झोपडपट्टी ते इस्रो – प्रथमेश हिरवेची गगनभरारी

3
16
_ZopadpattiTeISRO_PrathameshHirwe_1.jpg

पवई फिल्टरपाडा झोपडवस्तीत (नीटी चाळ) राहणारा प्रथमेश 22 जानेवारीला इस्रो विभागीय प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणून हजर झाला आहे. त्याचे वडील सोमा हिरवे हे मरोळ येथे महानगरपालिका शाळेत शिक्षक आहेत तर त्याची आई इंदू सातवीपर्यंत शिकलेली आहे. ती गृहिणी आहे. त्याचा लहान भाऊ निखिल बारावीत सायन्सला शिकत आहे. असे छोटे चौकोनी कुटुंब 10 x 10 च्या घरात राहते. त्या छोट्या घरात प्रथमेशने शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहिले व त्याने ते साध्य केले!

त्याचे मित्र व शेजारीपाजारी त्याला नेहमीच अभ्यास करताना बघायचे. तो रात्रंदिवस अभ्यास करायचा. शेजारीपाजारी विचारायचे, ‘ह्याला व्हायचंय तरी कोण?’ प्रथमेशचे उद्दिष्ट ठरलेले होते. त्याला इंजिनीयर व्हायचे होते किंवा शास्त्रज्ञ. तो जराही त्यापासून विचलीत झाला नाही. प्रथमेश शाळेत कॅरम खेळायचा, स्पर्धेत भागदेखील घ्यायचा. त्याला पोहण्याची आवड होती. तो विहार लेकमध्ये नियमित पोहण्यास जाई.

विद्यार्थ्यांची दहावीत असताना त्यांनी मोठेपणी नेमके काय शिकायला पाहिजे, त्यांचे अभ्यास किंवा नोकरी व्यवसायाचे क्षेत्र काय असावे यासाठी कलचाचणी घेतली जाते. प्रथमेश त्या चाचणीला गेला. प्रथमेशचा कल त्या चाचणीने कला शाखेकडे (इंग्रजीत आर्ट्स) दाखवला. पण प्रथमेशला ते मान्य झाले नाही. तो वडिलांना म्हणाला, ‘मी इंजिनीयरच बनणार!’ त्याने तो कोणत्याही परिस्थितीत अभियंता होणार हे पक्के ठरवून ठेवले होते. त्याने विलेपार्ले येथील ‘भागुबाई मफतलाल पॉलिटेक्निक’मध्ये विद्युत अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतला. ती त्याच्या इंजिनीयर म्हणून शिकण्याच्या ‘स्ट्रगल’ची सुरुवात होती.

त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाले होते. तो डिप्लोमाच्या वर्गात मागच्या बेंचवर बसायचा, कारण काय? तर सरांनी काही विचारले तर तो बोलणार कसा? त्याला इंग्रजीत बोलायचे कसे याचीच धास्ती वाटे. त्यामुळे त्याला पहिली दोन वर्षें फार कठीण गेली. तो प्राध्यापकांना भेटला. त्याने त्याची भाषेची अडचण सरांच्या कानावर घातली. सरांनी ‘शब्दकोश उपयोगात आण आणि इंग्रजीची भीती मनातून काढून टाक’ असे सांगितले. तो 2007 ला डिप्लोमा परीक्षा चौऱ्याऐंशी टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला व ‘एल अॅण्ड टी’ कंपनीत इंटर्नशिप करू लागला. तेथे प्रथमेशची चुणूक बघून अन्वेष दास या तेथील अधिकार्यांने त्याला डिग्री करण्याचा सल्ला दिला. त्याला नवी मुंबईतील ‘इंदिरा गांधी इंजिनीयरिंग कॉलेज’ला डिग्रीसाठी प्रवेश मिळाला. तो विद्युत अभियांत्रिकीचा पदवीधारक 2014 मध्ये बनला.

त्याने मध्यंतरी युपीएससीची परीक्षा दिली होती. तो ती नापास झाला. परंतु त्याची जिद्द संपली नाही. तो शोध घेत राहिला. हैदराबादच्या ICSE संस्थेकडून त्याला मार्गदर्शन मिळाले. तेथेच त्याला इस्रोची माहिती मिळाली. त्याने 2015 ला इस्रोची परीक्षा दिली व तो ती पासही झाला. त्याला मार्च  2016 ला मुलाखतीसाठी बोलावले गेले. पद एकच. तो त्यात निवडला गेला नाही…. परंतु तो निराश झाला नाही. त्याची दिशा ठरली गेली होती. तो नव्या जिद्दीने तयारीला लागला. इस्रोची शास्त्रज्ञांसाठी नोकरीची जाहिरात पुन्हा आली. त्यावेळी नऊ जागा होत्या. तो परीक्षेला बसला.

‘इस्रो’च्या परीक्षेसाठी सोळा हजार मुले बसली होती. त्यांपैकी अकरा उमेदवार निवडले गेले. तो अखेरच्या नऊ जणांतही निवडला गेला. तो रिझल्ट 14 नोव्हेंबर 2017 ला लागला.

प्रथमेशची निवड  झाल्याचे आई-वडिलांना कळले तेव्हा ते खुश झाले. ‘इस्रो’ हा शब्द शेजाऱ्यापाजाऱ्यांनी कधी ऐकला नव्हता. साऱ्या झोपडवस्तीत आनंद पसरला… हिरवे यांच्या सातारा जिल्ह्यातील दहिवली या मूळ गावीही त्याचे कौतुक झाले. त्याच्या जिद्दीचा, अभ्यासू वृत्तीचा अखेर विजय झाला.

दरम्यान, तो महापारेषण कंपनीत सहाय्यक अभियंता म्हणून रुजू झाला होता. तेथेही त्याचे कौतुक झाले. तेथील त्याला नोकरीतून मुक्त करण्याच्या प्रक्रिया भराभर पार पाडल्या गेल्या. नोकरी सोडताना भरण्याचा एक लाख रुपयांचा बाँड माफ केला गेला.

प्रथमेशला अवकाश संशोधनाचे दार उघडले गेले आहे. त्याची भरती सायंटिस्ट-इंजिनीयर-सी या पदी झाली आहे. तो जिद्दीचा तरुण आहे. तो भविष्यात उंचच उंच झेप घेईल यात शंका नाही…

– श्रीकांत पेटकर

About Post Author

Previous articleमातीत रुजलेल्या शिक्षणाची सुरुवात
Next articleअक्षर चळवळीतील के के
श्रीकांत बापुराव पेटकर हे महापारेषण (MSEB) कंपनीत पडघे (तालुका भिवंडी) येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. पेटकर यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या वीज केंद्रास सलग तीन वर्षे उत्कृष्ट वीज केंद्राचा पुरस्कार मिळाला. त्यांना लेखनाची आवड असून त्यांची ‘आणि मी बौद्ध झालो‘ या अनुवादित पुस्तकासोबत कल्याण, शांबरीक खरोलिका, चांगुलपणा अवतीभोवती, बेहोशीतच जगणं असतं, गजल अशी आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पेटकर यांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्यांच्या चित्रांची दोन प्रदर्शने भरली होती. त्यांना ‘कल्याण रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

3 COMMENTS

  1. परिस्थितीवर मात करून …
    परिस्थितीवर मात करून प्रथमेशने मिळवलेल्या यशाचे खूप कौतुक !

  2. प्रथमेशने आपले अनुभव आदिवासी…
    प्रथमेशने आपले अनुभव आदिवासी दलीत आणि भटकेविमुक्त समाजातील मुलांसमोर बोलले पाहिजेत. अनेकजण प्रेरणा घेतील. आपल्या समाजाला आपणच दिशा दिली पाहिजे. त्याचे आमच्या बस्तरमध्ये केव्हाही स्वागत आहे. अभिनंदन!

Comments are closed.