धनगरवाडा – जखडलेल्या जगण्याचे आत्मकथन

1
50
_Dhangarwada_JakhadelyaJagnyacheAatymakathan_1.jpg

धनंजय धुरगुडे यांचे ‘माझा धनगरवाडा’ हे धनगरी अन् एकूणच, मराठी साहित्यातील मैलाच्या दगडाचे आत्मकथन आहे. तो पट एका कुटुंबाचा नव्हे, तर मेंढरे राखणाऱ्या धनगर समाजाच्या प्रातिनिधीक चरित्राचा आहे. तो अस्वस्थ करणारा आहे. मेंढपाळ, मेंढरे, माळ हा मराठी साहित्यासाठी; चित्रकला, संगीत आणि फोटोग्राफी यांकरता ‘दुरून डोंगर साजरे’ असा भुरळ घालणारा विषय. तो संशोधकांनाही वर्ज्य नाही. आडरानात मेंढरे राखत असलेल्या फिरस्त्या धनगराला जाता जाता पांथस्थ सहज विचारतो, ‘कुठल्या भागातली मेंढरं?’ क्षणभरासाठी का असेना, पण त्या पांथस्थाला व प्रत्येकाला वाटून जाते, ‘खरेच मस्त! असे असायला हवे जगणे.’ ‘बनगरवाडी’ लिहिणाऱ्या व्यंकटेश माडगूळकर यांनादेखील मेंढरे सहा महिने तरी राखायची होती! सर्वांच्याच मनात ती इच्छा कमीजास्त काळासाठी असते. पण ज्यांच्या नशिबी तोंडात रिकिब घातलेल्या घोड्यासारखे जीवन जन्मापासून आलेले असते त्यांनाच माहीत असतात धनगरांचे हाल! पायांना चाके लावून परमुलखातील भटकंतीचे जगणे आहे ते.

महाराष्ट्रात लोकसंख्येने जवळपास बारा टक्के असलेल्या धनगर समाजात शिक्षणाचे प्रमाण इतरांच्या तुलनेत अल्प. वस्तीला गावकुसात असला, तरी मुळात तो भटका समाज, वर्षातील सात-आठ महिने मेंढरे चारणीसाठी, गाव सोडून दूर परमुलुखात जात असतो. अपवादानेच, त्यांचा महिना-दीड महिन्याचा एखाद्या गावात मुक्काम. त्यामुळे त्या समाजात लहान मुलांचे शिक्षण अर्ध्यावरच संपून जाते. खंडी-दीड खंडी मेंढरे राखण्यासाठी तीनचार माणसांची गरज असते. दिवसभराचे मेंढरांपाठीमागचे भटकणे, दिवसातून एखाद्याने गावातून बाजारहाट, दळण आणणे, अन्यथा एका ठिकाणी कसला तो विसावा नाही. या सर्व गोष्टींमधून झालेले आरोग्य अन् स्वच्छता यांच्याकडे दुर्लक्ष. रात्रीचे मुक्काम गाव, वर्तमानपत्र अन् लोक यांच्यापासून दूर, निलांड्या (निर्मनुष्य) रानात. त्यामुळे विकास अन् बदल यांच्या अनुषंगाने कोणाशी कसलाही संवाद नाही. कोठलाही आजार उद्भवला, जखम झाली अथवा अपघात घडला तर जवळची हळद सोडल्यास तातडीचा वैद्यकीय इलाज नाही. त्या उपर उन्हाची झिट, थंडीची बाधा, निसर्गातील उकल न झालेले चमत्कार यांमुळे समाजाच्या मनात तयार होत असणारी शरणागत परात्मता… या सर्व गोष्टी आधुनिकतेपासून दूर असल्यामुळे, त्या समाजात शिक्षण अन् विज्ञान यांचा प्रसार झालेला नाही.

धनगर समाजातील शिक्षित तरुण त्यांचे जगणे आत्मकथनातून तर कधी कांदबरीतून गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून मांडू लागले आहेत. त्यांपैकी ‘रोहन प्रकाशना’तर्फे प्रकाशित धनंजय धुरगुडे यांचे ‘माझा धनगरवाडा’ हे, धनगरी अन् एकूण मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरावे असे आत्मकथन आहे. त्याने सातवीपर्यंतचे शिक्षण जूनपासून सप्टेंबरअखेर जन्मगावात तर; दिवाळीनंतर मात्र आईवडिलांसोबत, मेंढ्याचारणीला सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील एकसर या गावात घेतले. रानातील वाड्यापासून रोज किमान पाच-सहा किलोमीटरचे आरतपरतचे (जाऊन परत येणे) चालणे, वस्तीवर आल्यावर मेंढरे- वाघरे लावून वाड्यात बैजवार घालणे, जमेल तेवढी घरच्यांना मदत करणे, आई भाकरी करत असताना, रात्री कधी तीन दगडी चुलीच्या उजेडात- कधी लख्ख चंद्राच्या प्रकाशात – कधी काजव्यांच्या लुकलुकाटात अभ्यास करून वर्गातील पहिला नंबर राखणे… त्यातून आकारास आलेली एका कष्टाळू मुलाच्या शिक्षणाची ही गाथा केवळ त्याची एकट्याची नाही वा एका कुटुंबाची नाही, तर मेंढरे राखणाऱ्या धनगर समाजाचीच प्रातिनिधीक कथा आहे, ‘माझा धनगरवाडा’. त्याचे कुटुंब कसे आहे? त्याच्या आयुष्याला लागलेली ती पायपीट किमान मुलांच्या तरी वाट्याला येऊ नये म्हणून चारणीसाठी मेंढरे घेऊन परमुलुखाला जाणारा बाप, डोक्यावर धनगर पाटी घेऊन सावलीसारखी सोबत करणारी आई, वय वाढण्याआधीच शहाणपण आलेला थोरला भाऊ, जिच्या भविष्याचा कोणी विचारच केला नाही, कळायला लागल्यापासून हाताखाली काम करण्यात जी वाकबगार आहे, बोलता येत असूनही जी मुकीच राहिली आहे अशी बहीण अन् ज्याचे दुधाचे दातही अजून पडले नाहीत, जो दगड, माळ अन् ढेकळे यांतून चालताना हरघडी ठेचकाळत आहे असा लहान भाऊ. प्रत्येक धनगराचे कुटुंब व त्यांतील माणसे कमीअधिक तशीच असतात.

धनगर समाजाचा वर्षानुवर्षें चाललेला स्थलांतराचा अथक प्रवास आहे तो. वाटेवरील दगडधोंडे, रिकामी शेते अन् डोंगर हे त्यांचे सोबती- सगेसोयरे. प्रत्येक ठिकाणाशी निगडित असतात धनगरांच्या आठवणी. एखादा म्हातारा धनगर मेंढरे राखताना, एखाद्या अटंग्या (दूरवर पसरलेला माळ/जंगल) माळावर मरतो. गाव तर पाठीमागे पडलेले असते. सोबतीला चारणीला आलेली मेंढरे- त्यांना तेथे ठेवून प्रेत कशाला घेऊन जायचे मागे, म्हणून त्याला तेथेच पुरले जाते. समोरचा माळ उरावर दगड ठेवून तुडवायचा असतो. नंतर मेंढरे राखण्यास जाताना तो गाव आठवत राहतो. पुढे वहिवाटीतून त्या जागेवर मुक्काम पडतात. ‘राखण्या’ म्हणून कमरेएवढे देऊळ तयार होते. ‘तुझी नदर असूदे आमच्यावं’ म्हणूनचा तो नवीन देव होतो, धनगरांचा. दलित अभ्यासक डॉ. कांचा इलय्या सांगतात तसे, धनगरांची एकूण सांस्कृतिक विरासत, त्यांचे देव, मिथके, गोष्टी, ओव्या, परिभाषा, रीतिरिवाज, पेहराव पूर्वापार, प्रचलित संस्कृतीपासून वेगळे आहेत. लेखक त्याच्या अनुभवातून इलय्यांच्या विधानाला पुष्टी देतात.

भटक्या-विमुक्तांनी गावे वाटून घेतल्यासारखी प्रत्येक मेंढक्यांची (मेंढपाळ व्यावसायिक) गावेसुद्धा ठरलेली असतात. कोणी कोणाच्या गावशिवारात मेंढरे फिरवायची नाहीत, ठरलेल्या पांदीतून मेंढरे घेऊन जाताना वाटेवरील लिंब-बाभळीची झाडे वडसायची (त्या झाडांच्या फांद्या/पाला न छाटणे) नाहीत. परमुलुखात जगताना मुर्वतीने राहायचे, ‘न्हाय आक्का, न्हाय दादा’ म्हणून दिवस काढायचे; इतकेच काय, परक्या गावाला त्यांचीच गावपांढर समजायचे. त्या गावच्या जत्रेची वर्गणी द्यायची, तरीही नमूनच राहायचे. लेखक नमूद करत नाही, पण सहनशीलतेलाही अंत असतो! तसे काही झालेच, तर त्या गावची वाट मोडायची. एकूणच, मेंढपाळाने निमूटपणे जगताना सर्वांना आपलेसे करण्याचे तत्त्वज्ञान त्यांच्या जगण्यातून अंगीकारलेले असते. धनगरांमध्येही प्रकार आहेत. पाऊसपाणी अन् चारा असलेल्या भागात वर्षभर बाहेर असलेले ‘फिरते धनगर.’ डोंगरात-गडपरिसरात गुराढोरांसह मेंढरे पाळणारे ‘मस्का धनगर,’ चार-आठ गावांत राहून रिकाम्या रानात रातीला मेंढरे बसवणारे ‘बसकी धनगर’… वाचताना अशी नवीन माहिती मिळत जाते.

धनगरी अनुभवाचे ज्ञान चारशे पानांच्या या पुस्तकात प्रत्येक पानावर वाचकाला सहज मिळते. धनगरी परिभाषेतील शब्द वाचक नव्याने ऐकतो, शेरडामेंढरांच्या आचळेला कास अन् कासेतील धार काढण्यासाठी वापरलेले जे भांडे त्याला ‘कासांडी’ म्हणतात, असे अनेक शब्द वाचनात येतात. असे शब्द मराठीत वापरात आल्यास रूढ होत गेल्यास भाषा समृद्ध होईल. सालप्याच्या बिरोबाच्या रात्रीच्या जत्रेचे वर्णन बहारदारच! आजोबा बापू आता वय वाढल्याने सलग मेंढरे राखत नाहीत, कधी गाव- कधी कोठला देव, जत्रा तर कोठला पै-पावणा करत मुक्त फिरत असतात; लेक-सून अन् नातवंडे यांची आठवण आली, की चालत, मजल-दरमजल करत कोठे महाबळेश्वरच्या रानात वस्तीवर येतात, त्यांचे व्यक्तिचित्रण सुंदरच झाले आहे.

मला वाटते, बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा अन् संघर्ष करा’ या आदेशातील ‘शिका’ हा पहिला धडा तरुण धनगरी लेखकांनी गिरवायचा असे ठरवले आहे. पण त्यांनी संघटित होण्यासाठी समाजाचाही विचार करायला हवा. सोबत, त्यांच्याकडून त्यांच्या जवळचे नैसर्गिक आणि हाकेला ओ देणारे मित्र कोण याचा विचारही व्हावा. दूरगामी बदलासाठी संघर्ष कोणी एकटे करत नाहीत. त्यामुळे त्यांनी समदु:खी इतर समाजही पाहवा.

परिघावरील सर्व लेखकांनी त्यांच्या लिखाणातून समाजातील निरक्षरता, अंधश्रद्धा, बालविवाह, मुलींच्या शिक्षणाविषयीची अनास्था, आपसातील वैर, तरुणांत वाढणारी व्यसने यांचाही ऊहापोह करायला हवा आहे. अनुभवाचे संचित, पर्यावरणाबद्दलची आस्था, सांप्रदायिक सद्भावना, स्त्री-पुरुष समानता ही धनगरी व्यवहारातील शक्तिस्थळे- त्यांचा जोरकस उच्चार केला तर धनगरी साहित्याचा समृद्ध प्रवाह मराठी साहित्यात तयार होणार आहे.

लेखक : धनंजय धुरगुडे
प्रकार : आत्मकथनात्मक 
प्रकाशक :  रोहन प्रकाशन
पृष्ठं : 388
किंमत : 400रु
 
– आनंद विंगकर

anandwingkar533@gmail.com

‘दिव्य मराठी’वरून उद्धृत, सुधारित-संस्कारित

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.