तीन पैशांचा ‘पीपली’ तमाशा!

0
20


तीन पैशांचा ‘पीपली’ तमाशा!

– ज्ञानदा देशपांडे

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या – त्यातूनही इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या कानाखाली सणसणीत आवाज काढणारे दोन तास म्हणजे ‘पीपली लाईव्ह’! मिडियाबद्दल लोकबुद्धीला ठाऊक असलेल्या गोष्टी प्रत्ययकारी पद्धतीने मध्यमवर्गापर्यंत थेट पोचवण्याची देखणी व्हिज्युअल किमया अनुशा रिझवीनं केली. मेनस्ट्रीम सिनेमा जसा असावा असं वाटतं तसा सुंदर सिनेमा बघितल्याचा आनंद ‘पीपली लाईव्ह’नं दिला आणि मी इलेक्ट्रॉनिक माध्यमात नुकतीच दोन वर्षं काढलेली असल्यामुळे त्यातल्या कित्येक गोष्टी भावल्या-आवडल्या-पटल्या.

टोकाचा उपहास-त्यातून उलगडणारी पीपली गावातल्या नत्थाची ही कथा. त्यातल्या गावाचं नाव ‘पीपली’ तर नायक ऐरा गैरा नत्थू खैरा – सिनेमाची व्हिज्युअल बांधणी उत्कृष्ट आहे, तसंच त्यातले भेदक संवादही. आत्महत्या करून का होईना कुटुंबाचं पोषण करू शकू असं वाटणारा नत्थू, शेवटी त्या कुटुंबाला पारखा होतो आणि दरम्यान गावातला ‘जनमोर्चा’ या वर्तमानपत्राचा रिपोर्टर-स्ट्रिंगर राकेश या बातमीतल्या वेदनेचा परिपाक म्हणून ख-या पत्रकारितेचा मृत्यू भोगतो. ‘माणसाविषयी कणव आणि बातमी देण्याची धडपड – या
दोन्हींत माणसापेक्षा बातमी श्रेष्ठ! असं तुला वाटत नसेल तर पत्रकारिता सोड’ असं राकेशला सांगणारी महत्त्वाकांक्षी अँकर रिपोर्टर ‘पीपली लाईव्ह’मध्ये भेटते.

सत्य आणि स्टिरिओटाईप यांमध्ये फरक काय? तर स्टिरिओटाईप म्हणजे अर्धसत्य; असं अर्धसत्य, की जे पूर्णसत्य आहे असा क्लेम करतं. ‘पीपली लाईव्ह’नं अनेक स्टिरिओटाईप्स समोर मांडलेत. सेकंड फ्लश दार्जिलिंग टी पिणारा आयएएस ऑफिसर, नत्थूकार्डाची घोषणा करणारा कृषिमंत्री सलीम, बरखासदृश
संवेदनशीलतेनं बातमीपाठीमागे धावणारी न्यूज अँकर, हिंदी चॅनेलमधला नफ्फट रिजनल रिपोर्टर…. सारे साचे ‘पीपली लाईव्ह’मध्ये भेटतात. ‘स्टोरी’ घडते एका मृत्यूबद्दल आणि त्या मृत्यूचं ‘लाईव्ह’ थैमान अनुशा रिझवीनं कॅमे-यात पकडलंय. मात्र हे अर्धसत्य साचे तिनं काही क्षणांना पूर्णसत्याकडे ढकललेत. तो तिचा जिनियस आहे.

हा चित्रपट केवळ शेतक-यांच्या आत्महत्या या विषयावरचा नाही. हा विषय माणुसकीचा मृत्यू अनेक थऱांवर होत असताना आपण तो कंझ्युम कसा करतो याबद्दलचा आहे आणि तो आपण ‘मेणबत्ती संवेदनशीलते’नं  रिचवत असताना, दरम्यान, माध्यमं त्या अर्धमेल्या माणुसकीला पूर्ण ठार कशी करतात या प्रक्रियेवर ‘पीपली लाईव्ह’  भाष्य करतो.

माध्यमांचा वसाहतवाद, त्यातल्या सुमारांची सद्दी, दररोजच्या घडामोडींमुळे आलेला बधीरपणा, टीआरपीचा बिनडोक खेळ आणि त्याचा वापर करणारे निर्ढावलेले राजकारणी… ‘पीपली लाईव्ह’नं हे सारं वास्तव एकत्र पॅकेज केलं आहे.

यातल्या माध्यमांच्या क्रिटिककडे बघण्यापूर्वी दोन गोष्टींबद्दल सांगितलंच पाहिजे. एक म्हणजे या सिनेमातलं अप्रतिम कॅमेरावर्क. ते गोंधळलेपणाला, स्वप्नांना, आक्रमणांना, संतापाला सामावून घेतं. अनुशानं
कॅमे-याचा डोळा यातल्या उपहासावर रोखलाय. हे ‘वास्तव’ नाही – ही ‘कलाकृती’ आहे याचं भान असल्यामुळे कलाकृतीला आवश्यक व्हिज्युअल शिस्त आणि सौंदर्य, दोन्ही या चित्रपटानं सांभाळलंय. त्याचबरोबर अतिशय म्हणजे अतिशय नीटस, आर्त संगीत. हॅटस् ऑफ टु इंडियन ओशन. जर बॉलिवूड ही आमची
खरीखुरी भारतीय आधुनिक लोककला असेल तर ‘पीपली लाईव्ह’नं भारतीय लोककलेची सारी मूल्यं सांभाळली आहेत. दशावतारात जसे उपहासानं विनोदाकडे नेणारे कॅरॅक्टरचे साचे भेटतात तसेच साचे ‘पीपली लाईव्ह’मध्ये भेटतात. स्वेटर घातलेल्या बक-याला रात्रीच्या सन्नाट्यात मिठीत घेणारा नत्थू, त्याचा थोरला भाऊ, संसाराला कळंजलेली पॉवरफुल- व्यवहारी सून, मिडिया-नॉईजला पारखा झालेला भुकेकंगाल होरी, ‘पीपली लाईव्ह’ मधल्या भूमिका आणि त्यांच्या नात्यातून निर्माण होणारं सबटेक्स्ट यांचा समतोल साधून – ‘पीपली लाईव्ह’ जिवंत होतो.

अनुशा रिझवीचोवीस तास (२४X७) बातम्या हीच ग्लोबल भारताची बिमारी आहे असं शेवटी वाटू लागतं. बातमी खेचा, ओढा, डेव्हलप करा-वाढवा, मोठी करा, पिटत राहा हेच खरं दुखणं आहे. अशा बातमीचं वस्त्रहरण होतं, त्यानं माणसं भरडली जातात. या सा-या इलेक्ट्रॉनिक कच-यातून निर्माण होणा-या चिरफाडीची जबाबदारी कोणाची?
न्यूज चॅनेलच्या भडकपणाला डोळ्यांच्या बाहुल्या चिकटवणा-या मध्यमवर्गाची, की ती न्यूज तशा भडकपणे दाखवणा-या स्पर्धात्मक चॅनेल्सची, की माध्यमांच्या उथळपणानं ज्यांना फायदा होतो अशा निगरगट्ट राजकारण्यांची? कोणाच्या मूर्खपणाची ही सारी किंमत विचार करणारी मनं भरत असतात?

‘पीपली लाईव्ह’नं मला माझ्या दोन वर्षांचा जाबजबाब विचारला. मी इंग्रजी आणि हिंदी चॅनेलपेक्षा कित्येक पटींनी ब-या/उजव्या चॅनेलमध्ये काम केलं, तरीही या माध्यमाच्याच काही मर्यादा आहेत आणि दुसरं म्हणजे या माध्यमाला कसं ‘कंझ्युम’ करायचं हे अजूनही आपण जाणत नाही. कोणतंच माध्यम प्रश्न
सोडवत नाही; ते फक्त प्रश्न मांडतं. त्या प्रश्नाभोवती लोकांची चळवळ उभी राहिली, तरच प्रश्न सुटतात. मात्र हल्ली अनेकांना वाटतं, की ‘रस्त्यात खड्डे आहेत’ इथपासून ते ‘मला अन्यायानं नोकरीतून काढून टाकलं’ इथपर्यंत सर्व प्रश्न न्यूज चॅनेल सोडवू शकतात. चॅनेलवाल्यांनाही ही समजूत करून द्यायला आवडतं आणि चळवळ करू न इच्छिणा-या थंड समाजाला असा पॅसिव्ह अँक्टिव्हिजम आयताच हाती सापडतो. ‘माध्यमं’ प्रश्न सोडवायला जन्माला आलेली नाहीत. विशेषत:, न्यूज चॅनेल्स बातम्या देण्याचा ‘व्यवसाय’ नफा कमावण्यासाठी  करतात. प्रश्न सोडवणं हा त्यांचा KRA नाही. व्यवसायाला आवश्यक तेवढ्या बातम्यांचा ते  पाठपुरावा करतात. त्यातून काही वेळा काही प्रश्न सुटतात/सुटल्यासारखे वाटतात-मात्र ते त्यांचं कंद काम नाही.प्रश्न सोडवणं हे नागरिकांचंच काम आहे. पण जागतिकीकरणात नागरिक राहिलेत कुठे? इथे फक्त
‘कंझ्युमर’ जन्माला येतायत.

सवयीनं प्राईमटाईम, ब्रेकिंग न्यूज बघणारे मध्यमवर्गीय ‘पीपली लाईव्ह’ बघायला तिकिट काढून जातात. पॉपकॉर्न खात, कोकचा घोट घेत,थंड काळ्या शांततेत चित्रपट सुरू होतो आणि पहिल्याच,  ओपनिंग सीनमध्ये
नत्थाला उलटी होते. करमणुकीच्या आशेनं आलेल्या मध्यमवर्गीय न्यूज-चॅनेलच्या ग्राहकाला पहिली भेटते ती नत्थाची कडुजहर उलटी… आणि मग अनुशाच्या दिग्दर्शक म्हणून तिनं केलेल्या खेळाची सुरूवात होते. यात
जीवनदर्शन नाही. यात ‘ब्रेख्त’च्या नाटकासारखं,  तीन पैशांच्या तमाशातून दाहक वास्तवाकडे बघताना अंतर्मुख करणारं मटेरिअल आहे. ‘बघणं’, ‘कंझ्युम करणं’  हीच या मध्यमवर्गाची कृती असेल तर पुढच्या वेळी चॅनेल सर्फ करताना, त्या बटणांशी खेळताना, त्या आक्रस्ताळ्या आवाजातल्या ब्रेकिंग न्यूज ऐकताना, ते टीआरपीग्रस्त कार्यक्रम बघताना – आपल्या डोळ्यांना जाग येईल इतपत ‘चळवळ’ हा सिनेमा करतो. म्हणून तो महत्त्वाचा आहे.

वास्तववादानं ग्रासून, ‘षंढ असणं/कंझ्युमर असणं किती बरं?’ असं मानणा-या मध्यमवर्गाला निदान थोडं तरी भानावर आणतो हा ‘पीपली लाईव्ह’! त्यातल्या पत्रकारितेतल्या माणूसपणाच्या ऑनस्क्रीन मृत्यूनं निदान एवढं जरी शिकवलं आपल्याला तरी अनुशा रिझवी जिंकली असंच म्हणावं लागेल!


– ज्ञानदा देशपांडे

भ्रमणध्वनी : 9320233467
dnyanada_d@yahoo.com

About Post Author

Previous articleभारत-पाकिस्तान संबंधांचे भविष्य?
Next articleआंदोलनाची धगधगती सुरुवात!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.