पंधरावे साहित्य संमेलन (Fifteenth Marathi Literary Meet – 1929)

 

बेळगाव येथे भरलेल्या पंधराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष काळकर्ते शिवराम महादेव परांजपे हे होते. ते स्वातंत्र्याच्या चळवळीतील आघाडीचे वक्ते, तरुण पिढीला आकर्षित करणारी लेखनशैली असलेले स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी केवळ वाणी आणि लेखणी यांच्या जोरावर काळह्या त्यांच्या स्वत:च्या वृत्तपत्राचा मोठा वाचकवर्ग मिळवला. ते शाळेत शिकत असताना त्यांना विष्णुशास्त्री चिपळूणकर शिक्षक म्हणून लाभले. त्यामुळे लहान वयात स्वदेशाभिमान, स्वधर्माभिमान त्यांच्या हृदयात तेवू लागला.

त्यांनी त्यांचे शिक्षण संपल्यानंतर वर्ष-दोन वर्षे प्राध्यापकी केली आणि नंतर सार्वजनिक कार्याला आयुष्य अर्पण केले. त्यांचे नाव महाराष्ट्रभर अत्यंत वक्रोक्तीपूर्ण भाषणांमुळे झाले. ते लोकमान्य टिळक यांच्याबरोबर राजकीय कार्यातही होते. त्यांनी वृत्तपत्रांतून जहाल भाषेत लेखन केले. त्यांनी स्वत:चे काळ हे वृत्तपत्र 25मार्च 1898 रोजी सुरू केले. ते चार पृष्ठांचे पत्र दर शुक्रवारी प्रकाशित होत असे आणि त्यातील सारे लेखन परांजपेच करत असत. काळची लोकप्रियता एवढी वाढली की त्याचा खप पंचवीस हजारांपर्यंत पोचला होता. काळचे अग्रलेख वाचण्यास लोक उत्सुक असत. तितके अभ्यासपूर्ण, जहाल भाषेत लिहिलेले अग्रलेख वृत्तपत्रसृष्टीत क्वचितच लिहिले गेले असतील ! म्हणूनच केसरीआणि काळ या दोन वृत्तपत्रांनी इतिहास घडवला असे म्हणतात. काळमधील एका जहाल अग्रलेखाबद्दल ब्रिटिश सरकारने शिवरामपंत परांजपे यांना एकोणीस महिन्यांची सजा दिली होती.

शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म 27जून 1864 रोजी महाड येथे झाला. त्यांना मॅट्रिकला जगन्नाथ शंकरशेटही संस्कृतची शिष्यवृत्ती मिळाली. बीए ला भाऊ दाजी पारितोषिकआणि एम ए ला झाला वेदांतपारितोषिक मिळाले. पुढे ते एलएल बी झाले. शिवरामपंत परांजपे यांनी त्यांच्या वडिलांना सांगितले, की मी नोकरी वा वकिली करणार नाही. शिवरामपंतांचा विवाह महाड-गोरेगावचे गणेशपंत गोखले ह्यांची कन्या बयोताई हिच्याशी 1875 मध्ये झाला.

त्यांचे प्रसिद्ध साहित्य

· वेळोवेळी लिहिलेल्या राजकीय आणि संस्कृत विषयांवरच्या लेखांचा साहित्य संग्रह

· काळातील निवडक निबंध (बारा भाग),

· गोविदाची गोष्ट,

· विंध्याचल (कादंबरी)

· बाणाच्या कादंबरीवर आधारित संगीत कादंबरी (1897)

· शेक्सपीयरच्या मॅक्‌बेथवरून रचलेले मानाजीराव (1898), ॲडिसनच्या केटोवर आधारित रामदेवराव (1906) अशा काही नाटकांखेरीज त्यांनी पहिला पांडव (1931) हे कर्णाच्या जीवनावरील स्वतंत्र पौराणिक नाटकही लिहिले आहे.

त्यांनी देशभक्तीचा महिमा तसेच फितुरीचे दुष्परिणाम त्यांच्या नाटकांतून दाखवलेले आहेत. ती नाटके फारशी प्रयोगानुकूल नाहीत. त्यांनी अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या सौभद्रचे संस्कृतमध्ये भाषांतर केले होते. त्यांनी लिहिलेले अहल्याजार हे प्रदीर्घ काव्य आहे. त्यांनी त्याशिवाय काही स्फुट कविता आणि नाटकांतील पदे रचली आहेत.

शिवरामपंतानी कथालेखनही केले. त्यांनी आम्रवृक्ष’, ‘एक कारखाना’, ‘प्रभाकरपंतांचे विचारअशा कथांतून राजकीय विचार पेरले आहेत. त्यांच्या कथांतूनही त्यांनी व्याजोक्तीचा उपयोग केला आहे. स्वैर कल्पनाविलासाने त्यांच्या काही कथा नटल्या आहेत. वि.का. राजवाडे यांना भाषांतर मासिकाच्या कामात त्यांचे सहकार्य लाभले होते. कादंबरीकार ना. सी. फडके यांनी 1926 साली सुरू केलेल्या रत्नाकरया नियतकालिकातही परांजपे यांनी लेखन केले.

ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की संस्कृत भाषा ही आपल्या मराठी भाषेच्या साम्राज्यातील सोन्याची खाण आहे. या खाणीतील सोन्याने आपण आपल्या भाषासुंदरीच्या अंगावर कितीतरी सुवर्णालंकार घातलेले आहेत व लागेल तितके सोने खाणीतून आपल्याला काढता येईल.

शिवरामपंतांच्या आयुष्यातील कालदुर्गती अशी, की ते ज्या वर्षी बेळगाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, त्याच वर्षी (1929) मधुमेहाच्या विकाराने ते पुणे येथे निधन पावले.

वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र सुरेश लोटलीकर 99200 89488

——————————————————————————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here