तुम्हां तो शंकर सुखकर हो…

1
244
पंडित शंकर अभ्यंकर हे साताऱ्याचे. त्यांचा जन्म झाला तेव्हा वडिलांनी गडू आणि पळी वाजवली. तो जन्मनाद ही शंकरराव यांच्या पुढील ‘संगीत आयुष्या’ची नांदी ठरली ! त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ,” गुरुकृपेने संगीतात एवढे शिकलो की त्यावेळी मनात सुरू झालेली आनंदाची मैफल सुरूच आहे. या मैफलीला भैरवी नाही…”

पंडित शंकर अभ्यंकर हे साताऱ्याचे. त्यांची जन्मतारीख 19 मे 1934. त्यांची आई मुकी-बहिरी होती. त्यांचा जन्म झाला तेव्हा वडिलांनी गडू आणि पळी वाजवली. तो जन्मनाद ही शंकरराव यांच्या पुढील संगीत आयुष्याची नांदी ठरली ! वडिलांनी त्यांना शाळेत घातले नाहीपण वयाच्या चौथ्या वर्षी अब्दुल करीम खाँ यांच्याकडे मिरजेला सतार शिकण्यास नेले. त्यांनी तिकडे जाण्यापूर्वी खांसाहेबांना पत्र टाकले होतेपण त्या पत्रामध्ये वय लिहिलेले नव्हते. ते तेथे पोचले तर खांसाहेब म्हणाले, बहोत छोटा है बच्चा. इसको मैं क्या सिखाऊं…! लेकिन आये हो तो दो दिन रहो आरामसे … बम्मन होहम दाल-चावल देते है…तुम बाजुवाले कमरे मे पकाके खाओ…” ते राहिले… त्याची सतारीतील गती पाहून खांसाहेबांनी त्या लहान मुलाला सतारीचे प्राथमिक धडे दिले.

पुढे, चौदा वर्षे शंकर अभ्यंकर पंडित नारायणराव व्यास यांच्याकडे गुरुकुलात शिकले. नारायणराव आणि अभ्यंकर कराडला एका कार्यक्रमाला गेले. ते हॉटेलमध्ये चहा पिण्यास गेलेले असताना तेथील फोनोवर राधे कृष्ण बोल मुखसी’ ही, त्यावेळी गाजत असलेली नारायणरावांची तबकडी वाजत होती. ती रेकॉर्ड गिऱ्हाईकांच्या आग्रहाखातर सारखी सारखी वाजत होती. तसे चार-पाच वेळा झाल्यावरगल्ल्यावरून हॉटेलचा मालक वेटर पोऱ्याला निरागस रागावत म्हणाला, ‘अरे राम्या, किती वेळा लावतोसबुवांचा गळा बसेल ना- थोडा चहा शिंपड रेकॉर्डवर म्हणजे निदान त्यांचा गळा गरम राहील‘. तो पोऱ्याही चहाची किटली घेऊन फोनोजवळ गेला तेव्हा नारायणराव घाईघाईने उठले आणि त्याला अडवत म्हणाले, “अरे, ती माझीच रेकॉर्ड आहे. चहा नको शिंपडू तिच्यावर. ती रेकॉर्ड खराब होईल. मी तुम्हाला गाणे येथे प्रत्यक्ष म्हणून दाखवतो.” आणि मग नारायणरावांनी राधे कृष्ण बोल मुखसी’ गाणे सुरू केले.

शंकर अभ्यंकर यांच्या पोतडीत असे अनेक किस्से आहेत.

शंकररावांनी सूरश्री केसरबाई केरकर यांना अनेक वेळा तानपुऱ्याची साथ केली. मैफल सुरू होण्याच्या आधी केसरबाई ‘अनाऊन्सर’कडे चिट्ठी देत आणि त्यात ज्या सात-आठ लोकांची नावे असत ती माइकवरून जाहीर वाचण्यास सांगत. ‘अनाऊन्सर’ने ती नावे वाचली, की केसरबाई माइकवरून सांगत की “आता जी नावे वाचली त्यांतील कोणी या मैफलीला आलेले असतील तर त्यांनी ताबडतोब निघून जावे.” त्यात ऐकण्यास आलेले मोठमोठे गवई नि वादक असत. पण केसरबार्इंचा दरारा असा, की ते नमस्कार करून, मैफल सुरू होण्याच्या आधी निमूट निघून जात.

केसरबार्इंची शेवटची मैफल माधव आपटे यांनी आयोजित केली होती. आपटे यांना त्यांचा पेडर रोडवरील बंगला पाडायचा होतातेव्हा त्यांनी आप्तेष्टांना बोलावून केसरबार्इंचे गाणे ठेवले. त्या मैफलीचे निवेदक पु.ल. देशपांडे होते. त्या दिवशी केसरबाई पाच तास गायल्या. त्यांनी नंतर मुंबईत दोन कार्यक्रम केले आणि मंजुताई मोडक यांच्या सुनेला एके दिवशी सांगितले, की तंबोरा घेऊन जा. उद्यापासून मी गाणार नाही… आणि त्या त्यांचे देहावसान होईपर्यंत, पुढे दहा वर्षे गायल्या नाहीत. जे ग्रेट कलावंत असतात ते लोकांनी आता थांबा’ म्हणण्याच्या आधीच स्वतःहून थांबतात !

अभ्यंकर यांच्या पोतडीत रविशंकर यांच्या सतार वादनाचा असाच एक अफलातून किस्सा आहे. देवधरबुवांनी गिरगावच्या त्यांच्या देवधर संगीत विद्यालयात रविशंकर यांचे सतार वादन ठेवले. त्यांची इच्छा त्यांना अहमद जान थिरकवां यांच्यासारख्या उस्तादाने तबला साथ करावी अशी होती. म्हणून ते थिरकवां यांच्याकडे गेले आणि म्हणाले, की एक नवीन तरुण सितारिया आलेला आहे त्याला तुम्ही साथ कराल कातयारीचा आहे तो.” तेव्हा थिरकवां पटकन म्हणाले, “सब बडे बडे सितारिये तो चल बसे है, ये कौन आया हैजिसे मेरी साथ चाहिए?” पण मैफल सुरू झाली आणि रविशंकर यांनी सतार पंधरा मात्रांच्या पंचम सवारीत वाजवण्यास सुरुवात केली तेव्हा थिरकवा यांना सम सापडेना. पेशकार झाल्यावर ते म्हणाले, “कभी बजाया नही है मैने ऐसा… मै नही बजा सकता…” तेव्हा रविशंकर म्हणाले, मुझे मालूम था. मैने मेरा तबलिया लाया है. पण देवधरबुवांनी सांगितले, “रविशंकरहे थिरकवांसाहेब तुमच्या वडिलांसारखे आहेत. तीन तालांत घ्या आता… ती आज्ञा प्रमाण मानून रविशंकर यांची सतार आणि थिरकवांसाहेबांचा तबला याचा मेळ जमून ती मैफल रंगली !

अभ्यंकर कुटुंब ज्या घरात राहत होते ते पडण्यास आले होते. सगळे वासे मोडकळीस आले होते आणि भिंतीछप्पर डळमळीत झालेले होते. शंकरराव त्यांच्या वडिलांना नेहमी म्हणत, की हे घर केव्हाही कोसळेल, आपण दुसरीकडे राहण्यास जाऊया.’ पण दुसरीकडील भाडी परवडण्याएवढी ऐपत नव्हती. म्हणून वडील टाळाटाळ करत. एके दिवशी त्यांची आई सार्वजनिक हौदावर कपडे धुण्यास जाताना शंकरला खाणाखुणा करून म्हणाली, की थालीपीठ परतून घे आणि चिमणकडे जरा लक्ष दे… आई हौदावर गेली आणि शंकर पाळण्यातील चिमणला तसाच सोडून मित्रांबरोबर खेळण्यास शेजारच्या देवळाकडे पळाले. मुकुंद केळकर नावाचा मित्र पाच मिनिटांनी आला आणि म्हणाला, “अरे शंकर, तुला शोधण्यास तुझ्या घरी गेलो होतो तर तुझा भाऊ पाळण्यात उभा राहिलेला दिसला. त्याला घेऊन येऊ कापडेल बिडेल.” तर शंकर म्हणाले, “जा जा, घेऊन ये पटकन.” मुकुंदा तसाच पळाला आणि चिमणला देवळात घेऊन आला. त्याने चिमणला जमिनीवर ठेवले आणि त्याच क्षणी सगळ्यांच्या डोळ्यांसमोर घर कोसळले ! मोठा कडऽ कडऽऽ आवाज करत भिंतीछप्पर सगळे कोसळून पडले. केवळ दैवयोग म्हणून चिमण वाचला चिमणही पुढे सतारवादनात प्रवीण  झाले.

वयाच्या पंचविशीच्या आत आकाशवाणीवर सोलो सतारवादन प्रसारित होणारे दोनच कलाकार आहेत. पहिले, चिमण अभ्यंकर (शंकररावांचे बंधू) आणि दुसऱ्या झरीन दारुवाला. राष्ट्रपती राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतिभवनात सतारवादन करण्यासाठी चिमण यांना 1961 साली पाचारण केले होते. तेथे पोचल्यावर मैफलीचा सगळा इंतजाम झाल्यावर, राधाकृष्णन यांनी सेवकाला मैफलीचा हॉल बंद करण्यास सांगितले. हॉलमध्ये चिमण अभ्यंकर आणि घरगुती वेशात स्वतः राधाकृष्णन हे फक्त दोघे राहिले. चिमण यांना हा काय प्रकार आहे, ते कळेना. तेव्हा हसून राष्ट्रपती म्हणाले, की ‘आता मी तुम्हाला पखवाजची साथ करणार आहे. पण हे गुपित फक्त तुमच्या-माझ्यात ठेवा.’ राष्ट्रपतींनी पखवाजची साथ करण्याचे भाग्य मिळालेले चिमण अभ्यंकर हे एकमेव सितारिस्ट. राधाकृष्णन यांनी चिमण यांना निरोप देताना पाच हजार रुपयांचे भक्कम पाकिट त्यांच्या हातात ठेवले आणि आनंदाने हात दाबला !

संस्कृत विदुषी डॉ.कमल अभ्यंकर या शंकररावांच्या पत्नी. ‘वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षीही तुम्ही एवढे उत्साही आणि आनंदी कसे?’ या प्रश्नावर अभ्यंकर म्हणतात, “आनंदी राहण्यास पैसे पडत नाहीत आणि मी शाळेत न गेलेला माणूस गुरुकृपेने संगीतात एवढे शिकलो की त्यावेळी मनात सुरू झालेली आनंदाची मैफल सुरूच आहे. या मैफलीला भैरवी नाही…”

– महेश केळुस्कर 70662 74203

( पुण्यनगरी 10 एप्रिल 2022 वरून उद्धृत)

——————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. शंकर अभ्यंकर त्यांच्यावरील लेख आणि त्यांनी सांगितलेले किस्से इंटरेस्टिंग आहेत, लेख वाचून आनंद मिळाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here