तिचं आणि माझं संवादाष्टक

आपल्याला मदत करणाऱ्या स्त्री-पुरुषांना गुलाम किंवा नोकर समजणे, हे माणुसकीला धरून नाही. ‘हल्ली मोलकरणी इतक्या भाव खाऊ लागल्या आहेत, की आपल्यालाच त्यांची मनधरणी करावी लागते’, ‘‘मेड’ आहे म्हणून जमतंय’ किंवा ‘म्हणजे काय? पैसे मोजतोय इतके त्यांच्यासाठी, कामे करायलाच पाहिजेत …’ ‘छे छे… नातेवाईक नाही, मुलाला सांभाळणारी आहे ही.’ अशा प्रकारची वृत्ती आणि वाक्ये कोणाही संवेदनशील, सुसंस्कृत व्यक्तीला खटकतील. नाही खटकली तर विचार व्हायला हवा.

        आपल्या मदतनीस लोकांकडे ‘खालच्या पातळीवरचे’ असा पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यास हवा. त्यांच्याविषयी सद्भाव बाळगून विचारांची पातळी उंच करायला हवी. हे सांगणारा आणि कृतीतून व्यक्त होणारा उज्ज्वला बर्वे यांचा ‘तिचं आणि माझं संवादाष्टक’ हा लेख.

 – अपर्णा महाजन

————————————————————————————————–

तिचं आणि माझं संवादाष्टक

मी एक फेसबुक पोस्ट गेल्या आठवड्यात लिहिली होती. ती अशी-

कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये स्टाफ पिकनिक असतात, effective HR strategy म्हणून.

त्याही कंपनीच्या खर्चानं.

घरकामात गृहिणींना मदत करणाऱ्या बायका हा गृहिणींचा स्टाफ.

मग त्यांची पिकनिक गृहिणींनी करावी. त्यांच्या खर्चानं.

माझ्या मनात विचार आला.

मी तो लक्ष्मी, मंगल, कविता या माझ्या ‘स्टाफ’ला सांगितला.

तिघी लगेच तयार झाल्या.

आमचा पिकनिकचा दिवस ठरला.

ठिकाण? तेही पटकन ठरलं.

मुंबई !

          आणि मग पुढे, मी आमच्या पिकनिकचे वर्णन केले होते, फोटो टाकले होते. त्या पोस्टला भरपूर लाइक्स मिळाले, अनेकांनी त्यावर कॉमेंट्स केल्या. मला इतकी छान कल्पना सुचली आणि मी ती अंमलात आणली, याबद्दल माझे कौतुक अनेकांनी केले, त्यांनी ‘आम्हीपण असेच करू’ असेही लिहिले. छान वाटले, ते सारे वाचून. प्रत्यक्षात, ते सारे ‘त्यांच्या स्टाफ’ला नेतील तेव्हा खरे, पण मनात विचार आला हे तरी काय कमी आहे, असे वाटले.

दुसरीकडे असे वाटत राहिले, की कामवाल्या बायकांना एका दिवसाच्या पिकनिकला नेले की झाले माझे काम, मी एकदम भारी मालकीण अशी, तुटपुंज्या समाधानाची भावना यातून निर्माण व्हायला नको. बाकीचे तीनशेचौसष्ट दिवस मी बायकांच्या कामाबाबत काय विचार करते, त्यांच्यासमोर कोणत्या सेवाशर्ती ठेवते, त्यांना कर्मचारी म्हणून माझ्या दर्जाच्या समजते की माझ्यापेक्षा खालच्या पातळीवरील नोकर म्हणून त्यांच्याकडे पाहते याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. कामवाल्या बायका संघटित नसल्या तरी संघटित कामगारांना जे फायदे मिळतात ते गृहिणी त्यांना देऊ शकतात का, देऊ करतात का, हा प्रश्न आहे.

त्या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी ‘नाही’ असेच आहे. माझ्या महिला घरकाम सहकाऱ्यांशी- माझ्या डोमेस्टिक स्टाफशी- विविध प्रसंगांत होणाऱ्या माझ्या संवादातून हेच लक्षात येते, की शहरी, सधन, सुशिक्षित वर्गातील बहुतांश महिला कामवाल्यांच्या बाबतीत ‘तीदेखील त्यांच्यासारखीच नोकरी करते’ असा विचार करत नाहीत. ज्या मोजक्या कामवाल्या बायका स्वतःचे हक्क बजावू पाहतात, काही अटी घालू पाहतात त्यांना समजून घेण्याऐवजी त्यांचा राग करणे किंवा त्यांची टर उडवणे अशी प्रतिक्रिया दिली जाते. अशा वेळी मला माझे माझ्या ‘स्टाफ’बरोबर झालेले हे संवाद आठवतात.

मी- काय गं! आज येणार नव्हतीस ना कामाला? पालकसभेला जायचं होतं ना तुला?

ती- काय सांगू ताई. दुसऱ्या कामावरच्या ताईंनी नाही ना दिली सुट्टी. त्यांच्याकडे आज पाहुणे यायचेत जेवायला. ताई, शाळेची नोटीसपण दाखवली. तरी नाहीच म्हणाल्या. तुम्ही जा म्हणाल्या होतात, पण तसंही सभेला जाता आलं नसतंच, त्यांच्या कामाला यायचं म्हणून… मग मी तुमच्याकडेपण आले.

मी- पालकसभेला जायला पाहिजे गं. सभा करून कामाला जायचंस.

ती- मी म्हणाले होते, सभा संपवून येते म्हणून. कितीही उशीर झाला तरी येईन म्हणून. तर त्या म्हणाल्या, की त्यांना पार्लरला जायचं आहे. त्या पाहुणे गेल्यानंतर नसतील घरात.

मी- का? त्यांना ऑफिस नाही का आज? आणि किल्ली नाही देत तुला?

ती- किल्ली कसली देतायत ! आणि आहे ना ऑफिस. पण ‘शॉर्ट लीव्ह’ का काय असतं ते घेतलंय त्यांनी.

मी- हो, महिन्यातून दोनदा उशिरा आलं तरी चालतं.

ती- हो का?

***

मी- हे काय गं? माझी पावणेनऊची वेळ ठरलेली आहे. आज साडेनऊ झाले.

ती- ताई, आधीच्या कामावर आज खूप जास्त स्वयंपाक होता. मग भांडीदेखील जास्त पडली. त्यात वेळ गेला.

मी- तू किंवा त्यांनी तसा फोन तरी करायचा ना. काल मला कल्पना द्यायला हवी होती तशी.

ती- मी म्हणाले त्यांना. तर म्हणाल्या, घर म्हटलं की असं होणारच, कमीजास्त. आम्ही नाही का नोकरीत जास्तीचं काम करत, कधीकधी. मी म्हटलं, पण ताई, तुम्ही एकाच ठिकाणी काम करता. असं एकामागे एक वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यात किती कसरत होते ! प्रत्येकाची मर्जी आणि वेळ सांभाळताना धाप लागते नुसती.

***

मी- आलीस का? तुलाच फोन करत होते. आज काम नाहीये आमचं. अगं, आत्ता अचानक ठरलं, बाहेर जेवायला जायचंय ते. त्यामुळे स्वयंपाकाला सुट्टी. जा, बाकीच्या घरची कामं झाली की आज लवकर पळ घरी.

ती- लवकर कसली पळतीये? पुढच्या कामावर लवकर आलेलं चालत नाही.

मी- अग, उशीर झाला तर ओरडतात म्हणालीस ना?

ती- ते तर ओरडतातच. पण त्यांचे साहेब बाहेर जाईपर्यंत त्यांच्या घरी गेलेलंपण नाही चालत. तुमचा स्वयंपाक नाहीये आज तर तेवढ्या वेळात ट्रॉल्या साफ करू का? म्हणजे नुसतं वाट बघत बसायला नको. चालेल का?

मी- चालेल की. तुझं झालं की नीट कुलूप लावून घे म्हणजे झालं. किल्ली आणलीयेस ना? मी निघते.

***

मी- हा जानेवारीचा पगार. आधीपेक्षा दहा टक्के वाढवला आहे, दरवर्षीप्रमाणे.

ती- दुसऱ्या तार्इंना म्हणाले मी, पगार नाही का वाढवणार? तर त्या म्हणाल्या, तुझे खाडे कापत नाही हेच पुष्कळ आहे.

मी- खाडे काय म्हणतात गं ! मला अजिबात नाही आवडत तो शब्द. सुट्टी म्हणावं ना. खाडा म्हटलं की काहीतरी चुकीचं केल्यासारखं वाटतं. मी तर तुला सारखी सांगत असते, आठवड्यातून एक दिवस नियमितपणे सुट्टी घेत जा. तूच नको म्हणतेस.

ती-  ताई, बाकीच्या कामांवर मिळणार आहे का सुट्टी? मग तुमच्याच इथं कशाला दांडी मारायची? पण माझं काय म्हणणं, रोज येऊ आम्ही पण महिन्यातले चार दिवस आम्हाला सुट्टीचा अधिकार आहे की नाही?

मी- चारानं काय होतंय. मी तर म्हणते पाच दिवस पाहिजे. आम्हाला असते तशी कॅज्युअल हवी ना महिन्यातून एकदा. आधी सांगून घ्यायची म्हणजे झालं.

ती- पूर्वी नाही जमायचं आधी सांगायला. पण आता मोबाईलमुळे आम्ही सांगतोच की. नाही तशी कुणाची खोटी होऊ देत. आणि एक गंमत सांगते ताई. काही ठिकाणी पगार वाढवण्याचं बोलले ना की म्हणतात रोज तुला चहा, आमच्याबरोबर खायला देतो. पण तो काही पगाराचा भाग नसतो, ताई. त्यांना वाटतं, म्हणून देतात. एखाद्या दिवशी त्यांनी नाही दिलं तर मी मागत नाही, काही म्हणतही नाही. त्याऐवजी पन्नासशंभर रुपये जास्त मिळाले तर घरालाच उपयोगी पडतील !

***

मी- का गं, आज दमलेली का दिसतीयेस?

ती- दहा जिने चढून यायला लागलं ताई.

मी- का? दोन्ही लिफ्ट बंद पडल्या?

ती- एकच चालू आहे. ती मोठी आणि चांगली आहे. आम्ही रोज ज्यानं येतो ती बंद आहे.

मी- मग जी चालू आहे तिच्यातून यायचं.

ती- साहेब आणि मॅडम लोक येऊ देत नाहीत तिच्यातून. वॉचमनदेखील बजावतो, त्या लिफ्टमधून जायचं नाही. तुम्ही खराब करून ठेवता. कसं वाटतं ताई हे ऐकलं की, तुमच्या घरात आम्ही आलेले चालतो, तुमच्यासोबत लिफ्टमध्ये मिनिटभर नाही थांबू शकत? लिफ्ट खराब करायला, बटणं बिघडवायला आम्ही काय लहान मुलं आहोत का? उलट, कुणी बोलू नये म्हणून काळजीपूर्वक वापरतो, सावकाश दारं उघडतो, बंद करतो.

***

ती- ताई, तुम्ही काही बोलला का लिफ्टवरून कुणाला?

मी- हो मी आमच्या सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर टाकला होता खरमरीत मेसेज- असा भेदभाव करणं बेकायदेशीर आहे, माणुसकीला सोडून आहे. माझ्या बाईला पुन्हा कुणी लिफ्टमध्ये येण्यापासून अडवलं तर मी गप्प बसणार नाही.

ती- त्यांना कळेल मीच तुम्हाला सांगितलं. मला काही बोलणार नाहीत ना ?

मी- बोलले तर माझ्याशी गाठ आहे. पुन्हा वॉचमननं अडवलं तर लगेच मला फोन कर.

***

कधीकधी संवादांचा नूर पालटतो.

ती- ताई, बरं नाही का?

मी- हो ना. ताप आलाय कालपासून. आत्ताचं कर तू. संध्याकाळचं बघीन संध्याकाळी.

ती- ताई, बरं नाहीये तर उठता कशाला. बाकीची कामं आटपून पुन्हा येईन संध्याकाळचं करायला. उठू नका अजिबात. उद्या येताना घरून करूनच आणते तुम्हाला नाश्त्याला काहीतरी.

ती- ताई, आपल्या पिकनिकची फार जाहिरात झालीये सोसायटीत. मालकिणी म्हणू नका, दुसऱ्या बाया म्हणू नका. सगळे विचारतायत.

मी- बरंय की. पुढच्या वर्षी कुठे जायचं विचार करून ठेवा.

***

तिला आपण आणि आपल्याला ती. सोपं आहे खरं तर.

उज्ज्वला बर्वे 9881464677 ujjwalabarve@gmail.com

———————————————————————————————

About Post Author

3 COMMENTS

  1. किती छान विचार आहेत …मला सुद्धा छोटी छोटी मुलही आपल्या घरी मदतीला येणाऱ्या मोठ्या मावशींनाही नावाने हाक मारतात ना …आजिबात आवडत नाही. पालकांनीच शिकवायला हवं …नाही का ?

  2. आपण आपल्या कामामध्ये, नोकरीमध्ये जे अनुभवतो, ज्यात बदल असावेत म्हणजे स्वतःची अस्मिता सांभाळली जाईल, असे वाटते, ते बदल आपण मदतनीस स्त्री पुरुषांच्या बाबतीत करू..

  3. फार भारी कल्पना! अश्या विचारांचे व कृतीचे भान सर्वांना हवेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here