दहा वाजून दहा मिनिटांनी – संतोष हुदलीकर

1
30
_Santosh_Hudalikar_1.jpg

संतोष हुदलीकर. त्यांनी आठ वर्षांपूर्वी, 2010 साली दहाव्या महिन्यात दहा तारखेला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी दहा मान्यवरांच्या हस्ते दहा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील त्यांच्या स्वतःच्या दहा पुस्तकांचे प्रकाशन करून साहित्यजगतावर अनोखा ठसा उमटवला. त्यांच्या त्या उपक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झालेली आहे. त्यात ‘प्रासंगिका’ नावाचा नवीन साहित्यप्रकार समाविष्ट आहे. ते मूळ गझलकारही आहेत. ते त्यांच्या गझलेबद्दल लिहितात –

प्रहार माझी गझल, लोकहो- विचार माझी गझल,
लोकहो- आयुष्याची असह्य रणरण,
तुषार माझी गझल,
लोकहो- भट-गालिबच्या शहरामधली,
मिनार माझी गझल!

त्यांनी एकदा सलग चार रात्री बसून एकशेत्रेचाळीस शेर असलेली प्रदीर्घ लांबीची गझल लिहिली. तिची नोंद ‘Amazing World record’ मध्ये केली गेली आहे. पुढे, ती उत्स्फूर्तपणे दीडशे शेरांची झाली. त्या गझलेतील कडव्यांमध्ये काफियांची पुनरावृत्ती कोठेही नाही. त्यांचे ‘स्वल्प’ नावाचे पुस्तक रुबाईवर असून, त्यांनी ते मराठीत आणण्याचा कठीण आणि नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. त्यांनी 2018 सालात ‘द्वादश प्रकाशन’ हा आगळावेगळा उपक्रम राबवला. त्यांनी जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला दिमाखात पुस्तक प्रकाशन केले. प्रकाशनसमयी प्रत्येक महिन्यात अडीचशे ते तीनशे जण उपस्थित असत. नाशिकच्या ‘परशुराम साईखेडकर नाट्यगृहा’त पुस्तकाचे प्रकाशन होई. ‘द्वादश प्रकाशना’तील बाराव्या पुस्तकाचे प्रकाशन 1 डिसेंबर 2018 रोजी गुंफले गेले. बारावे पुस्तक आहे ‘कादंबरी’. तिचे नाव ‘जीर्णोद्धार’.

संतोष 1979 पासून रोज न चुकता काही ना काही लिहितात. संतोष सिव्हिल इंजिनीयर आहेत. त्यांनी नाशिकच्या शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत शिक्षण घेतले. ते नाशिकमध्ये कल्पक बिल्डर (contractor) म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा संचार लेखन, संगीत, वादन, चित्र, निवेदन, सूत्रसंचालन, वक्तृत्व, गायन, बांधकाम व्यवसाय, वास्तुशास्त्र, संख्याशास्त्र, समुपदेशन अशा विविध क्षेत्रांमध्ये मुक्त असतो.

त्यांची व्यवसायक्षेत्रातील सगळी कामे ‘चैत्र’ या नावाने चालतात. तेथेही त्यांनी त्यांच्या कविमनाची ओळख आणि साथ सोडलेली नाही. ते त्यांनीच बांधलेल्या ‘चैत्रदीप’ नावाच्या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहतात. त्यांच्या पत्नीचे नाव आहे चैत्रा. त्या माहेरच्या नयना पोळ. ऋजू व्यक्तिमत्त्व. मूर्तिमंत सकारात्मकता त्यांच्या रूपाने संतोष यांना लाभली आहे. चैत्रा हुदलीकर यांचे लग्नापूर्वीचे जीवन छत्तीसगडला गेले. त्यामुळे त्यांचा प्रयत्न मराठी भाषा नीट शिकण्या-वापरण्यापासून सुरू झाला. उत्तरोत्तर, त्या संतोष याच्या गझल-कवितांना उत्स्फूर्त आणि पहिली दाद देण्याइतक्या तयार झाल्या.  त्या स्वतः एम एस्सी आहेत. त्यांच्या वडिलांचे मामा, बाबा आमटे. त्यांनी बाबांचा सहवास अनुभवला आहे.

_Santosh_Hudalikar_2.jpgहुदलीकर यांचा मुलगा कौस्तुभ बी ई (सिव्हिल) झाला आहे. तोही त्याचा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय कंस्ट्रक्शन क्षेत्रात करत आहे. तो बासरी वाजवतो. मुलगी सोहा बारावीत शिकत आहे. तिने संतोष यांच्या महागझलेचे – ‘माझा पाऊस’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ चितारले आहे. हुदलीकर दाम्पत्याने नवे प्रयोग, नवे प्रयत्न मुलांना वाढवतानाही जाणीवपूर्वक केले. मुख्य म्हणजे त्यांना वाचनाची सवय लावली. त्यांचा प्रत्येक वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला. सोहाला तिचा वाढदिवस आदिवासी पाड्यावर जाऊन साजरा करताना वेगळा अनुभव मिळाला. संतोष यांनी ‘गंमतगाणी वाद्यवृंद’ ‘बालचमू’ निर्माण करून त्यांच्या मुलांबरोबर त्यांच्या मित्रांनाही कलाविष्काराची संधी दिली.

हुदलीकर यांचे सुखी समाधानी असे हे चौकोनी कुटुंब; पण त्या चौकोनात त्या चौघांव्यतिरिक्त बरेच काही सामावलेले आहे. हुदलीकर यांच्या गच्चीत ‘नाशिक कथालेखक संघा’ची स्थापना नुकतीच झाली. संतोष त्याचे अध्यक्ष आहेत. ती नामी कल्पना अमलात आणली शरद पुराणिक यांनी. संतोष यांना पदांचा हव्यास नसतो. खरे तर, ते कोणत्याही हव्यासापलीकडे गेलेले भासतात. संतोष यांच्या अंगी अनोखी स्थितप्रज्ञता जाणवते. त्यांची एकोणतीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या एकूण जीवनावर नियोजन, नावीन्य आणि लालित्य या त्रिसूत्रीचा प्रभाव आहे. घराच्या अंतर्गत रचनेपासून ते साहित्यनिर्मितीपर्यंत त्या नावीन्याचा ठसा जाणवतो.

संतोष यांना त्यांनी वेगळे काही केले तरच ते अधिक वेगाने पुढे जाऊ शकतील हा शोध लागला लहानपणी असावा. घरची गरिबी होती. वडील एसटीत होते. आईने सतत कामे करून घर चालवले. संतोष चौथीत असल्यापासून काम करत आहेत. ते शाळेपूर्वी आणि शाळा सुटल्यावर वर्तमानपत्रे विकून पैसे मिळवत असत. ते तो उद्योग जवळजवळ सहा वर्षें करत होते. बाकीची मुले पेपर विकताना ठरलेल्या बातम्या मोठ्या आवाजात ओरडत पेपर विकत. संतोष मात्र पेपर वाचून कोपऱ्यातील एखाद्या बातमीला त्याच्या आवाजात अग्रस्थानी आणत, – लोक त्याच्या बातमीकडे ओढले जात. म्हणजे अगदी ‘मुख्यमंत्र्यांचा राजीनामा’ अशी त्यांची घोषणा झाली तर लोक विचारत- कोठे आहे रे ती बातमी? संतोष आतमधील पानावर दाखवत असत- केरळच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा. ती हुशारी वर्तमानपत्राच्या खपासाठी होती खरी; पण त्यातून संतोष यांना नावीन्य आणि कल्पकता यांचे महत्त्व पटले असावे. नियोजन हे तर संतोष यांच्या रक्तात आहे. त्यांनी एस एस सी झाल्यावरच, बसून आयुष्याची आखणी केली होती. त्यात अगदी ‘मी लग्न 1991` साली करीन-बायकोचे नाव चैत्रा ठेवीन’ येथपासून ते आजवरच्या यशापर्यंत सारे प्रयत्न समाविष्ट आहेत. लेखक कलंदर असतो असे म्हणतात. हुदलीकर यांचा कलंदरपणा हा मुळातच आहे. त्यांनी त्याचेही रीतसर आखीव-रेखीव नियोजन केले. संतोष तबला लहानपणापासून वाजवतात. त्यांनी विसुभाऊ बापट यांच्या ‘कुटुंब रंगलंय काव्यात’साठी चार वर्षें तबलासाथ केली. ते उत्तम गातात. संतोष यांनी काही मालिकांसाठी शीर्षकगीते लिहिली, संगीतबद्ध केली, आठ मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगीते लिहिली, दोन चित्रपटांसाठी कथा-पटकथा-संवाद लिहिले. त्यांनी तीनशे पन्नास जाहिरातपटांचे लेखन केले आहे. त्यांची गाणी अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर, विठ्ठल उमप, सुरेश वाडकर, उदीत नारायण, अनुप जलोटा, अमनत्रिका, आनंदी जोशी, रवींद्र साठे आदी कलाकारांनी गायली आहेत. त्यांनी आनंद म्हसवेकर यांचे बोट धरून चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला. ते त्यांचे आयुष्य विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, नयनतारा अशा मंडळींनी समृद्ध केले असे म्हणतात. आनंद अभ्यंकर यांचे मैत्र त्यांना लाभले. त्यांनी भीमसेन जोशी, झाकीर हुसेन, प्रभाकर कारेकर, जितेंद्र अभिषेकी अशा दिग्गज मंडळींची मैफल कालिदास कलामंदिरात केवळ वीस रुपयांत नाशिककरांना एकेकाळी ‘अभिव्यक्ती’ संस्थेचा माध्यमातून ऐकवली आहे. त्यांचा पिंड नवे प्रयोग करत राहणे हा आहे. त्यांनी आपल्या मातीतील आणि संस्कृतीचे इंग्रजी संस्कारक्षम मुलांनी शिकावे असा आग्रह धरत इंग्रजी rhymes लिहिल्या आहेत. त्या गीतांच्या ऑडिओ व्हिडिओ सीडी काढल्या. त्यांनी त्यात मुलांसाठी animation च्या द्वारे अनेक कलात्मक गमतीजमती केल्या आहेत. त्यांचे ‘लिहिते व्हा’ हा संदेश देणारे पुस्तक लक्षणीय ठरते.

ते म्हणतात, “लाखो-करोडो लोकांचे विचार मनातून कागदावर उतरले तर मानसशास्त्रीय दृष्ट्या त्यांची वर्गवारी करून तज्ज्ञ मंडळींना अभ्यास करणे सोपे जाईल. अनेक प्रश्नांची उकल सापडेल. त्यासाठी लिहिता-वाचता येणाऱ्या प्रत्येकाने त्याचे विचार लिहून ठेवले पाहिजेत.” संतोष यांच्या ‘चैत्र बहुउद्देशीय संस्थे’तर्फे इंदिरानगर भागात गेल्या काही वर्षांपासून ते ‘चैत्र व्याख्यानमाले’चे आयोजन करतात. अनेक विचारवंतांची अनेक व्याख्याने तेव्हा नाशिककरांना ऐकण्यास मिळतात. त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या मान्यवरांचा ‘चैत्रगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान केला आहे. संतोष यांनी लेखकांना प्रोत्साहन देणारा ‘चैत्रसंवाद’ नावाचा पुरस्कार साहित्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘संवाद’ या संस्थेसाठी सुरू केला आहे. हुदलीकर यांनी त्यांचा ‘मृत्यू’ हा काव्यसंग्रह स्मशानात प्रकाशित केला.

_Santosh_Hudalikar_3.jpg‘मी थांब म्हणालो, तरी थांबला नाही! मृत्यूच्या मनात होते- भलते काही,
मी म्हटले, उधार दोन- चार क्षण दे रे, तो क्षणात म्हटला, ‘नाही, नाही, नाही,’

मृत्यूची जाणीव सतत जागती ठेवली, की जीवनाचे नवनवे अर्थ उलगडतात, मृत्यूपुढे विनम्र राहिले, की ताठ मानेने जगण्याचे बळ प्रामाणिकपणे कमावता येते, हेच खरे!

संतोष हुदलीकर यांच्या उपक्रमशीलतेतील प्रयोगांचा आणि नावीन्यपूर्णतेचा विचार केला, की जीवनातील अनेक सत्यांना स्पर्श करता येतो. तेव्हाच त्यांच्या शब्दांची अनमोल किंमत कळून येते. ते म्हणतात,

‘मी कधी कुणाशी स्पर्धा केली नाही. उत्सवात माझी कविता नेली नाही. ती नसेल विजयी झालेली कोठे –कधीही कोणापुढे शरणागतही झालो नाही.’

– संतोष हुदलीकर ९८२३०३८८२९/९९२२४१२२२६  hudlikarsantosh@gmail.com

संतोष हुदलीकर यांची प्रकाशित पुस्तके
अक्षरधून (महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाद्वारे प्रकाशित),
स्वल्प (मराठी रुबाईया), गंमतगाणी (बाल कविता),
कागदी नांव ओल्या कविता (गेय कविता), ऋतु संचिताचे (मुक्तछंद काव्य),
काळजाचे दार (गझलगीते), आर्त मनीचे (मुक्तक, चौपदी, रुबाईया),
हत्तीला बूट दे (बालकाव्यसंग्रह), काही ओली पाने (ललितगद्य),
ब्लॅक बोर्ड (स्फुटलेखन), my rhymes (इंग्रजी rhymes), खुली खिडकी (समग्र हिंदी),
पहिल्या रात्री (प्रासंगिका-एक नवा काव्यप्रकार), आशेचे झुंबर (मुक्तक),
मृत्यू (एक काव्यचिंतन- नाशिक स्मशानभूमीत प्रकाशन),
माझा पाऊस (जगातील सगळ्यात मोठी गझल),
‘प’ पर्यावरणाचा(पर्यावरणविषयक कवितासंग्रह)
द्वादश प्रकाशनातील 2018 साली प्रसिद्ध झालेली बारा पुस्तके
लिहिते व्हा, फगवी नेहरू आणि इतर कथा, उन्हाशय (एक विषयाशय….),
डोह माझा, स्कूल लाईफ, बैलनामा, जगू लागलोय पुन्हा, आतल्या आत मी, फंटूश गाणी,
मुक्त पावसाचा छंद, अंताचे हायकू, जीर्णोद्धार.

– अलका आगरकर alka.ranade@gmail.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.