दायाद

carasol

ऋग्वेदात दाय हा शब्द श्रममूल्य किंवा श्रमाबद्दल बक्षीस अशा अर्थी आलेला आहे (१०.११४.१०). पण पुढे त्याचा उपयोग वारसा अशा अर्थी केला जाऊ लागला. जीमूतवाहनाने दाय शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे –

पूर्वस्वामिसम्बन्धाधीनं तत्स्वाम्योपरमे यत्र
द्रव्ये स्वाम्यं तत्र निरूढो दायशब्द: | (दायभाग १.४-५)

अर्थ – ज्या द्रव्यावर एखाद्या व्यक्तीची मालकी असते त्या द्रव्यावर, ती व्यक्ती मरण पावल्यावर तिच्याशी संबंध असल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे जे स्वामित्व येते, त्याला दाय असे म्हणतात.
पित्याच्या संपत्तीवर पहिला हक्क पुत्राचा असतो. तो क्रम दायभागाने पुढीलप्रमाणे मानला आहे – १. पुत्र, पौत्र, प्रपौत्र; २. विधवा, ३. कन्या, ४. कन्यापुत्र, ५. पिता, ६. माता, ७. भाऊ, ८. पुतण्या व ९. पुतण्याचा पुत्र. या सर्वांना बद्धक्रम दायाद असे नाव आहे.

बद्धक्रम दायाद यांच्या अभावी पुढील क्रमाने उत्तराधिकार ठरतो – १. सपिंड, २. सकुल्य ३, समानोदक, ४. सपिंडाहून भिन्न बंधू, ५. गुरू, ६. शिष्य, ७. सहपाठी व ८. राजा
सपिंड – पिंड शब्दाचे जीमूतवाहनाने केलेले विवेचन असे –

एक पुरुष त्याच्या जीवनकालात पिता, पितामह व प्रपितामह या तीन पूर्वजांना पिंड देतो. मग त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र त्याचा पिता व पित्याचे तीन पूर्वज यांच्या नावे स्वतंत्र पिंड करून, त्यांचा पुन्हा एक पिंड बनवतो व अशा प्रकारे पित्याचे सपिंडीकरण करतो. अशा रीतीने मृत पुरुष जिवंतपणी ज्या पूर्वजांना पिंड देत असे, त्यांच्याच पिंडात मृत्यूनंतर तो सहभागी होतो आणि पुत्राने दिलेल्या पिंडाचा त्याचा पिता व पितामह यांच्यासह उपभोग घेतो. अशा प्रकारे तो ज्यांना पिंड देतो व जे त्याला पिंड देतात, त्या अविभक्त दायादांना सपिंड असे नाव आहे.

सकुल्य – सपिंडांच्या अभावी दायभाग परिवाराची संपत्ती सकुल्यांना मिळते. तीन पूर्वजांना पिंडदान केल्यानंतर कुशाने हात स्वच्छ करण्याची पद्धत आहे. त्या वेळी जो लेप हाताला शिल्लक राहतो, तो प्रपितामहच्या पूर्वीच्या तीन पिढ्यांतील पितरांना देण्यात येतो. त्याचप्रमाणे प्रपौत्राच्या पुढच्या तीन पिढ्यांनाही पिंडलेप देण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे चौथ्या पिढीपासून सहाव्या पिढीचे वंशज यांना सकुल्य असे म्हणतात.

समानोदक – सकुल्यांच्या अभावी समानोदक दायाद होतात. समानोदक म्हणजे एकाच व्यक्तीला उदक देणारे किंवा त्याच्याकडून उदक घेणारे होत. त्यात वरच्या व खालच्या सात ते चौदा या पिढ्यांतील व्यक्ती येतात.

समानोदकांच्या अभावी क्रमाने सपिंडाहून भिन्न बंधू, गुरू, शिष्य व सहाध्यायी व त्यांच्याही अभावी ब्राम्हणांव्यतिरिक्त इतरांचे धन राजाला मिळते.

(संस्कृती कोशातील माहितीवर आधारित)

About Post Author