तुकडोजी महाराजांची ग्रामगीता (Saint Tukdoji’s Gramgeeta)

0
328

तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला आणि महानिर्वाण 11 ऑक्टोबर 1968 रोजी झाले. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा महाराजांच्या जीवनातील काळ होता. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज सरकारच्या जुलमी सत्तेविरूद्ध त्यांच्या खंजेरीच्या आणि राष्ट्रीय भजनांच्या खड्या बोलावर जनजागृती केली. तेच तुकडोजी स्वातंत्र्योत्तर काळात स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी झटले. आदर्श ग्रामनिर्माण हे त्यांचे उद्दिष्ट होते. महाराजांनी अभंग, भजने, लहर की बरखा, सप्तसिंधू की लहरे या आणि अशा सुमारे पन्नास मराठी-हिंदी गद्यपद्य ग्रंथांची निर्मिती केली. त्यामध्ये सर्वांना सत्कार्याची जाणीव करून देणारा व आधुनिक युगातील संजीवनी बुटी समजल्या जाणाऱ्याग्रामगीताया ग्रंथाचा समावेश आहे. म्हणूनच, त्यास युगग्रंथ म्हणतात. तुकडोजी ग्रामगीतेत म्हणतात –

पुण्यक्षेत्र पंढरपुरी, बैसलो असता चंद्रभागेतीरी,
स्फुरू लागली ऐसी अंतरी, विश्वाकार वृत्ति ||
तेथे दृष्टांत होई अद्भूत, कासया करावी विश्वाची मात?
प्रथम ग्रामगीताचि हातात, घ्यावी म्हणे ||

तुकडोजी यांचे जन्म नाव माणिकदेव. पिता बंडोजी ऊर्फ नामदेव गणेशपंत इंगळे-ठाकूर-ब्राह्मभट. आई मंजुळादेवी. (जन्म अमरावतीनिकट यावलीला, 30 एप्रिल 1909 रोजी). आजोळ वरखेड. तुकडोजींचे नाव शाळेत घातले, पण त्यांचे एकांती ध्यान-धारणा आणि जनांमध्ये कविता-कीर्तने हे व्रत बालपणापासून होते. पोहणे, कुस्ती, अश्वारोहण असे त्यांचे छंद. त्यांच्यावर बालपणीच मातेबरोबर गृहत्याग करण्याची पाळी आली. त्यांचे अंतरंग वरखेड क्षेत्री नाथपंथी विदेही संत श्री आडकोजी महाराज यांच्या सहवासात फुलले. आडकोजी बाबा समाधिस्थ 1921 साली झाले. माणिकदेवांनी त्यानंतर प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांनी यावली येथे शिवणकाम करत मातेचा सांभाळ केला. त्यांनी 1925 मध्ये शिवणयंत्र विकून दानधर्म केला आणि रामटेकच्या अरण्याची वाट धरली ! त्यांना रामटेकवनात ध्रुवाप्रमाणे तपस्या करताना नारदाप्रमाणे एक अज्ञात महायोगी लाभले. त्यांनी स्वत:च्या योगगुंफेत तुकडोजींना हठयोग शिकवला. महाराजांनी 11 नोव्हेंबर 1968 रोजी दुपारी 4वाजून 58 मिनिटांनी देह ठेवला ! त्यांना छंदगायनाचा लळा चांदुरबाजारच्या विमलानंद भारती यांच्याकडून लाभला, यावलीच्या हणवंतीबुवांनी खंजेरीचे पाठ दिले. त्यांनी सातळीकोतळीकर महाराजांकडून योगासने आणि एकतारी यांसारख्या गोष्टी आत्मसात केल्या.

गांधी-विनोबांच्या चिंतनाचा सुरम्य काव्यात्म आविष्कार म्हणजे तुकडोजी महाराज यांनी उद्बोधलेली ग्रामगीताहा आहे. महाराजांनी साडेचार हजारांवर ओव्यांमधून त्यांचा विचार सविस्तर फुलवला आहे. गावा-गावातील जनता निरोगी, धष्टपुष्ट व सुखी असो हे तत्त्व मनी वागवून तुकडोजींनी ग्रामगीतालिहिली आहे. अर्पण पत्रिकेत तुकडोजी म्हणतात

मानवाची पूर्णता तुजसी | प्राप्त व्हावी मना वाटे |
म्हणोनी केली
ग्रामगीता’ | जागृत व्हाया ग्रामदेवता |

ग्रंथाची फलश्रुती महाराजांनी एका ओळीत केली आहे –

मित्रत्व वाढो त्रिभुवनी | तुकड्या म्हणे ध्येय हेचि |

त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ ग्रामनाथाला अर्पण केला आहे. भारत हा खेड्यांत वसला आहे. निव्वळ भौतिक झगमगाट असलेली महानगरे म्हणजे भारत नव्हे. साडेसात लाख खेडी आणि तेथील वैविध्यपूर्ण संस्कृती यांनी नटलेला ग्रामीण भाग, लोक- लोकांच्या चालीरीती आणि त्यांतील मागासलेपणा असा ग्रामीण भारत आहे. महाराजांनी ग्रामगीता त्या ग्रामीण भारतात राहणाऱ्या ग्रामनाथांच्या जीवनोत्कर्षासाठी लिहिली आहे. ग्रामोद्धार किंवा लोकोद्धार हा ग्रामगीतेच्या निर्मितीचा मथितार्थ आहे. म्हणून तुकडोजी यांच्या ग्रामगीता ग्रंथाच्या अर्पणपत्रिकेतील एकेक ओवी अतिशय महत्त्वाची आहे. ते अर्पणपत्रिकेत म्हणतात –

सर्व ग्रामासि सुखी करावे, अन्न-वस्त्र-पात्रादी द्यावे |
परि स्वतः दुःखचि भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा ||
तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकलांचे लक्ष तुजकडे वळो,
मानवतेचे तेज झळझळो, विश्वामाजी या योगे ||

          देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटून गेली तरी ग्रामातील ग्रामनाथाला सुखी करता आलेले नाही, ही भारत देशातील मोठी शोकांतिका आहे. सद्धर्म मंथन, लोकवशीकरण, ग्रामनिर्माण, दृष्टिपत्यिर्तन, संस्कारशोधन, प्रेमधर्म संस्थापन, देवत्वसाधन आणि आदर्श जीवन अशी ही अष्टाध्यायी गीता आहे. तो ग्रंथ 28 मे 1954 रोजी पूर्ण झाला. सुदाम सावरकर यांनी त्या ग्रंथाचे संपादन केले. प्रत्येक अध्यायाच्या समापनात महाराज म्हणतात, की हा गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत असा ग्रंथ आहे. ग्रामस्थ जनांनी लाभ घ्यावा या भावनेने सदरचा ग्रंथ विश्वरूपी गुरुदेवांना अर्पण केला आहे.ग्रामगीता या ग्रंथामध्ये एकूण आठ पंचक असून पहिल्या सात पंचकांमध्ये पाच – पाच आणि शेवटच्या आठव्या पंचकात सहा अध्याय असे एकूण एकेचाळीस अध्याय आणि चार हजार सहाशे चौऱ्याहत्तर ओव्या आहेत. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला विविध धर्मांतील थोर पुरुषांच्या प्रतिमांना स्थान दिले गेले आहे. तुकडोजी 1953 च्या आषाढी एकादशीला पंढरपूर क्षेत्री चंद्रभागेतीरी ध्यानस्थ बसले असताना त्यांना अद्भुत दृष्टांत झाला. विश्वाची मात करण्याऐवजी ग्रामनिर्माणाची संहिता का घेऊ नये, ग्राम हेच मानवमात्राचे प्रथम माहेर असून, मानवाचे वर्तन सुधारून गाव सर्वांगसुंदर करावे आणि त्याद्वारे विश्वाचे आदर्श चित्र प्रत्यक्षात आणावे हा त्यामागील संदेश होता. तुकडोजी यांनी विजयादशमीला (ऑक्टोबर 1953) ग्रंथलेखन प्रारंभ करून धावत्या प्रवासात मे 1954 पर्यंत क्रमाक्रमाने ओवी रूपात लिहून ग्रंथ पूर्ण केला. पहिल्या आवृत्तीचा अभूतपूर्व प्रकाशन सोहळा मे 1955 च्या गीता जयंतीच्या दिवशी, एकाच वेळी एक हजार गावांमध्ये श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या शाखांमध्ये पार पडला. ग्रामगीतेच्या पहिल्या आवृत्तीला भूदान यज्ञ चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची प्रस्तावना लाभली आहे. सोबत वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांचे दोन शब्द आहेत. त्याखेरीज अनेक नामवंत साहित्यिक मान्यवरांची विचारपुष्पे लाभली आहेत. त्यात वि.स. खांडेकर, स्वाध्याय मंडळाचे संचालक श्रीपाद सातवळेकर, कुलगुरू वि. भि. कोलते, ग. त्र्यं. मालखोडकर, अप्पासाहेब पटवर्धन, दीनदयाळ गुप्त, कुसुमावती देशपांडे, अच्युत नारायण देशपांडे, वा.वि. मिराशी, दि.ल. कानडेशास्त्री, बाबासाहेब खापर्डे अशांचा समावेश आहे.

गांधीजींनी तुकडोजींना सांगितले, की तुम्ही भजनांच्या माध्यमातून अहिंसा प्रचार-प्रसाराचे कार्य शिरावर घ्यावे. महाराजांची श्रद्धा अहिंसा विचारावर दृढ होती. गांधीजींच्या आशीर्वादाने तो विचार वज्रलेप झाला. महाराजांनी यात्रा-नवसातील पशुबळी थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. महाराजांनी तो विचार त्यांचे श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि अनेक सेवेकरी यांच्या मदतीने सर्वत्र पोचवला. महाराजांनी मोझरी आश्रमातील कृषी व्यवस्थापन, गोशाळा, छात्रावास या प्रकल्पांशिवाय इस्पितळ आणि प्रसृतिगृह यांसारखी सेवाकेंद्रे, नई तालीम देणारे विद्यालय, माध्यमिक शाळा, खादीविद्या प्रसार, तेलघाणी प्रकल्पही यशस्वीपणे राबवले; ग्रंथालय, प्रार्थनाभवन यांसारख्या ऊर्ध्वमुखी विधायक प्रवृत्तींनी आनंद वाढवला.

तुकडोजी महाराज इंग्रजी राजवटीला असुरी राजवट म्हणून संबोधत असत. तुकडोजींची कविता चळवळीची आहे. तत्कालीन जुलमांची चर्चा त्या कवितेतून येते. धार्मिकतेसोबत त्या कवितेला सामाजिकता आणि आर्थिकता यांचाही संदर्भ आहे. महाराजांनी गीतेचा कालसंगत अर्थ प्रतिपादला. त्यांच्या स्फूट भजनांमधून गीतेचा कर्मयोग प्रवाहीपणे वाहताना दिसतो. त्यांनी संतमहंतांनाही चळवळीत पाचारण केले. कर्मकांडाचा त्याग करण्यास प्रवृत्त केले. त्यांनी धुनी सोडा, चिमटे त्यजा, मुग्ध समाधीचा त्याग करा, खळांचा बीमोड करा. ही विश्रांतीची वेळ नाही. या आवाहनाने साधू समाज मुळापासून गदगदा हलवला. महाराज कुंभमेळ्यात गेले. त्यांनी विविध आखाड्यांतील संन्याशांशी संवाद साधला. त्यांच्या उपदेशाने प्रभावित होऊन अनेक अध्यात्ममार्गी साधुसंतांनी देशभक्तीचा वसाराष्ट्रोत्थानाचे व्रत घेतले.

ग्रामगीता या ग्रंथासंबंधी गाडगेबाबा म्हणतात – तुकडोजी बाबांची ग्रामगीता ही गीता-ज्ञानेश्वरीप्रमाणे जनतेला खरं ज्ञान देऊन खेड्यापाड्यांत- झोपडीझोपडींत सुख-समाधान पैदा करील असा भरवसा वाटतो. या ग्रंथापासून साध्याभोळ्या समाजाला ज्ञान मिळून, त्यांच्या हातूनच त्यांचं दु:ख-दैन्य दूर होण्याचं भाग्य त्यांना मिळू शकेल, भगवंताच्या गीतेचं खरं मर्म – सर्व जीव देवासमान समजून सेवा करा– हे या ग्रंथाच्या रूपात पाहिजे तशा तऱ्हेने प्रगट झालं आहे अन् त्यातूनच प्रपंच-परमार्थ साधला जाईल.

तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत विविध म्हणींचा वापर केला आहे. नथीतून तीर मारणे, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, थेंबे थेंबे तळे साचे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, मातृदेवो भव, बाप तैसा लेक, चूल आणि मूल, बळी तो कान पिळी यांसारख्या अगणित म्हणी त्यात आढळतात. त्या ग्रंथाची भाषा लोकसंमत आहे. त्यांचा विचार बहुजनांपर्यंत पोचवण्याच्या कणवेतून त्या ग्रंथाची रचना झाली आहे.

ग्रामगीता ही संपूर्ण समाज परिवर्तनाची दिशा सुचवते. तुकडोजी महाराजांनी संतांच्या विचारांचा मागोवा घेऊन समाज परिवर्तनाची नवी विचारधारा मानव समाजासमोर ठेवली आहे. ते ग्रामगीतेत म्हणतात –

गीतेने यथार्थ ज्ञान दिले, ते जनमनाने नाही घेतले,
रुढीच्या प्रवाही वाहू लागले, विसरले सगळे भूतहित ||

          ग्रामगीता हा ग्रंथ केवळ आदर्शवादाचा पुरस्कार करत नाही तर तो प्रायोगिक, नित्य नवीन स्फूर्तीचा अखंड झरा आहे. तो बेशिस्त, अशिक्षित, सुशिक्षित, समाजधुरिण, पंडित, विद्वान, विचारवंत, लेखक, कवी; तितकेच नव्हे, तर सर्व स्तरांतील मानवाला मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ आहे.

प्रथम पाया मानव वर्तन, यास करावे उत्तम जतन,
गाव करावे सर्वांगपूर्ण, आदर्श चित्र विश्वाचे ||

          माणसाचे वर्तन उत्तम असेल तरच समाजाची प्रगती होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीर, मन, वाणी, इंद्रिये आणि बुद्धी यांचा विकास झाला पाहिजे. त्याला सद्धर्माचे शिक्षण कळले पाहिजे. त्याचप्रमाणे गावाचा देखील सर्वांगसुंदर विकास झाला पाहिजे हा त्यामागील हेतू होता.

गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा,
गावचि भंगता अवदशा, येईल देशा ||

          गाव हा विश्वाचा मूळ घटक आहे. म्हणून अगोदर गाव प्रसन्न असले पाहिजे. गावाच्या प्रसन्नतेमुळे देव, विश्व व मन हेही प्रसन्न राहतात. प्रसन्नतेने दुःखांचा नाश होतो. समोर आलेल्या समस्यांना समर्थपणे तोंड देता येते. प्रार्थना हे राष्ट्रहित साधण्याचे, विविध अंगांनी भरकटलेल्या मानवसमूहाला एका सूत्रात बांधण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यांनी त्यातूनच विश्वात शांतता प्रस्थापित होऊ शकते हे सिद्ध करून दाखवले. त्यांनी ग्रामगीता ग्रंथातून अनेक विषय मांडून समाजाच्या प्रत्येक समस्येवर उपाय सांगितला आहे. खेड्यातील निद्रिस्त जनता जागी व्हावी; अज्ञान-अंधश्रद्धा आणि सामाजिक जडत्व यांमुळे होत चाललेले अधःपतन नष्ट व्हावे; मरगळलेल्या जीवनात चैतन्य निर्माण व्हावे ही ग्रामगीता ग्रंथामागील आंतरिक तळमळ आहे.

                तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत महिलोन्नती हा वीसावा अध्याय घेतलेला आहे. ते महिलांना सर्वोच्च दर्जा देताना म्हणतात –

जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी,
ऐसी वर्णिली मातेची थोरवी, शेकडो गुरूंहुनी ||

       त्यांनी स्त्रियांच्या आंतरिक गुणांना महत्त्व दिले आहे. ते त्यांच्या आंतरिक गुणांचा विकास होण्यासाठी स्त्रीशिक्षण हे महत्त्वाचे आहे हे सांगतात. ग्रामगीतेत विचारांबरोबर आचारसंहितेचे महत्त्व फार सांगितले आहे. तुकडोजी म्हणतात-

बोलण्यात ते अतिशहाणे, परि कार्य त्यांचे ओंगळवाणे,
कैसे गाव सुधारेल याने, सांगा मज?

          

              काही लोक बोलण्यात चतुर असतात, ते लोकांसमोर खूप सुंदर विचार सांगून त्यांच्यावर प्रभाव टाकतात. मात्र त्यांचे विचार आणि आचार यांत विसंगती आढळून येते. अशा लोकांच्या विचारांचा प्रभाव कायम टिकून राहत नाही आणि त्यांच्याकडून कोणतेही सुधारक कार्य होत नाही. जर ग्रामसुधारणेची आवड असेल तर विचारांची आचारांशी सांगड घातली पाहिजे. तरच लोक ऐकतील.

लाख बोलक्यांहून थोर, एकचि माझा कर्तबगार |
हे वचन पाळोनि सुंदर
, गाव सुधारावे कार्याने  ||

        त्यांनी चमत्कार आणि अनिष्ट चालीरीती यांवर कडाडून प्रहार केला आहे. संत चमत्कार करून लोकांचा उद्धार करत नसतात. एकाचे खिसे कापून दुसऱ्याला दान देणे हे ढोंगी बुवांचे काम असते. ते भोळ्या जनांना भुलवून, त्यांना नादी लावून लुटतात.

चमत्कार तेथे नमस्कार, तेणे जादुगरीस चढे पूर,
खऱ्या संतास ओळखी ना नर, चमत्काराअभावी ||

       ग्रामीण समाजातील सर्वसामान्य जनांचा उदय जेव्हा होईल, त्यांच्या आशाआकांक्षांना नवे बळ प्राप्त जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आदर्श ग्रामराज्य निर्माण होईल अशी ग्रामगीता ग्रंथातील आदर्श ग्रामराज्याची संकल्पना आहे.

ग्रामगीता नव्हे पारायणासि, वाचता वाट दावी जणांसि,
समुळ बदलवी जीवनासि, मनी घेता अर्थ तिचा ||

ही ओवी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराज म्हणतात, की ग्रामगीता हा ग्रंथ बासनात बांधून, तिच्यावर पुष्प ठेवून- तिची पूजा करून पारायण करण्यासाठी मुळीच नाही आणि पूर्वी, संतमहात्म्यांनी सुद्धा अनेक ग्रंथांची निर्मिती केली, त्यामागे त्या ग्रंथांचे फक्त पारायण व्हावे हा उद्देश नव्हता. ग्रामगीता ही तो ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येक जणाला प्रगतीचा मार्ग खुला करणारी आहे. ग्रामगीतेतील प्रत्येक ओवी वाचून तिचा अर्थ जाणून घेतला तर लोकांचे जीवन समूळ बदलून जाईल एवढा मोठा प्रभाव ग्रामगीता ह्या ग्रंथाचा आहे.

राजेंद्र घोटकर 9527507576 ghotkarrajendra@gmail.com

(लेखामध्ये मराठी संशोधन पत्रिका, एप्रिल-मे-जून 2021वरून काही भाग समाविष्ट केला आहे)

राजेंद्र घोटकर हे शिक्षक आहेत. त्यांचे बीएड आणि डीएडचे शिक्षण झाले आहे. त्यांचा वंचितांच्या वेदनाहा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. विविध मासिके आणि त्रैमासिके यांमध्ये त्यांचे लेख व कविता प्रकाशित झालेल्या आहेत.

 (Last Updated on 9th September 2021)

—————————————————————————————————————————————————————————-

तुकडोजी महाराजांची काही छायाचित्रे

 

 

 

 

 

————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here