देशवंदना

0
16

१५ ऑगस्ट. स्वातंत्र्यदिन. थिंक महाराष्ट्रच्या कार्यकर्त्या ज्योती शेट्ये कर्जत-चौकजवळच्या इर्शालगडावर गेल्या होत्याउध्दव ठाकरे यांच्या दुर्गभरारीचे ध्वजारोहण तेथेही झालेत्यांच्या या भटकंतीत त्यांना दिसले ते वास्तव आणि जाग्या झाल्या काही जुन्या आठवणी…

देशवंदना

– ज्योती शेट्ये

चहू बाजूला छान स्वच्छ सूर्यप्रकाशात न्हालेला, गिरिशिखरे चमकणारा सुंदर, विशाल हिमालय होता. मनाने उत्साहित व आनंदी पण शरीराने थकलेले असे आम्ही, १५ ऑगस्ट १९८७ ला ‘रक्तवर्ण ग्लेशिअर’वर ‘शेलू’ आणि ‘कोटेश्वर’ अशा दोन शिखरांवर चढाई करण्यात आमच्या चमूचे सर्व सदस्य यशस्वी झाले होते. तिथे स्वातंत्र्यदिन साजरा करताना व राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना आमचा आनंद द्विगुणित झाला होता.

ही सुंदर आठवण निघण्याचे कारण म्हणजे  गेल्या आठवड्यात १५ ऑगस्टला सह्याद्रीच्या कुशीत ध्वजवंदन झाले त्या प्रसंगी मी हजर होते.

पहाटे पाच वाजता घर सोडले. डोंबिवली रेल्वेस्टेशनकडे जाणारा रस्ता, सर्व बंद दुकानांबाहेरच्या जागेत पेपरवाले आणि त्यांनी पसरवलेले पेपर यांनी गजबजला होता. गावाची लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढली आहे, त्या प्रमाणात ते पेपर असणार. पण एवढे लोक पेपर वाचत असतील असे पाहून बरे वाटले!  रेल्वेस्टेशनवर देशप्रेमाची गाणी वाजत होती. पुढेही सर्व स्टेशनांवर ही गाणी ऐकू येत होती.

सव्वासहा वाजता ऐरोलीहून आम्ही तिघेजण निघालो. सहाजण आदल्या दिवशीच गेले होते आणि पाच तरुण डॉक्टर्सची टीम मागून येणार होती. आम्ही साडेसात वाजता इर्शालगडाच्या पायथ्याशी पोचलो. पूर्वी इथे यायला केवढा आटापिटा करावा लागे. शेवटची कर्जत गाडी पकडायची. ट्रेकची गाणी गात, गप्पा मारत कर्जतला पोचायचे. मग चालत चौकला जायचे तिथे अंधार असेपर्यंत विश्रांती. मग धाब्यावर पोटपूजा करून गडाकडे कूच करायचे. आता बहुतेक सगळेच ‘वाहनधारक’ झालेले असल्यामुळे, घरापासून थेट पायथ्यापर्यंत गाडी! प्रगतीच म्हणायची ही.

चौकवरून आत आल्यावर प्रचंड जलाशय दिसला. हे होते मोरवे धरण, अलिकडेच काही वर्षांत बांधले गेलेले. त्याला बिलगून एक जुनी वाडी आणि इर्शालच्या पाय़थ्याशी नव्याने वसलेले गाव – नानिवली. धरणप्रकल्पग्रस्त विस्थापितांसाठी सरकारने वसवलेले. मोठी, नीटनेटकी घरे. एका मोठ्या पाण्याच्या टाकीतल्या पाईपमधून गावाला पाणीपुरवठा होतो. हे सर्व मला नवीन होते. गाव अजून पूर्ण जागे झाले नव्हते.

लगेच गड चढायला सुरूवात केली. वातावरण छान प्रसन्न होते. सुरेख पावसाळी हवा आणि हिरवीगार सृष्टी. खूप दिवसांनी असा योग आला होता. अर्ध्या वाटेवर थर्मासमधल्या चहाने आणि घरून आणलेल्या खाऊने जरासं क्षुधाशमन केले. उशीर होईल म्हणून कुठे हॉटेलमध्ये थांबलो नव्हतो. गडाजवळ म्हणजे इर्शालवाडीजवळ आल्यावर मोबाईलने ( ही आणखी प्रगती) वरच्या लोकांशी संपर्क साधला, तर कळले की बरोबर आठ वाजता झेंडावंदन झाले. सरकारी हुकूमावरून  तिथल्या शिक्षकांनी ही वेळ पाळली. सगळे सरकारी कर्मचारी सदैव वेळेची अशी बंधने पाळतील तर किती छान होईल! मी मनातल्या मनात तिथूनच सलाम केला. मग आम्ही पोचलो तेव्हा शाळेसमोर नुकताच झेडांवदन झालेला, झेंडा छान हवेत लहरत होता. इर्शालगडाच्या पायथ्याची ही ‘छोटी वाडी’ आता गावात रूपांतरीत झाली आहे. शाळा म्हणजे बाहेर एक मोठी पडवी असलेला हॉल आहे. आतमध्ये सर्व मुले आणि त्यांचे पालक बसले होते. शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे व पटसंख्या चौदा. खालच्या गावातून रोज वर येणारे दोन शिक्षक आहेत, एक शिक्षक – भाऊ पारधी, हे ह्या वर्षी इर्शालगडाचे दुर्गपालही नेमले गेले आहेत. दुसरे शिक्षक – स्वामी. हे मूळचे लातूर जिल्ह्याचे रहिवासी. शाळेची अवस्था ‘जाणीव’ ह्या संस्थेच्या मदतीमुळे चांगल्या रूपात आहे. त्यांनी खर्च करून शाळेचे रूप पालटले आहे. तेथे सरकारी नियमाप्रमाणे एक मोठी टाकी आणि स्वच्छतागृह बांधले गेले होते. टाकीचा काही उपयोग नाही कारण त्याला नळच बसवलेले नाहीत! स्वच्छतागृह कोसळून गेले आहे. कितीही तक्रारी केल्या तरी कोणी दादच देत नाही असे गावकरी म्हणाले.

शाळेच्या मुलांना ताटे आणि पाणी पिण्याची भांडी भेट देण्यात आली. चॉकलेटे वाटण्यात आली. तीन मुलांचा खास सत्कार करण्यात आला. एक मुलगा बारावी पास झाला. त्याला रोख एक हजार रुपये देण्यात आले. दोन मुले दहावी पास झाली. त्यांना प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात आले. हे सर्व ‘जाणीव’ तर्फे करण्यात आले. तुम्ही पदवी मिळवा. आम्ही तुम्हाला अजून मदत करू असे ‘जाणीव’ तर्फे उपस्थित असलेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितले. त्या मुलांच्या चेहे-यावर समाधान आणि कृतज्ञता होती. थोडा वेळ मुलामुलींचे खेळ घेण्यात आले आणि मग ती मुले आपापल्या घरी गेली.

नंतर आम्ही कपडे वाटण्यासाठी गावात फिरलो. प्रत्येक घऱात जाऊन आम्ही कपडे दिले. ‘जाणीव’ चे कार्यकर्ते गावातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येकाला त्याच्या परिस्थितीसकट ओळखत होते. सगळे कपडे चांगल्या अवस्थेत होते. त्यांमध्ये मुद्दाम निव़डलेले साड्या-पोलकी, पंजाबी ड्रेस आणि मॅक्सी/गाऊन यांचा समावेश होता. दोन घरांत नवीन सुना आल्या होत्या. त्यांच्यासाठी नवीन कपडे, पाचशे रूपये आणि शिलाईखर्चाचे पैसे असा अहेर दिला गेला. फारच विचारपूर्वक केलेले हे आयोजन होते.

‘जाणीव” ह्या संस्थेबद्दल खूपच सांगण्यासारखे आहे पण तूर्तास एवढेच सांगता येईल, की नवव्या गिरिसंमेलनात ज्या ‘दुर्गभरारी’ ह्या संस्थेची घोषणा करण्यात आली, तिच्या कार्याचा आरंभ इर्शालवाडीवर झाला. ही संस्था इथे गेली पंचवीस वर्षे काम करत आहे.

‘दुर्गभरारी’च्या योजनेचा भाग म्हणून ‘जाणीव’ही संस्था इर्शालवाडी गडाची पालक व भाऊ पारधी हे दुर्गपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. दुर्गपाल दरवर्षी बदलण्यात येईल. दुर्गपालाकडे नोंदणी बुक व ‘महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक देण्यात आले आहे. गडाला भेट देणा-या सर्वांची नोद ह्या बुकात होणार आहे. त्यांना दुर्गपालाकडून मार्गदर्शन, त्यांची राहण्या-खाण्याची व्यवस्था, नियोजित शुल्क आकारून होणार आहे. ‘जाणीव’तर्फे दरवर्षी १५ ऑगस्टला आणि २६ जानेवारीला ध्वजवंदन होतेच, ह्यावर्षी ते ‘दुर्गभरारी’चा शुभारंभ म्हणून झाले.

पावसाळा असल्यामुळे आम्ही गडावर गेलो नाही. वर एक गुहा आहे. हा गड टेहळणी बुरूज म्हणून, आजूबाजूला संकेत देण्यासाठी शिवकाळात वापरत होते. आम्ही वाडीपासून निघून गडाला प्रदक्षिणा घालून परत वाडीपाशी शाळेत आलो. आम्ही छान पाऊसवाटेने फिरलो. हिरव्या साम्राज्यात फेरफटका झाला. एका झ-यावर पाणीही प्यायलो.

प्रदक्षिणा झाल्यावर भाऊ पारधी यांच्या घरी मस्त जेवण मिळाले. तिथे पिकलेले तांदूळच जेवणात वापरले गेले होते. इथे फक्त भातपीक होते. अन्य वस्तू खालून, चौक इथून आणाव्या लागतात. इतकी वर्षे लोटली स्वातंत्र्य मिळून, पण अजून सर्वांपर्यंत अन्न, पाणी, वीज ह्या गोष्टी पोचल्या नाहीत. ह्या गावात सौरऊर्जेवर काही प्रमाणात वीज प्राप्त होते. इथल्या लोकांचे आरोग्यही बरे आहे.

सर्वांचा निरोप घेऊन साडेतीनच्या आसपास इर्शालवाडी सोडून निघालो. नरसिंह राज किटक, पाने, फुले ह्याबद्दलची माहिती सांगत होते. मोळी किटक चांगलाच लक्षात राहिला आहे. ऊन पडले म्हणून कॅमेरा चालू होतो का ते बघितले तर कॅमेरा चालू झाला होता. मग फोटो काढण्यासाठी मी थोडी मागेच राहिले. एकटीच विचारात हरवून, नजरेत हिरवा रंग मनात साठवत निघाले होते, तर एक बाई रॉकेलचा कॅन घेऊन घरी परत चालली होती, स्वातंत्र्य दिनाची भेट!  तिने विचारपूस करत छान गप्पा मारल्या.

मला वसईतल्या दिवसांची आठवण आली. आदिवासी मुलींच्या शाळेत रोज सकाळी आठ वाजता ध्वजवंदन होई आणि संध्याकाळी पाच वाजता समारंभपूर्वक ध्वज उतरवला जाई. पूर्ण शिस्तीत हा कार्यक्रम, शाळेचे सर्व दिवस अगदी रविवारीही पार पडतो. राष्ट्रगीत चालू असताना त्या परिसरातले लोक ऑफिस-स्टाफ, नोकर वगैरे सगळे स्तब्ध उभे राहतात, फार छान वाटायचे. असे रोज ध्वजवंदन करणारी महाराष्ट्रातली काय भारतातलीही ती एकमेव शाळा असेल.

ह्याच शाळेत असताना रोज सगळ्या शाळेत म्हटली जाणारी ‘प्रतिज्ञा’ माझ्या शालेय जीवनानंतर परत एकदा आयुष्यात आली. ही प्रतिज्ञा फार कोरडेपणाने फक्त उच्चारली जाते. मनापर्यंत पोचतच नाही. मी भारतीय आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत एवढे जरी सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोचले तरी कितीतरी फरक पडेल सगळ्यांच्या जीवनात.

१९८३ साली यूथ हॉस्टेल आणि हिमालय ह्या दोन सुंदर गोष्टी माझ्या जीवनात आल्या आणि मनाला एक विशाल परिमाण प्राप्त झाले. मी महाराष्ट्रात राहणारी भारतीय बनले. यूथ हॉस्टेलची सर्व पदभ्रमणे, राष्ट्रीय एकात्मता अभियाने, एन.सी.सी. गाईडचे कॅम्प आणि अगदी अलिकडचा आंतरराष्ट्रीय कलाकारांचा सहभाग असलेला कार्यक्रम… इथे सर्व राज्यांचे लोक भेटत गेले आणि आपण सारे एक आहोत ही भावना दृढ होत गेली, सर्व नाही पण काही सीमारेषांवर जाऊन जवानांना भेटण्याची संधीही यूथ हॉस्टेलमुळे मिळाली. सर्व जवान फक्त सीमारेषा नाही तर जिथे कुठे ड्युटी असेल तिथे प्राण पणाला लावून झटत असतात. त्यांच्यामुळे आपण इथे सुखात राहतो (आणि फक्त चर्चा करतो). त्या सर्वांसकट, सा-या बांधवांचा, राष्ट्राचा मानबिंदू आहे हा राष्ट्रध्वज! त्याला मनापासून वंदन करणे हे आपले कर्तव्य आहे असे मला वाटते. बाकी कर्तव्येही प्रत्येकाने पाळली पाहिजेत.

काही ठरवलेले नसताना अचानक ईर्शालवाडीत जाऊन ध्वजवंदन करण्याची आणि तिथल्या लोकांना पुन्हा भेटण्याची संधी मला मिळाली, ह्याचा मला खूप आनंद झाला.

चार वाजता आम्ही खाली धरणाजवळ आलो. धरणावर खूप लोक गाड्या घेऊन फिरायला आलेले दिसले. माथेरानचे पर्यटक असतील हे बहुधा. तिथेच आम्हाला ‘पिरवाडी’ला पण ‘जाणीव’ तर्फे ध्वजवंदन करण्याचा कार्यक्रम करणारे अन्य उत्साही कार्यकर्ते भेटले. त्यांना भेटून कारने आम्ही मुंबईकडे यायला निघालो.

ठाण्याला जाणारी रेल्वे पकडण्यासाठी आम्ही घणसोलीला उतरलो. नवी मुंबईतल्या सर्व टोलेजंग, देखण्या इमारती नजरेत भरतात. तिथली सर्व स्टेशनं पण भव्य, छान, स्वच्छ आहेत, पण ऐरोलीपासून ठाण्यापर्यंत पसरलेला कचरा, पक्क्या घरांच्या अपु-या मूलभूत सोयी असलेल्या घनदाट वस्त्या हेही ६३व्या स्वातंत्र्यदिनाचे वास्तव आहे, मन विषण्ण करणारे अजून खूप पल्ला गाठायचा आहे ही जाणीव करून देणारे!

– ज्योती शेट्ये

भ्रमणध्वनी : 9820737301

jyotishalaka@gmail.com

 

About Post Author

Previous articleजात म्हणे जात नाही!
Next articleरूईया कॉलेजचे श्रीपु स्मृतिदालन!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.