ब्लॅक ब्युटी – घोड्याच्या नजरेतून

‘ब्लॅक ब्युटी’
‘ब्लॅक ब्युटी’

‘ब्लॅक ब्युटी’ माझ्या वाचनातून अनेक पुस्तके गेली आहेत. कधी कादंबरी, कधी कथासंग्रह, कधी प्रवासवर्णन तर कधी आत्मचरित्र! पण ती सारी पुस्तके आहेत ती तुमच्या-माझ्यासारख्या माणसांवरची,  तशी माणसांशी संबंधित. माणसाने माणसाच्या नजरेतून, त्याच्या दृष्टिकोनातून लिहिलेली. पण मग माणसाप्रमाणे प्राण्यांच्या नजरेतूनही काही कथा असू शकतातच की! प्राण्यांना माणसांप्रमाणे जरी बोलता येत नसले तरी त्यांना मन असतेच ना! आणि मन म्हटले, की भावभावना ह्या आल्या. ते कधी दु:ख असेल तर कधी आनंद, कधी राग असेल तर कधी नैराश्यही! माणसाळलेला असाच एक प्राणी म्हणजे घोडा. घोडा! आपल्या पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग. घोड्याने जशी अनेक युद्धे पाहिली तसाच तो अनेक शर्यतींत चौफेर उधळलाही आहे. कधी तो श्रीमंतांचा थाट बनून राहिला तर कधी तो गरिबांची निकड बनला. बुद्धीने तल्लख असलेला तो प्राणी कुत्र्याप्रमाणेच माणसाचा लाडका ठरला. परंतु त्याच्या संपूर्ण प्रवासात त्याच्या मनाचा ठाव कधी कुणाला लागला का? त्या मुक्या जनावराच्या भावना कधी कुणापर्यंत पोचल्या का? त्याच्या वेदना जाणून घ्यायच्या असतील तर अ‍ॅना सेवेल यांनी लिहिलेल्या ‘ब्लॅक ब्युटी’च्या वाचनाशिवाय पर्याय नाही. एका घोड्याचे आत्मवृत्त हळुवारपणे मांडणारी कादंबरी म्हणूनच जागतिक साहित्यात ‘ब्लॅक ब्युटी’अजरामर ठरली आणि ती सर्वकाल रोचकतेने वाचली जाते.

ब्लॅक ब्युटी नावाचा घोडा आहे. जसे माणसाला स्वत:चे स्वातंत्र्य प्रिय असते तसेच ते मुक्या जनावरालाही तितकेच आवडते. म्हणूनच केवळ त्याला काबूत आणण्यासाठी त्याला लगाम घालण्याचा, फॅशनसाठी त्याचा लगाम अधिकाधिक आवळण्याचा, त्याची शेपूट कापून टाकण्याचा माणसाचा खटाटोप हा त्या मुक्या जनावरासाठी किती क्लेशदायक असू शकतो त्याचे चित्रण ‘ब्लॅक ब्युटी’मध्ये करण्यात आले आहे. ते थेट मनाला भिडते.

पुस्तकाच्या पहिल्या भागात वाचकासमोर येतो तो ‘ब्लॅक ब्युटी’चा जन्मानंतरचा सुखद काळ. आईच्या सहवासात मजेत दिवस जगणार्‍या ‘ब्लॅक ब्युटी’ला माणसाच्या व्यवहारी व स्वार्थी जगाची सुतराम कल्पना नसते. म्हणूनच आईने दिलेल्या ‘तू चांगला वागशील तितकीच चांगली वागणूक तुला मालकाकडून मिळेल’ या शिकवणीचे पालन करत, तो आपला मालक, जॉर्डन याच्या सेवेत व जिंजर, मेरीलेग्ज आणि सर ऑलिव्हर या त्याच्या मित्रपरिवाराच्या सहवासात मजेत दिवस जगत असतो. परंतु जेव्हा त्याला दुसर्‍या मालकाला विकण्यात येते तेथून त्याच्या जीवनाचा दुसरा अध्याय सुरू होतो. तो यातनामय ठरतो. माणसाकडून त्याच्या थोड्याशा स्वार्थांसाठी लादण्यात येणार्‍या निर्बंधांमुळे ‘ब्लॅक ब्युटी’ला त्रासदायक अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्याच दरम्यान त्याचे त्याच्या मित्रांना दुरावणे, त्याची मैत्रीण जिंजर हिचा मृत्यू हे सारे ‘ब्लॅक ब्युटी’साठी धक्कादायक असते. माणसाच्या अप्पलपोटीपणाला आपणही एक दिवस असेच बळी पडणार ही भावना ‘ब्लॅक ब्युटी’च्या मनात घर करू लागली असतानाच त्याच्या सुदैवाने, त्याच्या अखेरच्या काळात, त्याला त्याच्या सर्वात पहिल्या मालकाच्या कुटुंबातील सदस्य जो ग्रीन भेटतो. तो  ‘ब्लॅक ब्युटी’ला ओळखतो. त्या गुणी, मुक्या जनावराची झालेली दुर्दशा त्याला सहन होत नाही. तो त्याला पुन्हा त्याच्या घरी घेऊन जातो. आणि तेथूनच ‘ब्लॅक ब्युटी’चे शेवटचे पर्व सुरू होते. ते आनंददायी ठरते.

लेखिका अॅना सेवेल अ‍ॅना सेवेल यांनी माणसाची स्वार्थी वृत्ती आणि त्याच्या त्या स्वभावामुळे मुक्या जनावराला जगण्यासाठी करावी लागणारी धडपड याचे करुण चित्र कादंबरीतून अचूकपणे उभे केले आहे. अ‍ॅना सेवेल यांनी कादंबरी १८७७ मध्ये लिहिली. अ‍ॅना सेवेल यांचा, त्यांची कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत मृत्यू झाला. परंतु तोपर्यंत ती कादंबरी बेस्टसेलर ठरली होती.

१८७७ साली प्रसिद्ध झालेल्या ‘ब्लॅक ब्युटी’ पुस्तकाचे मुखपृष्ठ अॅना सॅवेल यांचे ‘ब्लॅक ब्युटी’ हे एकमेव पुस्‍तक. १८२० मध्ये इंग्लंडच्या यारमाऊथ भागात जन्मलेली अॅना ही हसरी, खेळकर तरुणी होती; मात्र तिचे कुटुंबजीवन फारसे चांगले नव्हते. तिच्या वडिलांना नोकरीनिमित्त स्टेशनवर पोचविण्यासाठी अॅना घोडागाडीतून जायची. त्‍या काळात तिला घोड्यांबद्दल आत्मीयता निर्माण झाली. अॅनाला ऐन तारुण्यात अपघातात पाय गमवावा लागला. त्यानंतर ती आयुष्यभर अंथरुणाला खिळून अपंग आयुष्य कंठत राहिली. तिला त्‍या काळात ‘ब्लॅक ब्युटी’ची कल्पना सुचली; मात्र ती कादंबरी प्रकाशित होण्यास १८७७ साल उजाडले. ‘ब्लॅक ब्यूटी’ कादंबरी प्रकाशित झाल्यापासून आजतागायत जनमानसात लोकप्रिय आहे. ते पुस्‍तक पिढ्यानपिढ्या रोचकतेने वाचले जातेय.

ज्या काळात घोडा या प्राण्याविषयक माणसाच्या मनात कोणतीही आदराची भावना नव्हती, ज्या काळात त्या मुक्या जनावराकडे केवळ आपल्या मालकीचे वाहन म्हणून पाहिले जात असे अशा काळात लिहिली गेलेली ती कादंबरी. जसे मी म्हटले, की हे एका घोड्याच्या दृष्टिकोनातून लिहिले गेलेले आत्मवृत्त आहे. ते सोप्या भाषेत माणसाचे क्रौर्य अधोरेखित करते. माझ्या मते, घोडा या मुक्या जनावराला हीन वागणूक देणा-यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम कादंबरी करते व घोड्याकडे सह्रदय दृष्टिकोनातून पाहण्यास, त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने वागण्यास भाग पाडते. खरे तर सेवेल यांची ती कादंबरी खास मुलांकरता लिहिण्याचे योजना नव्हती. परंतु तरीही कादंबरी मुलांमध्येही तितकीच वाचनीय ठरली हे त्या कादंबरीचे मोठे यश म्हणावे लागेल.

ब्लॅक ब्युटी
लेखिका : अ‍ॅना सेवेल
अनुवाद : स्मिता लिमये
साकेत प्रकाशन औरंगाबाद
पाने – १०४
किंमत – १२० रूपये

अनुप्रिता करदेकर
९८१९३५६३३९

Last Updated On – 4th May 2016

About Post Author