पुलगम टेक्स्टाइल – सोलापूरची शान

0
28
carasole

पुलगम, अर्थात सोलापुरी चादरींचे नाव भारतभर आहे. सोलापूरची चादर म्हटले, की पुलगम ब्रँडचे नाव येतेच. फक्त चादरच नव्हे तर टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये पुलगम यांचे नाव दुमदुमत आहे.

पुलगम कुटुंब हे मूळचे आंध्रप्रदेशातील वरंगल जिल्‍ह्यातील मेदक या खेड्यातील साळी समाजाचे. ते 1940 च्या दशकात सोलापूरला आले. ते कुटुंब सोलापूरमध्ये हातमाग चालवू लागले. कुटुंबापैकी यंबय्या माल्ल्या पुलगम यांचा पुलगम टेक्स्टाइलच्या यशात मोठा वाटा आहे. त्यांनी स्वत:चे चार हातमाग 1949 साली सुरू केले व त्यावर साड्या (फरास पेठी, जपानी किना-यांच्‍या साड्या, इरकल) तयार करून प्रसिद्धी मिळवली. त्यानंतरच्या दोनच वर्षांत चाराचे आठ हातमाग तयार करून जोरात उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिले दुकान 1959 साली सोलापूरच्या साखरपेठेत उघडले व त्यांच्या साड्या ‘लक्ष्मीनारायण छाप लुगडी’ या नावाने विकण्यास आरंभ केला. साड्यांमध्ये चांगलीच गुणवत्ता असल्याने त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला व बाजारपेठेत त्यांचे नाव झाले.

त्याच कुटुंबातील रामय्या सांबया पुलगम यांनी आठ हातमागावर चादरींचे उत्पादन 1964 सालापासून सुरू करून ‘पुलगम शोरुम’ची स्थापना केली. त्यांनी आणखी एकशेचार हातमाग 1973 ते 1987 या काळात वाढवले आणि त्यांच्या साड्यांचे इतके नाव झाले, की त्यांची इतर वस्त्रोत्पादनेही ज्याच्या त्याच्या तोंडी होऊन त्यांची अफाट विक्री झाली. त्‍यांनी सोलापूरातील दाजी पेठत भव्‍य शोरुम सुरू केले. आज पुलगम चादरींनी परदेशातही नावलौकिक मिळवला आहे. पुलगम यांनी बाजारात आणलेल्‍या मयुरपंख बॅन्‍डला चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या सितारा, रोशनी, राधिका आणि इतर ब्रॅन्‍डच्या चादरी, बेडशिट्स ,टॉवेल आणि इतर हातमाग वस्तूंना देशभरासोबत परदेशातूनही वाढती मागणी आहे. पुलगम यांचा कारखाना सोलापूरातील एमआयडीसी परिसरात आहे. त्‍यांचे गोडाऊन दाजी पेठेतील शोरुममध्‍ये आहे.

‘वर्ल्ड इकॉनॉमिक्स प्रोग्रेस सोसायटी, नवी दिल्ली’ व ‘इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट असोसिएशन, नवी दिल्ली’ यांनी ‘पुलगम टेक्स्टाइल्स’ला ‘बेस्ट क्वॉलिटी प्रॉडक्शन’ व ‘हाय परफॉर्मन्स इन टेक्स्टाइल्स इंडस्ट्री’ असे दोन पुरस्कार दिले आहेत. पुलगम टेक्सटाइल्सचे एकच ध्येय आहे. ते म्हणजे इंडस्ट्रीमध्ये उत्पादन व गुणवत्ता यांत क्रमांक एकवर राहायचे. त्यासाठी मनुष्यबळ, वेळ या बरोबरीने ते नवीन तंत्रज्ञानही वापरत आहेत, असे पुलगम टेक्स्टाइल्सचे सध्याचे मालक रामय्या व्यंबय्या पुलगम म्हणतात. ‘इकॉनॉमिक्स अँड रिसर्च असोसिएशन’ यांच्याकडून त्यांना ‘भारतीय उद्योगरत्न पुरस्कार’ही देण्यात आला आहे. चादर उद्योगातील पायोनियर म्‍हणून घेतल्‍या जाणा-या क्षीरसागर, एस. एन. चिलका, चाटला, वडनाल, सिंगम, आर. एन. गोली, दत्तोबा दिवटे, अरविंद बोमड्याल, कमटम, अन्नलदास, गांगजी, गाजूल, राठी या नावांच्‍या रांगेत पुलगम यांचे नाव आदराने घेतले जाते.

रामय्या पुलगम, 7276728518

–  प्रमोद शेंडे

About Post Author