दु:ख, वेदना आणि मृत्यू

माझ्या पावणेतीन वर्षांच्या नातवाचे नुकतेच निधन झाले. त्याला ब्रेन ट्युमर झाला होता. तो अवघ्या दीड वर्षांचा असताना ब्रेन ट्युमरचे निदान झाले आणि त्यानंतर सव्वा वर्ष त्या लहानग्या जीवाने कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी लढत दिली.

माझे मन आक्रंदन करून मनातल्या मनात सतत विचारात राहिले होते, एवढेसे दीड-दोन वर्षांचे लहान पोर, त्याला ब्रेन ट्युमर का व्हावा? त्याने काय पाप केले होते? कुणाचे काय वाईट केले होते?

कुणास ठाऊक हे गूढ कसे उकलावे?

का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे?

पण या प्रश्नाला उत्तर नव्हते. तरी मनात दाटून आलेल्या दु:खाला वाट कशी करून द्यायची? मला रडता येत नाही. मी वाचत राहिलो. त्याच ओघात एका ग्रीक कवीची कविता समोर आली. कविता सेमोनायडीस या प्राचीन ग्रीक कवीची आहे. त्याचा कालखंड ख्रिस्तपूर्व ५५६ ते ख्रिस्तपूर्व ४६८ असा सांगितला जातो. त्याने ज्या काळात ही कविता लिहिली, त्या काळी ग्रीक लोकांचे पर्शियाबरोबर युध्द चालू होते. ते अनेक वर्षे चालले आणि त्यात प्रचंड प्राणहानी झाली. सेमोनायडिसच्या बर्‍याच कविता त्या युद्धाच्या संदर्भातल्या आहेत. प्राचीन ग्रीक वाड्मयामधे त्या गाजल्या. त्यातून सेमोनायडिसला प्रसिध्दी मिळाली.

सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ही कविता जरी प्राचीन ग्रीक वाड्मयामधील असली, तरी तिचा मथितार्थ भगवदगीते मध्‍ये भगवान श्रीकृष्णाने ‘सम्यक दृष्टी ठेवा, स्थितप्रज्ञ बना’ असा उपदेश करताना म्हटलेल्या ‘सुखदु:ख समे कृत्वा, लाभालाभौ जयाजयौ’ या ओळीशी मिळताजुळता आहे आणि भगवदगीता व सेमोनायडिसची कविता या दोन्हींना युध्दाची पार्श्वभूमी आहे!

झूस हा ग्रीक पुराणातला देव. त्याचे भाषांतर मी शिव असे करतो. ग्रीक भाषा हीदेखील इण्डोयुरोपीयन भाषाकुटुंबातली भाषाभगिनी आहे व तिचे मूळ वैदिक संस्कृतात आहे.

आयुष्यातला अंधार

अरे मुला, तो भयानक गर्जना करणारा झूस (शिव-पशुपती)

करत असतो सगळ्याचा शेवट, त्याच्या इच्छेनुसार

आपण मरू घातलेले, यमपाशाने बांधलेले

क्षुद्र जीव; विचारही करू शकत नाही त्याचा

 

आपण जगतो पशुवत, एकेक दिवस पुढे ढकलत

आपल्याला काय ठाऊक देवाच्या मनात काय आहे?

आपला विश्वास आणि आपल्या आशा सुटत नाहीत

जरी ते असतात अळवाच्या पानावरच्या थेंबासारखे

 

कुणी बघतात वाट नव्या दिवसाची

आशाआकांक्षांच्या पूर्तीची

पण वर्षांमागून वर्षे जातात उलटून

तरीसुध्दा आशा सुटत नाही कुणालाच!

 

करत असतात देवाची पूजा

म्हणतात, ‘दीर्घायुरारोग्य, धनधान्य प्रीत्यर्थम्’

पण देवाच्या मनात असते वेगळेच

कुणाला जख्ख म्हातारपण, कुणाला दुर्धर रोग

तर कुणी मरतात लढाईत;

सगळे जगत असतात मृत्यूच्या छायेत

 

कुणी मरतात समुद्राच्या लाटांमधे

जेव्हा येते एक प्रचंड त्सुनामी

तर कुणाचे जहाज बुडते, निळ्याशार पाण्यावर तरंगताना

कुणी करतात मरायचा विचार

लावतात गळफास मानेभोवती

त्यांना नसते पर्वा, उद्या उगवणार्‍या सूर्याची

 

प्रत्येक जीवात्म्याच्या नशिबी

असतात दु:ख, वेदना आणि मृत्यू

अरे माणसा, जरा माझे ऐक

भुलू नको जीवनातल्या सुखांना

आणि बडवू नकोस कपाळ

आयुष्यातील दु:खे भोगताना

(सेमोनायडिस यांची भाषांतरीत कविता या ठिकाणी ऐकता येऊ शकेल. ) 

अनिलकुमार भाटे
एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका

anilbhate1@hotmail.com

About Post Author