली अनेक शिल्पे आहेत. त्यातील प्रचंड असा भू-वराह हा विशेष अभ्यासनीय आहे. भू-वराहाच्या मूर्तीत धड मनुष्याचे व मुख वराहाचे, त्याच्यावर भूदेवी (पृथ्वी) मनुष्यरूपाने दाखवलेली असते.
उदयगिरी लेण्यातील भू-वराह मूर्ती

स्वतःस परम-भागवत म्हणवून घेणाऱ्या चंद्रगुप्तची द्वितीय कन्या महाराष्ट्रातील वाकाटक राजघराण्याची सून म्हणून आली. त्या संपर्कामुळे रामटेक व विदर्भ प्रदेशात केवल-नृसिंहत्रिविक्रम आणि यज्ञवराह इत्यादी वैष्णव मूर्ती आणि मंदिरे दिसून येतात. गुप्त-वाकाटकांप्रमाणे कर्नाटकातील बदामीच्या चालुक्यांनीही विष्णूची व त्याच्या अवतारांची पूजा केली. बदामीच्या कोरीव लेण्यांत भूवराहशेषशायीत्रिविक्रम इत्यादींसोबतच हरिहराचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्पही दिसते. त्या शिल्पात शिव आणि विष्णू यांच्या ऐक्याची कल्पना केलेली आहे. अशा इतरही सामायिक प्रतिमांची कल्पक योजना शास्त्रकार व मूर्तिकार यांनी केलेली दिसून येते. त्याचे उदाहरण म्हणजे वैकुंठ-विष्णू. त्यात नर-नृसिंह-वराह-राक्षस अशा, चार मुखे असलेल्या मूर्तीची कल्पना केलेली आहे. तशा मूर्ती काश्मिरात विशेष प्रचलनात होत्या. त्यापैकी बऱ्याच मूर्ती आता देशी-विदेशी संग्रहालयात आहेत.

महाबलिपुरमच्या कृष्णमंडपातील
गोवर्धन उचलतानाचे श्रीकृष्णाचे शिल्प

दक्षिणेतील पल्लव राजांनीही वैष्णव पंथांना आश्रय दिला आणि लेणी व मंदिरे यांची निर्मिती केली. त्याच काळात तमिळनाडूतील महाबलीपुरम् येथील कृष्णमंडपातील ग्रॅनाइट शिळेत गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रसंग अतिशय जिवंतपणे कोरलेला आहे. पल्लव राजांची राजधानी असलेल्या कांचीपुरम नगरीत नरसिंहवर्मन याने उभारलेले वैकुंठ-पेरुमलचे मंदिरही अद्वितीय आहे. त्या मंदिरात विष्णूच्या व त्याच्या अवतारांच्या अनेक मूर्ती आहेतच व प्राकारात भिंतीवर पल्लव राजवंशाचा इतिहासही कोरलेला आहे.

त्याशिवाय दक्षिणेत अनेक प्राचीन वैष्णव मंदिरे आहेत. त्यामध्ये विष्णूचे तिरुपती बालाजीच्या रूपातील स्थान अधिक ठळक आहे. आंध्रप्रदेशातील त्या देवस्थानाचा इतिहास दहाव्या शतकापर्यंत, पल्लव राजांच्या काळात पोचतो. त्या देवस्थानाला आता दिसणारे महत्त्व आणि वैभव विजयनगर साम्राज्यात प्राप्त झाले. तेथे बालाजीसोबत भूदेवी व पद्मावती या त्याच्या दोन पत्नींची पूजा होते. तिरुपतीप्रमाणे अतिशय जगप्रसिद्ध वैष्णव स्थान म्हणजे पुरी. ओदिशातील पुरी येथे जगन्नाथाचे मंदिर गंग राजांच्या काळात (बारावे शतक) निर्माण झाले असावे. तेथे जगन्नाथासोबत बलराम आणि सुभद्रा यांच्याही लाकडी मूर्तीचे पूजन होते. त्या हात-पाय-कानविरहित विशिष्ट आहेत. तेथील मंदिरात आणि शास्त्रीय नृत्यात कवी जयदेवाच्या गीतगोविंदमधील अष्टपदीचा समावेश आवर्जून असतो. तेथील रथयात्रेचा सोहळा अवर्णनीय आहे.
विठ्ठल

जगन्नाथबालाजी आणि विठ्ठल ही तिन्ही दैवते लोकसंस्कृती व अभिजात वैष्णव संस्कृती यांच्या मिलाफाची उदाहरणे म्हणूनही सांगितली जातात. इतिहास संशोधक रा.चिं. ढेरे यांनी एके ठिकाणी जगन्नाथासअन्नब्रह्म‘, बालाजीस ‘कांचनब्रह्म‘ आणि विठ्ठलास ‘नादब्रह्म‘ असे सार्थ संबोधले आहे. पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणीची ओळख मराठी माणसास वेगळी काय सांगावीमहाराष्ट्राचे ते लाडके दैवत भक्तवत्सल म्हणून ओळखले जाते. इतर दैवतांप्रमाणे त्यास पक्वान्न वा धन यांची अपेक्षा नसून, ते केवळ नामस्मरणाने संतुष्ट होणारे आहे. म्हणून सर्व जाती-पंथांतील संतांनी त्याचे महिमागान केले आहे. कमरेवर दोन हात ठेवून उभ्या चोविसाहूनही वेगळा। तो हा पंचविसावा।‘ अशा मूर्तीची ओळख मूर्तिज्ञ गो.बं. देगलूरकरयोगस्थानकमूर्तीअशी करतात. तेथील मंदिरास यादव व होयसळ राजांनी;  तसेच, अनेक गावांतील सर्वसामान्य भाविकांनी दान दिल्याचे अभिलेख उपलब्ध आहेत.

सोळाव्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी श्रीराम व हनुमंत यांच्या उपासनेचा आग्रह धरला. साधारणतः त्याच काळात बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू व आसाममध्ये श्रीमंत शंकरदेव यांनी वैष्णवभक्तीची परंपरा जागृत ठेवली. त्याच्या नंतरच्या काळात बंगालमध्ये विष्णुपूर येथे मल्ल राजांनी मंदिरांची निर्मिती केली. ती सारी विटांची परंतु सुंदर नक्षीकामाने सजलेली मंदिरे आहेत. रासमंच, श्यामराय, मदनगोपाल, मुरलीमोहन, राधागोविंद, राधामाधव आणि राधाश्याम इत्यादी अशा अनेक मंदिरांची नावे वाचताच मल्ल राजांचे कृष्णप्रेम समजून येते.
          याव्यतिरिक्त भारतात व भारताबाहेर अनेक प्राचीन-अर्वाचीन वैष्णव मूर्ती आणि मंदिरे आहेत जी या समृद्ध परंपरेची स्मृतिचिह्ने आहेत व भारताच्या विशाल सांस्कृतिक संचिताचा महत्त्वाचा भाग आहेत.
दिग्विजय पाटील8975932510
digvijayp94@gmail.com

दिग्विजय पाटील हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक आहेत. त्यांचा प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती हा संशोधनाचा विषय आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ पुणे) व पदव्युत्तर पदविका पं. दीनदयाल उपाध्याय पुरातत्त्व संस्थान (नोएडा) येथे पूर्ण झाले आहे. ते प्रकल्प सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. तसेच, त्यांची शिखर-शिंगणापूरच्या शंभू-महादेवसंबंधी अभ्यासात विशेष रुची आहे. ते मूळ सोलापूर  जिल्ह्यातील अकलूजजवळचे: सध्या पुण्यात  असतात. 

बोस्टन संग्रहालयातील वैकुंठ विष्णू

 

बिष्णुपूर येथील मंदिर

 

———————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here