नवरात्रातील तुणतुणे परंपरा (Tuntune Tradition In Konkan)

4
41
तुणतुणे परंपरा चालवणारे प्रकाश
रसाळ आणि संतोष यादव
 कोकणातील  नवरात्रोत्सवाचा अविभाज्य भाग म्हणजे नऊ दिवस तुणतुणे घेऊन आरती म्हणत गावागावातून फिरणारे देवीचे भुत्ये. भुत्ये हे सरवदे समाजाचे लोक असतात. संगमेश्वर तालुक्यात ती परंपरा चारशे वर्षांची आहे. सरवदे समाज संगमेश्वर तालुक्यातील देवळे ह्या गावाला लागून असलेल्या चाफवली ह्या गावात राहतो. त्यांची आडनावे पुढील प्रमाणे असतात रसाळयादवमोरेरणसेसुर्वेभागवतकेतकर. गावात त्यांची एकूण अठ्ठावीस घरे आहेत. ती सरवदेवाडी म्हणून ओळखली जाते. वाडीतील प्रत्येक घराला तालुक्यातील गावे वाटून दिली आहेत. त्या कुटुंबातील लोक नेमून दिलेल्या त्याच गावात भुत्याच्या वेशात जाऊन नवरात्रातून तुणतुणे परंपरा चालवतात.

ती परंपरा शहाजी राजांनी सुरू केली. त्यामुळे त्या समाजाचे शहाजी राजे हे दैवत आहे. सरवदे समाज हा मूळ खेडयेथील रसाळगडावरील. रसाळ, यादव आडनावाचे त्यांचे काही नातलग आजही त्या गडावर वास्तव्य करून आहेत. ते तेथेही तुणतुणे परंपरा चालवतात. शहाजी राजांनी त्या समाजाची नेमणूक बहुरूपी म्हणून केली होती. त्यांच्या काळात त्या समाजाचे लोक कोणते ना कोणते रूप घेऊन गावागावातून फिरत आणि शत्रूची माहिती काढून आणत. त्यामुळे त्या काळात ते लोक गुप्तहेर म्हणून प्रसिद्ध होते. कालांतराने, शहाजी राजांनी त्यांची नेमणूक महसूल गोळा करण्यासाठी केली. त्यांना महसूल गोळा करणारे अधिकारी म्हणून ताम्रपत्रे देण्यात आली. प्रत्येक घराण्याने त्याचे त्याचे ताम्रपत्र पदवी प्रमाणे जपले आहे. सरवदे समाज हा वर्षातून गोळा होणार्‍या महसूलापैकी एक हिस्सा स्वत:ला ठेऊन उर्वरित तीन हिस्से शहाजी राजांकडे जमा करत असत. शहाजी राजांनंतर स्वराज्यात शिवाजी राजांनी आणि संभाजी राजांनी सरवदे समाजाच्या त्या कामात कोणताही फेरबदल केला नाही. ती परंपरा थेट पेशवेकाळापर्यंत तशीच सुरू होती.     

पेशवाईच्या अस्तानंतर आलेल्या इंग्रजांनी मात्र त्या परंपरेत बदल केला आणि नवरात्रातील केवळ नऊ दिवसांचा महसूल सरवदे समाजाकडे ठेवण्यास परवानगी दिली. त्यामुळे उर्वरित तीनशेछपन्न दिवसांचा महसूल इंग्रजांना द्यावा लागत असे. त्या समाजापुढे त्या कारणाने चरितार्थाचा मोठा प्रश्न प्रथमच उभा राहिला. स्वातंत्र्यानंतर तीही प्रथा बंद पडली आणि तुणतुणे परंपरा तेवढी सांस्कृतिक स्वरूपात सुरू राहिली.              

       

सरवदे समाजाची दैवते
 सरवदे समाजाची प्रमुख दैवते नऊ आहेत – भैरी देवी, भवानी देवी, वाघंबर, काळकाई देवी, रूपाजीबाबा, इटलाई देवी, सात आसरा देवी, पितरबाबा आणि ब्राह्मण. तो समाज शंकराचाहीउपासक आहे. नवरात्रातील नऊ दिवस ते कवड्यांची माळ गळ्यात घालतात. नऊ दिवस ते लोक त्यांना नेमून दिलेल्या गावात जाऊन राहतात. त्यांचा मुक्काम ग्रामदेवतेच्या देवळात असतो. ग्रामदेवतेचा मानकारी त्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय पाहतात. देवळात सकाळी आरती गाऊन त्यांच्या दिनचर्येला प्रारंभ होतो. तेथून ते मग गावातील घरे घेण्यास सुरुवात करतात. नऊ दिवस संपूर्ण अनवाणी पायांनी ते गावात फिरतात. नऊ दिवस अभक्षभक्षण आणि अपेयपान पूर्ण वर्ज्य करतात. प्रत्येक घरात जाऊन घरातील देवासमोर आरती म्हणतात. सायंकाळ झाली की पुन्हा ग्रामदेवतेच्या देवळात जावून संध्याकाळची आरती म्हणतात. ते गळ्यात कवड्यांची माळ, डोक्यावर कवड्यांची अथवा गांधी टोपी, खांद्याला अडकवलेला देवीचा देव्हाराहातात तुणतुणेधोतर-कुर्ता असा त्यांचा साधा वेश असतो. पुढे, धोतर-कुर्त्याची जागा शर्ट-पँटने घेतली.

इंग्रजांच्या काळापासून महसूल प्रथेवर मोठा परिणाम झाल्यामुळे चरितार्थाचा बिकट प्रश्न त्या समाजापुढे उभा राहिला. त्यामुळे त्यांना नवरात्र काळात केलेल्या सेवेबद्दल धान्य देण्याची प्रथा सुरू झाली. त्यांना घरटी पायलीभर भात मिळत असे. परंतु भुत्ये ते भात नवरात्रात न घेता तुळशीविवाहानंतर गोळा करत. त्यासाठी ते सोबत तीन-चार माणसे नेत आणि धान्याची पोती स्वगृही आणत. धान्य गोळा करण्याच्या त्या प्रथेला त्यांच्या समाजात उकळ’ असे म्हणत.

          पण आता उकळ केलेले धान्य नेण्यासाठी पुन्हा गावात जाणे अवघड झाले. माणसेही मिळेनाशी झाली. शिवाय सरवदे समाजाने स्वत:ची थोडी फार शेती असल्यामुळे आणखी धान्य आणण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे आता उकळ ही रोख व्यवहाराने होते. गावात प्रत्येक चुलीमागे पन्नास रुपये असा व्यवहार ठरला गेला आहे. मात्र आता ती पद्धतही मागील पाच वर्षांपासून पूर्ण बंद झाली आहे. तुणतुण्याची परंपराच काही गावांतून बंददेखील झाली आहे. ती परंपरा चालवत असलेली सध्याची पिढी आता ज्येष्ठ झाली आहे. त्यामुळे ज्या गावातील भुत्ये वयोवृद्ध झाले किंवा ज्यांचे निधन झाले त्या गावात आता नव्याने, त्या समाजातील कोणी तरुण भुत्या होऊन येत नाहीत. सरवदे समाजातही पुढील पिढी सुशिक्षितउच्चशिक्षित झाली आहे. त्यांना चांगल्या नोकर्‍या मिळाल्या आहेत, त्यांनी स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत आणि ते आता शहरांमधून स्थायिक झाले आहेत. त्यामुळे ही तुणतुणे परंपरा येत्या दशकात अस्ताला जाईल अशी भीती सरवदे समाजाने व्यक्त केली आहे.

(माहिती सहाय्यक – प्रकाश रसाळ)

– अमित पंडित 9527108522   

ameet293@gmail.com

अमित पंडित हे शिक्षक आहेत. ते दैनिक सकाळमध्ये पत्रकारिताही करतात. त्यांची सात पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते विविध वृत्तपत्रे व मासिकांमधूनही लेखन करतात.

—————————————————————————————————–

About Post Author

4 COMMENTS

  1. सर,इतकी खोलवर माहिती या समाजाची कोणालाच नसावी. तुमच्यामुळे सर्वाना ही माहिती मिळाली. धन्यवाद!

  2. खूप वेधक माहिती इंग्रजांचे डोके कसे चालत असे पाहा.. विचार करूया आपल्या संस्कृती लोकपरंपरेत महसूल गोळा करणे किती कष्टदायक असेल.

  3. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. वाचकांचे प्रतिसाद, अभिप्राय लेखकांना पुढील लेखनासाठी प्रोत्साहित करतात. त्या दृष्टीनं आपला अभिप्राय महत्वाचा आहे. पुन्हा एकदा धन्यवाद !

  4. खूप छान माहीती आहे मी गोंधळी आहे मी graduate आहे तरीसुद्धा मी माझ्या वडिलांबरोबर देवी घेऊन जातो गोंधळ घालतो मला खूप अभिमान आहे गोंधळी असल्याचा

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here