डॉ. व्यंकटेश केळकर – धन्वंतरी कर्मयोगी

carasole

सांगोला तालुक्यामध्ये रुग्णसेवेचा श्रीगणेशा

डॉ. व्यंकटेश शिवराम तथा दादा केळकर यांचे देवळामध्ये चालणारी कीर्तने, प्रवचने ऐकण्याच्या आवडीतून व्यक्तिमत्व घडत गेले. ते डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी नर्स मिडवाईफ असलेल्या सौ. चंपुतार्इंशी विवाह केला. नंतर, 1936 ते 1940 या काळात त्यांनी एदलाबाद (मुक्ताईनगर) व सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यभार निभावला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनी त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग प्रज्वलित झाले. दुसऱ्या महायुद्धास 1939 मध्ये सुरुवात झाली. ते ‘सैन्यात भरती व्हा’ हा सावरकरांचा आदेश मानून सैन्यात दाखल झाले. ते ‘टायरिया’ या युद्धनौकेवर वैद्यकीय अधिकारी म्हणून 1941 मध्ये रुजू झाले. त्यांनी ती सेवा 1945 पर्यंत केली. त्या काळात, त्यांनी जवळ जवळ अर्धे जग समुद्रप्रवासातून पाहिले. त्यांनी युद्धकालीन परिस्थिती, जगण्याची अनिश्चितता, मरणसदृश प्रसंगांना सामोरे जात अनेक रोगांवर, आजारांवर, जखमांवर अपुऱ्या वैद्यकीय साधनांनिशी उपचार करून मृत्यूच्या दारातील अनेक रुग्णांना जीवदान दिले. त्यांनी एकीकडे वाचन करून विविध देशांचा इतिहास, राजकीय तत्त्वज्ञान, इंग्लिश साहित्य इत्यादी अद्ययावत ज्ञान मिळवले. तसेच, कायद्याचा समग्र अभ्यास केला.

ते युद्धावरून परत आले. त्यांना सांगोला नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी म्हणून 1946 च्या जूनमध्ये नेमणूक मिळाली. त्‍यांनी तेथे 1955 पर्यंत काम पाहिले. त्यावेळी सांगोला रुग्णालयात केवळ जुजबी उपचार किंवा प्रथमोपचार होत असत. त्यामुळे रुग्णांना पंढरपूर, मिरज, सोलापूर येथे अधिक उपचारांसाठी पाठवले जाई. त्यांनी अपुऱ्या सुविधांची परिस्थिती बदलण्यासाठी ‘सर व्हिक्टर ससून ट्रस्ट’चे प्रमुख विश्वस्त हेंडरसन यांच्याशी चिकाटीने पत्रव्यवहार करून त्या काळात रुग्णालयासाठी एक लाख रुपये मिळवले व सांगोल्याच्या नगरपालिका रुग्णालयाचे नुतनीकरण करून मोठे रुग्णालय सुरू केले. सांगोल्‍याला दादा केळकर यांच्‍या रुपात धाडसी व यशस्वी डॉक्टर मिळाल्याने त्‍यांच्‍याकडे सांगोला, मंगळवेढा, जत या तिन्ही तालुक्यांतून रुग्णांचा ओघ सुरू झाला. ते सायकलवरून अनेक वाड्या-वस्त्यांवर जाऊन रुग्णसेवा मनोभावे करत. तसेच, रुग्णालयात अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि गरोदर स्त्रियांची बाळंतपणेही यशस्वीपणे करत असत.

दादा केळकर यांची मिरज येथे 1955 मध्ये बदली करण्यात आली. मात्र त्यांना रुग्णसेवेसाठी सांगोला येथे येणे क्रमप्राप्त होते. पुढे, 1956 मध्ये त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन सांगोला हीच त्यांची कर्मभूमी मानली व तेथे स्वत:ची खासगी प्रॅक्टिस सुरू केली. अल्पावधीतच, त्यांना धन्वंतरी अशी ख्याती मिळाली.

त्यानंतर त्यांनी सांगोला तालुक्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात 1957 ते 1972 या काळात अग्रेसर राहून लोकसेवा केली.

त्यांनी घरातील सर्व जबाबदाऱ्यांना व्यवस्थित न्याय देऊन अडचणीत असलेल्या अनेक स्त्रियांना, अनाथांना आधार दिला. ते समाजातील दुर्बल घटकांना सदैव मदत करत. मुलांच्या शाळा-कॉलेजांतील शुल्क भरणे, अनाथ महिला-बालकांच्या संस्थांना सढळ हाताने नियमित मदत करणे, हे कर्तव्य समजून ते करत असत. दादा शेतकऱ्यांना सल्ला, कुळकायद्याचे ज्ञान देणे, सांगोल्याचा बिकट पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जनजागरण करणे, समाज प्रबोधनासाठी व्याख्याने-कीर्तने-प्रवचने यांचे स्वखर्चाने आयोजन करणे अशा सर्व आघाड्यांवर लढत आणि समाजाला लढायला शिकवत असत.

त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा सांगोल्याच्या नगरपालिकेच्या व तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या निवडणुकीच्या प्रक्रियेवरही उमटवला. सतत अकरा वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रम करणाऱ्या लोकप्रिय आमदार गणपतराव देशमुख यांच्या सुरुवातीच्या काळात दादांच्या भक्कम आणि मोलाच्या सहकार्यामुळे आमदारकीची निवडणूक त्यांना सहज यश देऊन गेली. तसेच 1974 मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पृथ्वीराज भीमराव चव्हाण यांना यशस्वी करण्यात दादांचा सिंहाचा वाटा होता.

सांगोल्यामध्ये सुतगिरणी उभारण्याच्या वेळेसही दादा हे सूतगिरणीचे सर्वांत मोठे शेअर होल्डर होते. तसेच, सांगोल्‍यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या स्थापनेमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दादांना दोन्ही डोळ्यांना 1972 मध्ये अंधत्व आले. मात्र त्यांनी कधीही स्वत:ला परस्वाधीन मानले नाही. त्यांनी त्यांची लोकसेवेची कार्ये अत्यंत जिद्दीने सुरूच ठेवली.

ते 28 एप्रिल 1993 रोजी अनंतात विलीन झाले.

‘मरावे परी कीर्तीरुपे उरावे|’ ही उक्ती त्यांनी सिद्ध केली आहे.

त्यांचा मुलगा डॉ. सतीश व मी त्यांची सून संजीवनी त्यांच्या दातृत्वाचा आणि कर्तृत्वाचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो.

– डॉ. संजीवनी केळकर

About Post Author