बाळ भैरवनाथाचा हवामानाचा अंदाज!

3
208
carasole

बाळ भैरवनाथांचे देवस्थान अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे आहे. तो अष्ट भैरवनाथांपैकी एक. त्या ठिकाणी गुढीपाडव्यानंतर पंधरा दिवसांनी दोन दिवस यात्रा भरते. यात्रेत बाळ भैरवनाथ व जोगेश्वरी यांचे लग्न यथासांग होते. बाळभैरवनाथांच्‍या त्‍या देवस्‍थानाचे एक वैशिष्‍ट्य आहे. गावच्‍या परंपरेनुसार गुढीपाडव्‍याला तेथील ग्रामस्थ एका विशिष्ट पद्धतीने येणाऱ्या हवामानाचा-पाऊसपाण्याचा अंदाज बांधतात. त्याला एक वेगळेच पंचांगवाचन म्हणता येईल.

महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीच्या किनारी परिसर दंडकारण्याने व्यापलेला होता. त्या परिसरात पुरातन काळी श्रीरामाने वनवास भोगला. दशरथ राजाचा दशक्रिया विधी गोदावरीच्या तीरावर डाऊच खुर्द गावी झालेला आहे. तेथील भूमीत दधिची नावाच्या ॠषींचा आश्रम व इतर ॠषी-मुनींची वेद पाठशाळा प्रख्यात होती. तेथे यज्ञ व इतर धार्मिक विधी नेहमी होत असत. परंतु काशासुर नावाचा राक्षस त्या धार्मिक विधींचा नाश करत असे. त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून वरदान प्राप्त केले होते. ते वरदान असे, की काशासुराचा वध जो कोणी अग्निडाग घेऊन स्वत:ला जाळून मृत होर्इल अशा मृत माणसाच्या अस्थींच्या बाणाने फक्त होर्इल! म्हणून काशासुराच्या असुरी कृत्यांनी त्रस्त झालेल्या दधिची ॠषींनी स्वत:ला जाळून घेण्यापूर्वी भगवान शंकराची प्रार्थना करून, त्याला प्रसन्न करून घेतले आणि बाळ भैरवनाथांकरवी काशासुराचा अंत व्हावा अशी शेवटची इच्छा प्रकट केली. परंतु बाळभैरवनाथ ब्रह्मचारी असल्यामुळे त्यांच्या हस्ते काशासुराचा अंत होत नव्हता. म्हणून बाळ भैरवनाथांचा विवाह चैत्र शुद्ध त्रयोदशी या दिवशी चर्मकार समाजाच्या जोगेश्वरी नावाच्या मुलीबरोबर करण्यात आला. नंतर बाळभैरवनाथ व काशासुर यांचे घनघोर युद्ध झाले. त्या युद्धामध्ये बाळभैरवनाथाने दधिची ॠषींच्या अस्थींच्या बाणाने काशासुराचा अंत केला. ज्या ठिकाणी काशासुरास मारले त्या ठिकाणास काशासुराच्या नावावरून ‘‘कसारे’ असे नाव पडले. तसेच, दधिची ॠषींच्या नावावरून ‘’डाऊच’ असे नाव पडले. काशासुराचे जेथे डेंडाळे पडले त्याला ‘‘देर्डे’ व जेथे मढे पडले त्या ठिकाणास ‘मढी’ असे नाव पडले. ज्या ठिकाणी त्यास जाळले त्या ठिकाणास ‘‘जवळके’ असे नाव पडले. काशासुराच्या मृतदेहाचे अवशेष घारीच्या तोंडातून ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणास ‘घारी’ म्हणतात. काशासुराचे सोन्याचे कडे जेथे पडले त्यास ‘सोनेवाडी’ हे नाव पडले. त्या सर्व ठिकाणी मोठी गावे वसली असून, ती सर्व सात-आठ किलोमीटर अंतराच्या परिसरात आहेत.

ज्या ठिकाणी भैरवनाथ थांबले त्या चांदेकसारे गावी बाळ भैरवनाथांचे भव्य मंदिर बांधलेले आहे. मूळ मंदिर कोठल्या साली बांधले असावे ते सांगता येत नाही. परंतु मंदिराचा जीर्णोद्धार 1617 मध्ये दगडी बांधकाम करून झाल्याचे शिलालेखावरून कळते. तसेच, त्याचा पुनरोद्धार 1845 मध्येही झाला असे लाकडावर कोरलेल्या फलकावरून म्हटले आहे. मंदिराच्या चोहोबाजूंनी काळ्या पाषणाची दहा फूट उंच अशी मजबूत भिंत बांधलेली आहे. मंदिराच्या चारही बाजूंस भक्कम दगडी बुरूज आहेत. मंदिरास उत्तर बाजूस मुख्य दरवाजा आहे. पूर्व-पश्चिम बाजूंसही दरवाजे आहेत. सध्या पूर्व बाजूचा दरवाजा कायम बंद केलेला आहे. पश्चिम बाजूचा दरवाजा यात्रेच्या वेळी दोन दिवस उघडा असतो. दरवाज्याच्या चौकटीस अखंड दगड वापरलेले असून त्यावर बारीक नक्षीकाम आहे. मंदिराच्या मुख्य दरवाज्यासमोर गोलाकार दीपमाळ असून त्यामधून वर जाण्यास रस्ता आहे. दीपमाळेस ठिकठिकाणी छोटी छिद्रे आहेत, तेथून हवा व प्रकाश आतमध्ये येतात.

मंदिरात पूर्व बाजूस चाळीस-पन्नास फूट खोल बारव दिसते. पूर्वी बारवेस बाराही महिने पाणी असे. पंरतु आता, बारवेचे पाणी आटले आहे. मंदिराच्या बाहेर मुंबर्इ-नागपूर हायवेच्या पलीकडेही बारव असून ती काळ्या पाषाणात बांधली आहे. त्या बारवेमध्ये पाणी घेण्यास जाण्यासाठी खालपर्यंत पाय-या बांधलेल्या आहेत. बारा-तेरा पाय-या उतरून गेल्यानंतर लगेच मुबलक पाणी मिळत असे, म्हणजे त्यावेळी पाण्याची पातळी किती वरपर्यंत होती याचा अंदाज येतो. बारव खूपच आकर्षक पद्धतीने बांधलेली असून, आतपर्यंत सुस्थितीमध्ये आहे. परंतु पहिल्या पायरीच्या वर असलेल्या दगडावर कोरलेले मोडी लिपीतील लिखाण नामशेष होत चालले आहे. असे म्हणतात, की ती बारव अहिल्याबार्इ होळकर यांनी बांधलेली आहे.

मंदिराच्या पूर्वीच्या सभामंडपातील लाकूड व दगड यांवरती मोर, कमळाचे फूल, स्वस्तिक; तसेच, विविध प्रकारच्या पानाफुलांचे आकर्षक असे नक्षीकाम केलेले होते. मंदिराच्या मूर्ती असणा-या, गाभा-यापर्यंत जाण्यासाठी असणा-या रस्त्याच्या दोन्ही बाजूंस समसमान लाकूड व दगड यांचे नक्षीकाम केलेले होते. पूर्व-पश्चिम बाजूंच्या नक्षीकामात किंचितसुद्धा फरक नव्हता, परंतु ते बांधकाम खूपच जुने असल्यामुळे मोडकळीस आले होते. मंदिराचा जीर्णोद्धार 1990 मध्ये करण्यात आला. त्यावेळी मंदिराच्या गाभा-यात तीन फूट खोल खड्डयामध्ये पुरातन काळातील बाळ भैरवनाथांची मूर्ती सापडली. त्या आधाराने नवीन संगमरवरी दगडाची मूर्ती जयपूरला तयार करून घेण्यात आली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पुणतांबा येथील भास्करराव रामकृष्ण जाधव व त्यांच्या पत्नी सुमनबार्इ यांच्या हस्ते करण्यात आली. असे म्हणतात, की जाधव यांच्या घरातील एक पूर्वज भैरवनाथ यात्रेच्या दिवशी घोड्यावर बसून चार फूट उंचीच्या दरवाज्यातून मंदिरात प्रवेश करत असे.

भैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या विवाहसोहळ्याची स्मृती निरंतर राहवी म्हणून चांदेकसारे गावचे होन व चांदकर कुटुंबीय दरवर्षी चैत्र शुध्द त्रयोदशीला भैरवनाथांची भव्य यात्रा भरवतात. यात्रेत सर्व जातिधर्मपंथाचे लोक एकत्र येतात व सण उत्साहाने साजरा करतात. यात्रेच्या दिवशी पहाटे भैरवनाथांना स्नान घालण्यासाठी कावडीने गंगाजल आणण्याचा मान मढीचे गवळी व आभाळे, निर्मळपिंप्रींचे घोरपडे, नांदुर्खीचे वाणी यांचा आहे. तसेच, काठीचा मान धोत्रे व वैजापूर येथील पोटे, लहवीतचे गायकवाड, धोडांब्याचे उशीर यांचा आहे. बाळ भैरवनाथांच्या पूजेचा मान उबाळे परिवारास आहे. भैरवनाथ भक्तांसाठी तेथे विविध प्रकारच्या सुखसुविधा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत उपलब्ध होणार आहेत. भैरवनाथ मंदिरास ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे.

भैरवनाथ यात्रा ही चांदेकसारे येथील सर्वधर्म, सर्वसमाज यांच्या ऐक्याचे प्रतीक आहे. यात्रेच्या नियोजनासाठीं गावातील हिंदू, मुस्लिम, दलित, आदिवासी व इतर समाज तन-मन-धनाने एकत्र सहभागी होत असतात.

यात्रेच्या दिवशी भैरवनाथ मंदिराबरोबर गावातील मस्जिद व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक; तसेच, हनुमान मंदिर, विठ्ठल-रूखमार्इ मंदिर, दत्त मंदिर, लक्ष्मी माता मंदिर, शनी मंदिर, महादेव मंदिर या सर्व धार्मिक स्थळांवर आणि गावातील प्रमुख रस्त्यांवर विद्युत रोषणार्इ करण्यात येते, त्यामुळे संपूर्ण गावच विद्युत रोषणार्इने नटलेले असते.

गावातील सर्व समाजांची परगावी नोकरी, उद्योगधंद्यानिमित्ताने गेलेली माणसे सहकुटुंब हमखास यात्रेनिमित्त सुट्टी काढून गावाला येतात, त्यामुळे शालेय जीवनातील बालपणीचे मित्रमैत्रिणी, नातेवार्इक यांच्या भेटीगाठी होतात व आनंदाला उधाण येते. यात्रेमध्ये पाळणा, लहान मुलांच्या खेळण्यांचे दुकान, फुल हार, प्रसाद, भेळ भत्त्यांचे दुकाने, हॅाटेले, संसारोपयोगी भांड्यांची दुकाने, शेतीला उपयुक्त अवजारांची दुकाने असा बाजार थाटलेला असतो.

गुढीपाडवा जवळ आला की गावची हवामानाचा अंदाज बांधण्‍याची परंपरा आणि पाडव्‍यानंतर पंधरा दिवसांनी सुरू होणारी यात्रा याचे गावक-यांना वेध लागतात. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मंदिराच्या पाठीमागे नक्षत्रांच्या संख्येनुसार व त्यामध्ये राजा-राणी-प्रधान यांचे नावे असे एकूण अठरा खड्डे खेादून त्यात बाजरी, गहू, ज्वारी, हरभरा, मूग असे पंचधान्य प्रत्येक खड्डयात टाकून त्या वरती वडाच्या झाडाची मोठया आकाराची प्रत्येकी पाच पाने ठेवून त्यावर थोडेसे पाणी शिंपडले जाते. ते खड्डे रात्रभर झाकून ठेवण्यासाठी लाकडी फळी किंवा लोखंडी जाळी यांचा वापर केला जातो. नंतर पूजा करून मंदिराचा पुजारी, ट्रस्टी ब्राम्हण, गोसावी व गावकरी निघून जातात.

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पूर्ण गाव भैरवनाथ मंदिरात जमतो; पंचक्रोशीतील गावकरी मंडळीही आलेली असतात. प्रत्येकाला उत्सुकता असते, पाण्यापावसाचे भाकित ऐकण्याचे! भैरवनाथांची विधिवत पूजा झाल्यानंतर आदल्या दिवशीच्या नक्षत्राप्रमाणे खोदलेल्या खड्ड्यांवरील वडाची पाने सावकाश काढली जातात आणि तो खड्डा किती ओलसर आहे किंवा कोरडा आहे? टाकलेल्या पंचधान्याची नासाडी झाली आहे काय? हे गावचे गुरू बारकार्इने तपासतात व त्यावरून त्या नक्षत्राचे भाकित वर्तवले जाते. वर्षभरातील पाणी-पाऊस, दुष्काळ व अन्नधान्य उत्पादन यांची बरीवार्इट परिस्थिती सांगितली जाते. वर्तवलेल्या त्या भाकितावर गावातील व पंचक्रोशीतील शेतक-यांचा विश्वास आहे. शेतकरी म्हणतात, की, एक वेळ हवामान खात्याचा अंदाज चुकेल, पंरतु तेथे वर्तवलेला अंदाज कधी चुकत नाही!

गुढीपाडव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर भैरवनाथ मंदिरातच गावक-यांची पंधरवड्यानंतर सुरू होणा-या यात्रेच्या नियोजनासाठी मीटिंग होते. मीटिंगमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच वर्गणी मागण्यास सुरुवात केली जाते. यात्रा कमिटीचे लोक तमाशाची पंढरी समजल्या जाणा-या नारायणगावला यात्रेचा तमाशा ठरवण्यासाठी त्याच दिवशी दुपारनंतर जातात.

तेलवणाचा कार्यक्रम यात्रेच्या पाच दिवस अगोदर असतो. तेव्हा भैरवनाथ व जोगेश्वरी या दोघांना हळद लावली जाते. ती पूर्ण गावातून वाजत गाजत हळद मिळवली जाते. हळद लावताना महिला हळदीचे व लग्नाचे पारंपरिक गाणे म्हणतात व एकमेकींची चेष्टामस्करी करतात.

सोनेवाडीचे बोंडखळ, मढीचे गवळी व आभाळे हे लोक दाढी-कटिंग त्या दिवसापासून करत नाहीत, शेतात औत जुंपत नाहीत, बैलगाडी हाकत नाहीत. घरी कुरडया-शेवया करत नाहीत. तसेच, पाच दिवसांचे उपवास धरतात. त्याच प्रकारचे व्रत चांदेकसारे, डाऊच, जेऊर कुंभारी, घारी व हिंगणी येथील काही भाविक पाळतात.

मढीचे गवळी-आभाळे भैरवनाथ मंदिराच्या कळसाला चुना यात्रेच्या दिवशी लावतात. तेव्हाच भैरवनाथांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्या मंडळींचा उपवास सुटतो व भैरवनाथांना लावलेली हळदही उतरवली जाते. काही भाविक काशासुराला बोकडाचा बळी देऊन मटणाचा नैवेद्य दाखवतात. भैरवनाथ-जोगेश्वरी यांच्या चांदीच्या मुखवट्यांची सायंकाळी पालखीमधून वाजत-गाजत मिरवणूक निघते. मिरवणूक मार्गावरून प्रत्येकाच्या घरासमोर सडा-रांगोळी काढलेली असते. सुवासिनी पालखीतील भैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या मुखवट्यांची पूजा करत असतात. पालखी मिरवणूक भगव्या पताका फडकावत ग्रामप्रदक्षिणा करून जेव्हा मंदिराजवळ येते तेव्हा शोभेच्या दारूची आतषबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते.

लोकनाट्य/तमाशाचा कार्यक्रम यात्रा कमिटीच्या वतीने मोफत दाखवला जातो. नामवंत पहिलवानांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा दुस-या दिवशी दुपारी चालू होतो. तेव्हा शक्ती आणि भक्ती यांचा मिलाफ होतो. शेवटची कुस्ती मानाची असते. ती झाल्यानंतर दोन दिवस चाललेल्या त्या आनंद सोहळ्याची, माणसा-माणसातील वैरभाव विसरून सर्व जातिधर्मांतील लोकांना एकत्र आणणा-या भैरवनाथ-जोगेश्वरी यात्रेची सांगता होते!

– अरूण श्रावण खरात

Last Updated On – 13th FEB 2017

About Post Author

3 COMMENTS

  1. धन्यवाद हि माहिती दिल्याबद्दल
    धन्यवाद हि माहिती दिल्याबद्दल.

Comments are closed.