निसर्गरम्य बेलकुंड – वनविश्रामगृहांचे सौंदर्य

3
236

मेळघाट सुंदर सुंदर वनविश्रामगृहांनी भरलेले आहे. रायपूर, चौराकुंड, रंगूबेली, कोकटू… ही सर्व वनविश्रामगृहे इंग्रजांनी वनसंपत्तीच्या प्रशासनासाठी बांधली. त्यांतील विलायती झाक मोहक वाटते. त्या सगळ्यांत आगळेवेगळे दिसणारे विश्रामगृह म्हणजे बेलकुंडचे ! बेलकुंडच्या निसर्गरम्य परिसरातील पर्यटन म्हणजे साहसी आव्हानांचा एक रसरशीत अनुभव…

मेळघाटामधील बेलकुंडला जाण्यास तीन मार्ग आहेत. पहिला दर्यापूर-अकोट-बेलकुंड; दुसरा परतवाडा-घटांग-हरिसाल-बेलकुंड आणि तिसरा परतवाडा-परसापूर फाटा-अंबापाटी ते बेलकुंड. मेळघाट हा परिसर अमरावती जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम दिशेला व तापी नदीच्या दक्षिणेकडे पसरला आहे. उंचच उंच पर्वत आणि तेथील चिखलदरा-माखला ही थंड हवेची ठिकाणे. तेथील जंगलांत विविध झाडे व वनस्पती आहेत. अंबापाटीवरून जाणारा रस्ता मेळघाटचे डोंगर आणि पठार यांमधून जातो. त्या मार्गावरील एका छोट्या टेकडीवरून जाताना समोर नजर खिळवून टाकणारे दृश्य दिसते. सरळ दोन हजार फूट उंचीच्या पर्वतरांगा, चिखलदऱ्याची ओळख जगाला करून देणारे वायरलेस टॉवर आणि तेथील थोडीफार अंधुक दिसणारी घरे. थोडे उजवीकडे बघितले, की डोंगराच्या कपारीवर स्वत:चा तोल सांभाळत उभा असलेला गाविलगड किल्ल्याचा परकोट आणि ह्या सर्वांकडे दिमाखात बघणारी व नजर खिळवणारी वास्तू म्हणजे राणीचा महाल ! त्या वास्तूंचे सौंदर्य सायंकाळच्या सोनेरी किरणांत काही औरच ! जणू तांबड्या-पिवळ्या वेषातील मेळघाटची राणी ! गवळी व कोरकू लोकवस्तीची अनेक सुंदर गावे रस्त्याच्या वळणा वळणावर लागतात.

मेळघाट सुंदर सुंदर वनविश्रामगृहांनी भरलेले आहे. रायपूर, चौराकुंड, रंगूबेली, कोकटू, चिखलदरा, माखला, तारुबांदा, कोलकास, ढाकना, गुल्लरघाट… ही सर्व वनविश्रामगृहे इंग्रजांनी वनसंपत्ती प्रशासनासाठी बांधली. त्यांतील विलायती झाक मोहक वाटते. त्या सगळ्यांत आगळेवेगळे दिसणारे विश्रामगृह म्हणजे बेलकुंडचे !

सार्वजनिक बांधकाम विभागाने (पी.डब्ल्यु.डी.) अकोट ते हरिसाल रस्त्याचे बांधकाम 1880 च्या आसपास ‘गडगा’ नदीच्या काठाकाठाने पहाड खणून केले. त्या काळात त्या विश्रामगृहाची पायाभरणी झाली असावी. हरिसालचा तो रस्ता ठिसूळ व सरळसोट असे डोंगर कापून तयार केलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर दरडी कोसळतात. तो रस्ता वाहतुकीला बऱ्याचदा बंद असतो. अकोट ते हरिसाल हे अंतर शहात्तर किलोमीटर आहे. बेलकुंडचे विश्रामगृह त्या दोन्ही गावांच्या बरोबर मध्ये आहे.

बेलकुंडचा नाला गडगा नदीला विश्रामगृहाजवळ मिळतो. ती जागा इंग्रजांनी खुबीने निवडली आहे. ती मुख्य रस्त्यापासून दोनशे-तीनशे फूटांवर आहे, तरी ती वास्तू माहितगाराला विचारल्याशिवाय दिसत नाही. वनविश्रामगृहाच्या तिन्ही बाजूंनी उंचच उंच, सरळ अशा पर्वतरांगा व पूर्वेस अडीचशे ते तीनशे फूट उंचीचा डोंगर आहे. त्या डोंगरापलीकडे गडगा नदीला समांतर गेलेला मुख्य रस्ता आहे. त्यामुळे इंग्रजी ‘टी’सारखी रचना होते. डोंगराच्या घळीतून विश्रामगृहाकडे जाणारा छोटा रस्ता या ‘टी’मध्ये प्रवेश करतो.

‘बेलकुंड’ हे नाव त्या परिसरातील नदीनाल्यातील अनेक कुंडे व सोबतीला वाढणारी बेलांची झाडे यांवरून पडले असावे. सागाची झाडे त्या परिसरात औषधालाही मिळणार नाहीत. विश्रामगृहाच्या बाजूने वाहत येणारा नाला व गडगा नदी हे प्रवाह जेथे मिळतात तेथे गडगेचा धबधबा खोल साठ ते सत्तर फूट व्यासाच्या कुंडात पडतो. कुंडात बाराही महिने पाणी असते. त्यामुळे ते वन्य प्राण्यांचे आवडीचे ठिकाण आहे. गडगा नदी पुढे त्याच पर्वतांच्या खोऱ्यातून वाहत जात तापीला मिळते.

बेलकुंडचे वनविश्रामगृह पूर्णतः दगडाचे आहे. ते 1891 साली बांधल्याची शिळा इमारतीवर स्पष्ट दिसते. ती वास्तू भरभक्कम आहे. तिचे जोतेच चार-पाच फूट उंचीचे आहे. वास्तू उत्तरमुखी आहे. गडगा नदी तिच्या उजव्या बाजूला म्हणजे पूर्वेला वाहते. ती पुढे वळसा घेऊन पश्चिमेकडे वाहत जाते. विश्रामगृहाच्या थोडे पुढे, मुख्य रस्त्यावर पन्नास फूट उंचीचा सुंदर व मजबूत असा पूल आहे. तो 1886 मध्ये बांधलेला आहे. तसा माहितीवजा ओतीव लोहपट तेथे उत्तम स्थितीत आहे. गडगा नदीचा भक्कम प्रवाह पावसाळ्यात जेव्हा पुलाच्या कमानीखालून वाहतो तेव्हा त्याच्या आवाजाचा गडगडाट त्या खोऱ्यात मावत नाही !

विश्रामगृहाच्या मागे कोणा एकाची मजार आहे. बेलकुंडपासून पंचवीस किलोमीटरच्या परिसरात कोणतीही मनुष्यवस्ती नसली तरीही तेथे अनेक हिंदू-मुस्लिम भाविक आवर्जून दर्शनाला येतात. भाविकांना मार्गदर्शन करणारी व इतर सोपस्कार करणारी एक प्रसन्न व्यक्ती तेथे आहे. पांढरे स्वच्छ धोतर, सदरा व टोपी असा पोषाख त्या व्यक्तीचा नेहमी असतो. ती व्यक्ती म्हणजे गणपतराव सोळंके. गुळगुळीत दाढीमिशा. गंभीर चेहरा ! ते सदैव मदतीस तयार असतात. त्यांचा जडीबुटीचा व औषधी वनस्पतींचा अभ्यास आहे. ते औषधी वनस्पती वर्षातील विशिष्ट दिवशी गोळा करतात. वेडसर वाटणाऱ्या बाया व इतर व्याधींनी ग्रस्त मंडळी इलाज करण्यासाठी त्यांच्याकडे येतात. ते जडीबुटीबरोबर मंत्रतंत्रानेही उपचार करतात.

गडगेचे कुंड विश्रामगृहाच्या बाजूने जाणाऱ्या हरिसाल मार्गावर आहे. कुंडाकडे जाण्याच्या मार्गावर दोन मंदिरे लागतात. त्यांतील एकाबाहेर शंकराचा त्रिशूळ व बाजूने बेलाचे झाड आहे. त्या परिसरावर लिहिलेल्या सुंदर व समर्पक कवितेचा फलक तेथे दिसतो-

हिरवे हिरवे रान पसरले, डोंगर माळांनी जणू वेढले
त्यात उभे हे कुंड चिमुकले, नयनी बघता भान हरपले !

देवळाच्या मागील दरडीवरून कुंडाकडे सरळ, खोल एक पायवाट जाते. नवख्यांना त्या पायवाटेवरून उभ्या उभ्याने उतरणे अशक्य ! खडकाच्या खोबणीत पाय रोवून, हाताने खडक धरून खाली उतरताना कसरत करावी लागते. त्या खडतर उतरणीनंतर मात्र डावीकडे बघितले, की कुंडाचे दृश्य रमणीय दिसते. कुंडावरील खडकावर प्रवाहाच्या वेगवान गतीमुळे गोलसर खोल झऱ्या पडल्या आहेत. त्या मार्गाने फिरत येत गडगेचा फेसाळ प्रवाह दहा फूटांवरून कुंडात पडतो. तिन्ही बाजूंनी दहा फूट उंचीच्या ‘सी’ च्या आकाराच्या उभ्या कडा व मध्ये साठ फूट व्यासाचे शांत कुंड. त्या सौदर्यांत भर म्हणजे कुंडाच्या मागील बाजूला बेलकुंड पुलाची बुलंद दरवाज्यासारखी दिसणारी भव्य कमान !

विजय इंगोले 9049844964  vtingole@gmail.com

—————————————————————————————————————————-

About Post Author

3 COMMENTS

  1. खुप छान माहीती.
    लगेच उठावं.बँग भरावी
    निघावं चिखलदरा…असं वाटतं.

    फार छान लेखन.

  2. खूपच छान वर्णन केले आहे. ते वाचून तिथे गेलेच पाहिजे असे वाटू लागते. अमरावतीहून नक्की जाता येईल. मनापासून धन्यवाद.

  3. बेलकुंड एक नवीन माहिती समजली
    खूप छान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here