पंचविसावे साहित्य संमेलन (Twenty Fifth Marathi Literary Meet – 1940)

         पंचविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ना. सी. फडके हे होते. ते संमेलन रत्नागिरी येथे 1940 साली भरले होते. ना. सी. फडके यांची जनमानसात प्रतिमा प्रतिभासंपन्न, चतुरस्त्र लेखन करणारा लोकप्रिय साहित्यिक अशी होती. त्यांची यशस्वी प्राध्यापक म्हणून कारकीर्द गाजली होती. ना.सी. फडके हे रसिक होते. त्यांना सर्व खेळांबद्दल आस्था होती. ते क्रिकेटमध्ये तर रमून जात. परंतु त्यांची खरी प्रतिमा साहित्याचे सर्व फॉर्मस् लीलया हाताळणारे त्यांच्या काळातील तरुण पिढीचे हिरो लेखक अशी होती. फडके यांनी त्यांच्या लेखनाने तीन-चार पिढ्यांच्या वाचकांना भारावून टाकले. त्यांची अल्ला हो अकबरही पहिली कादंबरी 1916 साली प्रसिद्ध झाली. त्यांच्या नावावर दौलत वगैरे अशा चौऱ्याहत्तर कादंबऱ्या, सत्तावीस लघुकथासंग्रह, सात नाटके, नऊ लघुनिबंध संग्रह, समीक्षेची बावीस पुस्तके, नऊ चरित्रे आणि इतर विविध ग्रंथ आहेत. त्यांनी लेखनात मराठी कादंबरीचा पोत बदलून टाकला. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राचे नाव माझे जीवन एक कादंबरीअसे दिले होते. ते कलाप्रेमी व सौंदर्याचे पूजक मानले जात. ते पट्टीचे वक्तेही होते. फडके साहित्य व कलासमीक्षक म्हणूनदेखीलही ख्यातनाम झाले.

नारायण सीताराम फडके यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 रोजी नगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात झाला. फडके यांचे प्राथमिक शिक्षण वडूज (जिल्हा नासिक), बार्शी (जिल्हा सोलापूर), पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजात झाले. ते एम ए 1917 साली झाले. तत्पूर्वीच, 1916 साली त्यांची न्यू पूना कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. नंतर त्यांनी काही काळ केसरी-मराठाच्या संपादकीय विभागात काम केले. त्यानंतर त्यांनी दोन-तीन कॉलेजांत काम केले. ते शेवटी, निवृत्त होईपर्यंत (1949) कोल्हापूरच्याराजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून होते. त्यांनी काही काळ रत्नाकर मासिक आणि झंकारसाप्ताहिक चालवले.

ते पंचविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, हे फार महत्त्वाचे होय. तो मान त्यांना त्यावेळी मिळायलाच हवा होता. त्या काळी मराठी साहित्यात प्रभाव वि.स. खांडेकर यांच्या जीवनवादाचा होता. ना.सी. फडके यांनी त्याविरूद्ध ठणठणीत भूमिका घेतली, ती कलावादाची. जीवनवाद विरूद्ध कलावाद हे द्वंद्व मराठी साहित्यात काही दशके गाजले. जीवनवाद हळुहळू मागे पडला आणि कलावादाची सरशी होत राहिली. मौज अशी, की खांडेकर व फडके हे दोघेही मराठी वाचकांना प्रिय झाले. फडके यांची वाचकप्रियता हळुहळू मावळत गेली. खांडेकर मात्र मराठी साहित्यात अजरामर ठरले. त्यांच्या कादंबऱ्या आठ-दहा दशके उलटली तरी वाचक अजून ओढीने वाचतात. परंतु 1940 मध्ये फडके हेच अग्रस्थानी होते व म्हणून त्यांना त्यावेळी अध्यक्षपद मिळणे महत्त्वाचे होते.

फडके यांची लघुनिबंधाची, समीक्षेची पुस्तकेही गाजली. प्रतिभासाधन या त्यांच्या ग्रंथावर क्लेटन हॅमिल्टन यांच्या आर्ट ऑफ फिक्शनचा अनुवाद केला असा चौर्यकर्माचा आरोप झाला होता. अत्रे-फडके वादही बराच गाजला होता. पण तो वाद अखेरीअखेरीस मिटलादेखील. फडके यांच्या अध्यक्षपदी निवडीमागेही एक कथा आहे. फडके हे 1940 च्या सुमारास प्रसिद्धीच्या झगमगाटात होते. माडखोलकर-अत्रे आणि फडके तिघेही अध्यक्षीय निवडणुकीत उभे होते. फडके यांनी वैयक्तिक दुःखाचे कारण सांगून उमेदवारी मागे घेतली. माडखोलकर यांनीही नाव मागे घेतले आणि अत्रेच 1940 ला भरलेल्या पंचविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणार होते, पण रत्नागिरीचे स्वागत मंडळ फडके यांच्याकडे अध्यक्ष व्हा म्हणून साकडे घालून बसले आणि फडके यांनी होकार दिला ! वास्तविक, त्यामुळे अत्रे डिवचले गेले होते, पण अत्रे यांनी मोठ्या मनाने नवयुगचा फडके विशेषांक काढून फडके यांचा जाहीर सत्कारच केला. पण फडके यांनी ती जाण न ठेवता एकूणच पत्रकारितेवर सडकून टीका केली आणि त्यातून अत्रे-फडके वाद पुन्हा एकदा पेटला.

          ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की आज गंभीर मार्गदर्शक, विचारप्रवर्तक लिखाणाला भावच उरलेला नाही. विनोदाच्या नावाखाली बीभत्सपणा उजळ माथ्याने वावरू लागला आहे. प्रतिष्ठित आणि ग्राम्य यांच्या सरहद्दी पुसट होत चालल्या आहेत. असल्या साहित्याचा विनोद म्हणून सत्कार आणि पुरस्कार होणार असेल तर आपल्या वृत्तपत्र साहित्याची संपूर्ण अधोगती दूर नाही. सध्याच्या वृत्तपत्रीय साहित्यातील गलिच्छ गोष्टींचे परिणाम दूरवर होणार आहेत.

त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार 1962 साली बहाल केला. त्यांचा मृत्यू 22 ऑक्टोबर 1978 रोजी पुण्यात झाला. त्यांच्या पत्नी कमला फडके (19161980) यांनीही कथा-कादंबऱ्यादी लेखन केलेले आहे.

वामन देशपांडे 91676 86695,अर्कचित्र सुरेश लोटलीकर 99200 89488

——————————————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here