बेबीचे वडगाव

_Bebiche_Wadgaon_1.jpg

नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये वडगाव नावाचे छोटेसे गाव आहे; त्यास ‘बेबीचे वडगाव’ असेही म्हणतात. ते सिन्नरच्या  दक्षिणेकडे सहा किलोमीटरवर स्थित आहे.

गावकऱ्यांकडून त्याबद्दल मिळालेली माहिती अशी – मोघल राजाने त्याची ‘बेबी’ नावाची मुलगी या गावात दिली व ते गाव जहागिर म्हणून जावयास दिले. म्हणून त्यास ‘बेबीचे वडगाव’ असे म्हणतात. राजाने त्याच्या मुलीस पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून देवनदीवर तीन किलोमीटर लांबीचा बंधारा बनवून दिला. त्या बंधाऱ्यात पाणी असते. पुढे, मुस्लिमांनी स्थलांतर केले. गावात सद्यस्थितीला एकही मुस्लिम कुटुंब वास्तव्यास नाही. गावामध्ये मशीद आहे. त्या मशिदीमध्ये वैशाखी पौर्णिमेस उत्सव साजरा होतो! तो उत्सव सर्व हिंदू लोक मिळून करतात. पूर्ण गावास जेवण दिले जाते. हिंदू लोक मशिदीमध्ये नैवेद्य नेतात. शेजारील गावातील मौलवी येऊन फक्त जत्रेदिवशी पूजा करतो. सर्वधर्म समभाव ही वृत्ती त्या लोकांमध्ये दिसून येते.
पुढे, लोक शेती करताना नागवेल (खाण्याच्या विड्याची पाने) पिकवू लागले. म्हणून त्यास ‘पानाचे वडगाव’ असेही ओळखले जाऊ लागले. गावाची दप्तरी नोंद वडगाव-सिन्नर या नावाने आहे.

गावामध्येे शिवप्रेमी नावाचे तरुणांचे मंडळ कार्यरत आहे. मंडळाकडून गावातील कन्यारत्न प्राप्त झालेल्या दाम्पत्यांचा, गावचे जे जवान सीमेवर शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करणे असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात.
– उज्ज्वला क्षीरसागर      
 

About Post Author