बबन पवार यांची पुराणकथेत शोभेल अशी यशोगाथा

प्रतिकूल परिस्थिती व शिक्षण अजिबात नसताना आत्मविश्वास, परिश्रम व चिकाटी या गुणांच्या आधारे माणूस काय करू शकतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बबन गोपाळ पवार. ते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या कापसेवाडी या खेडेगावातील.

बबन पवार यांच्या आईचे नाव नानीबाई व वडिलांचे नाव गोपाळ. त्या दांपत्याला आठ अपत्ये. बबनरावांचे वडील दुष्काळ पडल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे कामासाठी गेले होते. बबन यांच्या वडिलांचे निधन 1969 साली झाले. बबन यांचे बहीणभाऊ कासेगावला तर बबन गावाकडेच राहत.

दुष्काळी परिस्थितीत उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणून, बबन यांनी गावातील लोकांच्या संगतीने मुंबई गाठली, पण शिक्षणाअभावी, बबन यांचा निभाव मुंबईत लागला नाही. म्हणून त्यांनी परत गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. सर्व भावंडे लहान असल्यामुळे त्यांची जबाबदारी आई व बबन यांच्यावर होती. बबन यांनी गावच्या सरपंचाकडे सालाना (वर्षाकाठी) दीडशे रुपये या हिशोबाने 1971 साली कामास सुरुवात केली. तसे काम करत असताना, त्यांनी त्यांच्या बहिणींची लग्ने थोड्या थोड्या महिने-वर्षांच्या अंतराने लावून दिली.

बबन यांच्या घरचा संसाराचा गाडा दिवसाला दीड रुपये या रोजगारावर चालत होता. बबन यांचे लग्न 1982 साली झाले. त्यांची पत्नीही मजुरी करू लागली. तसेच, भाऊ दत्तात्रय व विठ्ठल हेसुद्धा मजुरी करत होतेच. बबनरावांनी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी बहिणीकडे (मुलांच्या आत्याकडे) पोखरापूर येथे व पत्नीच्या बहिणीकडे (मुलांच्या मावशीकडे) तुळजापूर येथे पाठवले.

दुसरीकडे, बबनरावांनी मजुरीबरोबर जोडधंदा करावा म्हणून ‘बँक ऑफ इंडिया’कडून कर्ज घेतले, वीस मेंढ्या खरेदी केल्या व मेंढीपालन सुरू केले.

वर्षातच, बबनरावांनी आणखी वीस मेंढ्या खरेदी केल्या. जो नफा मिळाला त्यातून दोन एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली. शासकीय आर्थिक मदतीतून विहीर खोदली. विहिरीला पाणीही भरपूर लागले. दोन एकर भुईमूग केला, त्यातून पाच हजार रुपये नफा मिळाला. बबनरावांनी आणखी दोन एकर जमीन खरेदी केली. भाऊ विठ्ठलचे लग्न करून दिले.

बबनरावांनी त्यांची पावले दुग्धव्यवसायाकडे वळवली. त्यांनी प्रथम चार गाई घेतल्या व त्यापाठोपाठ पुन्हा सहा एकर जमीन खरेदी केली व त्या शेतीमध्ये ठिबकसिंचन पद्धत अवलंबली. त्यांच्या गावातील प्रगतिशील शेतकरी कै. राजकुमार मल्लिकार्जुन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली डाळींब व द्राक्षे या फळबागांची लागवड केली. सुधारित शेती पद्धतीने फळबागांचे नियोजन केले. त्यातून समाधानकारक यश मिळाले, म्हणून काही दिवसांनी अडीच एकर द्राक्षबागेची लागवड केली व त्या उत्पन्नातून शेजारील पाच एकर जमीन खरेदी केली.

तशात बबनरावांवर नेसर्गिक संकटांना तोंड देण्याची वेळ आली. फेब्रुवारी 2005 साली अवकाळी पावसाने द्राक्षाची बाग जमीनदोस्त झाली व लाखांमध्ये नुकसान झाले. त्या सर्वांमधून बाहेर पडत असतानाच महिन्याच्या कालावधीत बबनरावांचे राहते घर शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाले. त्यांचे कुटुंब पुन्हा उघड्यावर आले. बबनरावांना मदत करण्यासाठी त्यांचे मित्र बापुराव घाडगे व गावातील रहिवासी आणि त्यांचे नातेवाईक पुढे आले. बबनरावांनी पुन्हा हिंमत घेतली. त्या उत्पन्नातून त्यांनी कापसेवाडी व मानगाव शिवारात जमिनी खरेदी केल्या. पुन्हा 2012 व 2013 साली अवकाळी पाऊस व वादळ यांमुळे अडीच एकर द्राक्षबाग जमीनदोस्त झाली.

बबनरावांच्या शेतात सध्या बोअरवेल, विहीर असून दुष्काळी परिस्थितीवर मात करता यावी  म्हणून शेततळे बनवले आहे. त्या तळ्यात शेतीला उन्हाळ्यात तीन महिने पाणी पुरेल एवढा साठा आहे. सात एकर शेतात डाळींब, नऊ एकर शेतात द्राक्षे, एक एकर शेतात निंबोणी व दोन एकरांमध्ये  शेवग्याची बाग आहे. तीन एकर ऊस लावला आहे. त्यांनी 2012 मध्ये सर्वसाधारण कुटुंबाला राहायला पुरेल असे घर बांधले आहे.

बबनराव यांच्या कुटुंबात त्यांचे तीन भाऊ, बबनरावांची तीन मुले – मोठ्या मुलाने बी.एस्सी. डिग्री घेतली आहे. तो शेतीचे व्यवस्थापन बघतो. दोन मुलांची बारावी झाली असून तेही शेतीत मदत करतात.

बबनरावांचा भाऊ दत्तात्रय यांचा मोठा मुलगा अविनाश याने बी.एड. केले आहे. दुसरा शिक्षण घेत आहे. मुलीचे लग्न झाले आहे. बबनरावांचा दुसरा भाऊ विठ्ठल यांची दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. मोठ्या मुलाचे मोबाईल शॉपी आहे.

बबनरावांच्या तिन्ही मुलांची आणि भावाच्या मुलीचे व भाच्याचे विवाह पार पडले. तीन भाऊ -त्यांची मुले, सुना असे सर्वजण एकत्र कुटुंबपद्धत जपत एकत्र राहत आहेत.

बबन गोपाळ पवार
मु. पो. कापसेवाडी ,
ता. माढा, जि. सोलापूर
9561730247

– उज्ज्वला क्षीरसागर

About Post Author

1 COMMENT

  1. Baban Pawar yanchi hi
    Baban Pawar yanchi hi yashaogatha kharokharach antarmukh karnari aahe. Tyanchya jiddila salaam.

Comments are closed.