नव्वदीच्या ‘तरूणांचे’ टेबल टेनिस!

    0
    28

    .. वंदना भाले

         प्रौढांच्या टेबल टेनिस स्पर्धा जागतिक पातळीवर होतात, हे ठाऊक आहे तुम्हाला?.

         जागतिक पातळीवर आयोजित करण्‍यात येणा-या टेबल टेनिस स्‍पर्धांमध्‍ये वंदना भाले यांनीही भाग घेतला. त्‍यासाठी चीनमध्‍ये गेल्‍यानंतर त्‍यांना दिसली ते आयोजनाचे अथक परिश्रम आणि स्‍वतःची ताकद जगाला दाखवण्‍याची कसोशी…


    जागतिक स्पर्धेतील अनुभव

    -वंदना भाले

         प्रौढांच्या टेबल टेनिस स्पर्धा जागतिक पातळीवर होतात, हे ठाऊक आहे तुम्हाला?.

         गतवर्षी जागतिक प्रौढ टेबल टेनिस स्पर्धांचे आयोजन चीनचा प्रदेश असलेल्या परंतु ‘इनर मंगोलिया’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागात- ‘हो हॉट’  या प्रांतात केले गेले. मी त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेले होतो. मी गेली चार वर्षे या स्पर्धांत भाग घेत आहे. भारतातून साधारणपणे अडीचशे लोक येतात.

         दर दोन वर्षांनी वेगवेगळ्या देशांत या स्पर्धा गेली सुमारे पंचवीस वर्षे भरवल्या जात आहेत. स्पर्धेचा कालावधी सात दिवसांचा असतो. मधला एक दिवस स्थानिक प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी मोकळा ठेवला जातो. चाळीस वर्षांपुढील व्यक्ती त्यात सहभागी होऊ शकतात. सर्वात वयस्क खेळाडू नव्वदीच्या पुढचे असतात. परंतु त्यांचा उत्साह तोंडात बोट घालायला लावतो. काहीजण तर व्हिलचेअरमध्ये बसूनसुध्दा खेळतात! खेळाडूंना मिळणारा प्रतिसादही हृद्य असतो. सगळे वातावरण चुस्त असते.

         भारतामधून जाणार्‍या खेळाडूंची निवड ‘व्हेटरन इंडियन्स टेबल टेनिस असोसिएशन’मार्फत होते. भारतीय संस्थेचा वर्षभराचा कार्यक्रम इंटरनेटवर जाहीर होतो. तो पाहून प्रत्येक खेळाडूने आपण कोठल्या इव्हेंटमध्ये सहभागी व्हायचे ते ठरवायचे असते अर्थात सहभागासाठी आवश्यक ते स्पर्धात्मक कौशल्य सिद्ध करावे लागते.

         ‘हो हॉट’ येथील स्पर्धेमध्ये साधारणत: सात हजार स्पर्धक सहभागी होते. ‘चीन’बद्दल असणारे आकर्षण व त्यामुळे चीनला भेट देण्यास निमित्त हे एक एवढ्या मोठ्या सहभागाचे ‘हो हॉट’ म्हणजे आपल्या नाशिक, नागपूर दर्जाचे शहर. पण रस्ते सहा-सहा पदरी, दोन्ही बाजूंना विस्तारलेले! त्यापलीकडे दुकाने, टपर्‍या, खाण्याची छोटी हॉटेल्स इत्यादी… रस्त्यांवर दिव्यांची प्रचंड रोषणाई. इमारतींवर भरपूर ‘निऑन साइन’स्. रंगीबेरंगी सजावट. अत्यंत आकर्षक. मनात आलं, या निमशहरी गावात यांना वीजेची एवढी चंगळ कशी काय परवडते!

         हॉटेल ‘हुआ चेन’मधे  गेल्या गेल्या गोर्‍या, हसतमुख मुलामुलींनी ‘नमस्कार’ म्हणून आमचं स्वागत केलं. प्रत्येक देशातून येणा-या पाहुण्यांचं स्वागत त्यांच्या भाषेतून होत होतं. पण बाकी त्यांची भाषा म्हणजे सगळा नुसता आकार, उकार! मग प्रत्येक ग्रूपबरोबर इंग्रजी येणारे एकदोघेजण असायचे. ते रात्री बारा वाजेपर्यंत स्पर्धकांच्या अडीअडचणींतून त्यांची सुटका करत. कारण इंग्रजी बोलणारा तो ‘गाइड’वजा माणूस वगळला तर बाकी कुणालाच स्थानिक सोडून इतर भाषा येत नव्हत्या.

         पहिला दिवस स्वागत समारंभाचा. साधारणत:  पंधरा हजार चौरस फुटांच्या प्रचंड मोठ्या सभागृहात हा कार्यक्रम होता. दोनेक हजार मुलेमुली त्यात सहभागी झाली होती. पाहुणे आत शिरताच प्रत्येकाला अननसाचे पारंपरिक पेय छोट्याशा ग्लासमधे देत होते, एकदाच. कार्यक्रमाला जवळजवळ दहा हजार माणसे उपस्थित होती. प्रत्येकाची बसण्याची आरक्षित खुर्ची होती. पाहुणापाहुणी जरा घोटाळले की तिथे स्वयंसेवक हजर होत असे. कुठेच गडबड, गोंधळ, गर्दी जाणवत नव्हती. प्रत्येक गोष्टीत डोळ्यांत भरत होता तो नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, आखीवरेखीवता. भोंगळपणाचा पूर्ण अभाव मनात ठसत होता. सभागृहात अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था, उत्तम ध्वनियोजना. मोठमोठे पडदे दोन बाजूंना लावलेले, त्यांवर चाललेला कार्यक्रम दाखवत होते. आपल्याप्रमाणे, सरकारी अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी यांची उठबस मात्र जरा जास्तच आहे असे वाटून गेले.

         पारंपरिक नृत्य, गायन, वेगवेगळ्या कसरती-कवायतीं… असा भरगच्च कार्यक्रम; दोन तास खिळवून ठेवणारा!  प्रत्येक गोष्टीत जाणवत होता तो आत्मविश्वास; जगाला आपली ताकद दाखवण्याची संधी त्यांना सोडायची नाही हे अधोरेखित होत होते.

         स्पर्धांची सुरूवात दुसर्‍या दिवशी झाली. एका हॉलमधे पन्नास टेबले, असे पाच हॉल. तसेच, सरावासाठी स्वतंत्र कक्ष. सकाळी सात वाजल्यापासून, तो सर्वांना खुला होता. हॉटेल ते हॉल दर तासाने, नेण्याआणण्यासाठी वाहनाची सोय. स्वच्छ, प्रशस्त आवार. कुठलाही कोपरासुध्दा दुर्लक्षित नव्हता. प्रत्येक गोष्ट सुविहीत!

         इथे प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे कुठलीही गोष्ट करण्याचे चिनी लोकांनी मनावर घेतले, की ती ‘यशस्वी’च होणार. त्यासाठी अथक परिश्रम करणार. सगळ्या कामांत स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता.

         प्रत्यक्ष स्पर्धांमध्ये सुमारे दोन हजार चिनी खेळाडू सहभागी झाले होते. त्यांचे प्रशिक्षक आम्हाला भेटले. गप्पांमधे बोलताना म्हणाले, की जरी दोन हजार स्पर्धक इथे आले आहेत तरी त्या तोडीचे अजून पाच हजार खेळाडू आमच्याकडे तयार आहेत. त्यांतील कुठलाही खेळाडू काही कारणाने खेळू न शकल्यास त्या क्षमतेचा दुसरा खेळाडू आम्ही स्पर्धेत उतरवू. आमच्या प्रशिक्षणात सर्वांत महत्त्वाचे आहे ते एका तोडीचे अनेक खेळाडू तयार करणे.

         आम्ही मुलांच्या क्षमतेचा अंदाज वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपासून घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात करतो. त्यांचा सराव आठ-दहा वर्षे कडक शिस्तीत रोजचे बारा बारा तास चालतो. त्या काळात पालकांना त्याची चिंता नसते. त्यांची शाळा, राहणे, खाणे याची व्यवस्था केली जाते. त्यांनी कसे, कुठे, किती खेळायचे याचा निश्चित कार्यक्रम असतो. त्यात प्रशिक्षक सोडून इतरांना हस्तक्षेप करण्याची मुभा नसते. सर्व नियोजनबद्ध असते आणि प्रत्येकाला ती शिस्त पाळावीच लागते. त्यामुळे वैयक्तिक क्षमतेचा पुरेपूर विकास संभवतो.

         जागतिक पातळीवर एखाद्या खेळात चीनने भाग घेतला तर त्याचे खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करतात. ही शिस्तबद्ध, नियोजित सराव शिबिरे त्यांच्या यशात प्रभावी ठरतात, असे वाटते.

    वंदना भाले
    भ्रमणध्वनी
    : 9960100500

    {jcomments on}

    About Post Author

    Previous articleनायपॉल यांचे वक्तव्य ‘पोलिटिकल’
    Next articleपाबळचा विज्ञानाश्रम
    दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.