डेंजर वारा

0
68
जयंत पवार
जयंत पवार

‘आजच्या पिढीला हा इतिहास पुन:पुन्हा सांगावा लागेल. कदाचित मुंबईच्या
नकाशावरून गिरणी कामगार साफ पुसला जाईल. कदाचित नवमहानगर उभारताना
त्याचा नरबळी अपरिहार्यही असेल पण त्याची जिगर, त्याचा लढाऊ बाणा,
त्याचे श्रम आणि त्याने उभी केलेली संस्कृती विसरणं ही इतिहासाशी गद्दारी ठरेल.
हे आख्खं आख्खं ‘मोहन जो दारो’ काळाच्या उदरात गडप होताना
झालेली जगण्यासाठीची ही अखेरची तडफड.’

जयंत पवार     जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकाच्या आरंभी हे निवेदन जाहीरपणे केले जायचे. जयंत पवार हे गेल्या दहा-पंधरा वर्षांत नाटककार म्हणून पुढे आलेले समर्थ नाव. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, प्रशांत दळवी ह्या प्रभावी नाटककारांच्या पंक्तीमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या कथा, एकांकिका, त्यांनी केलेली नाट्यसमीक्षा यांमुळे त्यांचे नाव परिचयाचे झाले असले तरी ते प्रखरपणे पुढे आले ते ‘अधांतर’ या नाटकामुळे.

     जयंत पवार स्वत: परळला कामगार चाळीत वाढले. त्यांनी गिरणीत कामदेखील केले. त्यांनी कापडगिरण्यांमधील कामगारांचा १९८२ चा संप अनुभवला. त्यानंतर जणू एक संस्कृतीच नष्ट झाली. त्यामधून ‘अधांतर’ नाटकाच्या आरंभीचे उद्‍गार प्रगटले. त्या नाटकामध्ये एका गिरणीकामगार कुटुंबाच्या उध्वस्ततेची प्रातिनिधीक कहाणी आहे. त्या ओघामध्ये पवार यांनी त्या काळातील जी व्यक्तिचित्रे निर्माण केली आहेत ती अस्सल, शंभर टक्के वास्तव अशी आहेत. पवार यांनी ‘अधांतर’च्या रूपाने जणू एक समाजचित्रच  प्रेक्षकांसमोर उभे केले. त्यामुळे प्रेक्षक गलबलून गेले आणि नाट्य समीक्षकांना तर मराठीनाट्यसृष्टीची आधारभूत जमीनच सरकल्याचा भास झाला. एवढा क्रांतिकारक प्रभाव त्या नाटकाचा गणला गेला.

‘अधांतर’ नाटकातील एक दृश्य     जयंत पवार यांचे नंतरचे ‘माझं घर’ हे नाटक मध्यमवर्गीय कुटुंबात घडते. तेथेही घटस्फोटामुळे कुटुंब दुभंगलेलेच आढळून येते.

     खरोखरीच, जयंत पवार हा आजच्या काळातला सर्वात प्रखर मराठी नाटककार आहे. हे त्यांचे ‘काय डेंजर वारा सुटलाय!’ हे नवीन नाटक पाहून जाणवते त्याचे वास्तवाचे भान भेदक आहे. त्याला विचारदिशा व त्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यांची चांगली जाण आहे. तसेच, त्याला प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्याची नाटककाराची हातोटी आहे आणि त्याच्याकडे भडकपणा न आणता प्रेक्षकाचे (वाचकाचे) मन प्रक्षुब्ध करण्याचे उत्तम पत्रकाराचे सुजाण कौशल्य आहे. तरीदेखील त्याला मराठी नाट्यसृष्टीत झकास यश लाभलेले नाही. त्याच्या नावाचा बोलबाला आहे. विजय तेंडुलकरांसारख्या मराठीमधील मान्यवर नाटकाराने जंयत पवारच्या ‘अधांतर’ या नाटकाला सद्यकाळातले सर्वश्रेष्ठ नाटक असे म्हटले आहे. स्वाभाविकच, पवारच्या नव्या नाटकाकडे सुजाण प्रेक्षक कुतूहलाने पाहत असतो.

     ‘काय डेंजर वारा सुटलाय’ हे नाटक नावापासूनच आकृष्ट करते. त्याचा विषयही सद्यकाळातील प्रक्षोभक असा आहे – बिल्डरांचे अक्राळविक्राळ चाळे! बिल्डरांच्या कारवाया चित्रपटांतून व वृत्तपत्रांच्या बातम्यांमधून प्रेक्षकांपर्यंत पोचलेल्या असतात. किणीसारखे एखादे प्रकरण बरेच गाजलेले व न्यायालयापर्यंत गेलेले असते. प्रेक्षकांमधील काहींनी बिल्डरांचे चटके सहन केलेलेही असतात व त्यांच्या कहाण्या कर्णोपकर्णी झालेल्या असतात.

पवार यांनी ‘अधांतर’च्या रूपाने जणू एक समाजचित्रच  प्रेक्षकांसमोर उभे केले     पवार यांचा ‘डेंजर वारा’ हादरवून टाकतो; प्रेक्षक नाट्यगृहातून मन उध्वस्त होऊनच बाहेर पडतो. दाभाडे हा सरळमार्गी, कुटुंबवत्सल गृहस्थ. त्याचे चौकोनी कुटुंब, त्याची शिवाजी पार्कची छानशी, मध्यमवर्गीयाला शोभेल अशी जागा. परंतु बिल्डरची नजर त्या जागेवर पडते. तो साम-दाम-दंड भेद असे सर्व प्रकार वापरून दाभाडेची जागा मिळवतो. दाभाडे हतबल होतात, नामोहरम होतात. बिल्डराचे क्रौर्य आणि तो मानवी मूल्यांचा करत असलेला चुराडा मन विषण्ण करतो.

     दाभाडे विमा एजंट आहेत, त्यांची बायको गृहिणी आहे. मुलगा ‘टीव्ही सीरिएल’मध्ये धडपड करत आहे आणि मुलीची महत्त्वाकांक्षा एमबीए होण्याची आहे असे समकालीन संदर्भ पवारांनी अचूक टिपले आहेत. परंतु बिल्डरलॉबी या समकाळाची गती बिघडवून टाकत आहे. गंमत अशी, की बिल्डरच्या या कामात सर्वसामान्य माणसाचे हितसंबंधदेखील गुंतलेले आहेत. हा व्यवहार कधीकाळी ‘फेअर’ होता, त्यावेळी बिल्डरांचे फावलेले नव्हते; किंबहुना या बांधकाम व्यवसायात बिल्डर नावाचा घटकच नव्हता.

     जयंत पवार यांनी बिल्डर, राजकारण आणि गुन्हेगार यांचे एकमेकांत गुंतलेले हितसंबंध आणि बनलेले त्यांचे ‘रॅकेट’ सुरेखरित्या प्रकट केले आहे. बिल्डर ‘भाई’ लोकांकरवी दाभाडे कुटुंबीयांचे जिणे हराम करतो आणि दाभाडे जेव्हा त्याविरूद्ध दाद मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचतात तेव्हा मुख्यमंत्र्याचाही स्वार्थ हास्यकारकरित्या स्पष्ट होतो.

‘काय डेंजर वारा सुटलाय’ नाटकातील एक दृश्य     दाभाडे हा माणूस अतिसंवेदनाशील आहे. त्यामुळे तो या परिस्थितीत निर्जीव होऊन जातो. सौ. दाभाडे या स्त्रीमाणूस. त्यामुळे त्यांचे संसार जपण्याकडे, मुलीचे जगणे नीट लावून देण्याकडे लक्ष असते. त्या मार्गाला त्या लागतात मुलगा ‘सीरियल’ निर्मितीचा ध्यास सोडून फ्लॅट खाली करून घेणार्‍या गुंडांच्या टोळीत सामील होतो. कुटुंबाची एवढी वाताहत! त्यामध्ये अतिनाट्य ठासून भरलेले आहे, परंतु पवार ते भडकपणे मांडत नाहीत वा तर्कदुष्ट होऊ देत नाहीत. पवारांचा प्रेक्षकांच्या बुद्धीवर विश्वास आहे.

     मात्र पवारांचे नाटक निर्भेळ समाधान देत नाही, याचे कारण नाट्यप्रयोग पवारांच्या संहितेइतक्या प्रभावीपणे सादर होत नाही. प्रयोग सर्व बाबतींत कमी पडतो. त्यामुळे संहितेत जिथे कोठे उणेपणा आहे तिथे तो भरून काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सूत्रधाराच्या नियुक्तीपासूनच ती सुरुवात होते. तो नट गुणी आहे, परंतु तो वयाने फार कमी वाटतो. त्यामुळे निवेदकाला जो पोक्तपणा अभिप्रेत आहे तो त्याच्यात येत नाही. हीच गोष्ट काही प्रमाणात दाभाडे यांची भूमिका करणार्‍या अनिल गवस यांच्या बाबतीत घडून येते. त्यांनी साकार केलेले दाभाडे उत्तम आहेत; विशेषत: शेवटचा हताश माणूस त्यांनी फारच परिणामकारक वठवला आहे, परंतु आरंभीचा कुटुंबवत्सल हसरा-खेळकर दाभाडे-शिवाय, तो विमा एजंट आहे, त्यामुळे त्याची अवांतर बडबड आणि त्याचे समुद्रप्रेम… या गोष्टी बिंबल्या जात नाहीत, त्यामुळे त्याचे शेवटी येणारे समुद्राबाबतचे निवेदन निष्प्रभ ठरते. ती तरलता गवस यांच्या आविष्कारात देखील नाही.

‘डेंजर वारा’ पाहून प्रेक्षक नाट्यगृहातून मन उध्वस्त होऊनच बाहेर पडतो.     त्यांच्या ‘अधांतर’चे दिग्दर्शन मंगेश कदम यांनी केले होते. पवार-कदम जोडी मराठी नाटयसृष्टीत क्रांतिकारक नवीनपण आणेल असे वाटले होते. ‘माझं घऱ’ मध्ये देखील या दोघांनीच परिणाम साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ‘डेंजर वारा’ हे नाटक अनिरुद्ध खुटवळ या दिग्दर्शकाने पुढे आणले आहे. पवार यांच्या लेखनाची ताकद खुटवड यांना पुरेशी कळली आहे का अशी शंका त्यांचे नाटक पाहत असताना येते. नाटकाच्या नेपथ्यात वादळ सुचित करणारा पडदा हा घटक फार महत्त्वाचा आहे. शिवाय त्या पडद्यातच टिव्हीचा पडदा दिसतो व त्यावरील दृश्य हा नाटय परिणामाचा प्रमुख आधार गृहित धरला आहे. हे सर्व ज्या प्रभावीपणे जाणवायला हवे तसे भासत नाही. त्याहूनही खुटवडांना अपयश आले आहे ते बहुधा अयोग्य पात्रयोजनेमुळे.

     ‘अंधातर’मध्ये विपरीत परिस्थितीत घडून आलेली मानवी शोकांतिका आहे. ‘डेंजर वारा’मध्ये देखील पवार शोकाच्या, निराशेच्या, वैफल्याच्या वाटेनेच जातात. परंतु येथे माणसाचा शत्रू अगडबंब वाढलेला आहे; अक्राळविक्राळ विस्तारलेला आहे आणि त्यामुळे माणूस अधिक हतबल, असहाय्य बनून गेला आहे. पवार यांचे वैशिष्टय असे, की बिल्डरलॉबीच्या रूपाने तो भयानक शत्रू ते उभा करतात आणि त्याचबरोबर त्याचे या व्यवस्थेमध्ये तयार झालेले वेगवेगळे हितसंबंध दाखवून देतात. या संदर्भात मानसोपचारतज्ञाचा नाटकातील प्रसंग आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा नाटकातील प्रसंग याचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक राजकारण हे देखील शोषकाच्याच बाजूने कसे उपयोगात आणले जाते याचे विदारक दर्शन होते.

     जयंत पवार याची मानवी जीवनाविषयीची समजूत नाटकागणिक वाढत गेलेली दिसून येते. तो आधुनिक विचाराचा मागोवा यथार्थ घेऊ शकतो असे जाणवते, परंतु त्याचबरोबर आधुनिक विचाराने जी पुरातन मानवी संस्कृती पूर्णत: दुर्लक्षली आहे त्या संस्कृतीमधील शहाणपणादेखील जयंतने जाणून घेतला तर आज माणसासमोर परंपरागत मूल्ये आणि आधुनिक मूल्ये असा जो पेच आहे त्याचे रास्त भान त्याला येऊ शकेल.

आशुतोष गोडबोले
इमेल – thinkm2010@gmail.com

महाजालावरील इतर दुवे –
अधांतर ते लालबाग परळ

About Post Author