डीएसके विश्वाची पडझड: ग्लोबल सेतूचा दिलासा

0
22
_DSK_VishvachiPadzad_1.jpg

‘डीएसके विश्वा’मध्ये झालेला भूकंप हा एकूणच मराठी मनाला हादरा देणारा ठरला आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने एक हजार रुपये जमा करून त्यांना पन्नास कोटी रुपयांची मदत करावी असा एक पुढाकार मंदार जोगळेकर या तरुणाने घेतला आहे. त्याची कल्पना मोठी आहे. ती आपण समजावून घेतली पाहिजे. त्याचे उद्दिष्ट एवढे मोठे आहे, की प्रथम असंभव वाटेल, परंतु गेल्या पंचवीस वर्षांत बदलत गेलेली मराठी समाजवृत्ती आणि त्याहून अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘डीएसके’ यांनी मराठी समाजामध्ये निर्माण केलेला विश्वास, यांमुळे मंदार जोगळेकर याचे उद्दिष्ट अशक्य वाटत नाही. कम्युनिकेशनच्या जगात मेसेजेस व्हायरल होतात, तर पैसे व्हायरल होऊन एकत्र का होऊ शकणार नाहीत? महत्त्वाचा मुद्दा असा, की मराठी उद्योजकांमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास आणि त्यांनी आम मराठी जनतेमध्ये निर्माण केलेली विश्वासार्हता या दोन्ही गोष्टींना तडा जाता कामा नये.

‘डीएसके’ यांच्या उद्योगाचे पतन कशामुळे झाले? याबद्दल वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जातात. त्यांपैकी मुख्य शक्यता – त्यांचा व्यावसायिक अंदाज चुकला; धंद्यात मंदी आली, नोटाबंदी झाली आणि त्यांनी जे स्वप्न पाहिले त्याला अनुरूप गणिते मांडली, ती बिनसली ही शक्यता जास्त खात्रीशीर वाटते. त्याखेरीज त्यांच्यावर पैसे व्यवसायातून खाजगीत वळवले, मुलाने गैरव्यवहार केले, कुटुंबाने चैनीचे जीवन स्वीकारले यांसारखे विविध आरोप केले जातात, परंतु त्यांच्याबद्दलची मुख्य तक्रार ठेवीदारांची आहे. ते ठेवीदार दहा हजार रुपयांपासून लाख रूपयांपर्यंतचे आहेत. त्यांना जे नियमित व्याज मिळत होते ते बंद झाले. त्यामुळे ते धास्तावले आणि त्यांनी मूळ मुद्दलच परत मागणे सुरू केले. त्यातून हा पेच उद्भवला आणि ‘डीएसके विश्वा’स हादरा बसला. ते कोसळणार अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मराठी मनही बिथरले. परंतु ‘डीएसके’ यांनी न्यायालयाकडून दिलासा मिळवला असल्याने ते आर्थिक गणिते पुन्हा जुळवू शकतात का ते पाहूच!

दरम्यान, मराठी उद्योजकांबद्दलच्या विश्वासार्हतेचा मुद्दा अधिक काळजीचा ठरतो. ‘डीएसके’ व्यक्ती म्हणून उमदे आणि लोकप्रिय आहेत. त्यांनी त्यांची आणि त्यांच्या व्यवसायाची प्रतिमा गेल्या पंचवीस वर्षांत पद्धतशीर, सुरेख व विश्वासपात्र निर्माण केली आहे. त्यांची एक गरजू मुलगा ते एक यशस्वी उद्योजक ही वाढ विलोभनीय आहे. ते ती कहाणी रसाळपणे ठिकठिकाणी सांगत असतात. त्यांनी घरांच्या वेगवेगळ्या वसाहती जशा उत्तम निर्माण केल्या, बांधकाम उद्योगात जसे नवे पायंडे पाडले तशी त्यांनी मराठी सांस्कृतिक विश्वावर छापदेखील टाकली. तो सर्व प्रकार मोहक आहे. ‘डीएसके गप्पा’ हा पुण्यातील कार्यक्रम किंवा ‘डीएसके’ यांची आकाशवाणीवरील मनोगते व प्रश्नोत्तरे हे ‘मन की बात’च्या आधी लोकांची मने जिंकून गेली होती. सुटाबुटातील, टाय घातलेला मराठी माणूस ‘ताजमहाल’, ‘ओबेरॉय ट्रायडण्ट’ हॉटेलांमध्ये मीटिंगा घेतो आणि दक्षिण मुंबईत गृहप्रकल्प उभे करतो हे दृश्यच उमेद वाढवणारे होते. त्याला तोडीस तोड दुसरे नाव सुचते ते परांजपे यांचे. परांजपे उत्तम गृहप्रकल्प उभे करतातच, परंतु ‘अथश्री’सारखी निवृत्तीनंतरच्या जीवनाची एक शैली निर्माण करतात. ती जगभर पसरली जाते. हे मराठी माणसासाठी अभिमानास्पदच होय. त्यातील ‘डीएसके’ कोसळले. त्यामुळे मराठी मन दु:खी होणे अगदी स्वाभाविक आहे.

डीएसके, परांजपे यांच्यासारख्या यशस्वी उद्योजकांना मोठे कोंदण लाभले ते गेल्या काही दशकांत मराठी माणसांमध्ये घडून येत असलेल्या बदलाचे. मराठी माणूस फक्त नोकरीच्या लायकीचा असे नक्की नाही. अशी भावना गेल्या दोन-तीन दशकांत तयार झाली. केवळ देशात नव्हे तर विदेशांत व्यापार-उद्योग करून नाव कमावलेले काही मराठी उद्योजक आहेत, त्यामध्ये मसाले-विक्रीवाले दातार, सिपोरेक्सचे शिर्के, पूल-हायवे बांधणीतील म्हैसकर, कुबल-खामकर आणि बेडेकर अशी लोणची-मसाले व्यापारातील मंडळी आहेत. काही मराठी उद्योजकांनी थोड्या वेगळ्या वाटा चोखाळून, उद्योग-व्यवसायात उडी मारलेली दिसते. चार दशकांपूर्वी राजा पाटील ह्यांनी टुरिझम अर्थात सहल या वेगळ्या आणि त्या काळात कमी प्रमाणात असलेल्या व्यवसायाला सुरुवात केली आणि त्यांचे बस्तान बसवले. त्यांनी ‘राजा ट्रॅव्हल्स’मधून काश्मीर-दर्शनास आरंभ करून दिला. ‘केसरी’, ‘वीणा’चा ताजा इतिहास सर्वांना ज्ञात आहेच. सहल आणि पर्यटन क्षेत्रात शरद किराणे, जकातदार, चौधरी ह्यांची यात्रा कंपनी अशी काही मंडळी नाव कमावती झाली. तो व्यवसाय आता खूपच विस्तारला आहे. पैकी ‘सचिन ट्रॅव्हल्स’ने एक ग्राहक-वर्ग निर्माण केला. पुढे ती कंपनी टिकू शकली नाही. लग्नाची कंत्राटे घेणारे नामवंत केवळ मुंबई-पुण्यात नव्हे तर शहराशहरांत नि गावागावात आहेत. त्याखेरीज लोणी म्हटले, की  सामंत, मिठाईसाठी पणशीकर, बाकरवडी –बर्फी –दुधासाठी पुण्याचे चितळे, टोपीवाले गोखले, खानावळ आणि भोजनालये –ह्याकरता दुर्गाश्रम, विनय लंच होम, आस्वाद, प्रकाश, दत्त स्नॅक्स अशी काही नावे मराठी डोळ्यांसमोर आहेत. ठाण्याहून किरण भिडे व सनी पावसकर त्यांचा नवा ब्रँड एस्टॅब्लिश करू पाहत आहेत. आयटी, सॅनेटरी नॅपकिन, संगणक आणि इंटरनेट; तसेच, विविध सेवा क्षेत्रात सेवा पुरवणारे छोटे-मोठे मराठी उद्योजक माहितीत असतात. त्याआधी किर्लोस्कर, गरवारे, पेंढारकर, खातू,  कोंडुसकर, लागुबंधू, पेठे, पेंडुरकर, पेडणेकर, गाडगीळ, गोखले-देसाई, साठे-जोशी अशी अनेक आडनावे… त्यांची घराणी उद्योग-घराणी म्हणून ख्यातकीर्त झाली.

‘डीएसके’ यांनी घरबांधणी क्षेत्रात उडी मारली आणि उत्तम बांधकाम, परवडणारी किंमत व कल्पक प्रकल्प उभारून त्यांचे नाव प्रस्थापित केले. ज्या क्षेत्रात भल्या-भल्या अमराठी बिल्डर-मंडळींची मोनोपोली होती तेथे ‘डीएसके-विश्व’ उभारले गेले. यशाची कमान उंचावत असताना, रिअल इस्टेट क्षेत्रात ‘मंदी’ सुरू झाली, त्यापाठोपाठ आलेल्या नोटाबंदीने सगळ्यांनाच जायबंदी केले. घर-बांधणी उद्योगाला घरघर लागायचीच बाकी होती. खूप प्रकल्प करायचे म्हणून जमिनी घेऊन ठेवलेल्या, लोकांकडून ठेवी स्वीकारलेल्या, पुढील बांधकाम-चक्र ठप्प होऊ लागले. ठेवींवरील व्याज देण्याइतके खेळते भांडवल हाती उरले नाही अशा अनेकविध कारणांनी ‘डीएसके’ यांचे रथचक्र रुतू  लागले. सुरुवातीचा संयम आणि इतक्या वर्षांच्या विश्वासाचा बुरुज ढासळू लागले. आपापसांतील कुजबुज सोशल मिडियाच्या चव्हाट्यावर पसरून बोभाटा झाला आणि नकारात्मकतेचा ज्वालामुखी उसळला. हे सर्व इतक्या पराकोटीला गेले, की ‘डीएसके’ ह्यांची तुलना थेट विजय मल्या या देश सोडून गेलेल्या बदनाम उद्योगपतीशी केली गेली! ‘डीएसके’ यांनी वारंवार सांगितले, की मला सर्वांचे पैसे परत द्यायचे आहेत! जमिनी किंवा अन्य मालमत्ता विकून पैसे उभे करण्याची प्रक्रिया होण्यासाठी अमुक एक कालावधी लागतो, तोवर धीर धरून त्यांना ‘एक संधी’देण्याचा विचार कोणालाच कसा सुचला नाही? त्यांना त्यांचा आर्थिक गोंधळ –गैरव्यवहार किंवा चुकीचे निर्णय यांचे परिणाम निस्तरण्याची संधी न देता आरोप सिद्ध झाले आहेत हे गृहीत धरून कोंडीत पकडायचे? एका प्रस्थापित उद्योजकाला –बांधकाम-क्षेत्रातील नामांकित मराठी बिल्डरला व्यवसायातून आणि जीवनातून कायमचे उठवायचे?

‘डीएसके’ यांच्यासारखा गोंधळ होऊन नेस्तनाबूत झालेले, होत असलेले अशी दोन उद्योजकांची उदाहरणे आठवतात. एक ‘सचिन ट्रॅव्हल्स’. त्याचे चालक मालक सचिन जकातदार यांचीही प्रतिमा मराठी जगामध्ये उज्ज्वल होत गेली होती. त्यांनी पर्यटन व्यवसायात काही संकेत निर्माण केले. परंतु त्यांचा व्यवसाय अकस्मात बुडाला. जकातदार यांच्या ‘ट्रॅव्हल्स’चे नामोनिशाण राहिले नाही. जकातदार यांचे पतन मराठी मनाला डाचून राहिले आहे. ‘डीएसके’ यांचा व्यवसाय कोसळल्यानंतर तशीच आपत्ती नाशिकच्या ‘गावकरी’ वर्तमानपत्राचे मालक अरविंद आणि वंदन पोतनीस यांच्यावर ओढवली आहे. मात्र त्यांच्याबाबतच्या वदंता त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करणा-या नाहीत. त्यांनी म्हणे धंद्यासाठी उभा केलेला निधी जमिनीमध्ये गुंतवला आणि गेल्या एक-दोन वर्षांमध्ये जमिनीचे भाव जसे पडत गेले तसे ते ‘डीएसके’ यांच्याच प्रकारच्या दुष्टचक्रात सापडले. येथे ही गोष्ट मुद्दाम नमूद करायला हवी, की ‘डीएसके’ यांच्याबद्दल जी हळहळ मराठी माणसांमध्ये व्यक्त केली जाते ती भावना पोतनीस पिता-पुत्रांच्या वाट्यास आलेली नाही.

यातून एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येतो, की विश्वासार्हता हा उद्योगविश्वात सर्वात मोठा घटक असतो. तो सांभाळून मराठी माणसाला उद्योगधंदा उभारता येतो का? तो चालवता येतो का? धंद्याचे जे मुख्य सूत्र आहे, की पैसा कशासाठी मिळवायचा तर तो पैशासाठी! तो उद्योजकाच्या मनीच्या गरजेचा एक विश्वास आहे; म्हटले तर स्वभावप्रवृत्ती आहे. ती सहसा अल्पसंतुष्ट वृत्तीच्या मराठी माणसामध्ये आढळत नाही. त्यामुळे ‘डीएसके’, ‘सचिन ट्रॅव्हल्स’ अशी धंद्यातील यशापयशाची उदाहरणे पाहिली, की मराठी माणसाच्या मूळ वृत्तीबाबत चर्चा सुरू होते. त्यासाठी उघड दाखले असतात ते किर्लोस्कर, गरवारे यांचे. ते तर उत्पादन क्षेत्रात भारतभर नाव कमावलेले उद्योजक. त्यांचासुद्धा वाढत असलेला उद्योग आक्रसत गेला. ‘राज्य वैराग्याने उपभोगावे’ हा मराठी माणसाला रामदास व शिवाजीराजे यांनी दिलेला बोध आधुनिक व्यापारप्रभावी जगामध्ये या त-हेने मराठी माणसास त्रस्त करून राहिला आहे का?

या परिस्थितीत मराठी मनास दिलासा वाटावा अशी घटना घडत आहे, तीही जाणून घेउया. मंदार जोगळेकर यांच्या ‘ग्लोबल सेतू’तर्फे घोषणा करण्यात आली आहे; ती म्हणजे जगातील तमाम मराठी माणसांनी ‘आपल्याच’ डीएसके यांना मदतीचा आर्थिक हात देण्यासाठी शाब्दिक करुणा –सहानुभूतीचे भाकड पाझर न पसरवता, त्यांच्या पदरचे काही पैसे हातभार म्हणून पुढे करावेत, जेणेकरून आर्थिक कोंडीत सापडलेल्या ‘डीएसके’ यांना त्यांच्या प्रामाणिक भावनांप्रमाणे खरोखर वागण्याची संधी मिळेल. कारण आजच्या घडीला त्यांच्या सर्व कंपन्या; तसेच, वैयक्तिक बँक-खाती गोठवली गेली आहेत. पैसा असूनही त्याचा विनियोग नाही करता येत, अशा प्रसंगी एक अडचणीत सापडलेला बांधव – आजवर यशस्वी म्हणून नावाजला गेलेला मराठी उद्योजक हताश होऊ नये, त्याला काडीइतकी का होईना आर्थिक मदत करावी म्हणून स्वतः उद्योजक असलेल्या मंदार जोगळेकर (बुक-गंगा – ऑन-लाईन पुस्तक विक्रीचे प्रणेते) ह्यांनी सद्भावनेतून जगभरातील सर्व मराठी माणसांना आवाहन केले आहे. संकटात सापडलेल्या माणसाला मदतीचा हात देणे या भावनेतून आपण सर्वानी किमान एक हजार रुपये या घडीला काढुया आणि आर्थिक गर्तेत सापडलेल्या आपल्या बांधवाला बाहेर पडण्यासाठी सक्रिय असा पुढाकार घेउया. त्यांची संकल्पना धाडसी आहे. ते म्हणतात- “पाच दिवसांत –पाच लाख मराठी लोकांनी एकत्रित होऊन ‘डीएसके’ यांना मदतीचा हात देउया.” मुंबई म्हणा, महाराष्ट्र म्हणा किंवा जगात एकूण किमान पाच लाख मराठी माणसे तयार होणे अवघड आहे का? शिवाय हे जे प्रत्येकी एक हजार रुपये द्यायचे आहेत, त्याच्या बदली त्यांना जगातील मराठी माणसांच्या –विविध गटांतील (व्यावसायिक, नोकरदार) नेटवर्किंगचे सदस्यत्व मिळणार आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसाय-वृद्धीसाठी आणि संपर्कासाठी उपयोग होऊ शकेल. तात्कालिक फायदा असा, की त्यांनी ‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणून डीएसके यांच्यासारख्या अडचणीत सापडलेल्या मराठी उद्योजकाला मदतीचा हात दिला हे समाधान लाभेल! मदतीची ही कल्पना आजच्या घडीला ‘डीएसके’ ह्यांच्यासाठी उपयोगात आणली जाणार असली, तरी पुढे कोणा मराठी उद्योगपतीला अशी काही आर्थिक अडचण आली तर तो ‘निधी’ त्यालादेखील बाहेर पडण्यासाठी उपयोगी पडू शकेल.

ग्लोबल सेतूच्या उपक्रमाबद्दल अधिक माहिती –

www.GlobalSetu.com,

‘Global Setu’ App – www.globalsetu.com/applink.aspx

– राजीव जोशी   

About Post Author

Previous articleपेशवाई थाट!
Next articleयज्ञसंस्कार
राजीव जोशी हे लेखक तसेच बँकिंग, फायनान्स अभ्यासक व ट्रेनर आहेत. त्यांनी एम.कॉम [बँकिंग], एल एल बी, पी.जी. डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. ते गेली 15 हून अधिक वर्षे बँकिंग,फायनान्स,अर्थ-विषयक लिखाण करत आहेत. महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, नवशक्ती, सामना, सकाळ आणि मासिकांतून लेखनाद्वारे आर्थिक साक्षरतेचा त्यांनी प्रसार केला आहे. करिअर ग्राफ ,ई लर्निंग तसेच एकांकिका व नाट्य-विषयक त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. नाट्यछटा लेखनासाठी 'आशीर्वाद' पुरस्कार आणि प्रायोगिक नाटकबाबत बोरीवली नाट्यपरिषदेतर्फे रंगप्रयोग पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9322241313