परेश केंकरे – ग्लोबल संस्कृतीचा पाईक (Paresh Kenkre’s Global Dream)

6
20

अमेरिकेतपहिल्या एक-दोन मराठी पिढ्या 1960 नंतर गेल्या
, त्यांनी मराठीपण फार जपले; की ते जणू पुलं-वपु-सुधीर फडके यांच्यातच गोठून गेले आहेत असे म्हणतात! परंतु तंत्रशिक्षित तरुणांचे 1990 नंतर जे ब्रेनड़्रेनझाले त्यांतील काही लोक नव्या जाणिवांनी संपन्न होते. त्यांनी भारतीयत्वाच्या उत्तम खुणा जपल्या, परंतु अमेरिकेच्यास्थानिक जीवनाशी एकरूप होण्याचाही प्रयत्न केला. तसे भारतीय/मराठी लोक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या व्हाइट हाऊस कार्यालयातील अधिकारपदापासून ओहायोतील लोकप्रतिनिधीत्वापर्यंत काही ठिकाणी दिसून येतात. परेश केंकरे हे त्यांतील एक आहेत. ते त्यांच्या गावातील जीवनाशी एकरूप होऊन गेले आहेत.

 

केंकरे कॅलिफोर्नियात सॅनफ्रान्सिस्कोजवळ फॉस्टर सिटी या शहरात राहतात. लोकवस्ती असेल तीस-पस्तीस हजार, पण सिटी कौन्सीलचा प्रतिनिधी (नगरसेवक) निवडणे असेल तर केंकरे यांची मदत घ्यावी लागते, असा त्यांचा दबदबा आहे. अशी पंधरा सिटी कौन्सील मिळून एक काउंटी कौन्सील बनते. केंकरे यांची ती ताकद अलिकडेच अजमावली गेली. त्यांचे सच्चेपण असे, की त्यांनी त्यांच्या वॉर्डातील प्रतिनिधी जेव्हा फार लाच खाऊ लागला तेव्हा त्याला रिकॉल करण्याची मोहीम आरंभली आणि त्याच्या जागी नवा प्रतिनिधी ऐंशी टक्के मते मिळवून निवडून आणला! केंकरे म्हणाले, की अमेरिकेत स्थानिक राजकारणात राजकीय पक्ष नसतात. त्यामुळे प्रतिनिधी व्यक्तींच्या गुणवत्तेवर ते निवडून येऊ शकतात. सार्वजनिक कामातील आस्था हा केंकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू आहे. त्यांचे विविध गुणदर्शन झाले, की त्यांचे कौतुक वाटू लागते. कारण अशा वेगवेगळ्या आवडीनिवडी असलेला हा माणूस स्वत:च्याच छंदात, करिअरमध्ये रमून गेला नाही, स्वत:च्याच कोशात गुंफून गेला नाही; तर त्याने कुटुंबात लक्ष घातले, मोठा मित्रपरिवार जपला आणि करिअरची कमान चढती ठेवली. केंकरे यांच्या 31 डिसेंबरच्या पार्ट्या, दिवाळी-होळी यांचे सण-समारंभ हे लक्षवेधक असतात. तेथे त्यांच्या लोकसंग्रहाचा प्रत्यय येतो.

 

केंकरे व्हीजेटीआयमधून (जिजामाता तंत्र महाविद्यालय) इंजिनीयर झाले, त्यांनी एकादे वर्ष मद्रासमध्ये (चेन्नई) नोकरी केली आणि त्या वेळच्या प्रथेप्रमाणे, ते 1990 साली अमेरिकेत गेले. तेथे कॅलिफोर्नियात स्थिरावले. त्यांचा पहिला मुक्काम सनी वेल येथे म्हणजे गोखले-गोरे-केळकर-रानडे यांच्या आगरात झाला. केंकरे यांनी 1990-96 पर्यंत नोकरी केली, त्यानंतर स्वत:चा आयटी व्यवसाय सुरू केला, त्यामध्ये सतत नवनवे टप्पे गाठले. त्यांनी 2003 नंतर सात वर्षें जसा पुणे-मुंबई तसा इंग्लंड-अमेरिका प्रवास केला. म्हणजे आठवड्याचे पाच दिवस इंग्लंडमध्ये आणि वीकएंड हसबंड अमेरिकेत!’

 

अनाडी या सिनेमात नूतनचे वडील असतात उद्योगपती मोतीलाल. ते नूतनला तिच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी एकदम उभी पाहतात, तेव्हा म्हणतात, की अरे ही आपली मुलगी? हिला आपण घरून बाहेर कामाला जायचो तेव्हा आणि बाहेर कामावरून घरी आलो तेव्हा आडवी झोपलेलीच पाहिली आहे, ही एवढी मोठी केव्हा झाली? परेश केंकरे यांचे त्यांची मुलगी राधिका हिच्या बाबतीत तसेच काहीसे झाले. त्यांनी राधिकाला मोठी होताना पाहिली नाही आणि म्हणून ती जेव्हा दहावीत गेली तेव्हा, 2012 मध्ये त्यांनी इंग्लंडमधील व्यवसाय बंद केला, तो अमेरिकेपुरता मर्यादित ठेवला. तोपर्यंत तंत्रविज्ञानातील हनुमान उड्या सुरू झाल्या होत्या. त्यांशी जुळवून घेता आले नाही तर? आर्थिक चणचण नको म्हणून साईड बिझनेस म्हणून डल्लसमध्ये पेट्रोलपंप व दुकान विकत घेतले. त्याच बरोबर कुटुंबाशी मित्रत्व अधिक जोडले. ते पत्नी गीता व मुलगी राधिका यांच्याबरोबर अधिक वेळ घालवू लागले. अर्थात तंत्रविज्ञान हीच त्यांची कास राहिली आहे. त्यामुळे वयाची पन्नाशी उलटल्यावर, त्यांनी सध्याच्या काळाला अनुरूप अशा डेटा सायन्सचे शिक्षण घेणे सुरू केले आहे. त्यामध्ये ते आता नवा उद्योग व्यवसाय कोणता सुरू करतात ते पाहायचे.

 

केंकरे यांनी लग्न सनी वेलमध्ये असतानाच केले, ते त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकून आलेल्या कल्याणच्या गीता देवधर या मुलीशी. केंकरे म्हणाले, की आम्ही कॉलेजमध्ये मुंबईला भेटलो होतो, पण प्रेम केले-लग्न जुळवले अमेरिकेत आल्यावर. तेथे आम्ही तरुण दिवसभर कामे केल्यावर संध्याकाळी गप्पा मारण्यास एकत्र जमायचो, तेथे माझे-गीताचे जमले. आम्ही लग्न अमेरिकेतच केले. त्यानंतर दोन-तीन वर्षांनी भारतात जाऊ शकलो, तेव्हा रिसेप्शन वगैरे करण्याचा घरच्यांचा मुद्दा शिल्लक राहिला नव्हता.

 

 सुवीर सरन यांच्यासोबत परेश केंकरे
गीता देवधर ही विलक्षण तल्लख बुद्धीची सरळमार्गी मुलगी आहे. तिची स्वत:ची अमेरिकेतील करिअर आणि सरळ लाघवी स्वभाव याबाबत स्वतंत्र नोंद होऊ शकेल. इतकी ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. परेश केंकरे-गीता देवधर आणि त्यांची कॉलेजमध्ये न्युरो सायन्स शिकून तयार झालेली मुलगी राधिका यांची नावे व संस्कार याशिवाय भारतात/महाराष्ट्रात त्यांचे काही उरले आहे असे जाणवत नाही, इतकी ती अमेरिकन होऊन गेली आहेत. ती जीवनशैलीच वेगळी आहे. त्यांना PIO (Persons of Indian Origin) म्हणतात हेच योग्य आहे. अर्थात केंकरे पती-पत्नींना मायभूमीची, तेथील नातेसंबंधांची ओढ आहेच. ती त्यांच्या, विशेषत: परेश केंकरे यांच्या छंदांतून व्यक्त होते. म्हणजे केंकरे यांना भारतीय मांसाहारी खाद्यपदार्थ विशेष आवडतात. गीता ते खात नाही. मग परेश यांनी ते शिकून घेतले. त्यांतील त्यांचे प्रावीण्य मोठमोठ्यांना लाजवणारे आहे. सुवीर सरन नावाचा शेफ अमेरिकेत प्रसिद्ध आहे, तो भारतीय लज्जतदार खाद्यपदार्थांठी. केंकरे यांनी त्याच्याशी दोस्ती केली, ती अर्थात इमेलवर. त्यामधून केंकरे यांनी स्वत:च्या अशा चविष्ट पाककृती तयार केल्या आहेत. गंमत अशी, की केंकरे यांचे हे वेड ध्यानी घेऊन गीता व त्यांच्या मित्रमंडळींनी परेश केंकरे यांना त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाला भेट दिली ती सुवीर सरन यांना न्यू यॉर्कमधून सॅनफ्रान्सिकोला (म्हणजे काश्मीरमधून कन्याकुमारीला) बोलावून! सुवीर यांनी केंकरे यांच्या मित्राच्या घरी पन्नास जणांच्या पार्टीचे जेवण शिजवले. केंकरे त्या सन्मानाने गहिवरूनच गेले. केंकरे यांना स्वत:चे रेस्टॉरंट सुरू करावे असेही एका टप्प्यावर वाटून गेले होते.

 

केंकरे यांना बालपणी लेखक व्हावे असे वाटत होते. त्यांची ती आवड अचानक उफाळून आली ती त्यांचा बालमोहन वर्गाचा व्हॉट्सअॅप ग्रूप झाला तेव्हा. त्यांनी त्यासाठी ललित लेखन सुरू केले. त्यांपैकी काही माझ्याकडे पाठवले. ते हळुवार अनुभव हलवून सोडणारे आहेत- कधी खळखळवून हसवतातही. ते शाळेत मिस्किल-चहाटळ म्हणून प्रसिद्ध होतेच. प्रमिला दातार यांच्या गाण्यावर त्यांनी विडंबन काव्य रचले म्हणून शाळेतून रस्टिकेट होण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यांचे काका तंत्र शिक्षणसंचालक होते, म्हणून केंकरे बापुसाहेब रेगे यांच्या शिस्तीच्या बडग्यातून बचावले. ते म्हणाले, की मी आयुष्यभर प्रवास केला, गॅस स्टेशनवरही अनेक लोक भेटत गेले. त्यातून मला समाजातील विसंगती, दंभ या गोष्टी दिसतात त्रास देतात. त्यातून मी काहीबाही लिहीत असतो.

 

त्यांनी त्यांना एकदा भारतीय हिंदी सिनेस्टार धर्मेंद्र लंडन विमानतळावर भेटला त्याची हकिगत साभिनय सांगितली होती त्या ही मॅनच्या आविर्भावासह. त्याहून अधिक सुखद त्यांची भेट होती ती दीपिका पदुकोनबरोबरची. ती योगायोगानेच घडून आली. अमेरिकेत गोवन लोकांचे संमेलन झाले होते, त्याचे अध्यक्ष होते प्रकाश पदुकोन. त्या संमेलनानिमित्त स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आली. तिचे संपादक होते परेश केंकरे. त्यांनी गोव्याचा इतिहास व वर्तमान यांबाबतचे अपूर्व साहित्य त्या विशेषांकासाठी जमा केले आहे, तेवढेच प्रभावी संपादकीय लिहिले आहे. केंकरे संमेलन संपल्यानंतर भारतात आले तेव्हा त्यांच्या विमानात योगायोगाने दीपिका होती. केंकरे यांनी प्रकाशच्या झालेल्या ताज्या ओळखीचा धागा पकडून तिच्या हाती तो विशेषांक ठेवला. तिलाही वेळ होता. तिने आस्थेने तो अंक वाचला. त्यातील संपादकीयाबद्दल केंकरे यांच्याशी ती आपुलकीने बोलली. केंकरे यांच्याकडे अशा आठवणींचा खजिना आहे.

 

परेश (शंकर) केंकरे यांचे आईवडील (गुरुदास केकरे) गोव्यातील, बाणवली. परंतु केंकरे यांनी पहिली सहा वर्षें फक्त तिकडे काढली. ते नंतर काकांकडे मुंबईत आले. त्यांचे शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले. केंकरे यांना एका टप्प्यावर फोटोग्राफीचे वेड लागले होते. त्यांनी विविध तऱ्हांचे व विविध ठिकाणी फोटो काढले आहेत. ते त्या काळात गळ्यात कॅमेरा टांगूनच फिरत असत. त्यांनी असे विविध छंद जपले व सोडून दिले. त्यातील काही वेड मुलगी राधिका हिनेही घ्यावे असे त्यांना वाटे म्हणून मुलीशी बोलून एकदा त्यांनी पियानोचे धूड घरात आणून ठेवले. पण नंतर राधिकाच उच्चशिक्षण व नोकरी यानिमित्ताने घराबाहेर पडली. पियानो हॉलमध्ये आहे तेथेच आहे. ते मनाने जसे संवेदनाशील आहेत, तसे अभियंतेही आहेत. त्यामुळे ते लेखन जितक्या हळुवार हाताने करतात तशाच प्रकारे, कुशलतेने यांत्रिक बाबी हाताळतात. केंकरे छांदिष्ट आहेत तसा व्यवहार नीट जाणतात. त्यांना जगण्याची सचोटी हे सर्वात महत्त्वाचे मूल्य वाटते व तो अमेरिकेतील जीवनाचा आधार आहे, तेथे लपवाछपवी नाही असे ते म्हणतात. म्हणूनच त्यांनी त्यांचा देश अमेरिकामानला आहे. त्यांच्या आधीच्या पिढ्यांना भारत व अमेरिका अशी दुविधा त्रास देई. नव्या पिढ्यांना त्या प्रकारचा मनस्ताप नाही. त्यांना नि:शंक मनाने अमेरिकेतच राहायचे आहे. केंकरे म्हणतात, की मानवी संस्कृतीत गेली दोन-पाच हजार वर्षें सतत प्रगतीच होत आलेली आहे तेथे अधोगती नाही. त्याचे महत्त्वाचे कारण स्थलांतर हे आहे. त्याला तर आता फारच वेग आला आहे. त्यामुळेच गेल्या तीस वर्षांतील ग्लोबल संस्कृती हे मानवी विकासातील पुढील पाऊल आहे!

 

परेश केंकरे shankar.kenkre@gmail.com
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
 ——————————————————————————————————————
                                       परेश केंकरे यांनी काढलेली काही छायाचित्रे
——————————————————————————————————-

About Post Author

Previous articleकै. अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना 2020-21 (Arun Sadhu Memorial Fellowship 2020-21)
Next articleकोरोना : सिंगापूर प्रशासनाचे तीन मंत्र (Corona : Strong Singapore Govt.)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

6 COMMENTS

  1. खूप छान लिहिले आहे. माणूस जपण्याची कला त्यांना छान अवगत आहे‌.

  2. लेख फार छान आहे.परेश एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे.ते एकाच लेखात पकडणे कठीण आहे.

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here