बादरायण संबंध

0
383

अस्माकं बदरीचक्रमं युष्माकं बदरीतरु | बादरायणसंबंधे यूयं यूयं वयं वयम् ||

एक माणूस एकदा बैलगाडीने परगावी चालला असताना रात्र झाली. तो वस्ती करण्यासाठी जागा शोधू लागला, परंतु त्याला सोयीची अशी जागा सापडेना. त्याला एका श्रीमंताच्या वाड्यापाशी बोरीचे झाड दिसले, त्याने त्याचे बैल झाडाला बांधले व तो तेथेच झोपी गेला. थोड्या वेळाने, वाड्याचा मालक आला आणि त्याने त्याला ‘तो कोण? कोठला? येथे कशाला आलास?’ वगैरे चौकशी केली. तेव्हा तो म्हणाला, “तुमचा नि माझा संबंध आहेच की !”

“तो कसा काय?” असे विचारताच तो म्हणाला, “माझी ही गाडीची चाके बोरीच्या लाकडाची आहेत आणि तुमच्या दारातील हे झाडही बोराचे आहे, म्हणजे तुमचे आणि माझे नाते जुळते !”

प्रत्यक्षात काहीही कसलेही नाते नसताना, ओढूनताणून जवळीक साधण्यासाठी नसती नाती जोडण्याचा यत्न केला जातो, तेव्हा त्यास ‘बादरायण संबंध’ असे म्हणतात.

महर्षी व्यासांना ‘बादरायण’ अशीही एक संज्ञा आहे. तीही त्यांना ओढूनताणून संबंध लावला गेल्याने प्राप्त झालेली आहे. व्यास म्हणजे पराशराला सत्यवतीपासून कौमार्यावस्थेत झालेला पुत्र. त्यांनी नियोगविधीने विचित्रवीर्याच्या दोघी भार्यांपासून धृतराष्ट्र व पंडू आणि अंबिका दासीपासून विदुर हे तीन पुत्र उत्पन्न केले. त्यातून पुढे शंभर कौरव, पाच पांडव निर्माण झाले. या प्रकारे शंभर कौरव, पाच पांडव आणि विदुर ह्यांच्या वंशातील कोणाही व्यक्तीचा व्यासाशी संबंध लावला जाऊ शकतो. असा तो ओढूनताणून लावलेला, काल्पनिक संबंध ! व्यासांनी वेदाचे काही भाग व महाभारत लिहिले. त्या ग्रंथात जगातील सर्व विषयांचे ज्ञान सामावले आहे. जिचा उल्लेख व्यासकृत ग्रंथात नाही अशी एकही ज्ञानशाखा नाही; म्हणून ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्’ म्हणतात. जगातील मानव कोणत्याही ज्ञानाचा संबंध व्यासकृत ग्रंथाशी लावू शकतो. विशेषत: मोठ्या व्यक्तीशी दूरच्या नात्याचा संबंध जोडणे. स्वत:च्या क्षुद्र ज्ञानाचा व कार्याचा संबंध दुसऱ्या थोर व्यक्तीशी वा कार्याशी जोडणे म्हणजे बादरायण संबंध !

– विजय पाध्ये 9822031963 v.wordsmith@gmail.com

(संदर्भ – लाक्षणिक मराठी शब्दकोश, संपादक – र.ल. उपासनी)

(भाषा आणि जीवन (मे-जून 2020) वरून उद्धत)

—————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here