प्रतापगडचे युद्ध – अ स्टडी ऑफ द कॅम्पेन प्रतापगड

2
63
carasole

ग्वाल्हेरचे महाराज शिंदे यांना अर्पण. बागली या मध्य भारतातील एका संस्थानचे ठाकूर सज्जन सिंह यांच्या आश्रयामुळे हे पुस्तक तयार झाले अशी नोंद.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1659 मध्ये प्रतापगड येथे अफझलखानास यमसदनास धाडले हा प्रसंग अनेकांना स्फूर्ती देणारा वाटला. त्या विषयावर चित्रपट आले, तसाच एक फार्सही आला – अफझलखानाच्या मृत्यूचा फार्स. लेखक काशीनाथ महादेव थत्ते, प्रकाशन १८८६. त्या प्रकरणाचा शोध घेण्याचा आणखी एक प्रयत्न वि.ल. भावे यांनी केला होता. पुस्तक – अफझलखानाचा वध अथवा श्री. शिवाजीमहाराजांचा एक अदभुत पराक्रम. प्रकाशन १९२१, त्या प्रसंगावर लिहिलेले “बुद्धिबळ” नावाचे नाटक (लेखक – विवेक वाटवे) ईसाहित्य.कॉम वर नुकतेच उपलब्ध झाले आहे.

कॅप्टन गणेश मोडक यांचे पुस्तक त्याच विषयावर आहे. ते सुमारे नव्वद वर्षांपूर्वीचे आहे आणि इतक्या वर्षांपूर्वी त्याची निर्मिती होण्यास महाराष्ट्राबाहेरच्या संस्थानांचा हातभार लाभला होता. त्याचे लेखक मोडक हे ग्वाल्हेरच्या लष्करामध्ये कॅप्टन या पदावर होते. मोडक यांनी “मस्केट्री लेक्चर्स”, “व्हिज्युअल ट्रेनिंग नोट्स” वगैरे पुस्तके लिहिली असा उल्लेख पुस्तकाच्या पहिल्या पानावर आहे. मोडक यांनी “Indian Defence Problem – Being A Plea for Saving Rs. 28 Crores a Year” या नावाचे आणखी एक इंग्रजी पुस्तक १९३३ साली लिहिले होते असे इंटरनेटवरून समजले. ते पुस्तक oudl.osmania.ac.in वर उपलब्ध आहे.

मोडक यांनी ‘प्रतापगडचे युद्ध’ या पुस्तकाला पंचेचाळीस पानांची विस्तृत प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते त्यांचा हेतू विशद करताना म्हणतात, ‘’प्रतापगडाच्या युद्धाचे केवळ वर्णन करावे असा मर्यादित हेतू न ठेवता त्या युद्धातील गोष्टींसंबंधी गतकालीन व आधुनिक युद्धशास्त्र यांमध्ये वाचकाची एकंदर गती व्हावी, वाचकास त्यातील आरंभापासूनचे राजकारण, युद्धधोरण, डावपेच व आडाखे समजावेत असे धोरण ठेवले आहे. वास्तविक हे पुस्तक सैन्यातील होतकरू लोकांसाठी लिहिले आहे. तथापी, त्यातील प्रमेये अगदी सुलभ करून लिहिली आहेत. त्यामुळे पुस्तकाचा स्वीकार महाराष्ट्रातील इतिहासतज्ज्ञांनी आणि इतिहास जिज्ञासूंनीही प्रेमाने करण्यास हरकत नाही असे वाटते.’’

लेखकाने पुस्तक नऊ प्रकरणांत विभागले आहे. पहिल्या प्रकरणात प्रतापगडाची सर्वसामान्य माहिती, तत्कालीन राजकीय परिस्थिती, उभय बाजूंची सैन्ये आणि त्यांची युद्धविषयक तयारी, शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या सैन्यसंख्येत असलेला फरक लक्षात घेऊन महाराजांनी कोणती रणनीती स्वीकारली, अफझलखानाचे युद्धातील पवित्रे आणि त्यांची युद्धशास्त्रीय कारणमीमांसा असे मुद्दे येतात.

दुसऱ्या प्रकरणात महाराजांच्या सैन्यक्षमतेचे तपशील येतात. तत्कालीन तोफखान्याची माहिती परिश्रमपूर्वक दिली आहे. वाहतुकीची साधने, लष्कराचे शिक्षण, सैन्यभरती, सैन्याचे मनोधैर्य, महाराजांची रणनीती – खानास त्यांनी त्यांच्या हद्दीत खेचणे – बचाव आणि चढाव कोणत्या परिस्थितीत आदी विषयांचा उहापोह आहे. त्याच प्रकरणात महाराज आणि समर्थ रामदास यांच्या संबंधांचा तपशील देताना, लेखकाने समर्थ रामदासांनी महाराजांना पाठवलेले डाक पत्र उद्धृत केले आहे. वरवर उपदेशपर वाटणाऱ्या त्या पत्रांतून समर्थांनी “विजापूरचा सरदार निघाला आहे” ही बातमी प्रत्येक चरणाच्या पहिल्या अक्षरातून दिली आहे. गुप्त लिपी आणि तिचा वापर साडेतीनशे वर्षांपूर्वी किती प्रभावीपणे केला होता हे बघितल्यावर वाचकाला थक्क तर व्हायला होतेच, पण त्याच बरोबर समर्थांबद्दलचा आदरही दुणावतो. त्याच प्रकरणात छत्रपतींच्या शिस्तीचेही उदाहरण पाहण्यास मिळते.

तिसरे प्रकरण हे त्या पुस्तकातील सर्वात छोटे प्रकरण. अफझलखानाच्या एकंदर उद्दिष्टांचे आणि धोरणांचे विवेचन त्यात येते. लेखक म्हणतात, “महाराजांनी गनिमी काव्यात पूर्ण कौशल्य प्राप्त केले होते. त्यांच्या कौशल्यामुळे खानाच्या योजनेत बरेच अडथळे आले. त्याशिवाय, महाराजांना त्यांच्या प्रदेशाची खडान् खडा माहिती महाराजांना होती, तशी ती खानाला नव्हती. त्यावर तरतूद म्हणून खानाने त्याच्या देशमुख, देशपांडे आदी सरदारांस येऊन मिळण्याचे फर्मान काढले होते. मात्र त्या मराठी सरदारांचे मनोधैर्य कमी असावे. कारण खानाचा पराभव झाल्यास महाराज त्यांनाही चंद्रराव मोरे याच्याप्रमाणे पुरी अद्दल घडवतील अशी भीती त्यांना वाटत असावी.” (प्रकरण पहिले, पृष्ठ ४१)

चौथ्या प्रकरणात महाराजांच्या बचावाच्या रणनीतीचे विस्तृत विवेचन आहे. त्या प्रकरणातील उपशीर्षके लेखकाच्या अभ्यासाची कक्षा किती विस्तृत होती हे दाखवतात :

संभवनीय रणक्षेत्र, लढाईपूर्वीचे धोरण, परराष्ट्रीय राजकारण, सैन्याची विभागणी व नेमणूक, खानाची चढाई व महाराजांचे धोरण, तोफांच्या बारांचे संकेत, युद्धाच्या निरनिराळ्या पद्धती व त्यांचे एकीकरण, परिस्थितीमुळे रणक्षेत्र बदलण्याचा विचार, बेत व आडाखे यावर होणारा वेळ व जागा यांचा परिणाम इत्यादी, इत्यादी… या शीर्षकांवरून प्रत्यक्ष लढाईच्या हकिगतीत एक किंवा दोन वाक्यांत सांगितल्या जाणाऱ्या घटनांच्या मागे किती खोल विचार असतो याची कल्पना येऊ शकेल. त्याच प्रकरणात लेखकांनी रस्ते, घाट, नदीचे उतार, रसद पुरवठा व लोकसंख्या यांचे लढाईतील योगदान उलगडून दाखवले आहे.

पाचव्या प्रकरणात शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यातील वाटाघाटी कशा झाल्या त्याची हकिगत आणि भाष्य येते. तेथे आणि अफझलखानाच्या संबंधीचे इतर लेखन वाचताना लक्षात येते, की महाराज आणि खान, दोघांनाही समोरासमोर युद्ध नको होते. – अर्थात वेगवेगळ्या कारणांसाठी. त्यामुळे वकील पाठवणे आणि प्रतिपक्षाची मानसिकता कशी व किती मजबूत आहे याचा अंदाज घेणे आवश्यक होते. महाराजांनी खानाचा वकील हिंदू आणि ब्राह्मण असल्याचा फायदा घेत त्याच्या धार्मिक भावनांना हात घातला. त्याला गोब्राह्मण प्रतिपालनासाठी चाललेल्या प्रयत्नांत सामील होण्याचे आवाहन केले.” तुम्ही हिंदू आहात. सांप्रत मुसलमानी राज्यात गायी व देवस्थानांचा छळ होत आहे. तो तुम्ही पाहत आहात. पैशांनी आपण नागवले जात आहोत. अन्यायाबद्दल सरकारदरबारी फिर्याद केल्यास काहीच उपयोग न होता न्यायाचा फार्स करून सरकार अपराध्यास सोडून देते. … तसेच, या सर्व गोष्टींचा प्रतिकार व्हावा अशी प्रत्येक जाणत्या हिंदूच्या मनात इच्छा उद्धृत झाली आहे…

श्री शंभूंच्या कृपेने आम्ही स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले आहे. त्यास सर्व देव-ब्राह्मणांचा व साधुसंतांचा आशीर्वाद आहे. जाणत्या हिंदूंची सहानुभूती आणि शक्य तेवढा पाठिंबाही आहे. अशा वेळी तुमच्यासारख्या ब्राह्मणश्रेष्ठाने यवनाच्या कच्छपी लागून असल्या महत्कार्यास खो घालू नये.” हा सारा शिष्टाईचा मजकूर मुळातून आणि संपूर्ण वाचणे उद्बोधक ठरेल. ती शिष्टाई सफल झाल्यामुळे महाराजांना खानाच्या बेताचे खरे स्वरूप समजून पुढील तयारी करणे शक्य झाले. प्रतापगडाच्या युद्धातील शिष्टाई ही त्या सगळ्यात महत्त्वाचा भाग होय. वरवर दिसणाऱ्या लढाईमागे यशस्वी केलेले राजकारण किती मोठ्या प्रमाणावर कारणीभूत होते त्याची कल्पना वाचकाला फारच थोडी असते. त्यानंतर महाराज आणि खान यांच्या प्रत्यक्ष भेटीची हकिगत – खानाने दगा देण्याचा प्रयत्न करणे आणि तो लक्षात आल्यावर महाराजांनी त्यांचा स्वत:चा बचाव करण्यासाठी बिचवा वापरून खानाला जखमी करणे –ही जी इतिहासात सांगितली गेली तशी येते.

या बाबत उलटसुलट मतप्रवाह आहेत. ‘अफझलखानाच्या मृत्यूचा फार्स’ या एक अंकी प्रहसनात बरोबर उलटा प्रकार झाला असे सांगितले आहे. महाराजांनी ते खानाला दगा देऊन मारणार असे त्यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांपाशी बोलून दाखवले होते असाही प्रसंग दाखवला आहे. सर जदुनाथ सरकार यांनी असे म्हटले आहे, की अफझलखानाच्या मृत्यूचा खरा प्रकार बाहेर येणे शक्य दिसत नाही. दोन पुढारी अशा रीतीने भेटून जेव्हा घात होतो तेव्हा खरा प्रकार बाहेर येणे शक्य नसते.

त्या पुढील प्रकरणांत खानाच्या मृत्यूनंतर ठरल्याप्रमाणे चढाई कशी झाली आणि त्यासाठी युद्धशास्त्रातील कोणते नियम पाळून हालचाली केल्या गेल्या त्यांचा तपशील येतो. पुस्तकाचे वैशिष्ट्य हे आहे, की साधारणपणे नेहमी दिली जाणारी हकिगत अथवा माहिती तेथे तिच्या युद्धशास्त्रातील संदर्भासह येते. महाराजांच्या युद्धशास्त्रीय धोरणांबरोबर अफझलखानाच्या तयारीतील उणिवा, अगोदर तयारी न केल्यामुळे प्रत्यक्ष लढाई सुरू झाल्यावर खानाच्या फौजेची कोणती पंचाईत झाली वगैरे विवेचन येते. लेखक स्वतः लष्करात कार्यरत असल्याने व युद्धशास्त्राचा अभ्यासक असल्याने इतर युद्धांमध्येही साधारणपणे समान परिस्थितीमध्ये काय घडले त्याचेही संदर्भ येतात.

पुस्तकाच्या अखेरच्या भागात युद्धशास्त्राचा शब्दकोश, आधार ग्रंथांची यादी आणि सूची आहे. कॅप्टन मोडक पुस्तकासाठीची सामग्री जमा करण्यासाठी यांनी अठरा वर्षे पाठपुरावा केला होता. त्या त्यांच्या प्रस्तावनेतील विधानाची खात्री ठिकठिकाणी दिलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या संदर्भातून होते. जवळ जवळ शंभर वर्षापूर्वी एका अत्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून इतिहासाचे दर्शन घडवणारा ग्रंथ असे त्या पुस्तकाचे वर्णन करता येईल.

लेखक – कॅप्टन गणेश वासुदेव मोडक
प्रथम आवृत्ती १९२७
प्रकाशक – एन्.एन्. दातार अँड सन्स

– मुकुंद वझे

About Post Author

2 COMMENTS

  1. लेख आवडला
    लेख आवडला

  2. मी या पुस्तकाच्या शोधात आहे…
    मी या पुस्तकाच्या शोधात आहे. मला हे पुस्तक विकत मिळेल का. फार वर्षांपासून मी या पुस्तकाच्या शोधात आहे.

Comments are closed.