नवरात्र : देवीच्या नऊ अवतारांची पूजा

_devi_9_Avatar_1.jpg

हिंदू धर्मात सणवार आणि व्रतवैकल्ये यांची योजना ऋतुमानानुसार केली गेली आहे. त्याचप्रमाणे कुळधर्म-कुळाचारांचीही आखणी निसर्ग, ऋतू, ग्रह-नक्षत्रे यांच्या स्थितीनुसार आणि प्राचीन पौराणिक संदर्भांनुसार करण्यात आली आहे. आश्विन महिन्यातील ‘नवरात्र’ त्या त्या कुळधर्म हा घराण्याच्या कुलस्वामिनीशी निगडित आहे. शरद ऋतूतील आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजर्‍या होणार्‍या देवी नवरात्रोत्सवास ‘शारदीय नवरात्र’ असे म्हणतात. चातुर्मासाच्या काळात म्हणजेच आषाढ ते आश्‍विन अशा चार महिन्यांच्या काळात सर्व देवदेवता निद्रिस्त असतात असे मानले जाते. देवीला त्या निद्रिस्त अवस्थेतून जागे करण्यासाठी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. असुरी शक्तींचा प्रकोप जेव्हा वाढतो तेव्हा दैवी शक्ती जागृत होते आणि आसुरी शक्तींशी युद्ध करून त्यांचा बीमोड करते. दैवी शक्तीचा असुरी शक्तीवरील विजयाचा उत्सव म्हणजे नवरात्र. त्या दैवी शक्तींची म्हणजेच देवीची नऊ रूपे आहेत. देवीच्या नऊ अवतारांची नवरात्रात पूजा, उपासना केली जाते. ब्रह्मदेवाने त्या नवदुर्गांचे महात्म्य वर्णन केले आहे :

१. शैलपुत्री- नगाधिराज हिमालय हा देवीचा परम उपासक होता. त्याने आदिमातेची तपश्चर्या करून आदिमातेला प्रसन्न करून घेतले आणि ‘तू माझी कन्या हो’ अशी विनंती केली. देवी स्वतः जगन्माता असूनही दयाळू असल्याने तिने हिमालयावर प्रसन्न होऊन, त्याच्या पोटी कन्या रूपात अवतार घेऊन हिमालयाची विनंती मान्य केली. हिमालयाची कन्या म्हणून तिला ‘शैलपुत्री’ असे नाव पडले.

२. ब्रह्मचारिणी – सत्-चित्-आनंद स्वरूप असे जे ब्रह्म आहे ते प्राप्त करून देणारी देवी म्हणजे ‘ब्रह्मचारिणी’ होय. ब्रह्म म्हणजे वेद, तत्त्व, तप यांनुसार ती वेदस्वरूप, तत्त्वरूप आणि तपोमय आहे. ‘ब्रह्मपद’ प्रदान करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी होय.

३. चंद्रघंटा- देवीच्या हातातील घंटाही चंद्राप्रमाणे तेजस्वी, निर्मल आणि नादमधुर आवाजाने आल्हादकता निर्माण करणारी आणि चंद्राप्रमाणे लावण्यमयी अशी आहे, म्हणून त्या देवीला ‘चंद्रघंटा’ असे संबोधले जाते.

४. कुष्माण्डा – कुष्मा आणि अण्ड अशा दोन शब्दांनी मिळून कुष्मांडा शब्द तयार झाला आहे. कुष्मा म्हणजे तप्त असा संताप आणि अण्ड म्हणजे संसार, विश्व, जगत. या विश्वातील विविध तापत्रय, त्रास, असुरी शक्तींचा नायनाट करून या विश्वाचे, संसाराचे रक्षण करणारी दैवी शक्ती म्हणजेच कुष्माण्डा होय. तसेच, कुष्मांण्डा म्हणजेच कोहळा होय. देवीला तो  विशेष आवडतो. म्हणून चण्डीयागाच्या वेळी होमहवनात कोहळा अर्पण केला जातो.

५. स्कन्दमाता- स्कन्द म्हणजे कार्तिकेय. कार्तिकेयाच्या वीर्यापासून निर्माण झाल्यामुळे सवत् कुमाराला ‘स्कन्द’ असे नामाभिधान मिळाले. ‘भगवान सनतकुमार: तं स्कन्द इति आचक्षते’ अशी श्रुती छांदोग्य उपनिषदात आहे. कार्तिकेय, षडानन, स्कन्द अशी एकूण अठ्ठावीस नावे सनतकुमार यांची आहेत. त्यांचा उल्लेख ‘प्रज्ञाविवर्धन’ स्तोत्रात आढळतो. अशा महाज्ञानी योगींद्रांची, कार्तिकेयांची माता ही स्कंन्दमाता म्हणून ओळखली जाते.

६. कात्यायनी- प्रत्यक्ष देवांनीच त्यांच्या कार्यसिद्धीसाठी भगवती देवीला आवाहन केले की ती कत ऋषींच्या आश्रमात प्रकट झाली. तेव्हा कत ऋषींनी तिचा त्यांची कन्या म्हणून स्वीकार केला. ती देवी कुमारिका आहे. कत ऋषींच्या गोत्रातील म्हणून ‘कात्यायनी’ हे नाव तिला पडले. ‘देवकार्यसमुधता’ असा त्या देवीचा ललिता सहस्रनामांत उल्लेख आहे.

७. कालरात्री – ‘राति भयं ददाति रति रात्रि:’ कालालाही जेथे भय वाटावे अशी ही कालरात्री देवी होय. रौद्र रूप असलेली, तपश्चर्येमध्ये रममाण झालेली आणि संहारकारक अशी जी तामसी शक्ती आहे तिला ‘कालरात्री’ म्हणतात. नंतर काल हा संहारकारक, प्रलयकारक अशा महाकालालाही भीती निर्माण करून त्याचा ती देवी नाश करते, म्हणून तिला कालरात्री हे नाव पडले.

८. महागौरी –  योगाग्नीने शुद्ध झालेली, हिमालयापासून निर्माण झालेली अशी ही देवी कुन्देन्दुशुभ्रवर्णाप्रमाणे (चंद्राप्रमाणे) शुभ्र, धवल तेजस्वी आहे. म्हणून ती महागौरी. शिवपुराणातही त्यासंबंधी एक कथा आहे. एकदा भगवान शंकरांनी पार्वतीला तिच्या सावळ्या रंगावरून चिडवले असता पार्वतीला राग आला. तिने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि गौरवर्णाचे वरदान मागितले. तेव्हापासून पार्वतीला महागौरी असे नाव रुढ झाले.

९. सिद्धिदा- मानवी जन्माची सिद्धी चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध झाल्याने पूर्ण होते. पुरुषार्थाची कृतार्थता मोक्षाने होते आणि तसा मोक्ष व सिद्धी प्राप्त करून देणारी देवी म्हणजे ‘सिद्धीदा’ होय. ती अष्टसिद्धी आणि कर्माची फले देणारी देवी आहे. अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व अशा अष्टसिद्धी आहेत. त्या देवीच्या उपासनेने या सिद्धी प्राप्त होतात, अशी ही सिद्धी देवी होय.

अशा या नवदुर्गांच्या उपासनेने त्या त्या शक्ती प्राप्त होतात. नवरात्रीचा हा काळ पर्वकाळ असतो. त्या पर्वकाळात नवदुर्गांचा शक्तिस्त्रोत प्रभावी असतो, म्हणून त्या पर्वकाळात केलेली देवी उपासना फलदायी ठरते.

नवरात्रीचे नऊ दिवसांचे नऊ रंग ही संकल्पना अगदी अलीकडची आहे. म्हणजे गेल्या दहा वर्षांतील आहे. ते एक प्रकारचे आत्ताच्या आधुनिक काळातील फॅडच आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ ह्या वृत्तपत्राने केवळ प्रसिद्धी आणि खप व्हावा म्हणून हा प्रकार सुरू केला असे नुकतेच माझ्या वाचनात आले. रंगाच्या ह्या संकल्पनेला कोणताही पौराणिक आधार नाही असे मला वाटते. कारण माझ्या वाचनात, अभ्यासात त्याविषयी काही आले नाही.

– प्रज्ञा कुलकर्णी, pradnyakulkarni66@gmail.com

About Post Author