ब्रिटिश छावण्यांतील वेश्यांची स्थिती (The Plight of Prostitutes in British Ruled Indian Camps)

6
51

मिशनरी म्हटले की बहुधा डोळ्यांसमोर येतात ते पांढरे पायघोळ झगे घातलेले आणि ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी काम करणारे स्त्री-पुरुष. महिला मिशनरी असा स्वतंत्र उल्लेख केला तर पहिले नाव आठवते ते मदर तेरेसा यांचे. तेरेसा हिंदुस्तानात 1929 साली आल्या. त्यांनी शिक्षिकेचे काम प्रथम अनेक वर्षे केले. त्यानंतर त्यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीज स्थापन केली. त्या संस्थेचे काम ज्या क्षेत्रात झाले – रुग्णसेवा, अनाथाश्रम, शिक्षणसंस्था; ती क्षेत्रेही मिशनरी या संज्ञेशी जोडली गेली आहेत. मिशनरी हिंदुस्तानात काम करू लागले ते अठराव्या शतकाच्या अखेरीस. मी ज्या मिशनरी महिलांच्या कार्याविषयी सांगत आहे त्या मदर तेरेसा यांचा जन्म होण्यापूर्वी हिंदुस्तानात आल्या होत्या. त्या महिलांचे कार्य वेगळ्या क्षेत्रात आणि वेगळ्या स्वरूपाचे आहे. त्यांची नावे – एलिझाबेथ अँड्रयू आणि कॅथरीन बुशनेल.

          कॅथरीन बुशनेल यांचा जन्म 1855 मधील. त्या डॉक्टर होत्या; त्याचबरोबर बायबलच्या अभ्यासक, समाज कार्यकर्त्या आणि धर्मशास्त्रात महिलावादी होत्या. त्यांचे बायबलविषयक पुस्तक God’s word to women हे प्रसिद्ध झाले होते. त्यांनी चीनमध्ये डॉक्टरी व्यवसाय 187982 या काळात केला. त्यांना चीनमध्ये असताना बायबलची भाषांतरे वाचण्यात रुची निर्माण झाली आणि त्या इंग्रजी भाषेत झालेल्या बायबलच्या अनुवादांतून महिलांविषयी दिसणारे पूर्वग्रह पुसून टाकण्याचा विचार आणि प्रयत्न करू लागल्या. बुशनेल मूळच्या अमेरिकन. त्या चीनमधून स्वदेशी परतल्या आणि त्यांनी Women’s Christian Temperance Union संस्थेचे सदस्यत्व घेतले. त्यांनी विस्कॉन्सिन भागातील वेश्याव्यवसाय बंद व्हावा यासाठी 1888मध्ये चळवळ केली. त्यांची भूमिकाही वेश्याव्यवसाय स्त्रियांवर लादला गेला आहे आणि त्यातून त्यांची पिळवणूक होत आहे अशी होती. त्यांच्या त्या प्रयत्नाला यश आले. अविवाहित महिलांना पळवून नेऊन वेश्याव्यवसाय करण्यास लावण्याला कडक शिक्षा देणारा कायदा पास झाला. मात्र त्यांना त्या चळवळीत बदनामी खूप सहन करावी लागली. त्यावेळी त्यांनी काहीशा नैराश्याने जोसेफाइन बटलर या इंग्लडमधील समाजसुधारक महिलेचा सल्ला घेतला. बटलरबार्इंनी त्यांना हिंदुस्तानात जाण्याचे सुचवले. तेव्हा त्या त्यांची मैत्रीण एलिझाबेथ अँड्रयू हिला सोबत घेऊन 1891 मध्ये हिंदुस्तानात आल्या.

          त्यांना हिंदुस्तानात जाण्याविषयी का सुचवले गेले असेल? ती बाब इतिहासातून कधीच न समजलेली आहे. ब्रिटिश सत्तेच्या काळात सैन्याच्या छावण्या ठिकठिकाणी असत. त्या छावण्यांतून काम करणारे सैनिक अविवाहित असत. त्यांना त्यांची शरीरसुखाची गरज पुरी करण्यासाठी वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया हा एकच मार्ग उपलब्ध होता. तशा संबंधांतून गुप्तरोगाची लागण होत असे. त्यासंबंधी परिस्थिती फार हाताबाहेर जाऊ नये म्हणून 1864मध्ये एक कायदा करण्यात आला होता – त्याचे शीर्षक संसर्गजन्यरोगांचा कायदा असे होते. त्या कायद्याच्या तरतुदीनुसार, वेश्यांचीतपासणीनियमित केली जायची. संसर्ग झालेल्या स्त्रियांना इस्पितळात दाखल करून उपचार केले जात असत. ते करून घेण्यासाठी कोणी नकार दिला अथवा इस्पितळातून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्या स्त्रीला दंड/तुरुंगवास होत असे. रोगाची तीव्रता खूप असेल तर त्या शरीरविक्रेतीला छावणीच्या बाहेर घालवले जाई. बटलर यांची भूमिका कायद्याच्या त्या तरतुदीत महिलांचे शोषण होते अशी होती. बटलर यांचे प्रतिपादन कायद्याच्या त्या तरतुदी फक्त ब्रिटिश सैनिकांची शारीरिक सुरक्षितता लक्षात घेऊन आणि सैनिकांना गुप्तरोगांची लागण झाल्यामुळे सैन्यसंख्येवर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी केल्या गेल्या आहेत असे होते.

          अँड्रयू आणि बुशनेर यांनी लखनौ, मीरत, रानीखेत, पेशावर अशा ठिकाणांना भेटी दिल्या. त्यांनी तेथे ज्या महिलांच्या भेटी घेतल्या त्यांची परिस्थिती, त्या कशा फसवल्या गेल्या, मद्यपी सैनिक त्यांना कसे त्रास देत अशा हकिगती वर्णन केल्या आहेत. त्यांनी काही महिलांची सुटका करण्याचा प्रयत्न केला, ‘परंतु त्या दुर्दैवी महिलांची मानसिक शक्ती पार कोसळलेली असे. बरेचदा संपूर्ण सत्य सांगितले जात नसे.बुशनेल आणि अँड्रयू यांना दिसलेली परिस्थिती, त्यांनी तपासलेली कागदपत्रे, त्यांना जाणवलेली शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची दुरवस्था आणि त्या सर्वाना असलेले सत्तेचे पाठबळ या सर्व कार्याचा, धांडोळा म्हणजे त्या दोघींनी लिहिलेले The Queen’s Daughters in India हे छोटेखानी पुस्तक (परिशिष्टे मिळून 155 पाने). प्रकाशनवर्ष 1899.

          लेखिकांनी पुस्तकात दिलेली माहिती धक्कादायक आहे. सर्व छावण्यांतून अधिकृत वेश्यागृहे असायची. साधारणपणे एक हजार सैनिकांच्या छावणीसाठी बारा-पंधरा शरीरविक्रेत्या असत. ज्या घरात त्या राहत असत त्याला चकलाअसे म्हटले जाई. एक सरकारी इस्पितळ असे. आठवड्यातून एकदा सर्व स्त्रियांची शारीरिक तपासणीहोत असे. तेथे त्या स्त्रियांना अपमानास्पद रीतीने वागवले जाई. गुप्तरोगाचा संसर्ग झालेल्या स्त्रीला वेगळे करून तिच्यावर उपचार केले जात. सैनिकाने शरीरसुखासाठी प्रत्येक वेळी किती पैसे मोजायचे हा दरवरचे अधिकारी ठरवत असत. वेश्यागृहाच्या प्रमुखपदी असलेल्या स्त्रीला महलदरणीअसे संबोधले जात असे.

          लष्कराने एक परिपत्रक 1886 मध्ये जारी केले. त्यात सारांशाने पुढील तरतुदी होत्या –

1. छावण्यांच्या बाजारातस्त्रियांची संख्या पुरेशीअसावी.

2. स्त्रिया पुरेशाआकर्षक असाव्यात.

3. त्या स्त्रियांना स्वच्छता पाळण्यास सांगितले जावे आणि त्यांना योग्य अशी घरे दिली जावीत .

4. सैनिकांनी त्यांचे हे कर्तव्य समजले पाहिजे, की त्यांना इतर सैनिकांचा बचाव गुप्तरोगाची शिकार होण्यापासून करायचा आहे. त्यांना संसर्गाचा धोका ज्या स्त्रियांपासून वाटतो अशा स्त्रियांची माहिती त्यांनी सहकाऱ्यांना देणे जरुरीचे आहे.

           लेखिकांना कागदोपत्री असेही पाहण्यास मिळाले, की शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांना बाजारातील वस्तूंप्रमाणे गणले जात होते. त्यांना पुढील नोंदी एका ठिकाणी मिळाल्या –

मी स्त्रियांची संख्या बारा करावी असा आदेश दिला आहे. चार स्त्रिया तरुण आणि आकर्षक असतील ह्याची काळजी घेतली जावी असेही निर्देश मी दिले आहेत ” – मुख्य अधिकारी.

          लेखिका सांगतात, की या निर्देशांची अंमलबजावणी उत्साहाने होत असे. रोग जडलेल्या स्त्रियांना छावणीबाहेर काढून त्यांच्या जागी निष्पाप, तरुण आणि आकर्षक मुली आणल्या जात.

          बटलर यांच्या प्रयत्नांनी 1864 मधील संसर्गरोगकायदा 1889 मध्ये रद्द झाला. फक्त एक घडले, की त्याबाबत आवश्यक ते कायदे/नियम बनवण्याचे अधिकार हिंदुस्तानच्या गव्हर्नर जनरलला दिले गेले. त्यामुळे परिस्थितीत सुधारणा काहीच झाली नाही. लेखिका सांगतात, ”कुंटणखाना चालवणाऱ्या महलदरणींकडे प्रशस्तिपत्रके पाहण्यास मिळाली – त्यात त्यांनी चांगल्या मुली पुरवल्या आहेतअसा शेरा असे. त्यासाठी मॅजिस्ट्रेट त्यांना पन्नास रुपयांपर्यंतची रक्कम देत असे.

          मात्र लेखिकांचा हेतू त्या महिलांच्या अवस्थेची पाहणी एवढाच नव्हता. त्या त्यांना धीर देत, येशू तुमच्या सोबत आहे असा विश्वास व्यक्त करत. लेखिका त्यांची भूमिका काय होती हे स्पष्ट करताना एके ठिकाणी सांगतात – या कृष्णवर्णी, धर्महीनमुलींचे वजन एका पारड्यात आणि रोगग्रस्त सैनिकांच्या टोळीचे वजन दुसऱ्या पारड्यात घातले तर, भौतिक सुखात बुडालेले सर्व राष्ट्र जरी विसरले तरी येशू सांगेल, कोणते पारडे जड आहे ते ”(पृष्ठ 39). त्या दुर्दैवी स्त्रियांची भेट घेण्यासाठी घोडागाडीतून जात असत. गाडीवाल्याला सांगत असत, की आम्ही ख्रिस्ती मिशनरी आहोत. आमच्या धर्माची शिकवण आहे त्यानुसार आम्हाला अत्यंत तिरस्कृत आणि सर्वात बदनाम झालेल्या महिलांना सांगायचे आहे, की ईश्वर तुमचा पाठीराखा आहे. आम्हाला त्यांच्यासाठी शक्य ते सारे करायचे आहे.लेखिकांनी शरीरविक्रेत्या स्त्रियांशी संवाद साधला तो दुभाषी महिलेमार्फत. ती दुभाषी महिलासुद्धा येशूचा संदेश पीडित स्त्रियांना सांगण्यास प्रवृत्त होत असे.

          लष्करी अधिकाऱ्यांनी शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया ह्या वेश्याया जातीतील असतात असा पवित्रा घेतला होता. त्याबाबत लेखिका सांगतात, ”आम्ही इंग्लिश लोक, एत्तद्देशीय डॉक्टर्स यांच्याशी वारंवार बोललो. जनगणना कार्यालयातही चौकशी केली. परंतु वेश्यानावाची जात आहे असे कोणीच कबुल केले नाही. परवाना पद्धतीने वेश्या व्यवसाय चालवण्याचे समर्थन करणारे सतत सांगतात, की तशा परवाने पद्धतीने काहीच नुकसान होत नाही, कारण भरती होणाऱ्या बायका वेश्याजातीतील असतात (पृष्ठ 4748). त्यांनी वेश्या व्यवसाय किती वेगाने अस्तित्वात येत असे ह्याचे तपशील दिले आहेत. मीरत येथे रेस्ट कॅम्प. दोन आठवड्यांपूर्वी रेजिमेंट आली. तितक्या कमी वेळात बायकांचे चौदा तंबू उभे राहिले आहेत. अफू पिण्यासाठी वेगळा तंबू. आणखी एका ठिकाणी शरीरसुखासाठी आणलेल्या बायकांना मारहाण आणि शारीरिक दुखापत होत असे‘ (पृष्ठ 52).

          उभय लेखिकांनी सर्वात तिरस्कृत अशा दुर्दैवी महिलांना धीराचे शब्द सांगायचे आहेत असा पवित्रा अधिकृतपणे जरी घेतला असला तरी त्यांचा हेतू तेवढाच नव्हता; कारण त्यांची भावना त्या शरीरविक्री करणाऱ्या स्त्रियांवर अन्याय होतो अशी होती. महिलांचा विचार स्त्री या भूमिकेतून होत नाही, तर वेश्या या भूमिकेतून होतो. बालविवाह जर स्वीकारार्ह नाही तर लहान मुलींना वेश्या व्यवसायात का ढकलले जात होते? तगड्या ब्रिटिश माणसाने एखाद्या सडसडीत, अशक्त मुलीला त्याच्या पायाशी लोळण घेण्यास लावावे हे लज्जास्पद होते.” (पृष्ठ 5254)

          सरकारी भूमिका अशी होती, की लष्करातील जवानांना मनावर नियंत्रण ठेवा असे बिंबवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. प्रत्येक सैनिकाने तसे प्रयत्न जास्तीत जास्त करायला हवेत की तो ईश्वराच्या आशीर्वादाने दुष्ट गोष्टीत पर्यवसान होणाऱ्या मोहापासून दूर राहील.सरकारी रिपोर्टातील ती भाषा म्हणजे धूळफेक आहे. त्यांना दुष्ट गोष्टी म्हणजे रोग असेच म्हणायचे आहे. ते नैतिक अधःपतन हे वाईट आहे असे म्हणत नाहीत असा आरोप सरकार विरोधकांचा होता.

          उभय लेखिकांनी त्यांचा अहवाल इंग्लंडमध्ये जाऊन सादर केला. त्यानंतर त्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि टास्मानिया येथे गेल्या. त्यांना साक्ष देण्यासाठी इंग्लंडला 1893 च्या सुरुवातीला बोलावले गेले. त्यांनी सर्व साक्ष प्रामाणिकपणे दिली. ती बरेच दिवस चालली. सर्व कागदपत्रे हिंदुस्थानातून मागवून घेतली गेली. ती येण्यापूर्वी, ज्या अधिकाऱ्याने वेश्यांच्या पुरवठ्याबाबतचे परिपत्रक काढले होते तो इंग्लंडला परतला. त्याला पत्रकारांनी छेडले तेव्हा प्रथम त्याने सर्व गोष्टी नाकारल्या. कागदपत्रे हिंदुस्थानातून आल्यावर पुन्हा एक चौकशी कमिशन नेमले गेले. संबंधितांची साक्ष झाली. अखेरीस, परिपत्रक जारी करणाऱ्या अधिकाऱ्याने (लॉर्ड रॉबर्ट्स) 1893 च्या ऑगस्ट महिन्यात स्कॉटलंड येथून पत्र पाठवले व कबुली दिली आणि लेखिकांची माफी मागितली. संबंधित कायद्याची दुरुस्ती फेब्रुवारी 1895 मध्ये करण्यात आली. ती दुरुस्ती संसर्गजन्य रोग झाल्याच्या संशयामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची पद्धत बदलली जावी. ज्यायोगे महिलांच्या लौकिकाला काळिमा लागणार नाही अशी पद्धत अमलात आणली जावी. जबरदस्तीने तपासणी, छावणीबाहेर हकालपट्टी या गोष्टींना दंड ठोठावला जाईल अशा आशयाची होती.

          मात्र दुर्दैव असे, की काही महिन्यांतच परवाना पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवला जावा या मताच्या लोकांनी दबाव आणला आणि दुरुस्ती रद्द झाली!

          मिशनरी असलेल्या स्त्रीने तिच्या सहकारी स्त्रीच्या साहाय्याने केवढे मोठे प्रयत्न केले होते ह्याची कल्पना कदाचित त्या उभय लेखिकांनाही नसेल.

          त्यांनी त्यांच्या पुस्तकाचे शीर्षक The Queen’s Daughters असे का ठेवले? लेखिका मीरत येथे पीडित महिलांशी बोलत होत्या, तेव्हा एक महिला अत्यंत उद्वेगाने बोलली – या साऱ्या गोष्टींना राणीची संमती नाही आहे. हे सर्व काम मुख्य सेनाधिकाऱ्याचे आहे. सरकार या साऱ्या गोष्टी करत आहे ही किती शरमेची गोष्ट आहे! मुख्य सेनाधिकारी, त्याच्या खालचे अधिकारी सारे ख्रिश्चन आहेत! आणि ते ह्या साऱ्या गोष्टींना मान्यता देतात. राणी असे करणार नाही. तिला स्वतःच्या मुली आहेत! आणि तिला काळजी तिच्या हिंदुस्तानातील मुलींचीपण आहे. सगळ्याचे मूळ त्या मुख्य सेनाधिकाऱ्यांत आहे!” (पृष्ठ 58).

          स्त्रियांच्या विविध प्रश्नांची ओळख आणि इतिहासात त्यासंबंधी काय काम झाले होते याची कल्पना अभ्यासकांना या पुस्तकाने निश्चित येईल.

रामचंद्र वझे 9820946547 vazemukund@yahoo.com

रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी ‘बँक ऑफ इंडियामध्‍ये चाळीस वर्ष काम केले. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना  काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले‘, ‘क्‍लोज्ड सर्किट‘, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले‘ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर‘ ही पुस्‍तके ‘ग्रंथाली’कडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे ‘महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

———————————————————————————————————

About Post Author

6 COMMENTS

  1. सुंदर लेख…पुस्तके मुळातून वाचायला प्रेरित करणारे लेखन/पुस्तक परिचय. धन्यवाद…

  2. छान आहे माहिती. माझ्या एका मैत्रिणीने सतीच्या चितेवरून पळून गेलेल्या उच्चवर्णीय स्त्रियांना ब्रिटीश अधिकारी कसे आश्रय द्यायचे आणि त्यांना वेश्यागृहात ठेवूनं घ्यायचे याबद्दल लिहिले आहे. या कुलीन वेश्या त्यांना अधिक योग्य वाटत. सती विषयावर तिची पीएच डी होती.धन्यवाद.छाया

  3. वाचला लेख. मागे यावर बहुधा लता राजे का कोणी लिहिले होते ते आठवले. त्यात थोडे निराळे होते. तिथे या स्त्रिया ब्रिटनमधून जहाजाने भारतात पाठवीत आणि त्यांची सांख्यिकी दिली होती. वझे भारी माणूस आहे. ट्रेकींग करणा-यांसारखा अनवट वाटेने जाणारा. नमस्कार त्यांना.

  4. चांगली  माहिती आहे. वेश्या व्यवसाय शेकडो वर्षे चालू आहे. पण मात्र तपशील बदलतो .बाकी सगळं तेच तेच असतं.मी काही ऐतिहासिक इमारतीत जनानखाने पहिले होते .   

  5. महत्त्वपूर्ण लेख…आजही वेश्याव्यवसासंदर्भात ठोस पावले उचलली जात नाहीत

  6. महत्त्वपूर्ण लेख…आजही वेश्याव्यवसासंदर्भात ठोस पावले उचलली जात नाहीत

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here