प्रगतशील युवा शेतकरी रविराज अहिरेकर

1
32

रविराजचे मूळ गाव विखळे (ता. कोरेगाव, जि. सातारा) पण त्याचे आजोबा धर्मराज यादवराव अहिरेकर बांधकाम विभागात नोकरीस असल्याने त्यांनी आबापुरी येथील डोंगरपायथ्याशी दहा एकर मुरमाड शेती खरेदी केली. त्यांचा मुलगा युवराज अहिरेकर शेती पाहायचे. प्राथमिक शिक्षण घेणारा रविराज मोकळ्या वेळेत त्यांना मदत करायचा. तेव्हाच रविराजला शेतीबद्दल आवड निर्माण झाली, पण युवराज यांच्या आयुष्यात २००८ मध्ये दुर्दैवी प्रसंग आला. त्यांना अचानक ओढवलेल्या आजारपणामुळे अपंगत्व आले. त्यामुळे त्यांची एवढी शेती करणार कोण, हा पेच अहिरेकर कुटुंबासमोर उभा राहिला.

आजोबा वयोवृद्ध; त्यामुळे जबाबदारी शिक्षण घेत असलेल्या रविराजवर आली. त्याने ती स्वीकारलीही. आजोबांच्या साथीने शेतीत नवनवीन प्रयोग २००८ पासून सुरू केले. त्याने त्याबरोबर त्याचे शिक्षणही पूर्ण केले. तो दापोली येथील कोकण कृषी विद्यपिठातून बी.एस्सी.(अग्री) झाला व त्यानंतर सुरू झाला त्यांचा पूर्ण वेळ शेतीचा नवा अध्याय.

अहिरेकर कुटुंब पहिल्यापासून टॉमेटो शेती करत असे. ते विक्रीचा दर कमी असला तरीही टॉमेटो शेती करतात. त्यांनी दोन एकर शेतावर पाटपाणी पद्धतीने टोमॅटो लागवड पहिल्यांदा २००७ साली केली, त्यांना भांडवल वजा खर्च जाऊन निव्वळ सत्तर हजारांचे उत्पन्न मिळाले. पुढे प्रत्येक वर्षी त्यांनी टोमॅटोची लागवड केली. त्यांनी २०१५ मध्ये पंचवीस गुंठे क्षेत्रावर पंधरा टन उत्पन्न घेतले. त्यांची पुणे बाजारपेठेत बारा ते चौदा रूपये दराने विक्री झाली. त्याआधीच्या वर्षी पंधरा गुंठे क्षेत्रावर काकडी लागवड केली. पण पाण्याची कमतरता असल्याने दोन टन उत्पन्न मिळाले. त्याची पंधरा रूपये दराने विक्री होऊन तीस हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. रविराजने २०१६ साली पन्नास गुंठे क्षेत्रावर टोमॅटोच्या अलंकार व नामधारी ८११ जातीची लागवड केली असून ही लागवड करण्याआधी शेतात दोन ट्रेलर कोंबडी खत टाकले व नंतर उभी आडवी नांगरणी केली. रोटर फिरवून चार फुटी सरीने दोन डिएपी, दोन निंबोळी, मायक्रो दोन बॅग यांचे मिश्रण करून बेडवर टाकले. मल्चिंग पेपर अंथरून साडेपाच हजार रोपांची लागवड केली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आळवणी आणि कॉन्फीडोअर व रोकोची फवारणी, पंधरा दिवसांच्या दोन टप्प्यांत बेनेव्हियाच्या रोगप्रतिबंधकारक म्हणून फवारणी केली. जमिनीत ओलावा टिकण्यासाठी चार दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले. त्यानंतर पस्तीस दिवसांनी फुलकळी लागून पंचेचाळिसाव्या दिवशी फळे लागण्यास सुरुवात झाली. टोमॅटोचे पहिल्या दोन महिन्यांतच दहा तोडे झाले असून तीस टन उत्पन्न मिळाले आहे. त्याची दहा रूपये किलो दराने विक्री होऊन तीन लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच, आतापर्यंत मशागत, फवारणी, भांगलणी, मजूर व इतर यांसाठी भांडवल नव्वद हजार रुपये खर्च झाले असून चार महिन्यांत रविराजला दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला. टॉमेटोच्या व्यतिरिक्त शेतात एक एकर हापूस, केशर जातीचे आंबे, भगव्या जातीचे चार एकर डाळींब, पॉलीहाऊस वीस गुंठे व इतर पावटा, घेवडा अशी वेलवर्गीय पिके आहेत. भविष्यात त्यांची शेती हायटेक करत नवनवीन पिकांची लागवड करत भरघोस उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा मानस आहे व त्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितले.

वयाच्या तेविसाव्या वर्षी रविवराज अहिरेकर याने आजोबाच्या साथीत व वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केलेली प्रगतीशील शेती युवकवर्गाला प्रेरणादायी आहे.

– दत्ता घाडगे
कृषी पत्रकार, सातारा
९९२२९ १६७१२

About Post Author

1 COMMENT

  1. छान lekh.sheti
    छान lekh.sheti pradrashansathi tyani Isreal la have..kase jayache tya baddal mi guidance deu shaken..

Comments are closed.