बी आर पाटील – कृतार्थ उद्योगानंतर कृषी पर्यटन!

_b.r.patil

माझे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील दुधगाव. माझा जन्म एका अशिक्षित, रांगड्या शेतकरी कुटुंबात झाला. माझे कुटुंब दुष्काळी कामावर जात असे. मीही त्यांत होतो. मी माझे शिक्षण तशा प्रतिकूल परिस्थितीत सांगली येथे आणि शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले (एम एस्सी – केमिस्ट्री). किर्लोस्करवाडी, मुंबई, पुणे येथे उमेदवारी केली; मी स्वप्न उराशी उद्योग उभारणीचे बाळगले; मी घर एक सायकल आणि नव्वद रुपयांनिशी सोडले, भावाकडे पलूसला काही काळ राहिलो. एमआयडीसी पलूसला त्याच वेळी, 1979 साली सुरू झाली. माझी नोंदणी एमआयडीसीतील पहिला उद्योजक म्हणून आहे. मी प्लास्टिक मोल्डिंगचा उद्योग सुरू केला. त्या ठिकाणी इंडस्ट्रियल मटेरियल, रबर यांची निर्मिती केली जात असे. मी छोटेमोठे कारखाने, साखर कारखाने, दूधडेअरी यांच्याशी त्यातून जोडला गेलो.

मी नाविन्याच्या शोधात सतत असे. मी कारखान्यांच्या गरजा आणि पारंपरिकतेला छेद या दोन्ही गोष्टी कशा साधता येतील, त्यांचा विचार करून अनेक इनोव्हेटिव्ह प्रॉडक्टस तयार केले. त्यातून कारखान्यांचा फायदा झाला आणि आम्हाला नवनवी गिऱ्हाईके मिळत गेली. माझा भर सतत ‘आर अॅण्ड डी’ यावर राहिलेला आहे. साहजिकच, लोक माझ्याकडे उत्साही, उपक्रमशील माणूस म्हणून पाहतात. मी माझा उद्योग एकाचे चार युनिट करत वाढवला. मात्र, मधील काळात दुष्काळ पडला. त्याचा परिणाम उद्योगावर झाला. मला मर्यादा येऊ लागल्या. म्हणून मी शाश्वत व्यवसायाची नीती अंगीकारली.

मी आमचे रजिस्ट्रेशन एनएसआयटीकडे केले. त्यातून माझी उत्पादने रेल्वे, नेव्ही, लष्कर, बीएआरसी यांच्याकडे जाऊ लागली. व्यवसायाचा व्याप खूप वाढवला. पाच हजार कंपोनंट्स तयार केली. तीनशे क्लस्टसर उत्पादनाला गती दिली. आमच्या उत्पादनांना पूर्ण देशातून मागणी असे. त्यातून माझा लौकिक त्या परिसरात वाढला. दरम्यान, माझ्या जोडीला माझा मुलगा आला होता. त्याने एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्यालाही त्या व्यवसायात चांगली गती आहे.

_green_gloryआमच्या उद्योगाची नोंदणी एनएसआयसीला असल्याने ती संस्था आमचे ‘प्रमोशन’ जगभरातील अनेक देशांत करत असे. त्यातून आम्हाला सुदानमध्ये पहिल्यांदा एका एक्स्पोमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. तेथील गरजा वेगळ्या होत्या. मग आम्ही त्यांचा अभ्यास करून, टर्न की पद्धतीने प्रोजेक्ट उभारून देण्याला प्राधान्य ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन केले. त्यासाठी आवश्यक नोंदणी संबंधित देशांत केल्या. आम्ही अनेक आफ्रिकन देशांत हिंडलो, फिरलो. आम्ही दहा हजार हेक्टर जमीन भाडेकराराने इथियोपियामध्ये सरकारकडून घेतली. माझे स्वप्न त्या ठिकाणी साखर कारखाना उभारण्याचे होते. आम्ही इथियोपियात 2009 ते 2014 या काळात होतो, मात्र विविध प्रकारच्या प्रयत्नानंतरही मला त्या ठिकाणी साखर कारखाना उभारता आला नाही. व्यवसायाच्या संधी, सुरक्षितता आणि गुंतवणुकीतील रिटर्न यांचा विचार सतत केला. आम्ही बाप-लेकांनी विचार करून, त्या देशांमध्ये इन्व्हेस्टर आणि सल्लागार म्हणून काम करण्याचे ठरवले; अनेकांना सल्ला आणि सेवा पर्यावरणपूरक टर्न की पद्धतीने देण्याचे काम त्या काळात केले; अन्य सरकारी आणि खासगी प्रकल्पावर नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारून दिले. त्यातून मला खूप काही मिळाले. मी उद्योग-व्यवसायात कृतार्थ जीवन जगलो!

मी वयाची साठी पार करत असताना, उद्योग-व्यवसायाचा सगळा व्याप मुलाकडे सोपवून शेती करण्याचा निर्णय घेतला. माझी भावना स्वत:बरोबर इतरांनाही आनंद आणि विरंगुळा मिळेल अशी होती. मी स्वतःला माझ्या घरच्या शेतीत वाहून घेण्याचे ठरवले. घरी पस्तीस एकर शेती आहे. त्यातील सांडगेवाडीच्या पंधरा एकरांवर ‘ग्रीन ग्लोरी कृषी पर्यटन’ उभारणी केली. घरी ऊस, द्राक्षे, फळबागा होत्याच. माझ्याकडे सात प्रकारच्या द्राक्षांच्या व्हरायटी आहेत. त्या परिसरात पंधरा हजारांपेक्षा जास्त प्रकारची फळे, फुले आणि सुगंधी झाडे आहेत. मी गावातील सतरा शेतकऱ्यांना ग्रीन हाऊस उभारून देण्याचे काम 1994 साली केले होते.

‘ग्रीन ग्लोरी कृषी पर्यटन’मागील पंचसूत्री ज्ञान-विज्ञान, नाविन्य, मनोरंजन, अध्यात्म आणि निवांतपणा ही आहे. आम्ही ‘मार्ट’ आणि ‘एमटीडीसी’च्या मान्यतेने अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवत आहोत. त्या ठिकाणी त्रेचाळीस प्रकारची फळझाडे, अकरा प्रकारची मसाले पिके, बासष्ट प्रकारच्या औषधी वनस्पती, त्रेचाळीस प्रकारची फुलझाडे व शोभेची झाडे, वीस प्रकारची जंगली झाडे वाढवली आहेत. नक्षत्रबाग, फुलपाखरू उद्यान, पाच प्रकारची द्राक्षशेती आणि काळी मिरीची ग्रीनहाऊसमधील लागवड यशस्वी केली आहे.

त्याचबरोबर सेंद्रीय ऊस, फळभाज्या, पालेभाज्या, स्वीट कॉर्न, हुरड्याची ज्वारी, भुईमुगाच्या शेंगा तेथे येणाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. विहिरीचे व नदीचे पाईपलाईनद्वारे दीड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार करून ड्रिप, स्प्रिंकलर, मायक्रो-स्प्रिंकलरची पाणीपुरवठ्याची सोय केलेली आहे. त्या ठिकाणी गाईचा गोठा, बायोगॅस संयंत्राची उभारणी करून, सेंद्रीय खते व गांडूळ खत यांची निर्मिती केली जाते.

कृषी पर्यटकांसाठी कार्यक्रम व मुक्कामाच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. विलोभनीय प्रवेशद्वार, अभ्यागत कक्ष, शेतमालाचे विक्री केंद्र, सुरक्षित पार्किंग व्यवस्था, सुसज्ज सभागृह व पार्टी लॉनची सोय, इण्डोअर चार हजार चौरस फुटांचे सभागृह, चर्चासत्रे व इतर प्रशिक्षण यांसाठी दोन सभागृहे अशा सुविधा विकसित केल्या आहेत. त्याचबरोबर, कुटुंबासाठी टेंट हाऊस व स्वतंत्र वुडन बंगला तयार आहे.

ग्रीन ग्लोरी सेंटरमध्ये लहान मुले, तरुण, वृद्ध यांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकार आहेत. फोटोसेशन पॉइंट, दोन स्वीमिंग पूल, रेन डान्स, खेळण्याची विविध साधने, इनडोअर नेट क्रिकेट, धबधबा, बोटिंग; तसेच, _green_glory_farmपर्यटकांसाठी बैलगाडी व ट्रॅक्टर सफारीची सोय केली आहे. नक्षत्र उद्यान व ध्यान केंद्र आणि फुलपाखरू उद्यानामुळे त्या परिसरात फिरताना वेगळाच आनंद मिळून जातो. जैन पद्धतीचे शाकाहारी, गावरान अशा जेवणाच्या व्हरायटीची सोय आहे.

मी साठीनंतरचे आयुष्य ‘ग्रीन ग्लोरी’च्या कृषी पर्यटन विकासाला वाहून घेतले आहे. अनेक फळपिकांचे उत्पादन सुरू झालेले आहे. त्या ठिकाणी पंचवीस महिला-पुरूष मजूर नियमित काम करतात. पर्यटकांसाठी गाईडची सोय आहे. आमचा परिसर द्राक्ष शेतीत अग्रेसर आहे. माझ्याकडे द्राक्षाच्या सात प्रकारच्या बागा आहेत. माझे स्वप्न अतिशय उत्तमपैकी वायनरी सुरू करण्याचे आहे. माझे प्राधान्य ग्रेप वायनरी, बनाना वायनरी, स्ट्रॉबेरी वायनरी उभारण्यासाठी राहणार आहे. राज्याच्या विविध भागांतून पर्यटक त्या ठिकाणी येतात. त्यांच्या सेवेत दिवस कसा जातो त्याची कल्पना येत नाही, पण निवृत्तीचे आनंददायी जीवन मला मिळते, हे मी माझे भाग्य समजतो.

– बाबासाहेब रामगोडा पाटील sales.patilgroup@gmail.com
(‘शेतीप्रगती’वरून उद्धृत संपादित-संस्कारित)

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.