धर्मांतील एकता : काकाचीवाडी (All Religion Diwali in Kakachiwadi)

2
65

काकाचीवाडी येथील पीर

   काकाचीवाडी हे एक छोटेसे गाव सांगली जिल्ह्याच्या वाळवातालुक्यात आहे. गावामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात. स्वतंत्र ग्रामपंचायत, अंगणवाडी ते चौथीपर्यंत शाळा, बिरोबा मंदिर-हनुमान मंदिर व त्याची यात्रा, मोहरम यांसारखे सण अशा वैशिष्ट्यांनी युक्त असे हे गाव आहे. गावाच्या सरहद्दीमध्ये येणारा माळीसमुदाय गावाबाहेर त्यांच्या स्वतःच्या शेतात घरे बांधून पूर्वीपासून राहत आला आहे. बागणी हे अडकित्त्यांसाठीप्रसिद्ध गाव जवळच आहे. वारणा नदी चार-पाच किलोमीटर अंतरावरून वाहते.

          काकाचीवाडीमध्येमुस्लिम समाज संख्येने बऱ्यापैकी मोठा आहे. त्यांची वस्ती गावाच्या पूर्वेस, पश्चिमेस व उत्तरेस आहे. गावात तकिया म्हणून प्रसिद्ध देवस्थान आहे. काकाच्यावाडीतील सर्व जाती-धर्माचे लोक ते देवस्थान मानतात. दरवर्षी मोहरमवेळी निघणारी पीर सवारीगाजते. सर्वधर्मीय लोक ती अगदी मनापासून मानतात. काकाचीवाडी गावाची लोकसंख्या चार हजार आहे. त्यात अकराशे मुस्लिम आहेत. मराठे पंधराशे, धनगर आठशे, माळी सहाशे अशी बाकी समाजरचना आहे.

संबंधित लेख – बागणी, काकाचीवाडी – एकत्र आणि विभक्त !(Communal harmony is the common feature of two neighbouring villages- Kakachiwadi and Bagani, Maharashtra)

 

गावात पाणी घेण्यास जात असताना पीर सवारी

 अशी प्रथा आहे, की सवारी प्रत्येक दारी जाऊन पाणी घेत असते. अर्थात, सवारी घेऊन येणाऱ्या व्यक्तींच्या पायावर पाणी घालणे, धूप घालणे असा विधी असतो. व्यक्तीच्या ऐपतीप्रमाणे गोड-धोड येणाऱ्या लोकांना प्रसाद स्वरूपात दिले जाते. तीच प्रथा गावाप्रमाणेच काकाचीवाडी सरहद्दीत येणाऱ्या जुना बावची रोड इकडे राहणाऱ्या माळी समाजाच्या बाबतीत आहे. नागाव रोड, आष्टा रोड, पांढरी मळा अशा ठिकाणच्या माळी समाजातही ती प्रथा सुरू आहे. सवारी गावात व मळ्यात प्रत्येक दारी पाणी घेत असतात.

          वैशिष्टय म्हणजे मोहरमवेळी खत्तल रात्रीशाकाहारी गोड नैवेद्य पिरांना दिला जातो. तेथेही कोणता भेद नसतो. मोहरमनंतर काही दिवसांतच रोटबनवण्याची पद्धत मुस्लिम समाजात दिसते. रोट हे गव्हापासून तयार करून भट्टीत भाजले जातात. त्यांचे प्रसाद म्हणून फार महत्त्व आहे. ते रोट गावात व मळ्यातील प्रत्येक घरी दिले जातात. तशीच प्रथा ईद-ए-मुबारक या सणा वेळीही दिसते. लोक त्यांच्या जवळच्या इतर समाजातील लोकांना घरी खीर खाण्यासाठी बोलावतात अथवा त्यांना घरी खीर पोचवून देतात.

 

       दिवाळी हा हिंदूंचा महत्त्वाचा सण. अगदी गरिंबापासून श्रीमंतांसाठीही ते आनंदाचे दिवस. करंजी, चकली, चिवडा, लाडू वगैरे पदार्थ कोणाला नाही आवडत? काकाचीवाडी व माळी समाजातील लोक दिवाळीतील पदार्थ मुस्लिम समाजात आनंदाने घरी जाऊन देत असतात. त्यांना घरी फराळासाठीही बोलावणे होते. हिंदूंमध्ये रोट केले जात नाहीत तर मुस्लिमांकडे दिवाळीचे पदार्थ बनत नाहीत. म्हणून ते पदार्थ घरोघरी पोचवण्याची पद्धत पडली असावी.

 

          दोन्ही सणांच्या माध्यमातून हिंदू व मुस्लिम पूर्वीपासून समन्वयाने, आनंदाने काकाचीवाडीमध्ये राहतात. रोट व दिवाळीच्या पदार्थांची देवाणघेवाण त्यांच्या आपापसातील प्रेमाचे उदाहरण होय. सण हे केवळ निमित्तमात्र आहे पण माणुसकी हा त्यांना बांधणारा दुवा आहे. समाजात धार्मिक अढी दिसत नाही; पक्ष कोणताही सत्तेवर असला तरी सामाजिक एकात्म भाव व्यक्त करणाऱ्या या कोणत्याही प्रथा बंद होत नाही. लोकांच्या मनात सहिष्णुता भरली गेली ती या सणांनी, देवाणघेवाणीने!

नगिना माळी 89752 95297 naginamali2012@gmail.com

नगिना सुभाष माळी या काकाचीवाडी येथे राहतात. त्यांनी राज्यशास्र, समाजशास्र आणि अर्थशास्र या विषयांत एम.ए तसेच, शिक्षणशास्त्रात पीएच.डी मिळवली आहे. त्या सध्या शिवाजी विद्यापीठात (कोल्हापूर) शिक्षणशास्र अधिविभागात कार्यरत आहे. त्यांचे संशोधनपर लेख राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांना गायनाची आवड आहे. त्यांचे लेखन वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असते.

 

———————————————————————————————————

तकिया
मोहरमप्रसंगी हिंदू -मुस्लिम ऐक्य

——————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. अतिशय छान लेख. माळी समाज गावाबाहेर का राहतो ते समजले नाही.

  2. सामाजिक सद्भावना जपण्याची अशी परंपरा अनेक गावात आहे. मात्र हिंदु मुस्लिमांसह इतर समाजघटकातील एकात्मभाव वाखाणण्यासारखा आहे. डॉ. नगिना यांनी लेखन सुंदर समरसून केले आहे. त्या ऐतिहासिक संदर्भांची आणखी भर घातली असती तर लेख आणखी वाचनीय, रोचक बनला असता. असो. लेखनाच्या चांगल्या प्रयत्नासाठी खूप अभिनंदन व शुभेच्छा …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here